आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
डोळे हा अवयव आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातही तुम्ही अशा क्षेत्रात काम करत असाल, जिथे दृष्टी उत्तम असण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, तर मग काही विचारायलाच नको. नीट दिसत नसेल, तर दैनंदिन जीवनातील कामं करणं सुद्धा अशक्य होऊन बसतं.
खेळ ही एक अशी गोष्ट आहे, ज्यात डोळे उत्तम असणं ही काळाची गरज म्हणायला हवी. त्यातही क्रिकेटसारख्या खेळात तुमची दृष्टी फारच महत्वाची भूमिका पार पडतात. जगातील उत्तम यष्टीरक्षकांच्या यादीत अगदी हमखास बसणारा दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळेच क्रिकेटपासून दूर झाला होता.
इम्रान ताहीरने टाकल्या चेंडूने स्टंप्सचा वेध घेतला. त्यावरील बेल उडून मार्कच्या डोळ्याला लागली, त्यामुळे त्याला दुखापत झाली आणि एक उत्कृष्ट यष्टीरक्षक क्रिकेटपासून दूर झाला. मात्र असे दोन भारतीय क्रिकेटपटू होते ज्यांनी चक्क दृष्टी गमावून सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर दमदार कामगिरी केली. कोण होते ते दोघे आणि काय आहे त्यांची कहाणी, जाणून घेऊया.
त्या दोघांनी गाजवलं क्रिकेट विश्व…
पतौडी खानदानाचे राजपुत्र आणि नंतर स्वतः नवाब झालेले मन्सूर अली खान यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. तुम्ही क्रिकेट चाहते असाल, तर टायगर पतौडी यांचं नाव आणि त्यांची दमदार कामगिरी तुम्हाला माहित असेलच. भारतीय संघाचे माजी कर्णधार, भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलून टाकणारे टायगर पतौडी एका डोळ्याने आंधळे होते हे मात्र अनेकदा विस्मरणात जातं.
अशीच काहीशी गोष्ट भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज साबा करीम यांची… करीम यांनी सुद्धा एका वाईट घटनेमुळे आपला एक डोळा गमावला होता. आज या दोघांच्या अपघातांविषयी जाणून घेऊया.
नवाबजादा जिद्दीने लढला…
नवाब इफ्तीकार खान आणि बेगम सजिदा सुलतान यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे मन्सूर अली खान पतौडी! हा नवाबजादा इंग्लंडमध्ये वाढला. वयाच्या १६ व्या वर्षीच त्यांनी कौंटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तुफान फटकेबाजी करत त्यांनी जणू धावांची टाकसाळ उघडली होती. राजघराण्याचा खासा अंदाज, तो रुबाब त्यांच्या वागण्या-बोलण्यात होताच, तोच जणू काही त्यांच्या फलंदाजीत दिसायचा. दिमाखदार आणि स्फोटक फलंदाजी ही त्यांची ओळख होती.
या दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांना भारतीय संघात संधी मिळाली नसती, तरच नवल. वयाच्या विसाव्या वर्षी १९६१ साली त्यांची भारतीय संघात निवड झाली. या आनंदात मन्सूर अली गाडी घेऊन फिरायला निघाले. विसाव्या वर्षी स्वप्नपूर्तीची संधी तर मिळाली, मात्र नियतीच्या मनात काही निराळंच होतं. कारला अपघात झाला. मन्सूर अली जखमी झाले. या सगळ्यात त्यांच्या डोळ्यात गेलेला काचेचा तुकडा कुणाच्या लक्षात आला नाही.
तो दिसला तोपर्यंत फारच उशीर झाला होता. डोळ्याची दृष्टी अधू झाली होती. कॉन्टॅक्ट लेन्सेस शिवाय काहीही दिसणं अशक्य होतं. आपण सहसा कुठल्याही गोष्टीकडे फार अधिक ताक लावून पाहिलं, तर एकाऐवजी दोन वस्तू दिसतात, हा अनुभव तुम्ही घेतला असेल. पतौडींचं तसंच काहीसं झालं होतं. फलंदाजी करताना लक्ष केंद्रित करायचं ठरवलं, की दोन गोलंदाज धावताना येत असलेले दिसत. दोन चेंडू आपल्याकडे येत आहेत असा भास होई.
लहानपणीचं स्वप्न मात्र पूर्ण करायचं होतं. त्यांनी चेन्नई गाठली. एमसीसी विरुद्धच्या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला. पतौडी मैदानावर तर उतरले, मात्र ते चाचपडत खेळत होते. दृष्टी त्यांची अंधुक झाली होती, मात्र खरेखुरे अफलातून फलंदाजी करणारे पतौडी प्रेक्षकांच्या नजरेत येत नव्हते. कशाबशा त्यांनी ३५ धावा जमवल्या. त्यानंतर मात्र त्यांचा संयम सुटला. त्यांनी कॉन्टॅक्ट लेन्स काढून टाकल्या. जायबंदी डोळा टोपीने झाकला आणि फलंदाजी सुरु केली. अचानक चमत्कार झाला, स्फोटक फलंदाजी करणारे पतौडी मैदानावर दिसू लागले, त्याची खेळी उत्तम रंगली.
