आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – संजय दाबके
—
२० जुलै १९६९ रोजी निल आर्मस्ट्राँग ह्यांनी चंद्रावर पाय ठेवला. त्या आठवणींना उजाळा देणाऱ्या काही पोस्ट्स, श्री संजय दाबके, ह्यांनी फेसबुकवर लिहिल्या होत्या. त्या सर्व पोस्ट्स संकलित स्वरूपात देत आहोत.
–
१६ जुलै ला अपोलो ११ नि चंद्राच्या दिशेनी उड्डाण केलं आणि ३ दिवसांनी (२० जुलैला) आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन चंद्रावर उतरले. त्या रात्री सगळ्या जगाचं लक्ष चंद्राकडे लागलं होतं. रेडिओवर लाईव्ह कॉमेंटरी सुरु होती.
मला आठवतंय त्याप्रमाणे माझे वडील ट्रान्सिस्टर वर ऐकत होते…ज्या क्षणी आर्मस्ट्राँग चे ‘ईगल हॅज लँडेड’ हे शब्द त्यांनी ऐकले, त्या क्षणी कडेवरच्या मला त्यांनी आनंदानी उडवून झेललं होतं…
सगळ्या जगात हेच होत होतं…भा. रा. भागवतांच्या ‘चंद्रावर स्वारी’ पासून या विषयाच्या वाचनाला सुरवात झाली.
नंतर ‘मॅन ऑन द मून’ बद्दल जितक शक्य होईल तितकं वाचून झालं होतं. पुढे बरीच वर्षे गेली…अमेरिकेला गेल्यावर २/३ वेळा केप केनेडीला टुरिस्ट म्हणून जाऊन आलो.
कट टू नोव्हेंबर २०१५…
अमेरिकेत फ्लोरिडा मध्ये होतो आणि पत्ता लागला कि माझा फ्रेंच मित्र केनेडी स्पेस सेंटर मध्ये स्पेसशिप लॉन्चिंगचा जो शो आहे, त्याचं काम करतो आहे…! फोन केला तर ‘येणार असलास तर लगेच ये’ म्हणाला.
दुसऱ्या दिवशी पोचलो. या वेळी तिकीट नं काढता कॉन्ट्रॅक्टर साठी असलेल्या प्रवेशातून हेनरि बरोबर आत पोचलो.
तिथे ज्या कन्ट्रोल रूम मधून संपूर्ण अपोलो मोहीम राबवली गेली ति थेट उभी केली होती (हि जागा अक्चुअली ह्युस्टन मध्ये आहे).
एकही माणूस आत नाही, पण १० मिनिटात जणू आपल्या डोळ्यासमोर उड्डाण होतंय असा भास निर्माण करणारा हा शो तिथे तयार होत होता…!
हेनरीला म्हणलं ‘लॉन्च पॅड जवळ जात येईल का?’ म्हणाला प्रयत्न करू…!
२ तासांच्या खूप घासाघीसी नंतर १० मिनिटे जाण्याची परवानगी मिळाली.
माझा पासपोर्ट, कॅमेरा, बॅग सगळं काढून घेतलं आणि हेनरी च्या कृपेने मी थेट ज्या लॉन्च पॅड वरून अपोलो यानं सुटली, आर्मस्ट्राँग सकट सगळे अंतराळवीर जिथून यानात शिरले, त्याच्या १० व्या मजल्यापर्यंत जाऊ शकलो…!
तिथून जवळच असलेली व्हेहिकल असेम्ब्ली बिल्डिंग – जिथे हि अवाढव्य सॅटर्न रॉकेट्स तयार व्हायची ती हि बघितली.
