Site icon InMarathi

अंडरडॉग संघातील तरण्याबांड गोलंदाजाने जेव्हा ३६ तासांसाठी सचिनची झोप उडवली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सचिन रमेश तेंडुलकर हे नाव ऐकलं, की आजही क्रिकेटप्रेमींच्या अंगावर शहारा येतो. त्याची आक्रमकता, त्याची खेळण्याची शैली, त्याचा मैदानावरील वावर, त्याचे विक्रम, एक ना अनेक किती गोष्टींबद्दल बोलावं, किती गोष्टी आठवाव्यात. आजही तो कुठल्याही कारणासाठी मैदानावर दिसला, की ‘सचिन सचिन’चा जयघोष मैदानावर सुरु होतो.

सचिन एवढं नाव जरी उच्चारलं, तरी क्रिकेटप्रेमींचे कान टवकारतात. त्याचे किस्से ऐकायला, सांगायला आजही त्याच्या चाहत्यांना फार आवडतं.

वयाच्या सोळाव्या वर्षी आंतराष्ट्रीय संघाची जर्सी परिधान करून मैदानावर उतरलेला सचिन, पहिल्याच सामन्यात एका वेगवान बाउन्सरमुळे त्याचं नाक फुटणं, सुरुवातीचे अनेक सामने वनडे सामन्यांमध्ये त्याचं शतक सुद्धा न होणं, टेनिस एल्बोसारख्या आजारातून सावरून पुनरागमन करत त्याने केलेली दमदार फलंदाजी, नर्व्हस नाईंटीज, आणि शेवटी तो शतकांचा आणि अनेक विक्रमांची शहनशाह होणं, किती किस्से सांगावेत या क्रिकेटच्या देवाबद्दल!

 

 

त्याचा असाच एक किस्सा आज जाणून घेऊयात. जे त्याच्या करिअरमधील सर्वात गंभीर असे ३६ तास असल्याचं दस्तुरखुद्द सचिनने सुद्धा म्हटलं आहे.

…आणि त्या सेलिब्रेशनमुळे सचिनला धक्काच बसला :

ही गोष्ट आहे १९९८ मधली, भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात खेळत होता. सचिन क्रीझवर उभा होता, एका २३ वर्षीय गोलंदाजाचा बाउन्सर सचिनला नीटसा कळला नाही. सोडून देता आला नाही. या चेंडूवर तो बाद झाला आणि तंबूत परतला.

ही विकेट मिळताक्षणीच झिम्बाब्वेचा तो तरणाबांड गोलंदाज ओलोंगो याने आक्रमक पवित्रा घेत सेलिब्रेशन केलं. सचिनच्या चेहऱ्यावरील नाराजी आणि राग त्यावेळी स्पष्ट दिसत होता. मात्र ही या कथेची सुरुवात नाही. हा आहे कथेचा मध्य!

या कहाणीत पुढे काय घडलं, ते अनेकांना ठाऊक असतं, पण या विकेटचा, या सेलिब्रेशनचा इतिहास मात्र माहित असतोच असं नाही. तो भलताच.रंजक आहे.

कारकिर्दीच्या सुरुवातीलाच धक्का :

वयाच्या १८ व्या वर्षी ओलोंगोने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात पदार्पण केलं. ३१ जानेवारी १९९५ या दिवशी झिम्बाब्वेकडून मैदानात उतरत त्याने इतिहास घडवला. तो या संघाकडून खेळणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू ठरला.

 

 

पदार्पणातच त्याने पहिल्याच षटकात पाकिस्तानचा एक गडी बाद केला. मात्र त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. झिम्बाब्वेने पाकिस्तानचा पराभव केला. हा त्यांचा पहिला कसोटी विजय होता.

एवढंच नाही तर त्याच्यावर चकिंग म्हणजेच फेकी गोलंदाजीचे आरोप झाले आणि त्याला संघाबाहेर जावं लागलं.

भारताची निवड :

गोलंदाजीची शैली सुधारणं हा एकमेव पर्याय त्याच्याकडे होता. त्याची गोलंदाजी तुफान वेगवान होती. टायच्या वेगावर त्याचा विश्वास होता, मात्र ऍक्शनमध्ये सुधारणा होणं गरजेचं होतं. त्याला यासाठी कुठल्याही देशाची निवड करता आली असती, मात्र त्याने चेन्नईमधील एमआरएफ फॉउंडेशनची निवड केली.

डेनिस लिली यांच्या अध्यक्षतेखाली गोलंदाजीचं प्रशिक्षण घेत असताना, तो चेन्नईची लाईफ सुद्धा एन्जॉय करत होता. त्याकाळी चेन्नईत एकाच क्रिकेटरचं नाव गाजत होतं, ते म्हणजे सचिनचं! तेच नाव सतत कानावर पडू लागलं.

गोलंदाजी सुधारून तो रुळावर आला. एकीकडे झिम्बाब्वे संघ प्रगती पथावर होता आणि ओलोंगो मात्र विस्मरणात जाऊ लागला होता. दुखापती, अचूक टप्पा न साधता येणं आणि करिअरमधील चढ-उतार यातच तो अडकून राहिला.

तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकून घेतलं सारं :

१९९८ साली ओलोंगोने दमदार पुनरागमन केलं. भारताच्या संघाविरुद्ध त्याचा संघ खेळात होता. भारताचा संघ तर दूर, सचिनच्या तडाख्यातून वाचणं अशक्य होतं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दोन सामन्यात शतकं, तीन मल्टिनॅशनल स्पर्धांच्या अंतिम सामन्यात शतकं, अशा खेळी तो खेळला होता. शतकांची टाकसाळ त्याने उघडली होती.

