आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
महिलांच्या हक्कांसाठी काम करणार्या पाकिस्तानी एनजीओ ‘औरत फाऊंडेशन’ च्या दुसर्या अहवालानुसार, पाकिस्तानातील जवळपास ७० टक्के स्त्रिया त्यांच्या आयुष्यात एकदा तरी घरगुती हिंसाचाराला बळी पडल्या आहेत. हा हिंसाचार सामान्यतः त्यांच्या पतीद्वारे केला जातो.
शारिरीक आणि लैंगिक हिंसाचार, ऑनर किलिंग आणि जबरदस्ती विवाहामुळे पाकिस्तान महिलांसाठी सर्वात वाईट देशांपैकी एक बनला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ‘ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स’ने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला तळापासून तिसरं स्थान दिलं होते. 153 देशांपैकी पाकिस्तान 151 व्या क्रमांकावर आहे.
पुरुषप्रधान पाकिस्तानमध्ये “सर्वाधिक अत्याचारित” लोक महिला आहेत. अशा स्थितीत एखादी महिला ती ही हिंदू महिला जेव्हा पुरुषप्रधान अशा पोलिस सेवेमध्ये भरती होते ती देखील पाकिस्तानच्या पोलिस सेवेत! ही निश्चितच वेगळी गोष्ट आहे.
पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जेकोकाबाद येथील 26 वर्षीय मनीषा रोपेटा ही ती तरुणी आहे जीने पाकिस्तान पोलिस सेवेतील नोकरी स्वीकारून एक इतिहास रचला आहे. रोपेटा ही सिंध प्रांतातील जेकोबाबाद येथील एका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबातील आहे. अनेक गुन्ह्यांचे प्राथमिक लक्ष्य स्त्रिया आहेत आणि देशात सर्वाधिक अत्याचारित आहेत, असं तिचं मत आहे.
रोपेटाने गेल्या वर्षी सिंध लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली होती. ती 152 यशस्वी उमेदवारांपैकी 16 व्या क्रमांकावर आहे. ती प्रशिक्षण घेत आहे आणि तिला लियारीमध्ये डीएसपी म्हणून नियुक्त केलं जाईल. वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणून काम केल्याने खरोखरच महिलांचे सक्षमीकरण होते आणि त्यांना अधिकार मिळतो, असं तिला वाटतं.
सिंध पोलिसात वरिष्ठ पदावर असणे आणि लियारीसारख्या ठिकाणी मैदानी प्रशिक्षण घेणे सोपे नसले तरी तिचे सहकारी, वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी तिच्या विचारांचा आणि परिश्रमांचा आदर करतात हे ती मान्य करते.
मनीषाने देशातील पहिली हिंदू महिला डीएसपी होण्याचा होण्याचा पराक्रम केला आहे. मात्र, तिचा मार्ग अजिबात सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला केवळ आपल्या नातेवाईकांची चूक सिद्ध करावी लागली नाही, तर ‘चांगल्या घरातील स्त्रिया पोलिस सेवेत जात नाहीत’ या समाजाच्या विचारसरणीशी लढावं लागलं .
गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या लियारी भागातील डीएसपी म्हणून त्यांची लवकरच नियुक्ती होणार आहे. असं करणारी ती देशातील पहिली हिंदू महिला आहे. मेडिकलमध्ये करिअर न करता तिने पोलिस सेवेची निवड केली.
रुपेटा सांगते की, मला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं, माझ्या तिन्ही बहिणींनी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलं आहे. मी MBBS देखील करेन अशी अपेक्षा होती पण परीक्षा पास न झाल्याने मी पोलीस सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.
मनिषा सांगते की, “पाकिस्तानातील महिला सामान्यतः पोलिस स्टेशन आणि कोर्टात जाण्यास कचरतात.
कुटुंबातील पुरुष सदस्यांसोबतच महिला या ठिकाणी जाते. चांगल्या घरातील मुली पोलिस ठाण्यात जात नाहीत, असा समज आहे, हा समज मला बदलायचा होता.”
पोलीस व्यवसायाने मला नेहमीच मोहित केले आणि प्रेरणा दिली. समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मला नेहमीच वाटत होते. तिच्या यशाने लोक खूश असल्याचं मनीषा सांगते.
आपल्या समाजातही आनंदाचे वातावरण आहे. संपूर्ण देश माझे कौतुक करत आहे पण माझ्या नातेवाईक इतरांना सांगतात की मी लवकरच माझे क्षेत्र बदलणार आहे आणि मी हे काम जास्त काळ करू शकणार नाही.
