रॉस व्हिटेले नाही, आमच्यासाठी युवराजच आहे ‘सिक्सर किंग’ !
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – केदार गोगारकर
—
तारीख 19 सप्टेंबर 2007. पहिलावहिला टी-ट्वेंटी वर्ल्डकप. भारत विरुद्ध इंग्लंड.
पहिली फलंदाजी करणाऱ्या भारताचा पाया, गंभीर 58 आणि सेहवाग 68 धावा काढून बाद होण्यापुर्वी रचुन गेले होते. पुढे विकेटही पडली आणि रनसुद्धा निघत होते.
सामान्यपणे चालू असणारा हा खेळ बघणाऱ्या प्रत्येकाला आयुष्यभर लक्षात राहावा, ही मात्र नियतिचीच इच्छा होती.
विकेट गेली आणि फलंदाजीला आला युवराज सिंग!
बघता-बघता नियतिने आपली कड बदलली. सामन्याचे आणि पर्यायाने वर्ल्ड कपचेही भवितव्य बदलणारी घटना घडली. अठरावा ओव्हर संपतांना स्लेजिंग प्रकारात विशेष प्रावीण्य असणाऱ्या इंग्लंड संघातील सर्वोत्कृष्ठ ऑलराउंडर एंड्रयू फ्लिंटॉफने युवराजला उद्देशुन शेरेबाजी केली.
सामान्यतः आपल्या शेरेबाजीने, एकाग्रता हरवली की फलंदाज विकेट फेकून देतो, हा अनुभव असणाऱ्या इंग्लंडने सवयीप्रमाणे डाव टाकला. उंचधिप्पाड फ्लिंटॉफने युवराजवर शाब्दिक कुरापतिचा मारा केला. काढ़लेली खोड उलटण्याची जरा ही शक्यता न वाटणारा फ्रेडी, युविच्या वाग्बाणांनी आश्चर्यचकित झाल्याने बड़बड़ करत समोरून बोलत मागे चालत, मध्येच कुत्सित हसत होता.
चवताळलेला सिंह गर्जना करत अंगावर चालुन जातोय, हे बघून बाकिच्यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ओठ तर थंडावले होते पण डोकं मात्र गरम होतचं, जे वचपा मागतं होतं.
प्रेक्षकही अचानक झालेल्या नाटकीयं दृश्याने उत्साहित झाले. शेवटुन दूसरा ओव्हर असल्याने संघालाही अश्या फटकेबाजीची अपेक्षा होती, जी भारताला सुरक्षित धावसंख्या काढून देईल.
एकोणविसावा ओव्हर घेऊन आला स्टुअर्ट ब्रॉड. खरे तर पहिला बॉल मिडविकेटवरुन ज्या पद्धतीने मैदानाबाहेर पाठवला, त्यावरुनच या डावखुऱ्या फलंदाजाचे इरादे स्पष्ट झाले होते. दूसरा पायावर टाकलेला बॉल फक्त फ्लिक करून 119 मिटरवर जाऊन पडला, तेव्हा टायमिंगची जादू साऱ्या जगाने अनुभवली.
फ्लिंटॉफने केलेल्या कर्माची फळ मात्र बिच्चारा ब्रॉड भोगत होता. तीसरा मारलेला फटका, कव्हर्सवरुन बॉल थेट बाउंड्री पार करण्यासाठी पुरेसा होता.
कुरापत काढ़णारा फ्लिंटॉफ, कर्णधार कॉलिंगवुड आणि हतबल झालेला गोलंदाज ह्यांची मैदानावरची मीटिंग, साइड बदलुन बघु, ह्या निर्णयाने संपली. अराउंड द स्टम्प्स ने टाकलेला बॉल दिशा चुकुन अगदी सोईच्या उंचीवर ऑफ स्टम्प बाहेर पडला आणि बॅकवर्ड पॉइंटवरुनही घणाघाती सिक्स बसला.
काहीतरी विशेष घडतय हे आता प्रेक्षकांनाही जाणवत होते. साइड बदलण्याची आयडियासुद्धा फ्लॉप झालेल्या ब्रॉड हा परत ओव्हर द विकेट आल्यावर स्टंप्स टार्गेट करणार, हे ओळखून आधीच किंचित वाकलेल्या युवराजने; मिडविकेटवरुन अगदी सहज पण तेवढ़्याच उत्तुंग षटकाराने उत्तर दिले.
