' पॅलिएटिव्ह केअरबद्दलचे समज आणि गैरसमज आजच दूर करा – InMarathi

पॅलिएटिव्ह केअरबद्दलचे समज आणि गैरसमज आजच दूर करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

लेखक – डॉ.संतोष सायनेकर, कल्याण.

गेल्या काही दिवसांपासून काही रुग्ण आणि रुग्णनातेवाईकांकडून पॅलिएटिव्ह केअरच्या बाबतीतले काही संवाद रुग्णालयात तसेच जनरल प्रॅक्टिस मध्ये सारखे सारखे कानी पडत होते, त्यातून एकच जाणवले कि पॅलिएटिव्ह केअरच्या बाबतीत समाजात फारच गैरसमज आहेत. त्या बाबतीत आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही माहिती-मदत होण्यासाठी हा लेखप्रपंच!!

अर्थात मी काही पॅलिएटिव्ह तज्ञ नाही परंतु आज पर्यंतच्या जनरल प्रॅक्टिसच्या/क्रिटिकल केअर प्रॅक्टिसच्या अनुभवाच्या परिप्रेक्षात काही सह-प्रचित (Share) करण्याचा प्रयत्न करतो आहे.

आपण रुग्ण किंवा रुग्णनातेवाईक संवादाची (रुग्णालयात किंवा इतरत्र घडणारी) मासलेवाईक उदाहरणे पाहुयात म्हणजे हे सर्व समजण्यास मदत होईल. अर्थात ही प्रातिनिधिक संवाद उदाहरणे आहेत. स्थळ, काळ, व्यक्ती सापेक्ष काही काही बदल ह्यात अपेक्षित आहेत/आणि बदल होतातच.
काही संवाद पुढीलप्रमाणे..

1) पॅलिएटिव्ह केअर सांगितली आहे रे म्हणजे गेल्यातलीच केस आहे..
2) काही काही खरं नाही हो त्याचं..
3)…म्हणजे काय मरायला सोडायचं का?
4) काही नाही.. काही करता येतं नाही म्हणून पॅलिएटिव्ह सांगितलंय त्यांनी…

असे एक ना अनेक प्रश्न, बरेच प्रश्न रुग्ण नातेवाईकांच्या मनात येतात मग येते गोंधळलेली, धास्तावलेली स्थिती… अर्थातच मग येते ती भीती…आपण ह्यातून मार्ग कसा काढायचा ते बघुयात…ह्याच अंगांनी ह्याचा आढावा घेऊया.

आपण आधी हे समजून घेऊयात कि आपण फक्त ह्या लेखात कॅन्सर व्यतिरिक्त पॅलिएटिव्ह केअरच्या (Non Cancerous Palliative Care) बाबतीत काही मुद्दे मांडणार आहोत.

कॅन्सर पॅलिएटिव्ह हा एक स्वतंत्र अभ्यासविषय आहे, त्यावर पुन्हा नंतर कधीतरी!

आपण हे समजून घेतलं पाहिजे कि बऱ्याचदा क्युअर (Cure) ला जिथे मर्यादा येतात तेंव्हाच रुग्णास केअरची (Care) गरज भासते. कारण क्युअर झाल्यास तो रुग्ण न राहता ती व्यक्ती आरोग्यपूर्ण आणि संपूर्ण कार्यक्षमतेसह पुन्हा समाजकार्यप्रवण होते, परंतु जेंव्हा जेंव्हा रोगविशिष्टते नुसार संपूर्ण क्युअर होयला काही आठवडे ते महिन्यांचा कालावधी जेंव्हा लागतो, किंवा क्युअर न होता जेंव्हा केअर लागते तेंव्हा तेंव्हा पॅलिएटिव्ह केअर हि लागते हे आपण सर्वात आधी लक्षात घेतले पाहिजे.

 

care im 1

 

पॅलिएटिव्ह केअरची सुरुवात केंव्हा करायची? हा प्रश्न जेंव्हा उभा ठाकतो…तेंव्हा त्याचे उत्तर हे नेहमीच पॅलिएटिव्ह केअरची सुरुवातच मुळी रोगनिदानानंतर होते/किंवा करायला पाहिजे.

पॅलिएटिव्ह केअरचे काही प्रमुख भाग आपण बघुयात ह्यात Therapeutics च्या नंतर Diet, Physiotherapy, Pain Management आणि अर्थातच Spirituality, Psychosomatic Counselling, Caregiver Counselling and Training असे महत्वाचे विभाग येतात.

इथे Spirituality चा अर्थ जनसामान्य प्रतिपादित भारतीय अध्यात्मिकता असा नसून ‘मानवतेच्या दृष्टिकोनातून व्यक्ती कडे बघणे आणि त्याच्या रोगविशिष्ट दुःखाला बघणे’ एवढाच अपेक्षित आहे. “व्यष्टी कडून समष्टीकडचा प्रवास” असा भारतीय अध्यात्मिकतेतला अर्थ इथे अपेक्षित नाही.

आपण एका केस द्वारे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे आणखीन सोपे जाईल.Non- Cancerous Palliative Care चा सर्वात मोठा भाग हा (Neuropalliative) मेंदूजन्य विकारांनी व्यापलेला आहे. म्हणूनच आपण मेंदूजन्य विकाराचेच उदाहरण घेऊया.

