Site icon InMarathi

या ५ मुलभूत चुका झाल्या अन् बीएसएनएल सारखी बाप कंपनी डबघाईला आली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दूरसंचार म्हणजेच टेलीकॉम हे क्षेत्र फार अजब आहे. एकीकडे सर्व प्रस्थापित कंपन्या या 5जी साठी बोली लावण्यास सज्ज झाल्या आहेत, तर दुसरीकडे भारत सरकारची ‘बीएसनल’ ही सध्या आपल्या अस्तित्वाचा संघर्ष करत आहे.

‘रेंज न मिळणं’, ‘कॉल मध्येच कट होणं’, ग्राहक सेवा प्रतिनिधी कधीच ऑफिसमध्ये किंवा टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध नसणं अशी ख्याती झालेल्या ‘बीएसनल’ला सध्याच्या तीव्र स्पर्धेत तग धरता येत नाहीये हे आता सिद्ध झालं आहे.

काही अंशी याला भारतीय ग्राहक देखील जबाबदार असतील जे, की सरकारी संस्थांकडून वस्तू किंवा सेवा घेण्यापेक्षा खासगी क्षेत्रातील संस्थेसोबत व्यव्हार करणं पसंत करतात आणि मग सरकारी सेवा खराब आहे अशी तक्रार करतात.

हे होतं, मान्य आहे, पण हे घडण्यामागे हे एकच कारण आहे, की “आजच्या ग्राहकाकडे वेळ, धीर नाहीये. तो अधिक पैसे देईलही, पण सेवा तशी मिळावी अशी अपेक्षा करेल.”

जपान, जर्मनी येथील लोकांशी तुलना केली तर भारतात ‘कस्टमर लॉयल्टी’ हा प्रकार तसा कमीच बघायला मिळतो. ‘स्वस्त ते पौष्टिक’ असा मार्केटचा नियम असलेल्या आपल्या भारतात ‘जियो’ सारखा पर्याय उपलब्ध झाला आणि टेलीकॉम क्षेत्राचे सर्व समीकरणच बदलले. एखाद्या गरुडाने जमिनीवरील असलेली शिकार झडप घालून उचलून न्यावी तसं जियो ने मोठा गाहकवर्ग आपल्याकडे खेचला.

‘जियो’ आल्यानंतर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या संस्थांची तारांबळ उडाली. एअरटेल, आयडीया यांनी चतुराईने आपल्या सेवा, दर यांच्यात बदल केले आणि आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवलं, पण कधी काळी प्रथम क्रमांकावर असलेल्या ‘बीएसएनएल’ला प्रवाहासोबत बदलता आलं नाही आणि आज त्यांच्यावर आज बंद होण्याची वेळ आली आहे हे कटू सत्य आहे.

बीएसएनएलची स्थापना कधी आणि कोणी केली? आणि त्यांनी नेमक्या कोणत्या व्यवसायिक चूका केल्या? जाणून घेऊयात.

 

 

१५ सप्टेंबर २००० रोजी ‘भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)’ ची तत्कालीन पंतप्रधान दिवंगत श्री. अटल बिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून स्थापना करण्यात आली.

भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खातं हे या कंपनीचे मालक आहेत. नवी दिल्ली येथे मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीत आज भारतभर मिळून १.७५ लाख इतके कर्मचारी कार्यरत आहेत आणि आज या सर्वांचं मासिक वेतन देणं हे कंपनीसाठी मोठी समस्या होऊन बसलं आहे.

बीएसएनएलने स्थापनेपासून ग्रामीण भागात दूरसंचार सेवा पुरवण्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. २००० साली त्यांनी इंटरनेट, लँडलाईन फोन आणि मोबाईल सेवा पुरवण्यास सुरुवात केली.

२००२ साली बीएसएनएलने 2जी सेवा पुरवण्यास सुरुवात केली. २००५ मध्ये ब्रॉडबँड सेवा आणि २०१० मध्ये 3जी सेवा असा प्रवास आहे.

