श्रोत्यांना शिवचरित्राचा अविस्मरणीय अनुभव देणा-या बाबासाहेब पुरंदरे ह्या ऋषीच्या अचाट स्मरणशक्तीची कथा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे स्वराज्याच्या इतिहास उराशी कवटाळून जगणारा माणूस!
आपल्या सिद्धहस्त लेखणीने छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या जगाला नव्याने ओळख करून देणाऱ्या हा व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य मराठ्यांच्या इतिहासात जगाला असे म्हटले तर वावगे ठरू नये.
आजही त्यांच्या मुखातुन शिवचरित्र ऐकणे म्हणजे स्वर्गीय अनुभूती असते.
पुस्तकांतून जितका इतिहास समजतो, त्याहूनही अधिक बाबासाहेबांच्या शब्दांतून तो शिकता येतो, इतकंच नव्हे जगता येतो.
शिवचरित्रातील कोणतीही माहिती ते इतक्या झटकन, सहजतेने सांगतात, की ऐकणारा थक्क होवून केवळ त्यांच्या चेह-यावरील विलक्षण तेजाकडे बघत राहतो.
त्यांच्या प्रत्येक शब्दागणिक, उपमेगणिक आणि स्तुतीगणिक अंग अंग रोमांचून उठते. नव्वदी पार केल्यानंतरही हे व्यक्तिमत्त्व अगदी आहे तसेच आहे. तितकेच तेजस्वी आणि तल्लख!
अश्या या थोर व्यक्तीच्या अगाध ज्ञानाबद्दल सुहास प्रभाकर यांनी आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केलेला अनुभव इनमराठी.कॉम च्या वाचकांसाठी लेखाच्या मार्फत प्रकाशित करत आहोत.
ह्या प्रसंगातून बाबासाहेब पुरंदरेंच्या विद्ववत्तेची, प्रखर स्मरणशक्तीची साक्ष मिळतेच. परंतु त्याहून अधिक महत्वाचं – त्यांच्या प्रगाढ अभ्यासाची, शिवभक्तीची खात्री पटते.
आज एका ऋषीच्या स्मरणशक्तीची कमाल अनुभवायला मिळाली.
या ऋषीचे आज वय ९७ …. आपल्याला सर्वांना माहीत असलेले ऋषी… बाबासाहेब पुरंदरे.
आज बाबासाहेबांशी अर्धा पाऊण तास गप्पा मारण्याचा योग आला, संधी मिळाली. आरती सुजीत यांच्या पुढाकाराने आम्ही बाबासाहेबांची वेळ मागून त्यांना भेटायला गेलो होतो. फक्त बाबासाहेब, आरती आणि मी.
मला दोनच प्रश्न विचारायचे होते बाबासाहेबांना.
१. शिवाजी महाराजांच्या काळात घडलेल्या सूर्यग्रहणांचे उल्लेख इतिहासात सापडतात का?
आणि
२. शिवाजी महाराजांच्या काळात दिसलेल्या एखाद्या धूमकेतूचा उल्लेख इतिहासात आहे का?
प्रश्न विचारल्यावर दोन मिनिटे स्तब्धतेत गेली आणि बाबासाहेबांनी उत्तर दिले –
खग्रास आहे की नाही याचा उल्लेख नाही, परंतू सूर्यग्रहणाचा उल्लेख या कालाच्या इतिहासात आहे. तारीख २३ सप्टेंबर १६३३ आणि ६ जानेवारी १६६५.
…!!!
मी स्तब्ध झालो! एवढंच नाही – बाबासाहेब पुढे म्हणाले –
२३ सप्टेंबर १६३३ रोजी शहाजी महाराजांची तुला करून दानधर्म करण्यात आला आणि ६ जानेवारी १६६५ रोजी जिजाऊंची तुला करून दानधर्म करण्यात आला. त्याच दिवशी सोनोपंत डबिरांचीही तुला करण्यात आली.
केवळ “बाबासाहेब सांगतात म्हणून ते मान्य केले” असा मी नसल्याने, मी अर्थातच घरी येवून या तारखांना महाराष्ट्रात सूर्यग्रहणे झाली होती का याची नासाच्या साईटवरून खातर जमा करून घेतली.
आणि काय आश्चर्य…
नासा सांगते,
३ आक्टोबर १६३३ आणि १६ जानेवारी १६६५ या तारखांना महाराष्ट्रात सूर्यग्रहणे झाली होती. यातील १६ जानेवारी १६६५ चे सूर्यग्रहण महाराष्ट्रातून कंकणाकृती दिसले होते.
आता या दोन्ही ग्रहणांच्या इतिहासातील नोंदीत आणि नासाच्या माहितीतील तारखात बरोबर दहा दिवसांचा फरक आहे.
आणि तो फरक – तेव्हा ब्रिटिश आणि भारतात वापरले जाणे ज्युलियन कॅलेंडर आणि नासाचे संदर्भ असलेले ग्रेगोरियन कॅलेंडर यांच्यातील फरकामुळे आहे.
या ऋषींना साष्टांग दंडवत…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.