समजा एक रुग्ण Stroke (अर्धांगवायू-पॅरॅलिसीस) चा आजार घेऊन आला आहे त्याच्या आपण Therapeutics म्हणजेच त्या आजाराच्या विशिष्ट चिकित्से मध्ये न पडता (तो मेंदूतल्या रक्त स्त्राव जन्य स्ट्रोक आहे कि रक्त अपुरवठा जन्य स्ट्रोक आहे.. कारण दोन्हीची चिकित्सा भिन्न भिन्न आहे)

आपण व्यक्ती म्हणून त्या रुग्णांकडे बघता बघता …हे दिसते कि रुग्णास क्युअर होयला प्रचंडच वेळ लागणार आहे परंतु तो पर्यंत त्या रुग्णाची केअर तर होयलाच पाहिजे म्हणून लगेचच आपण त्या रुग्णाची विशिष्ट चिकित्सा करता करताच आपण पॅलिएटिव्ह केअर सुद्धा सुरु करतो.

स्ट्रोकमुळे बऱ्याचदा त्याच्या गिळण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला असेल तर नाकातून पोटात नळी टाकून त्यातून जेवण सुरु करतो. (बऱ्याचदा ह्या शब्दाला फार अर्थ आहे बरं.. सगळ्याचं स्ट्रोक मध्ये असं होतंच असं नाही ) स्ट्रोकमुळे हात पायांची, वाचेची (Speech) कमजोरी झालेली असते, ती सुधरवण्यासाठी लगेचच Physiotherapy आणि वाचे साठी Speech Therapy सुरु करतो.

काही स्ट्रोक मध्ये रुग्णास श्वासासाठी नळी घातलेली असतें (Tracheostomy) त्या नळीची स्वच्छता, त्या नळीतील कफ बाहेर काढणं, गरज पडल्यास ऑक्सिजन लावणे हे सर्वच काही विशिष्ट काळाच्या ट्रेनिंग नंतर रुग्णनातेवाईकांनाच करावे लागते, अर्थात हे सर्व रुग्णालया बाहेर करण्यासाठी काही विशिष्ट संस्था (Home Care/Home ICU Care) ह्याच काळातल्या रुग्णांच्या ‘केअर’ साठी उपयोगी ठरु शकतात, परंतु सामान्य भारतीय मनुष्याच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता ते खूप जणांना इच्छा असून सुद्धा अश्या संस्थांची मदत घेणं शक्य होत नाही मग काय… ‘उद्धरेत आत्मानो आत्मानम्’… ह्या गीता उक्ती प्रमाणे रुग्णनातेवाईकच ह्याची जबादारी उचलतात जे अत्यंत स्पृहणीय आहे.

म्हणूनच केअरगिव्हर (रुग्णनातेवाईक) ह्यांचे प्रशिक्षण हे सुद्धा खूपच महत्वाचे ठरते पॅलिएटिव्ह केअरमध्ये…
अर्थात हे सर्व (रुग्णास ऍडमिट केल्या पासून वॉर्ड मध्ये किंवा घरी न्यायच्या स्थितीत रुग्ण येईपर्यंत गेलेला काळ हा काही दिवसांपासून काही आठवडयांपर्यंतचा असू शकतो..) काही आठवड्यांच्या कालावधीत सर्व उतार-चढावासकट हे सर्व चालू असतें त्यामुळे रुग्णांचे आणि रुग्णनातेवाईकांचे मनोसमुपदेशन (Psychiatric Counselling) सुद्धा फारच महत्वाचे ठरते. कारण ह्याच काळात रुग्णाचे आणि रुग्णनातेवाईकांचे मानसिक आंदोलन/भावनांचा गोंधळ होत असतो आणि तेंव्हाच मनो-समुपदेशनाची सर्वात जास्त गरज असते.

म्हणजेच केवळ पॅलिएटिव्ह केअर सांगितली म्हणजे ती ‘गेल्यातली केस’ न होता केअरची सर्वाधिक गरज असलेली केस होते. अश्या रुग्णांना कधीही मरायला सोडलेले नसते हे तर स्पष्टचं आहे, आणि ‘काही करता येतं नाही किंवा काही खरं नाही ह्याचं’ म्हणून नव्हे तर विविध-अंगानी (Interdisciplinary) रुग्णाची काळजी घेणं सर्वात महत्वाचं ठरतं म्हणून पॅलिएटिव्ह केअर सांगितली जाते हे आता आपल्या लक्षात आलं असेलच.

 

care im

 

अर्थात आपण Neuropalliative Care चा केवळ एक पदर बघत आहोत.Non-Cancerous Palliative Care मध्ये हृत रोग (Heart Disease), आंत्र विकार (GI Diseases), फुफ्फुस जन्य विकार (Lung Diseases) आदी विकारांचा सुद्धा समावेश होतो. त्या विकारांमध्ये त्या त्या विकारविशिष्टते नुसार वेगवेगळी पॅलिएटिव्ह केअर लागते.

Child Non Cancerous Palliative Care हा सुद्धा स्वतंत्र अभ्यासविषय आहे ज्यात सेरेब्रल पाल्सीच्या (Cerebral Palsy) मुलांची केअर सर्वात प्रमुख असतें. जो एक स्वतंत्र लेख विषय होऊ शकतो, कारण सेरेब्रल पाल्सी हा प्रचंड गुंतागुंतीचा रुग्ण, पालक, रुग्ण नातेवाईक ह्यांची पदोपदी (आर्थिक आणि मनो-सामाजिक) परीक्षा घेणारा विकार आहे ज्यासाठी स्वतंत्र मनोसमुपदेशनाची आणि पॅलिएटिव्ह केअर ची गरज पडते.

त्यामुळे पॅलिएटिव्ह केअर म्हटलं, की आता आपल्या रुग्णाला सर्वात जास्त गरज आहे ती दिर्घपल्ल्याच्या ‘केअरची’ एवढं कळलं तरी उत्तम!!

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?