साधारण ७०० फूट उंच x ५५० फूट रुंद x ५५० फूट लांब अशी हि महा प्रचंड इमारत आहे…VAB चंद्र मोहीम हि एक विलक्षण अद्भुत मोहीम होती…प्रत्येक यानातल्या अंतराळवीरांनी प्रचंड धाडस दाखवत ती यशस्वी केली…कित्येकांनी आपले प्राण गमावले…
२० जुलै १९६९…अपोलो ११ चे कमांड मोड्यूल आणि छोटे चांद्रयान ‘ईगल’ वेगळे झाले होते आणि चंद्राच्या पृष्ठभागाकडे वेगाने निघाले होते.
कमांडर कॉलिन्स चंद्रा भोवती फेऱ्या मारत राहणार होता आणि आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन दोघे चंद्रावर उतरणार होते. प्रत्येक पायरीवर ह्युस्टनचे शास्त्रज्ञ, अभियंते बारीक नजर ठेवून होते.
ह्युस्टनच्या फ्लाईट सेंटर मध्ये अनेक TV मॉनिटर्स वर निरनिराळे आकडे चमकत होते. आत्ता पर्यंत तरी सगळं समाधानकारक होतं.
फ्लाईट डायरेक्टर होता जीन क्रान्झ. कुठल्याही आणीबाणीच्या प्रसंगी शांतपणे क्षणात निर्णय घेणारा…त्यानी कंट्रोल रूम चे दरवाजे बंद केले होते…
आता लँडिंगशी संबंध नसलेल्या नासाच्या मोठ्यातल्या मोठ्या अधिकाऱ्याला सुद्धा आत प्रवेश न्हवता…त्यांना काचेच्या पलीकडेच उभ राहावा लागणार होतं. छोट्या चांद्रयानाच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आता सुरु होणार होता.
यान चंद्राच्या पृष्ठभागापासून ३० किलोमीटर अंतरापर्यंत येऊन पोचले होते आणि अचानक…
यानात नील आर्मस्ट्राँगच्या समोरच्या मॉनिटर वर “एरर १२०१..एरर १२०१…” हा अलार्म वाजू लागला. ह्युस्टन मध्ये पण सगळे दचकले.
काय करायचे? या शेवटच्या टप्प्यात चंद्रावर उतरायचे रद्द करून निल आणि बझ आल्ड्रिनला परत बोलवायचे?
यानाच्या ह्या विभागाची जबाबदारी जॉन ऍरोन नावाच्या २६ वर्षाच्या इंजिनिअर कडे होती. निर्णय घ्यायला काही सेकंदच मिळणार होते..जीन क्रान्झ नि शांतपणे वळून प्रश्नार्थक हाक मारली…
“जॉन?”
सेंटर मधल्या सगळ्यांच्या नजरा त्या तरुण इंजिनअरवर खिळल्या होत्या. निर्णय त्याचा होता. जॉनचा मेंदू सुसाट वेगाने विचार करत होता.
एरर १२०१? काय कारण असावे?
त्यांनी पुन्हा आपल्या समोरच्या डिस्प्ले कडे बघितले. लँडिंग करावं कि कुठलाही धोका ना पत्करता दोघांना परत बोलवावं? एवढा खर्च आणि गाजावाजा केलेली मोहीम या क्षणी रद्द?
“गो..नो गो…जॉन?” क्रान्झच्या आवाजाला आता धार आली होती.
जॉन क्षणात भानावर आला आणि त्याला आठवलं कि सिम्युलेटर मध्ये प्रॅक्टिस करताना असाच मेसेज एकदा आला होता…त्यावेळी असं लक्षात आलं होतं कि यानातील कॉम्प्युटरची मेमरी ओव्हरलोड झाल्याने हा मेसेज आला होता. त्यात धोका न्हवता.
“गो फॉर लँडिंग” जॉन नि आत्मविश्वासाने उत्तर दिलं. क्रान्झ ला तेव्हडं उत्तर बास होता…जॉन वर कुठलीही शंका न घेता त्यानी निल ला उत्तर रिले केलं –
“ईगल…यू आर गो फॉर लँडिंग!”
