आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : डॉ. श्रीरंग गोडबोले
===
मागील भागाची लिंक : जंगल सत्याग्रह आणि रा.स्व. संघ – लेखांक १ : निर्बंधभंगाची धामधूम
===
मिठासारख्या साध्या पण सर्वांसाठी जीवनावश्यक वस्तूवर कर लादणाऱ्या ब्रिटिश सरकारविषयी अगदी सामान्य माणसात चीड उत्पन्न व्हावी म्हणून महात्मा गांधींनी साधेपणाने केलेल्या आंदोलनाने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. मिठागरे नसलेल्या आणि समुद्रापासून दूर असलेल्या मध्य प्रांत व वऱ्हाडसारख्या प्रांतांनी जंगलचा जाचक निर्बंध मोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला. निर्बंधभंगाचे क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यातील पुसद ठरले आणि प्रारंभ दिन १० जुलै १९३० हा ठरला. सन १९२८ मध्ये हिंगणघाटच्या स्थानकावर सरकारी थैली लुटण्याचा प्रयत्न झाला. त्यात वापरलेले पिस्तुल रा.स्व. संघाचे निर्माते डॉ. हेडगेवार यांच्या क्रांतिकारक सहकाऱ्याचे असल्यामुळे डॉक्टरांवरील सरकारी पहारा अत्यंत कडक झाला. या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि त्यांचे निकटचे सहकारी आप्पाजी जोशी यांनी जंगल सत्याग्रहात भाग घेण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला. डॉक्टरांना संघात सांगकामे निर्माण करावयाचे नव्हते. देशभक्तीचे संस्कार घेतलेले संघस्वयंसेवक कोणत्याही आदेशाची वाट न पाहता ‘समाजघटक’ म्हणून देशहिताच्या कोणत्याही आंदोलनात भाग घेतील असा त्यांचा विश्वास होता. संघ समाजापासून पृथक नाही, म्हणून अशा आंदोलनात सहभागी होताना आपले संघत्व मिरवू नये असा त्यांचा मूलभूत विचार होता.
संघाचे धोरण
दि. २० जून १९३० ला काढलेल्या पत्रक क्र.६ मध्ये डॉक्टर म्हणतात, “नेहमी विचारण्यात येते की चालू चळवळीसंबंधी संघाचे काय धोरण आहे? चालू चळवळीत संघाने संघश: भाग घेण्याचे तूर्त ठरविले नाही. व्यक्तिशः ज्या कोणास भाग घेणे असेल त्याने आपल्या संघचालकाच्या अनुमतीने भाग घेण्यास हरकत नाही. संघाच्या कार्यास पोषक होईल अशा रीतीनेच त्याने कार्य करावे” (रा.स्व. संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Dr. Hedgewar letters cleaned\1930\Jully 1930 20-7-30a).
व्यक्तिगत स्तरावर संघाच्या स्वयंसेवकांना सविनय निर्बंधभंग आंदोलनात भाग घेण्याची मुभा डॉक्टरांनी आधीच दिल्याचे दिसते. किंबहुना या आंदोलनात डॉक्टरांनी भाग घेण्याचे निश्चित करण्यापूर्वीच संघाच्या प्रमुख स्वयंसेवकांनी तिच्यात भाग घेतल्याचे दिसते. सविनय निर्बंधभंग आंदोलन संचालित करण्यासाठी ठिकठिकाणी प्रमुख आंदोलकांच्या अस्थायी समित्या काँग्रेसकडून स्थापन करण्यात आल्या. या समित्यांना ‘युद्धमंडळ’ असे म्हटले जात असे.