 

 

भारताला रोखण्यासाठी ओलोंगोला बोलावणं धाडण्यात आलं. पाठीला आणि मांडीला दुखापत झालेली असताना सुद्धा त्याने संघात प्रवेश केला. एवढंच नाही, तर आल्यावर उत्तम फलंदाजीचं प्रदर्शन केलं. ५० मिनिटाचा डाव खेळत बहुमूल्य ३३ धावांची भागीदारी रचली.

नंतर निम्म्या भारतीय संघाला तंबूचा रस्ता दाखवला. मोंगिया, सिद्धू, अझर, गांगुली, रॉबिन सिंग, ही मंडळी त्याच्या गोलंदाजीवर तंबूत परतली. भारताचा १७३ खुर्दा उडाला. झिम्बाब्वेने दुसरा कसोटी विजय मिळवला आणि ओलोंगो सामनावीर ठरला.

कोका-कोला कपमधील उत्तम कामगिरी :

१९९८ च्या कोका कोला कपमध्ये झिम्बाब्वेने उत्कृष्ट कामगिरी केली. विश्वविजेत्या लंकेला दोनदा धूळ चारली. लीगमधील अखेरचा सामना होण्याआधीच भारत आणि झिम्बाब्वे यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अखेरच्या सामन्याला फारसं महत्त्व उरलं नव्हतं.

मात्र या सामन्यातून ओलोंगो पुनरागमन करत होता. त्याच्यासाठी हा महत्त्वाचा सामना होता. मात्र हा सामना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा सामना ठरणार होता, हे कुणालाही ठाऊक नव्हतं.

सामन्याचं दुसरंच षटक, दुसऱ्याच चेंडूवर गांगुली बाद झाला. गोलंदाज होता ओलोंगो! या तरुणाच्या पुढच्या षटकात द्रविड सुद्धा माघारी परतला. तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सचिनच्या बॅटची कड लागली, किपरने झेल टिपला. ओलोंगो आनंद साजरा करणार इतक्यात नो बॉलची घोषणा पंचांनी केली.

पुढच्या चेंडूवर त्याने तिखट बाउन्सर टाकला. सचिनला तो कळला नाही. सोडून देता आला नाही. तो बाद झाला. ज्या फलंदाजाचं नाव चेन्नईत सदासर्वदा कानावर पडत होतं, त्या सचिनला ओलोंगोने सलग दोन चेंडूंवर बाद केलं होतं. त्याने एक आक्रमक सेलिब्रेशन केलं.

 

 

गांगुली, द्रविड आणि फॉर्मात असलेला सचिन; ओलोंगोसाठी तीन षटकं म्हणजे स्वप्न होतं. मात्र सचिनला ही बाब जिव्हारी लागली.

बाद झाल्यावर त्याने सरावाचं ठिकाण गाठलं. पाऊण तास शॉर्ट बॉल्सचा सराव केला. तो परतला तोवर भारतीय संघ १९२ धावांत आटोपला होता २०९ धावांचं आव्हान भारताला पेललं नव्हतं.

…आणि फायनलचा दिवस आला :

या सामन्यानंतर सचिनला रात्रभर झोप लागली नव्हती. ३६ तासानंतर स्पर्धेचा अंतिम सामना होणार होता. सचिनने या वेळात अधिकाधिक काळ शॉर्ट बॉल्सचा सराव केला. हा ३६ तासांचा काळ त्याच्या आयुष्यातील सर्वाधिक कठीण काळ असल्याचं सचिनने अनेकदा म्हटलं आहे.

झिम्बाब्वेच्या संघाने सचिनसाठी एक योजना आखली होती. तो फलंदाजीला येईल तेव्हा ओलोंगोच्या हाती चेंडू आणि बॉऊन्सर्सचा मारा होणार होता. तोंडाने नाही, तर बॅटने उत्तर देणाऱ्या सचिनच्या मनात मात्र काही वेगळंच होतं.

पहिलाच दमदार शॉर्ट बॉल त्याने सीमापार धाडला. त्याची आक्रमकता पाहून केवळ प्रतिस्पर्धी नाहीत, तर गांगुलीसुद्धा चकित झाला होता. भारताने ३० षटकात बिनबाद १९७ धावा करून झिम्बाब्वेचं आव्हान पूर्ण केलं.

एकीकडे गांगुलीने ९० चेंडूत ६० धावा जमवलेल्या असताना, सचिनने ९२ चेंडूत १२४ धावा हाणल्या होत्या. १२ चौकार आणि ६ षटकारांचा यात समावेश होता. यात मजेची बाब अशी की ही खेळी अखेरीस काहीशी थंडावली होती. सचिनने अवघ्या २८ चेंडूंमध्येच अर्धशतक झळकावलं होतं.

 

 

आता लावा तुम्हीच हिशोब. ओलोंगोला या सामन्यात ६ षटकांत ५० धावा ठोकल्या गेल्या.

हीथ स्ट्रीक याने मात्र ओलोंगोला धीर दिला. ‘सचिनसारखा फलंदाज जेव्हा असं काही करायचं ठरवतो, तेव्हा त्याला कुणीही रोखू शकत नाही. तू उदास होऊ नकोस’ असं म्हणत त्याने ओलोंगोचं सांत्वन केलं.

यातून सावरत त्याने दमदार पुनरागमन केलं. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने डावात पाच गडी टिपले. झिम्बाब्वेने पुन्हा पाकिस्तानचा पराभव केला आणि त्या विजयाचा शिल्पकार होता ओलोंगो!

त्याने या मालिकेत मालिकावीराचा खिताब सुद्धा पटकावला होता. सचिनने केलेल्या धुलाईनंतर त्याला एक गोष्ट कळली होती. कुठल्याही दर्जेदार फलंदाजाला कधीही डिवचायचं नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version