महाराजांच्या पराक्रमी ‘भोसले’ घराण्याचा शाह शरीफ ‘दर्ग्याशी’ नेमका संबंध काय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
ही गोष्ट कदाचित तुमच्या ही कानी पडली असेल कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा अहमदनगर मधील ‘शाह शरीफ’ दर्ग्याशी संबंध आहे. चला जाणून घेऊया काय आहे हा संबंध…!
छत्रपती शिवाजी महाराजांची जी वंशावळ उपलब्ध आहे ती सुरु होते बाबाजी भोसले यांच्यापासून. त्यांचा जन्म १५३३ सालचा.
त्यांना मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे दोन पुत्र! त्यापैकी मालोजी राजे यांचे पुत्र म्हणजे- शहाजी राजे आणि शरीफजी राजे.
आता हा प्रश्न अनेकांना पडतो की, मालोजी राजांच्या दोन्ही पुत्रांच्या नावामध्ये मुसलमानी नावांचा प्रभाव डोकावतो. असे का?
तर या मागे एक कथा सांगितली जाते.
त्याचं झालं असं की, मालोजी राजांना मुल होतं नव्हतं. तेव्हा अहमदनगर मधील शाह शरीफ दर्ग्याची ख्याती मालोजींच्या कानी आली.
या दर्ग्यात जे काही चांगल्या मनाने मागालं ते पूर्ण होतेच अशी भाविकांमध्ये श्रद्धा होती.
त्यानुसार मालोजी राजांनी संतान प्राप्तीसाठी दर्ग्यात नवस म्हटला आणि नवस पूर्ण झाल्यास होणाऱ्या मुलाला ‘तुझे’ नाव देईन असा शब्द दिला.
पण पुढे मालोजींना दोन पुत्र झाले.
दिलेल्या वचनाला जागले पाहिजे या भावनेतून मालोजी राजांनी दर्ग्याच्या नावातील ‘शाह’ या शब्दावरून एका मुलाचे नाव ‘शहाजी’ ठेवले आणि ‘शरीफ’ या शब्दावरून दुसऱ्या मुलाचे ‘शरीफजी’ असे नामकरण केले.
तसेच या निमित्ताने दर्ग्यावर रोज नगाऱ्याची नौबत वाजवण्याची प्रथा सुरु केली.
पुढे जेव्हा औरंगजेब दक्षिणेत उतरला होता, तेव्हा नगरात असताना एके दिवशी सकाळी ही नौबत त्याच्या कानी पडली. आपल्या धर्मासमोर काफिरांचे वाद्य वाजवणे पाहून त्याला चीड आली त्याने ती नौबत बंद करवली.
त्यानंतर शाह शरीफ यांनी औरंगजेबाच्या स्वप्नात जाऊन ‘तू माझी नौबत बंद करवलीस आता मी तुझी नौबत बंद करतो’ असे सांगितले आणि नंतर अहमदनगर मध्ये असतानाच औरंगजेबाचा मृत्यू झाला.
अशी कथा स्थानिकांनध्ये प्रचलित आहे.
आजही अहमदनगर मध्ये हा दर्गा पहावयास मिळतो. शाह शरीफच्या दर्ग्याचे जे विद्यमान मुजावर आहेत त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की या दर्ग्याचे महापराक्रमी भोसले घराण्याशी नाते आहे.
आजही भोसले घराण्याकडून दर्ग्याला वर्षासन मिळते आणि भोसले घराण्यातील मंडळी येथे दर्शनासाठी येतात.
तर या दर्ग्याच्या आशीर्वादाने मालोजी राजेंना झालेला शरीफजी हा पुत्र देखील शूर निपजला. सध्याच्या पिढीला माहित नसेल पण इतिहासामध्ये ‘भातवाडीचं युद्ध’ म्हणून एक लढाई प्रसिद्ध आहे.
३१ ओक्टोंबर १६२४ रोजी हि लढाई लढली गेल्याची नोंद आहे. अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही मुळापासून नष्ट करण्यासाठी भारतभरातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या.
पण ते तितकेसे सोपे नव्हते, कारण निजामशाहीकडे शहाजी राजे आणि शरीफजी राजे हे भोसले घराण्यातील २ पराक्रमी योद्धे होते.
तलवारी भिडल्या आणि निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे आणि शरीफजीराजे निजामाचा वजीर मलिक अंबरच्या साथीने भल्या मोठ्या शत्रू पक्षांच्या सेनेला कापत सुटले.
अशक्य वाटणाऱ्या या युद्धात शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला, पण त्यांना आपले बंधू शरीफजी राजे यांना मात्र गमवावे लागले.
जर शरीफजी राजे जास्त काळ जगले असते, तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये अजून काही पराक्रमी गाथांची नोंद नक्की झाली असती!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.