दि. २० ऑगस्ट १९२७ ला चांदा (चंद्रपूर) येथे संघशाखा सुरू झाली असली तरी तिला खरी चालना डिसेंबर १९२८ ला डॉक्टरांच्या चांदा भेटीमुळे मिळाली. दि. २९ एप्रिल १९३० ला चांद्याचे युद्धमंडळ स्थापन करण्याच्या सभेला उपस्थित असलेले आबासाहेब चेंडके, नारायण पांडुरंग उपाख्य नानासाहेब भागवत (वर्तमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नानासाहेबांचे नातू होत), रघुनाथ सीताराम उपाख्य दादाजी देवईकर (चांदा संघचालक), रामचंद्र राजेश्वर उपाख्य तात्याजी देशमुख (चांदा संघ कार्यवाह) हे सर्व चांदा संघाचे प्रमुख स्वयंसेवक होते. चांदा युद्धमंडळाचे पहिले अध्यक्ष राजेश्वर गोविंद उपाख्य बाबाजी वेखंडे पुढे जंगल सत्याग्रहात डॉक्टरांच्या तुकडीत सामील झाले होते (के.के .चौधरी संपादक, सिव्हिल डिसोबीडियन्स मूव्हमेंट एप्रिल-सप्टेंबर १९३० खंड ९, गॅजेटियर्स डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकार, १९९०, पृ. ९०१). दि. ३० जून १९३० ला बापूजी अणे यांची चांद्यात प्रकट सभा आयोजित करण्यात देशमुख, अण्णाजी सिरास, चेंडके ही संघाची मंडळी प्रमुख होती (चौधरी, पृ. ९७४).
दि. १ मे १९३० ला झालेल्या नागपूर येथे झालेल्या सभेत डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी दहीहंडा (जि. अकोला) येथून आणलेल्या खाऱ्या पाण्यापासून मीठ बनवून आणि स्वा.सावरकरांच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या आक्षिप्त पुस्तकाचा भाग वाचून निर्बंधभंग केला.
संघाचे सरकार्यवाह गोपाळ मुकुंद उपाख्य बाळाजी हुद्दार यांनीही मीठ बनविले आणि स्वा. सावरकरांच्या ‘मॅझिनी’ या आक्षिप्त पुस्तकाचा भाग वाचला (चौधरी, पृ. ९०३). दि. २१ मे ला आर्वी (जि. वर्धा) येथे सुमारे ७०० लोकांसमोर संघाचे प्रमुख स्वयंसेवक व पुढे संघचालक झालेले डॉ. मोरेश्वर गणेश आपटे यांनी आक्षिप्त साहित्य वाचले (चौधरी, पृ. ९४८). मध्य प्रांत युद्धमंडळाचे अध्यक्ष बॅरिस्टर मोरोपंत अभ्यंकर यांना दि. २ जून १९३० ला अटक झाल्यानंतर पूनमचंद रांका अध्यक्ष झाले. त्यावेळी युद्धमंडळाच्या पुनर्रचनेत रा.स्व. संघाचे सरसेनापती मार्तंड परशुराम जोग यांना असिस्टंट कमांडर नियुक्त करण्यात आले (चौधरी, पृ. ९४६). पुढे दि. ८ ऑगस्टला जोगांना युद्धमंडळात ‘स्वयंसेवक प्रमुख’ करण्यात आले (चौधरी, पृ. १०१६).
नागपूर जिल्ह्याचे संघचालक लक्ष्मण वामन उपाख्य आप्पासाहेब हळदे हे मध्यप्रांत युद्ध मंडळाचे बारावे अध्यक्ष होते. तुरुंगवास भोगून ते दि. ६ मार्च १९३१ ला सुटले(महाराष्ट्र, १२ मार्च १९३१). हळदे प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य,काँग्रेसमध्ये डिक्टेटर (अधिनायक) व संघाचे नागपूर जिल्हा संघचालक होते. त्यावेळी काही काँग्रेसजनांनी चांद्याला हळदे यांच्या उपस्थितीत गांधींजवळ तक्रार केली.
तेव्हा गांधी म्हणाले होते की,
“मला संघ माहीत आहे तेव्हा डॉ. हेडगेवार, हळदे यांच्यासारख्यांच्या संबंधी तुम्ही असा विचार करू नका.” ही आठवण स्वतः हळदे यांनी सांगितलेली आहे (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Nana Palkar\Hedgewar notes –2 2_133).