रडकुंडी आलेला ब्रॉड कसाही करुन,निदान शेवटचा बॉल तरी थेट सीमारेषेपलीकडे जाण्यापासुन रोखावा, एवढाच धावा मनोमन करत असावा.
इकडे युवराज मात्र पाच बॉलमध्ये पाच सिक्स मारल्याने काहीही झाले तरी सहाव्वाही मारायचाचं, ह्या निर्धाराने मैदानात उभा होता. ह्या आधी सलग सहा षटकार मारण्याचा भीमपराक्रम करणाऱ्यांपैकी एक असलेला रवी शास्त्री स्वतःच कॉमेंट्री करत होता.
‘किंग्समीड ऑन अ ट्रीट’ म्हणत प्रेक्षकांनी लुटलेला फटक्यांचा आनंद शब्दात वर्णन करणारा हा विश्वविक्रमी माजी खेळाडू, असेच काहीसे आज मैदानात घडण्याची अपेक्षा करीत होता. ब्रॉड फॉलोथ्रूवर जाऊन थांबला होता आणि करीयरमधील सर्वात कठीण बॉलपैकी एक टाकायला ब्रॉड रनअपवरुन सुटला.
अख्खे मैदान उभे राहुन ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनत होते.
ब्रॉडच्या हातातुन शेवटचा चेंडू सुटला. तेवढ्याच जोराने तो चेंडू युवराजने मारला आणि गगनचुंबी फटका थांबला तो थेट प्रेक्षकात जाउनच. सहावा बॉल हाही एक उत्तुंग सिक्सरच होता.
नुकताच इतिहास घडुन गेला होता. टी-20 सामन्यात सलग सहा षटकार मारणारा पहीला खेळाडू युवराज सिंग बनला होता.
हजारो लोकांनी हा सोनेरी क्षण, डोळ्यात कायमचा साठवला. युवराजपेक्षा भारतीय संघ, मैदानावरील एकुण एक प्रेक्षक, नव्हे नव्हे जगभरातला प्रत्येक भारतीय सुखावला गेला होता.
ईट का जवाब हा धमाक्याने देउन युवराजने, जगभरातील क्रिकेटरसिकांना मेजवानीच दिली होती.
त्यानंतर जवळपास सहा महीन्यानंतर विश्वचषकातिल कर्णधार पॉल कॉलिंगवुड म्हणाला होता की, “ब्रॉड आता मानसिक धक्यातुन सावरतोय.”
शारजाहमध्ये सचिनने केलेल्या धुलाईनंतर शेन वॉर्न ला स्वप्नातही सचिनच दिसायचा म्हणे. ईथे तर पार गोलंदाजीची पिसं काढलेल्या युवराजमुळे, ब्रॉडला स्वप्न पडावी एवढ़ीही डुलकी त्या रात्री लागली नसेल तर त्यात काहीच आश्चर्य नाही.
पुढे 2011 वर्ल्ड कपच्या ह्या सर्वोत्कृष्ट खेळाडुने रक्ताच्या उलट्या होत असतांनाही मैदान गाजवतच ठेवले होते. भल्याभल्या लोकांच्या मनात केवळ नामोच्चाराने धडकी भरवणाऱ्या कॅन्सरलाही अखेर युवराजसमोर गुडघे टेकावे लागले. विरोधी संघाच्या चिंधड्या उडवणाऱ्या ह्या रियल लाइफ फायटरने ,स्वतःच्या शरीरात वाढ़णाऱ्या प्राणघातक शत्रुलाही चारीमुंड्या चीत केले.
हा अविस्मरणीय प्रसंग आठविण्याचे कारण म्हणजे, रॉस व्हिटेलेने काउंटी क्रिकेटमध्ये केलेली इतिहासाची पुनरावृत्ती.
अनेक लेखक, आंतरराष्ट्रीय समालोचक, पत्रकार रॉसची तुलना वरील घटनेसोबत करीत आहेत. आकड्यांच्या दृष्टीने बघितले तर दोघांचा ही पराक्रम हा सारखाच, त्याबद्दल रॉसचे अभिनंदन…..पण रॉस भाऊ, सहा बॉल मध्ये सहा सिक्स मारण्याचा जेव्हाही विषय निघेल, तेव्हा आमच्या डोळ्यासमोर येईल ते किंग्जमीड आणि आठवेल तो फक्त आणि फक्त युवराजच….!
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.