ती म्हणते, सर्वच लोकांचे माझ्याबद्दल असे मत आहे असं नाही. पुरुषप्रधान समाजात पुरुषांना असे वाटते की केवळ तेच या व्यवसायात जाऊ शकतात. ही त्यांची विचारसरणी असेल पण येत्या काही वर्षांत या लोकांचे मत बदलेल. यापैकी कोणाचीही मुलगी पोपोलीस सेवेत दाखल होऊ शकते.
शारीरिक आणि लैंगिक हिंसाचार, ऑनर किलिंग आणि जबरदस्ती विवाह यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या स्त्रियांसाठी सर्वात वाईट देश असलेल्या पाकिस्तानमध्ये रोपेटाला स्त्रीवादाच्या मोहिमेचं नेतृत्व करायचं आहे. मनीषा रोपेटा यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, पीडित महिलांना महिला रक्षकांची गरज आहे आणि या गरजेने त्यांना पोलिसांत सामील होण्याची प्रेरणा मिळाली.
कवितांची आवड असलेल्या मनीषा रुपेटासाठी हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. ती फक्त 13 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले.
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पाच मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांची आई कराचीला आली. त्यांच्या कुटुंबात आईशिवाय तीन बहिणी आणि एक भाऊ आहे.
आपल्या संघर्षमय दिवसांची आठवण करून देताना मनीषा सांगते की, जकूबाबादचं वातावरण तिच्या अभ्यासात सर्वात मोठा अडथळा होता. तिथे मुलींना लिहायला आणि अभ्यास करायला परवानगी नव्हती. मुलींना फक्त वैद्यकशास्त्र शिकण्याची परवानगी होती. मनीषाच्या तीन बहिणी एमबीबीएस डॉक्टर आहेत आणि तिचा लहान भाऊही वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिने सांगितलं, “जिथे बहुतांश पीडित महिला आहेत, तिथे संरक्षक देखील एक महिला असणं आवश्यक आहे. त्यामुळे महिला संरक्षक असणं ही खूप मोठी गरज आहे. या प्रेरणेने मला पोलिसात जावंसं वाटलं.”
===
पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील “ही” सन्मानचिन्हे देतात त्यांच्या पदाची ओळख!
पाकिस्तानात भारताचा ठसका – अस्सल भारतीय रेस्टॉरंट : इंडियन चस्का..!
===
तिला पाकिस्तानची पहिली हिंदू महिला डीएसपी बनण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुलींच्या शिक्षणाबद्दल उत्साह नसणे आणि सामाजिक रूढीप्रियतेपासून ते तिच्या स्वतःच्या कुटुंबातील लोकांचा तिच्यावर विश्वास नसणे या सर्व अडचणी तिच्या विरोधात आहेत. या अशा सर्व शक्यतांना मागे टाकून रोपेटाने तिच्या नातेवाईकांना “चुकीचं” सिद्ध केलं आहे. गुन्हेगारीग्रस्त लियारीमध्ये मैदानी प्रशिक्षण घेण्यासोबतच, मनीषा रोपेटा एका खाजगी अकादमीमध्ये शिकवते.
तिने सांगितलं, “मी एका खाजगी अकादमीतही शिकवते. मी त्यांना मार्गदर्शन करते. हे माझ्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे. मला वाटतं की माझ्या मार्गदर्शनामुळे अनेक मुली पुढे जाऊ शकतात. हे [ मार्गदर्शन] त्यांच्यासाठी उत्साहवर्धक असू शकतं.”
मनिषाच्या आधी सिंधमधील उमरकोट जिल्ह्यातील पुष्पा कुमारी यांनी सिंध पोलिसात पहिली हिंदू सहाय्यक उपनिरीक्षक बनून विक्रम केला होता. तर सुमन कुमारी या पाकिस्तानातील पहिल्या महिला हिंदू न्यायाधीश बनल्या आहेत. तसेच सिंध प्रांतातील कृष्णा कुमारी कोल्ही या मुस्लिमबहुल देशातील पहिल्या हिंदू दलित महिला सिनेटर बनल्या आहेत, थारमधील 39 वर्षीय कोल्ही या बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) सदस्य आहेत.
मित्रांनो, बदल हा निसर्गाचा नियम आहे. पाकिस्तानात होवू घातलेला हा महिला सक्षमीकरणातील हा लहान बदल देखील पुढे जाऊन तिथल्या महिलांसाठी राजमार्ग होऊ शकतो. यासाठी मनीषा रोपेटा यांचे अभिनंदन!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.