एका सामान्य स्त्रीचा मुंबईची ‘गॉडमदर’ होण्यापर्यंतचा प्रवास!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या श्रद्धा कपूरच्या ‘हसीना पारकर चित्रपटामुळे ह्या “गॉडमडर” ची बरीच चर्चा झाली. ज्यांनी तिचे नाव कधीही ऐकले नाही त्यांनी आणि ज्यांना माहित आहे की, ती कोणाची बहिण आहे त्यांनीसुद्धा बरीच चर्चा केली. आणि त्यामुळेच एक गट असाही होता जो या चित्रपटाला विरोध करत होता. तिचे उदात्तीकरण करणे त्यांना मान्य नाही. असो तो वाद आपण बाजूला ठेवू आणि ‘हसीना पारकर’ हिच्या जीवनाचा संक्षिप्त आढावा घेऊ.
२१ एप्रिल २००७ रोजी तब्बल २० वर्षांनी तिचे नाव पोलिसांच्या रजिस्टरमध्ये दाखल झाले आणि एरियातील सर्वांची ‘आपा’ पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. या ‘आपा’ची अजून एक ओळख म्हणजे जगातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहीमची ती सख्खी बहीण होती.
१९५६ मध्ये जन्माला आलेली हसीना दाउदपेक्षा छोटी आणि आपल्या १२ भावंडांमध्ये सातवी होती. दाउदने आपला भाऊ शब्बीर इब्राहीम कासकर बरोबर डी-कंपनी सुरू केली. दाउदच्या चार बहिणी होत्या – सईदा, फरजाना, मुमताज आणि हसीना. परंतु त्याच्या अंडरवर्ल्डच्या धंद्यामध्ये कोणतीच बहिण नव्हती. पण अखेर हसीना पारकरने मात्र या दलदलीमध्ये पाउल ठेवलेच, त्याला कारण ठरले तिच्या पतीची हत्या आणि पुढे ती बनली- मुंबईची ‘गॉडमदर’!
दाऊदच्या गुन्ह्यांमुळे ८० च्या दशकात त्याला देश सोडणे भाग पडले. पण तो बाहेर राहून मुंबईवर नियंत्रण ठेवून होता. प्रोटेक्शन मनी वसूल करणे, मर्डर आणि दुसऱ्या बेकायदेशीर धंद्यांमध्ये दाउदचा हात होता. कालांतराने मुंबईमध्ये अनेक नवीन गँग उदयास आल्या आणि त्यांच्या आपापसात होणाऱ्या वादांमुळे त्या काळी मुंबईत खूप रक्त वाहिले.
९० च्या दशकामध्ये दाउदच्या निशाण्यावर BRA गँग होती. BRA म्हणजेच बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी. या गँगचा प्रमुख रमा नाईक होता. रमा नाईक आणि बाबू रेशीम हे मारले गेल्यानंतर या गँगचा प्रमुख अरुण गवळी झाला. १९९० मध्ये दाउद हा गवळीचे सर्व शुटपर्सन एक –एक करून मारत होता. दाउद हा अतिशय धूर्त होता, त्यामुळे अरुण गवळीला त्याच्या गँगचा कोणीच माणूस हाती लागत नव्हता, जो त्याला दाउदपर्यंत पोहोचवू शकेल. जेव्हा दाउदने अरुण गवळीचा भाऊ पापा गवळी याची हत्या केली, तेव्हा खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये गँग वॉरचे वारे वाहू लागले.
मुंबईच्या क्रिमिनल इंडस्ट्रीचा एक अघोषित नियम आहे की, कोणाच्याही घरच्यांना आपल्या शत्रुत्वामध्ये आणायचे नाही. ज्याच्याशी तुमचे वैर आहे त्याच्याशीच तुम्ही दोन हात करायचे. हा नियम पोलिसांना सुद्धा लागू होता. पण संतापलेल्या गवळीने तो नियम तोडला आणि त्याने दाउदची बहिण हसीना पारकर हिचा नवरा इस्माईल इम्ब्राहिम पारकर याची हत्या करवली.
जेव्हा छोटा राजनने दाउदला कळवले की, इस्माईलला मारणारे लोक जेजे रुग्णालयात पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये आहेत. तेव्हा दाउदने यूपीचा गँगस्टर बृजेशसिंह आणि त्याच्या दोन शुटर्सना त्यांची सुपारी दिली. या गँगवारमध्ये पहिल्यांदाच एके-४७ चा वापर करण्यात आला होता. यामध्ये संशयित शैलेश हळंदकर याची हत्या करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या बिपीन शेरेला दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवले असल्याने तो वाबचावला. यामध्ये दोन पोलिसांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला.
