Site icon InMarathi

महाराष्ट्रातला असा कडा, जिथे नाणं दरीत फेकलं तरीही पाण्यातून वर येतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सह्याद्रीच्या पोटात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं दडलेली आहेत. उंच डोंगर, खोल दऱ्या, नागमोडी वळणं घेत वाहणाऱ्या नद्या, उंचावरून कोसळणारे धबधबे, घनदाट जंगल, वन्य प्राण्यांचा मुक्त संचार इत्यादी गोष्टींमुळे सह्याद्री जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतो.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असंच एक ठिकाण अर्थात नाणेघाट . नाणेघाट हे पुण्यातील जुन्नरजवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आहे. हे मुंबईपासून तीन तासांच्या अंतरावर आहे.

उलट्या धबधब्यासाठी हा घाट जगभर प्रसिद्ध आहे. त्याचे सौंदर्य विशेषतः पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. उलटा धबधबा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात.

 

 

सध्या नाणेघाटातील अद्भुत निसर्गाची अनुभूती देणारा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video of Naneghat waterfall) होतोय.

हिरव्यागार वनराईने नटलेल्या उंचच उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या फेसाळ धबधब्याची दिशाच वाऱ्याच्या दाबामुळं बदलल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. धबधब्यातील पाणी सुरुवातीला खालच्या दिशेने कोसळतंय, परंतु पुढच्याच क्षणी वारा त्याला पुन्हा वरती नेतोय. थोडक्यात हा उलटा धबधबा असल्याचा भास व्हावा.

अर्थात हा काही एकमेव उलटा धबधबा महाराष्ट्रात पहायला मिळत नाही, तर सावंतवाडी तालुक्याच्या अंबोली गावातील ‘कावळेसाद’ हा धबधबा देखील रिव्हर्स धबधबा आहे.

आंबोलीपासून ८ किलोमीटरवर ही एक प्रसिद्ध जलधारा आहे. विस्तीर्ण पठारावर एकत्र झालेले पाणी समोरच्या खोल दरीत या धबधब्याद्वारे कोसळते.  हा धबधबा नेहमी धुक्यात दडलेला असतो. ढगांपाठी पाऊस सुरू झाल्यावर तो दिसू लागतो. दोन टप्प्यांमध्ये हा धबधबा कोसळतो.

आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे दरीतून सोसाटय़ाचा वारा वाहू लागला तर हा भलामोठा धबधबा उलटा फिरू लागतो. हे दृश्य पाहणे खूपच मनोहारी असते.

 

 

मित्रांनो, आपण शाळेत गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे शिकलो. पृथ्वीच्या या शक्तीमुळे पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तिच्या सानिध्यात राहते. जरी एखादी वस्तू उंचीवर फेकली तरी ती गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर येते. नाणेघाटातील धबधबा देखील गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचे पालन करतो. परंतु नाणेघाटच्या धबधब्याचे स्वतःचे नियम आहेत.

वास्तविक हा धबधबा घाटाच्या उंचीवरून खाली येण्याऐवजी वर येतो. होय, याच कारणामुळे या धबधब्याला उलटा धबधबा म्हणतात. नाणे घाटातील धबधब्याचं पाणीही खाली पडतं, परंतु खालून येणाऱ्या वाऱ्याचा दाब हा प्रचंड जास्त असतो.

वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळं नाणे घाटातील धबधब्याचं पाणी पुन्हा वर येतं. त्याच्या वैशिष्ट्यामुळे हा धबधबा लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिथून खालच्या दरीत नाणे जरी फेकले, तरी ते हवेच्या किंवा वार्‍याच्या तीव्र दाबामुळे वर येते. ‘वाऱ्याच्या वेगाची तीव्रता गुरुत्वाकर्षणाच्या बलाएवढी किंवा त्याहून जास्त असते तेव्हा असे घडते.’

मिडियावर व्हायरल नाणेघाटातील हा सुंदर व्हिडीओ पाहून तुम्हाला नाणेघाट पहायला जायची इच्छा तर नक्की झाली असेल. पण तिथं कसं जायचं, कुठं थांबायचं, काय पाहायचं हे प्रश्नदेखील पडले असतील. तेव्हा या ऐतिहासिक नाणे घाटाबद्दल देखील जाणून घेऊया.

नाणेघाट हा महाराष्ट्रातील राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला.

 

 

इसवी सनपूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला, तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे.मौर्य साम्राज्यानंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला.

या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते. येथे असलेल्या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागनिका हिच्याविषयी माहिती मिळते.

या लेखांमध्ये महाराष्ट्राचे आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारे सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारे चार शतके सलगतेने राज्य करत होता. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते.

नाणेघाटाची निर्मिती देखील सातवाहन काळात झाली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘नाणेघाट’ हा प्रमुख मार्ग होता. नाणेघाट कल्याण आणि जुन्नर दरम्यान वसलेला आहे. पुण्यापासून उत्तरेस १२० किलोमीटर अंतरावर नाणेघाट स्थित आहे.

उत्कृष्ट रस्त्यांमुळे तुम्ही येथे अगदी आरामात पोहोचू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बाईक किंवा कारमधून येथे येऊ शकता. याशिवाय सार्वजनिक वाहतूकीची साधनंही तुम्हाला येथे पोहोचण्यास मदत करू शकतात.

 

 

कल्याण मार्गे : मुंबईकर कल्याणला येऊन तिथून कल्याण – मुरबाड – टोकावडे – वैशाखरे असे करत नाणेघाटाच्या पायथ्याशी पोहचू शकतात. इथून नाणेघाटात जायला साधारण २ तास लागतात

पुण्यामार्गे : पुण्याहून जुन्नर – घाटघर करत थेट नाणेघाटात जाता येतं.

नाणेघाटापासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ११६ किमी अंतरावर आहे. तर आकुर्डी रेल्वे स्टेशन १११ किमी अंतरावर आहे. घाटकर (मोरोशी) हा जवळचा बसस्टॉप असून तेथे मर्यादित बससेवा उपलब्ध आहेत.

तेव्हा मित्रांनो वाट कसली पाहताय? आपली बॅग पॅक करा आणि निघा नाणेघाटाच्या सफरीला!!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version