पुढे काही महिन्यांतच, त्यांनी भारतीय संघात पदार्पण केलं. अपघात घडून सहा महिने सुद्धा उलटले नव्हते आणि त्यानीं स्वप्न पूर्ण केलं. तिसऱ्याच सामन्यात त्यांनी शतक सुद्धा झळकावलं. त्यांची फलंदाजीची आकडेवारी फार भन्नाट वाटत नसली, तरी त्यांनी १७ वर्षं एका डोळ्याच्या सहाय्याने क्रिकेट खेळलं आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
एवढंच नाही, तर व्हायच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांना भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आलं. त्यांच्या कर्णधारपदाच्या, काळात ‘आपणही जिंकू शकतो’ असा विश्वास भारतीय संघात निर्माण झाला. त्यांचं भारतीय क्रिकेटसाठी मोठं योगदान आहे. त्यांना टायगर हे नाव पडलं, त्याचं हेदेखील एक कारण मानलं जातं.
सारं काही संपल्यासारखं वाटत होतं पण..
भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज साबा करीम यांनाही अशाच एका दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागलं होतं. १८ वर्षांचं उत्तम फर्स्ट क्लास करिअर, ५५ पेक्षा अधिक सरासरी अशी आकडेवारी असूनही, त्यांना पदार्पणाची संधी मिळाली ती ३१ व्या वर्षी! नयन मोंगिया, किरण मोरे यांच्यासारखेच यष्टीरक्षक संघात असताना, त्यांची डाळ शिजली नाही. अखेर बांगलादेश विरुद्ध १९९७ साली पदार्पणाची संधी मिळाली.
७ बाद १७९ या धावसंख्येवर त्यांनी मैदानात पाऊल ठेवलं आणि भन्नाट अर्धशतक ठोकलं. भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही, पण जी पहिली आणि अखेरची संधी असेल असं करीम यांना वाटलं होतं त्या खेळीने त्यांचं संघातील स्थान भक्कम झालं. मोंगिया यांच्या दुखापतीमुळे संघात येण्याची संधी मिळाली आणि पुढील तीन वर्षं उत्तम गेली. जागा गमवावी लागली तरी ते पुनरागमन करत होते.
–
क्रिकेटविश्वातल्या या ७ गैरसमजुती प्रत्येक भारतीयांच्या मनात खोलवर रुजवल्या गेल्या आहेत!
या अपमानास्पद प्रसंगामुळे तुफान बॉक्सरने चक्क ऑलिंपिक मेडल नदीत फेकून दिलं
–
१९९९ साली आशिया चषकात खलनायची संधी चालून आली, पण इथेच घात झाला. कुंबळेचा चेंडू त्यांच्या उजव्या डोळ्यावर लागला. त्यांना तंबूत नेण्यात आलं. काहीवेळाने त्यांनी डोळे उघडल्यावर त्यांना सारं काही दिसत होतं. त्यांनी मैदानावर जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र सत्य परिस्थिती वेगळीच होती. डावा डोळा बंद केला, तर त्यांना काहीही दिसत नव्हतं. उजव्या डोळ्याची दृष्टी गेली होती.
डोळ्याच्या मॅक्युला या भागाला दुखापत झाली होती. ती बारी होणं शक्यच नसल्याचं, सर्वच डॉक्टरांचं म्हणणं होतं. करीम यांनी सारं काही संपलं असल्याची मानसिक तयारी केली…
ती भेट झाली आणि…
करीम यांनी आशा सोडून दिल्या होत्या. मात्र एक चमत्कार घडला. साठ वर्षांचे टायगर पतौडी आणि करीम यांची भेट झाली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत, जिद्द न सोडण्याचा प्रयत्न करीम यांनी केला. २००० साली बांगलादेशच्या त्याच मैदानावर त्यांनी कसोटी पदार्पण केलं. एकाऐवजी दोन चेंडू दिसत असताना, ते चाचपडले. पतौडींप्रमाणे एका डोळ्याने खेळत राहण्याची जिद्द मात्र त्यांना दाखवता आली नाही.
कसोटी पदार्पण आणि ३४ वनडे सामन्यांची कारकीर्द संपली. एकाने विसाव्या वर्षी एक डोळा गमावून उभ्या क्रिकेटजगतावावर राज्य केलं. एकाने त्याच्यापासून प्रेरणा घेऊन पुन्हा जिद्द गोळा करून पाहिली. मात्र या दोघांनीही अशी कामगिरी करून दाखवली, जी क्रिकेटप्रेमी सहजपणे विसरणार नाहीत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.