१. महाग ‘लँडलाईन’ सेवा-

 

 

बीएसएनएलच्या सर्व सेवांपैकी ‘लँडलाईन’ या सेवेतून त्यांना सर्वाधिक नफा होत होता. पण, २००६-२००७ या आर्थिक वर्षांपासून नवीन ‘लँडलाईन’ कनेक्शनचं प्रमाण कमी झालं आणि २०१५ पर्यंत जवळपास १ कोटी ६० लाख लोकांनी बीएसएनएल कनेक्शन बंद केले. कारण, ‘लाईफ टाईम फ्री’ मोबाईल मिळत असतांना बीएसएनएल हे आपल्या ग्राहकांकडून १२५ रुपये प्रति महिना इतकी रक्कम वसूल करत होते.

२. सेवा पुरवण्यात असलेल्या त्रुटी-

एकीकडे बीएसएनएलचे कनेक्शन्स तर वाढत होते, पण त्या नवीन ग्राहकांना सेवा देण्यास बीएसएनएलची यंत्रणा सक्षम नव्हती. जमिनीखाली असणाऱ्या तारांचे प्रश्न वेळेत न सुटणे, फोन बंद असणे या समस्यांमुळे लोकांनी बिल भरणं बंद केलं आणि कंपनीचा आर्थिक तोटा वाढत गेला.

३. खर्चाचा अंदाज चुकणे-
ग्रामीण भागात सेवा पुरवत असतांना बीएसएनएलला अपेक्षेपेक्षा अधिक खर्च होणं, ग्राहकांकडून वेळेवर आणि पूर्ण पैसे न मिळणं अशा समस्यांना सामोरं जावं लागलं. ज्यामुळे कंपनीला ९,५२८ कोटी रुपयांचं नुकसान झालं. मागील ४ वर्षात बीएसएनएलला एकूण ३२,००० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

४. सरकारी अनुदान काढून घेण्यात आलं-

१९९९ मधील दूरसंचार नियमावलीनुसार, बीएसएनएल ला परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम शुल्क यांच्यात ‘सामाजिक योगदान’ या सबबीखाली आर्थिक सूट देण्यात आली होती, पण २००६-२००७ या आर्थिक वर्षात ही सूट काढून घेण्यात आली. हे सरकारी अनुदान बंद झाल्याने बीएसएनएलला दरवर्षी ३००० कोटी रुपयांचं नुकसान होऊ लागलं.

 

 

५. रिलायन्स ‘जियो’चा दणका-

“कर लो दुनिया मुठ्ठी मे” असं म्हणत धीरूभाई अंबानी यांनी भारतात ५०० रुपयात मोबाईल देऊन एक ‘मोबाईल क्रांती’ आणली होती. त्यांचा मुलगा मुकेश अंबानीने त्यापुढे पाऊल टाकत ‘फुकट कॅलिंग, कवडीमोल भावात इंटरनेट’ मिळू शकतं हे भारतीयांना सिद्ध करून दाखवलं.

याचा परिणाम हा झाला की, खेडोपाडी बीएसएनएलच्या सुमार सेवेने त्रस्त असलेली जनता जियोकडे वळली आणि बीएसएनएलचं कंबरडं मोडलं.

भारत सरकारची बीएसएनएल संबंधित असलेल्या निविदा काढण्याची संथ गती हे देखील इतर कंपन्यांच्या फायद्याचं ठरलं. बीएसएनएलच्या भविष्याबद्दल आज सर्वच साशंक आहेत.

कंपनीत कार्यरत असलेले कर्मचारी सध्या या सर्व समस्यांवर तोडगा काढावा आणि त्यांचे पगार नियमित व्हावेत अशी केंद्र सरकरकडे प्रार्थना करत आहेत. त्यांची इच्छा लवकरच पूर्ण व्हावी अशी आपण आशा व्यक्त करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version