===
===
सावनेरचे संघचालक अधिवक्ता नारायण आंबोकर रायपूर तुरुंगातून दि. ११ मार्च १९३१ ला सुटले (महाराष्ट्र, १२ मार्च १९३१). वाशिमचे अधिवक्ता शंकर उपाख्य अण्णासाहेब डबीर यांची तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांचा दि. १० मार्च १९३१ ला वाशिमला सत्कार करण्यात आला (महाराष्ट्र, १५ मार्च १९३१). त्यांची ऑगस्ट १९३१ च्या सुमारास वाशिमच्या संघचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
संघाची व्यवस्था
सत्याग्रहाला जाण्यापूर्वी डॉक्टर संघाची व्यवस्था लावावयाला विसरले नाहीत. त्यानिमित्त दि. २० जून १९३० ला त्यांनी काढलेल्या पत्रकाचा मागे उल्लेख आला आहे. त्या पत्रकात ते म्हणतात,
“मी स्वतः, श्री. आप्पाजी जोशी रा स्व संघ वर्धा जिल्हाधिकारी, श्री. परमार्थ व देव नागपुर संघातील प्रमुख कार्यकर्ते, श्री. वेखंडे श्री. खरोटे व श्री. पालेवार चांदा संघातील प्रमुख कार्यकर्ते, त्याचप्रमाणे आर्वी संघचालक श्री. नानाजी देशपांडे व सालोडफकीर संघचालक त्र्यंबकराव देशपांडे यांना बरोबर घेऊन वऱ्हाडात पुसद या ठिकाणी जो जंगल सत्याग्रह सुरू आहे, त्यात भाग घेण्याकरिता जात आहे. त्यामुळे रा.स्व. संघाचे चालकत्वाचे काम नागपूरचे सुप्रसिद्ध डॉ. परांजपे यांजकडे सोपविले आहे व ते यापुढे चालक राहतील आणि नागपूर संघाशी जो पत्रव्यवहार करावयाचा असेल तो खालील पत्त्यावर करावा (वि.वि. केळकर बीए एलएलबी हायकोर्ट वकील इतवार दरवाजा नागपुर सिटी). वर्धा जिल्हाधिकारी श्री. आप्पाची जोशी यांचे जागी श्री. मनोहरपंत देशपांडे वकील वर्धा यांची नेमणूक केली आहे व तेथील पत्रव्यवहार श्री. देशपांडे शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल वर्धा या पत्त्यावर करावा.”
या पत्रकात डॉक्टरांची सावध वृत्ती डोकावतेच. “वरील पत्ते लिहिताना संघचालक, कार्यवाह वगैरे कोणतेही काम शब्द न लिहिता दिलेलाच पत्ता फक्त लिहावा” अशी सतर्कतेची टीप ते पत्रकात जोडतात. या पत्रकात “यंदाचे उन्हाळ्याचे वर्ग मोठ्या प्रमाणावर व व्यवस्थित पार पडले, शारीरिक व लष्करी शिक्षणाबरोबरच बौद्धिक शिक्षणाचेही वर्ग झाले” हे आवर्जून सांगतात. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.
आपल्या अनुपस्थितीत नवजात संघाचे कसे होईल याची पुसटशी चिंता डॉक्टरांच्या कुठल्या पत्रात आढळत नाही. आपल्या सहकाऱ्यांवर आणि आपणच सुरू केलेल्या कार्यपद्धतीवर कोण हा विश्वास!
सरसंघचालकपदाचा त्याग
बापूजी अणे यांच्या नेतृत्वाखाली अकरा सत्याग्रहींच्या तुकडीने दि. १० जुलैला पुसदजवळ असलेल्या जंगलात गवत कापून जंगल सत्याग्रहाला सुरूवात केली. त्यांना भारतीय दंड विधानाच्या धारा ३७९ खाली सहा महिने सध्या कारावासाची शिक्षा झाली. दुसऱ्या दिवशी डॉ.मुंजे यांनी त्याच ठिकाणी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्यांना आकारण्यात आलेला रु. ५ दंड त्यांनी भरण्यास नकार दिल्यामुळे न्यायालयाचे त्या दिवशीचे कामकाज संपेपर्यंत त्यांना बंदी करण्यात आले. स्थानिक सत्याग्रह समितीने आग्रह केल्यामुळे डॉ. मुंजे यांनी दि. १२ ला पुनः सत्याग्रहाचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी रु. १० दंड भरण्यास नकार दिल्यामुळे त्यांना एक आठवड्याची सध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली (चौधरी, पृ. ९८०).
