“एका खांबावर उभी असलेली वर्तमानातील द्वारका”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखिका – मानसी चिटणीस
—
“शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती” हे गीत ऐकले, की प्रत्येक मराठी माणसाचे बाहू स्फुरण पावतात, उर अभिमानाने भरून येतो आणि नकळत शब्द उमटतात जय भवानी,जय शिवाजी!शिवाजीचे कर्तृत्व आठवून रक्तामध्ये एक अनोखी शक्ती निर्माण होऊन, एक जोष निर्माण होतो ना…
महाराष्ट्रात लहानांपासून थोरांपर्यंत सारेच शिवभक्तीचे वारकरी आणि यांचा मेरूमणी म्हणजे हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. त्यांच्या राजा शिवछत्रपतीने तर अवघ्या महाराष्ट्राला शिवभक्तीचे अमृत दिले. ग्रंथ, अनेक व्याख्याने आणि मुलाखती यातून हा शिवयोगी ‘ शिवाजी महाराज’ हा सप्ताक्षरी मंत्र आयुष्यभर जगत राहिला.
आज त्यांच्या स्मृती जागवतानाही याच मंत्राच्या ऊर्जेने त्यांचे व्यक्तित्व झळाळून उठले होते असे वाटते.
‘वन्ही तो चेतवावा I चेतविताच चेततो ‘ या समर्थ वचनाला जागत त्यांनी मराठी मनांची मरगळ दूर करण्याचे मोठे कार्य केले आहे. शिवशाहीर असे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर एकच नाव येते ते म्हणजे महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे. त्यांच्याविषयी लिहायचे झाले तर कोठून सुरवात करावी हाच मोठा प्रश्न आहे.
शिवस्पर्शानं पावन झालेल्या अनेक ठिकाणी भेट देणाऱ्या त्यांच्यातल्या शिवभक्तीबद्दल बोलायचं, की दादरा-नगर हवेली सशस्त्र संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांच्याबद्दल सांगायचं? की सिंहगडाचा तानाजी कडा कोणत्याही आधाराशिवाय चढून जाण्याबद्दल लिहायचं?
शिव प्रेमापोटी पायात वहाणा नसताना , प्रवासासाठी पैसे नसताना, केवळ शिव प्रेमापोटी एक तरुण जेव्हा हजारो मैलाचा प्रवास कधी चालत, कधी सायकळवरून, कधी मिळेल त्या वाहनाने करतो पण शिव भक्तीची ज्योत सार्यांच्या मनात तेवती ठेवण्याचा यत्न करतो हे सारेच विलक्षण! हे बाळकडू त्याला वंशपरंपरागत मिळालेले असते हा ही विलक्षण योगायोगच.
वडिलांनी सांगितलेल्या सिंहगडाविषयीच्या आणि तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाच्या गोष्टी, आठ वर्षांचा मुलगा सिंहगडावर पहिल्यांदा पोहोचताक्षणीच अचूकपणे सांगतो ही खूप नवलाईची गोष्ट होती.
आपल्या मुलाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून वडिलांनी अंगिकारलेले मित्रत्वाचे नाते आणि त्यातून कला, इतिहास, भूगोल, स्वातंत्र्यलढा, संस्कृती याबाबतचं अनौपचारिक शिक्षण देणारे वडील बाबासाहेबांना लाभले.
चित्रकार असलेल्या आपल्या वडिलांकडून कलेचा, इतिहास प्रेमाचा, दातृत्वाचा, कडाडणाऱ्या आवाजाचा, जात-धर्मभेद न पाळण्याचा, देशभक्तीचा वारसा बाबासाहेबांनी घेतला आणि या महाराष्ट्र भूमीत रुजवला. त्यातूनच आज अनेक दुर्गप्रेमी, इतिहासाचे अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडले आहेत, घडत आहेत. बाबासाहेबांचे हे सर्वस्पर्शी योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारं आहे.
शके १८२४, श्रावण शुद्ध पंचमी या तिथीला (दि. २९ जुलै १९२२) पुण्यातल्या शुक्रवार पेठेतील शिर्के वाड्यात राहणाऱ्या ऐतिहासिक पुरंदरे घराण्यात बाबासाहेबांचा जन्म झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून या मुलाने वडिलांबरोबर किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास सुरुवात केली. त्यासाठी मिळेल त्या मार्गाने प्रवास केला.
रात्र रात्र दप्तरे तपासून शिवचरित्राची सामग्री मिळवली. शिवचरित्र लिहिले, पण प्रकाशित करण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा, पैसे जमवण्यासाठी त्यांनी मुंबईच्या भाजीबाजारत कोथिंबीर देखील विकली. लोकांनी हे शिवचरित्र हृदयाशी धरले, त्यांची पारायणे केली.
या शिवचरित्राविषयी आपल्या अग्रलेखात आचार्य आत्रे यांनी लिहिले की, ” हे शिव चरित्र सार्या महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेऊन घरभर नाचत सुटावे, इतके ते सुंदर झाले आहे.” जी गोष्ट शिव चरित्राची, तीच त्यांनी निर्मिलेल्या भव्यदिव्य महानाट्याची.