इस्माईलचा बदला घेतल्यानंतर हसीना आपल्या नवीन नागपाडाच्या गार्डन हॉल अपार्टमेंट मध्ये शिफ्ट झाली. हसीनाने तिथे आपला अड्डा जमवला आणि आपले क्राईम सिंडीकेट सुरु केले. दाउदने भारत सोडल्यानंतर त्याच्या बेनामी संपतीची देखरेख करणे हे काम हसीनाचे होते, पण स्वत: धंद्यामध्ये आल्यानंतर हसीना त्यात अधिक गुरफटली. भरपूर ताकद, तिला घाबरून असलेले लोक, प्रत्येक बेकायदेशीर कामांमध्ये सहभाग आणि मुंबईमध्ये प्रत्येक इमारत बनण्याअगोदर तिची परवानगी घेतली जाई, या गोष्टींमुळे हसीनाला आपणच मुंबईवर राज्य करत आहोत असे वाटू लागले.
असे म्हणतात दाउदला तिच्या या बदलत्या स्वभावाचा राग येऊ लागला. कारण दर महिन्याला तो आपल्या बहिणींना कोट्यावधी रुपये पाठवत असे, पण ते कमी म्हणून की काय हसीना काही अंडरवर्ल्डच्या धंद्यातून बाहेर पडू इच्छित नव्हती.
मुंबईमध्ये २००६ च्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे काम खूप मोठ्या प्रमाणात चालू होते. तेव्हा हसीनाने बिल्डर कृष्ण मिलन शुक्ला आणि प्रॉपर्टी ब्रोकर चंद्रेश शाहच्या बरोबर वडाळ्यामध्ये एक छोटी झोपडपट्टी पुनर्वसन करण्याची योजना आखली. त्यासाठी एक कोटी रुपयांची गरज होती. या तिघांनी अजून एका प्रॉपर्टी ब्रोकर विनोद अल्वानीला पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले. त्याने डेव्हलपर जयेश शाहच्या मदतीने १ कोटी रुपये जमा केले. पण हा प्रोजेक्ट सुरू होऊ शकला नाही.
ज्यावेळी जयेशने पैसे मागितले तेव्हा विनोदने फक्त ७० लाख रुपये परत केले. बाकीचे पैसे हसीनाने प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली देण्यास नकार दिला. डिसेंबर २००६ मध्ये विनोद अल्वानीने क्राइम ब्रांचमध्ये तक्रार केली, पण तेथील अधिकाऱ्यांनी त्यांची FIR घेण्यास नकार दिला. त्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंध विभागामध्ये पोहोचले आणि त्यांनी आरोप केला की,
“क्राईम ब्राँचच्या अनिल महाबोले आणि राजेंद्र निकम यांनी FIR लिहून घेण्यासाठी १० लाखांची लाच मागितली होती.”
२१ एप्रिल २००७ मध्ये ही केस खंडणी प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्यात आली आणि हसीनावर FIR दाखील करण्यात आली.
बॉलीवुडच्या चित्रपटांना ओवरसीज देशांमध्ये राइटस मिळवून देण्यासाठी हसीना वाटाघाटी करत असे. खासकरून त्या चित्रपटांसाठी जे रशिया आणि आखाती देशांमध्ये रिलीज होतात. हसीना हवाला रॅकेटमध्ये सुद्धा सहभागी होती. मुंबईतील केबल वॉर वर देखील हसीनाचेच नियंत्रण होते. केबल वितरक आपला भाग ठरवून घेण्यासाठी हसीनाकडे जात असतं. हसीनाच्या सांगण्यावरून कोणीही केबल वितरक एकमेकांच्या विभागामध्ये घुसखोरी करत नसतं, हसीना त्यांच्याकडून बक्कळ पैसा उकळत असे आणि त्या बदल्यात त्यांना प्रोटेक्शन देत असे.
हसीनाच्या कमाईचा सर्वात मोठा भाग जबरदस्ती खंडणी गोळा करण्यातून येत असे. लोकांचे वाद मिटवण्यासाठी देखील ती पैसे वसूल करत असे.
हसीनाच्या कुटुंबामध्ये पती, दोन मुले आणि दोन मुली होत्या. हसीनाच्या छोट्या मुलाचे नाव आली शाह होते. तिच्या मोठ्या मुलाचा २००६ मध्ये अपघाती मृत्यू झाला होता, त्याचे नाव दानिश होते, तो आपल्या आईबरोबर तिच्या धंद्यांमध्ये तिला मदत करत असे. हसीनाकडे २०१४ पर्यंत तब्बल पाच हजार कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे बोलले जाते.
६ जुलै २०१४ रोजी रमजानच्या महिन्यामध्ये हसीना पारकरचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि मुंबई मधील आणखी एका क्रूर प्रवृत्तीचा न्याय थेट देवानेच केला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.