Site icon InMarathi

मित्रो! चांगले दिवस आलेत…कारण मोदीजी फक्त आवाहनं करत आहेत!

modi-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मोदींनी राज्य सरकारांना आवाहन केलंय. गो रक्षकांच्या हिंसेवर आवर घालण्याचं. ३ वर्ष पूर्ण होऊन गेलीत तरी हे सरकार आवाहनांच्या पुढे सरकत नाहीए.

कचरा होतोय? जनतेला स्वतः स्वच्छता करण्याचं आवाहन. डॉक्टर कमी पडताहेत? डॉक्टरांना गरिबांसाठी आठवड्यातील एक दिवस मोफत काम करण्याचं आवाहन. काळा पैसा? लोकांना कॅश लेस होण्याचं आवाहन.

आवाहन करणं चूक नाहीच. जनतेला अधिकाधिक सजग करणं, सुसंस्कृत करणं योग्यच. पण फक्त तेवढंच करून कसं चालणार? आम्ही केंद्र सरकारकडून शासन आणि अनुशासनाची अपेक्षा सोडूनच द्यावी की काय? प्रधानसेवक पदाची नोकरी कशासाठी दिली आहे?

indianexpress.com

नोट बंदीसारखी अप्रतिम स्टेप हास्यास्पद अंमलबजावणीमुळे फक्त तापदायक ठरली. फायदा नजरेच्या टप्प्यात काही येताना दिसत नाही. लोकांना कॅश लेस आणि लेस कॅश होण्याचा आग्रह करणे एवढंच काय ते धोरण दिसतंय. दरम्यान अख्खी जनता २००० च्या नोटा खिश्यात घेऊन फिरत आहे. सरकारनेच छापलेल्या. आधी वाटलं होतं की बॉटलनेक होऊ नये म्हणून मोठ्या नोटा आणल्या असतील, २००० च्या नोटा देखील हळूहळू काढून घेतील अशी आशा होती…पण आता ती आशाही राहिली नाही. असो. विषय आहे प्रधानसेवकांच्या आवाहनाचा.

मोदींच्या रिपीटेड आवाहनाचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. गो रक्षकांवर तर अजिबातच नाही. अनेकांचं म्हणणं असंय की ते मुळात गोरक्षक नाहीच. आणि ते बऱ्याच अंशी खरंय. नुकत्याच घडलेल्या काही प्रकरणांमध्ये ते दिसूनही आलंय. पण खुद्द पंतप्रधान acknowledge करत आहेत म्हणजे गो रक्षक समस्या अगदीच रद्द ठरत नाही. सत्य हे ही आहेच की, ह्या अश्या हिंसा आधीदेखील होत्याच. सध्या त्यावर आवाज अधिक होतोय इतकंच. पण आधी होत होत्या आणि आत्ताच त्यावर आवाज उचलला जातोय म्हणून जे घडतंय त्याकडे दुर्लक्ष करावं की काय? राज्य शासनांना आवाहन करून काही होत नाही हे स्पष्ट दिसतंय. त्यापुढे काही करणार आहेत की नाही मोदीजी?

काळजी गो रक्षकांच्या हिंसेची नाही. हिंसेची आहे. कुणाच्याही. कोणत्याही.

केंद्र सरकार बदलून ३ वर्ष झाली आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर राज्य सरकार बदलून ३ पूर्ण व्हायला आलीत. लॉ अँड ऑर्डर मध्ये काही सुधारणा झाल्याचं दिसत नाही. ना स्त्रियांना छेडणाऱ्या रोड रोमियोंवर जरब बसलीये ना पोलिस स्टेशनवर चालून येणाऱ्या गुंडांवर. ही जरब, हा धाक सुद्धा लोकांनीच बसवावा का आता?

indianexpress.com

सरकार लॉ अँड ऑर्डरकडे लक्ष द्यायचं सोडून लोकांना उपदेश करतंय. आवाहनं करतंय. पण कृतीशून्य आवाहनांनी काही होत नाही. मुद्रा आणि स्टार्ट अप सारखा नुसता भपका होतो. फोटो ऑप्ससाठी लोक झाडू घेतात आणि नंतर तिथेच येऊन कचरा टाकतात.

बँका धंद्यासाठी कर्ज देत नाहीत, स्टार्ट अप पॉलिसी अशी बनवलीय की हजारात एखादा त्यात फिट बसतो, स्वच्छतेची जबाबदारी असणारे काम करत नाहीत. सरकारी दवाख्यान्यांत गेलो तर रुग्णांची कीव यावी की डॉक्टरांची असं वाटतं.

आणि मोदीजी मात्र जनतेला आवाहनं करत रहातात.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version