‘जाणता राजा’ हे शिव चरित्रावर आधारित महानाट्य १९७४ मध्ये शिवराज्याभिषेकाच्या त्रिशताब्दी वर्षात मुंबईतील शिवाजी पार्कवर त्यांनी उभारलेल्या शिवसृष्टीत राज्याभिषेकाचा जिवंत प्रसंग दाखवण्यात आला होता.
यातूनच पुढं ‘जाणता राजा’ या महानाट्याची निर्मिती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल १९८४ रोजी या महानाट्याचा पुण्यात शुभारंभ करण्यात आला. भारतातील अनेक राज्यं आणि अमेरिकेत मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून या महानाट्याचे हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत.
प्रामुख्यानं शिवचरित्र या एकाच विषयावर जाहीरपणे गेली ८० वर्षं बोलणे अन् लिहिणे हा बाबासाहेब पुरंदरे यांचा विश्वविक्रमच म्हणावा लागेल.
‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनिवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ अशी अस्सल मऱ्हाटमोळी साहित्यसंपदा त्यांच्या लेखणीतून उतरली आहे.
पोर्तुगीज सरकारने दादरा-नगर हवेली प्रश्नी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी, पंडित नेहरूंनी अभ्यासक, संशोधकांची ‘गोवा युनिट’ नावाची समिती स्थापन केली होती.
भारताची बाजू पटवून देण्यासाठी आवश्यक ते पुरावे गोळा करण्याची अत्यंत महत्त्वाची आणि जोखमीची जबाबदारी या समितीवर होती. तरुण संशोधक-अभ्यासक या नात्यानं बाबासाहेबांचाही तीत समावेश होता.
बाबासाहेबांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्यानं दिली. हे सारं वाचताना, त्यांची व्याख्याने ऐकताना बाबासाहेबांमधला संशोधक, अभ्यासक, कलावंत अन् प्रतिभावंत ललित साहित्यिक आपल्याला ठायी ठायी भेटतो.
पुरंदरे घराण्याच्या रिवाजाप्रमाणं, बाबासाहेबांच्या घरी विविध जाती-धर्माच्या मुलांनी राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. आई-वडिलांच्या मायेनं बाबासाहेब त्यांची काळजी घेत असत. हा इतिहासाचा वारसदार मनाने कमालीचा हळवा होता. समाजाला सतत देत राहणे आणि आपली बांधिलकी जपणे हे त्यांनी तहहयात सुरू ठेवले.
शिवप्रेम हा त्यांच्याशी मैत्र जोडण्याचा महत्वाचा धागा होता. जेव्हा जेव्हा अनेक तरुण मुले जेव्हा किल्ले पाहायला जातात, त्यांची दुरूस्ती करणे, डागडुजी करणे अशा उपक्रमात भाग घेतात, तेव्हा बाबासाहेबांना ती ह्या गोष्टी पत्राने कळवत असत, तेव्हा बाबासाहेब देखील त्याच उत्साहाने त्यांना आशीर्वादपर पत्रे लिहित. त्यांना प्रोत्साहन देत.
या वयातही त्यांचा ओसंडून वाहणार्या उत्साहाचे श्रेय ते आपल्यामध्ये जपलेल्या लहान मुलाला देत असत. एका मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले होते, की त्यांना तीन गोष्टींचा कंटाळा येतो. एक दाढी करण्याचा, दूसरा, झोपेतून उठल्यावर अंथरूण गोळा करण्याचा आणि तिसरा व्याख्याने देण्याचा.
पहिल्या दोन गोष्टीतून मी माझी सुटका करून घेतली, पण तिसरी गोष्ट मात्र माझ्या वयाच्या आठव्या वर्षापासून मानगुटीवर बसली ती अजून सुटली नाही. महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण अशा अनेक सन्माननी त्यांना गौरवान्वित केले आहे.
बाबासाहेबांचा गौरव करताना प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले होते, “बाबासाहेब ही व्यक्ति आहे की संस्था हेच उमगत नाही. व्यक्ति म्हणावे तर त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे आणि संस्था म्हणावे तर तिची कोठेही शाखा नाही. एका खांबावर उभी असलेली ही वर्तमंकळतील द्वारका आहे.
शाबास ! शाहिरा शाबस! या सत्त्वहीन जगात शिव चरित्राचा गजर करत रहा. तुझ्या शिवकथेत न्हालेला महाराष्ट्र तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती करेल. हे घडावे यासाठी हे इतिहासपुरुषा , शतायुषी हो!” बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या शिवप्रेमाचा इतिहासपुरुष सदैव वाटचाल करत राहील. अशा या शिवशाहिराला मानाचा मुजरा!
—
- ”बाबासाहेब त्या मोजक्या लोकांपैकी एक, ज्यांना बाळासाहेब चरणस्पर्श करायचे”
- “शिवाजी महाराज आपल्या घरी आले होते, मी त्यांना जेवू घातलंय…” भाबड्या आईची गोड आठवण
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.