चंद्रयान लँडिंग साठी निघाले…
आता सर्व काही व्यवस्थित सुरु होते. कॉम्प्युटरनीच जिथे लँडिंग करायचे ती जागा ठरवली होती. यान आता चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त २००० फुटांवर पोहोचले होते.
सगळे जग श्वास रोखून बसले होते आणि निल आर्मस्ट्रॉंगला दिसले कि जी जागा लँडिंग साठी निवडली होती ती बरीच खडकाळ आहे. तिथे उतरताना जर यान कलंडले तर परत यायचा मार्गच न्हवता…!
दुसऱ्या क्षणी त्यानी यानाची सूत्रे ऑटो वरून काढून स्वतःच्या ताब्यात घेतली.
समोर एअरपोर्ट नव्हता…जमीन किती टणक की भुसभुशीत याचा अंदाज नव्हता…यानात इंधन मोजकेच होते…या परिस्थिती निल आर्मस्ट्राँग ने समोरच्या खिडकीतून बघत यान उडवायला सुरवात केली.
आल्ड्रिन कमी होणाऱ्या उंचीचे आणि किती सेकंदाचे इंधन शिल्लक आहे त्याचे आकडे वाचत होता. त्याचा एक हात ‘ABORT’ च्या बटनावर होता.
ह्युस्टनच्या कंट्रोल रूम मध्ये कोणाचा श्वास घेतल्याचाही आवाज येत न्हवता. निल शांतपणे खाली बघून योग्य जागा शोधात होता.
शेवटी ठरलेल्या जागे पासून काही किलोमीटर पुढे त्याला लँडिंगला योग्य अशी जागा सापडली आणि सावकाश, जणू नेहेमी तो चंद्रावर लँडिंग करतो, इतक्या सहजतेने नीलचे यान जमिनीवर स्थिरावले…!
आल्ड्रिनने इंधनांच्या आकड्या कडे बघितले. फक्त ३० सेकंदांचे इंधन टाकीत शिल्लक होते. ह्युस्टनला अजूनही कोणाला कंठ फुटत न्हवता…त्याचवेळी निलचे निर्विकार स्वरातले शब्द आले
“ह्युस्टन…ईगल हॅज लॅनडेड.”
अंतराळवीरांशी बोलणाऱ्या कॅपकॉम नि भानावर येऊन उत्तर दिलं…”कॉपी दॅट ईगल…! इथले सगळे लोक काहीवेळ काळेनिळे पडले होते. आमच्या सगळ्यांचा श्वासोच्छवास पुन्हा सुरु झाला आहे…”
अपोलो मोहिमेतल्या अश्या विलक्षण लोकांमुळेच माणूस चंद्रावर उतरू शकला…!
नासाच्या अंतराळ मोहिमांवर हजारो पुस्तके आहेत. माझ्याकडेच ढिगाने आहेत. पण त्यातली ७/८ स्पेशल आहेत.
निल आर्मस्ट्राँग. खरा जागतिक हिरो. पण यानी कधीही आत्मचरित्र लिहिलं नाही. आयुष्याच्या अगदी शेवटी त्यानी दुसऱ्या लेखकाला चरित्र लिहायची परवानगी दिली.
अपोलो ११ नंतर त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःला जगापासून अलिप्त ठेवलं. अगदी मोजके कार्यक्रम सोडले तर कुठेही ‘दीप प्रज्वलन’ करत फिरला नाही.
खरंतर आयुष्यभर सत्कार समारंभ करत आणि भाषणं देत फिरला असता तरी हरकत नव्हती. पण निल मात्र चंद्र मोहिमेबद्दल ‘हे हजारो तंत्रज्ञांचे यश आहे…मी फक्त निमित्त होतो’ हेच आयुष्यभर सांगत राहिला.