वास्तविक, डॉ. मुंजे यांना संघाच्या गुरुपूजनाच्या उत्सवाचे अध्यक्ष करून त्यांचा सन्मानपूर्वक जंगल सत्याग्रहासाठी निरोप द्यावयाचा असा डॉक्टरांचा विचार होता. पण त्यांना अटक झाल्यामुळे डॉ. लक्ष्मण वासुदेव उपाख्य दादासाहेब परांजपे यांना उत्सवाचे अध्यक्ष करण्यात आले.
दि. १२ जुलैला संघाचा गुरुपौर्णिमेचा उत्सव डॉ. परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ध्वजपूजन झाल्यावर डॉ. परांजपे म्हणाले,
“डॉ. हेडगेवार हे काही सहकाऱ्यांसह जंगल सत्याग्रहास जाणार आहेत. ज्यांस त्यात भाग घेणे असेल त्यांनी घ्यावा. इतरांनी तरुण संघटनेच्या कार्यास हातभार लावावा. सध्याची चळवळ ही राष्ट्राला पुढे नेणारी आहे यात शंका नाही पण ती फक्त स्वातंत्र्याच्या मार्गावरची पहिली पायरी आहे. राष्ट्रस्वातंत्र्यासाठी सर्व आयुष्य खर्च करणारी माणसे संघटित करणे हेच खरे कार्य आहे.”
अशा आशयाचे त्यांचे भाषण झाल्यावर डॉक्टरांचे भाषण झाले. ते म्हणाले,
“मी आता आभार मानून खाली बसलो की यापुढे संघाचा चालक मी नाही. डॉ.परांजपे यांनी या संघाचे चालकत्व आपल्या शिरावर घ्यावयाचे कबूल केले आहे याबद्दल संघातर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. आता आम्ही सर्व मंडळी जी या चालू लढ्यात भाग घ्यावयाकरिता जात आहों ते केवळ वैयक्तिक जबाबदारीवर जात आहोत. संघाची मते व कार्य करण्याचे मार्ग यांत काहीही बदल झालेला नाही किंवा आमची त्यातील श्रद्धाही ढळलेली नाही. देशात ज्या अनंत चळवळी चालू असतील, त्यांची आतून व बाहेरून माहिती करून घेणे व त्यांचा उपयोग आपल्या कार्यासाठी करून घेणे हे देशस्वातंत्र्यार्थ झटणाऱ्या कोणत्याही संस्थेचे कर्तव्य आहे. संघातील जे लोक आजवर या चालू लढ्यात पडले आहेत व आज आम्ही जे पडत आहोत ते याच हेतूने. जेलमध्ये जाणे हे आज देशभक्तीचे लक्षण झाले आहे पण जो मनुष्य दोन वर्षे जेलमध्ये जाण्यास तयार असतो, त्यालाच जर बायकापोरांची व घरादारांची दोन वर्षे सुट्टी घेऊन देशात स्वातंत्र्योन्मुख संघटनेचे कार्य करावयास तयार हो, असे म्हटले तर कोणीही तयार होत नाहीत. असे का व्हावे? तर देशस्वातंत्र्य हे वर्ष सहा महिने कार्य करून नव्हे तर वर्षानुवर्षे सतत संघटनेचे कार्य केल्यानेच मिळू शकेल ही गोष्ट समजून घ्यावयाला लोक तयार नाहीत. ही हंगामी देशभक्ती आम्ही टाकून दिल्यावाचून व देशासाठी मरावयाची तयारी ठेवावयाची – पण देशस्वातंत्र्यार्थ संघटनेचे प्रयत्न करीतच जगावयाचे, असा निश्चय केल्यावाचून देशाला बरे दिवस येणार नाहीत. ही वृत्ती तरुणांत उत्पन्न करावी व त्यांची संघटना करावी हेच या संघाचे ध्येय आहे”(संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Nana Palkar\Hedgewar notes –3 3_131, 132).
आपल्या अनुपस्थितीत संघाची व्यवस्था लावल्यावर आणि सत्याग्रहात जाण्यामागची भूमिका स्पष्ट केल्यावर आता डॉक्टर सत्याग्रह करण्यास सिद्ध झाले.
(क्रमश:)
===
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.