त्याच्या बरोबरच्या बझ आल्ड्रिनला मोहिमेच्या आधीपासूनच ‘हा मान निल ला मिळणार आणि आपण नेहेमी चंद्रावर उतरलेला ‘दुसरा’ माणूस म्हणून ओळखले जाणार’ ही खंत होती.
अपोलो ११ च्या आधी बराच काळ त्याने ‘निल जरी मोहिमेचा प्रमुख असला तरी मी चंद्रयानाचा पायलट असल्याने मीच चंद्रावर पहिल्यांदा उतरणं कसं योग्य आहे’ हे नासा मध्ये पसरवायला सुरवात केली.
शेवटी वरच्या अधिकाऱ्यांनी त्याला हा प्रकार थांबवायला लावला. निलनेही त्याला ‘बझ स्वतःची चेष्टा करून घेऊ नकोस’ असं समजावून सांगितलं.
चंद्रावरून परत आल्यावर नीलच्या बरोबरीने मान मिळून सुद्धा बझ या गंडातून बाहेर येऊ शकला नाही. व्यसनांच्या आहारी गेला. त्याला पुन्हा ताळ्यावर येण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत आणि अनेक वर्षे लागली.
आपल्या ‘द मॅग्निफिशण्ट डिसोलेशन‘ या पुस्तकात त्याने हे सगळे मनमोकळे पणे सांगितले आहे.
माईक कॉलिन्स हा अपोलो ११ चा तिसरा अंतराळवीर तर तेव्हढ्याच योग्यतेचा असूनदेखील त्याचं नाव देखील बहुतेकांना आठवत नाही. त्याला मात्र कसलाही गंड नव्हता.
आपली भूमिका किती महत्वाची आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती आणि निल आणि बझ आपल्या शिवाय परत पृथ्वीवर येऊ शकणार नाहीत हे हि त्याला माहिती होतं. त्यानेही एक ‘फ्लाईंग टू द मून‘ हे सुंदर पुस्तक लिहिल आहे.
अपोलो ११ पासून शेवटच्या अपोलो १७ पर्यंत फ्लाईट डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या आणि अंतराळवीरांच्या इतकाच महत्व असणाऱ्या अतिशय कणखर अश्या जीन क्रान्झ याने ‘फेल्यूअर इज नॉट ऍन ऑप्शन‘ हे अफलातून पुस्तक लिहिलं आहे.
यशस्वी अपोलो ११ पेक्षा सुद्धा अपघात झालेल्या अपोलो १३ च्या तिन्ही अंतराळ वीरांना चंद्रापासून पुन्हा जिवंत परत आणण्यात खरा हिरो होता तो जीन क्रान्झ.
आपलो १३ चा कमांडर जिम लॉव्हेल याचं चंद्राला प्रदक्षिणा घालून सुद्धा अपघातातून परत यायला लागलं, त्याची थरारक कथा सांगणारं ‘लॉस्ट मून‘ हे पुस्तक आहे.
याच्या वरच आधारित अपोलो १३ हा चित्रपट आला होता. त्यात टॉम हँक्स नि लॉव्हेल आणि एड हॅरीसनी जीन क्रान्झ च्या भूमिका अजरामर केलेल्या आहेत. चं
द्र मोहिमांवरील सर्वात सुंदर पुस्तक म्हणजे अपोलो १७ या शेवटच्या चांद्रयानाचा कमांडर जीन सरनान याचं ‘द लास्ट मॅन ऑन द मून‘ हे आहे.
हा चंद्रावर उतरणारा आत्तापर्यंत तरी शेवटचा मानव. याचा ३ दिवस चंद्रावर मुक्काम होता. तशी पुस्तकं आणखीन बरीच आहेत. पण चंद्र मोहिमेची हि टॉप ५!
—
- सूर्याचा रंग पिवळा, पांढरा की आणखीन कोणता…? उत्तर वाचून थक्क व्हाल
- बर्मुडा ट्रॅंगल नव्हे, तर या जागी गेलेलं विमान कधीच परत येत नाही
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.