इंग्रजांना नमवण्यासाठी समुद्राला साखळदंडात बांधणारी धुरंधर “बिझनेसवुमन”…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
७व्या शतकात ‘ईस्ट इंडिया कंपनी’ भारतात व्यापार करण्यासाठी आली. पुढे या कंपनीच्या विस्तारासाठी इंग्रज भारतात आले आणि त्यांनी भारतावर १५० वर्ष राज्य केलं.
इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्यासाठी क्रांतिकारी लोकांनी शस्त्र हातात घेतले आणि शेवटी सत्याचा विजय झाला हा इतिहास वाचत आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या शूर वीरांनी, विरांगणांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्यापैकी राणी लक्ष्मीबाई, राणी अहिल्याबाई ही नावं प्रामुख्याने आपल्याला माहीत आहेत.
‘राणी रश्मोनी’ हे एका अशा वीरांगनेचं नाव आहे ज्यांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ला त्यांचं सामर्थ्य समजल्या जाणाऱ्या ‘व्यापार’ या क्षेत्रात मात दिली होती हे मात्र फारसं प्रचलित झालेलं नाहीये.
बंगालच्या असलेल्या ‘राणी रश्मोनी’ यांच्या नावाकडे इतिहासाने कायमच दुर्लक्ष केल्याचं बोललं जातं. कोण आहेत राणी रश्मोनी? काय आहे त्यांचं कर्तृत्व? हे जाणून घेऊयात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
राणी रश्मोनी यांचा २८ सप्टेंबर १७९३ रोजी बंगाल मधील ‘हालिसहर’ नावाच्या छोट्या गावात एका कोळी कुटुंबात जन्म झाला होता. त्यांचे वडील हरेकृष्ण बिस्वास हे एक कामगार होते. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांच्या आई रामप्रिया देवी यांचं निधन झालं होतं.
त्या काळातील प्रथेप्रमाणे वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचं कोलकत्ता येथील ‘राज दास’ या जमीनदारासोबत लग्न लावण्यात आलं होतं.
इतर राजांमध्ये आणि ‘राज दास’ यांच्यात हा फरक होता, की ते प्रगतशील विचारांचे होते. त्यांनी राणी रश्मोनी यांच्यातील बुद्धिमत्तेला वाव देण्याचं ठरवलं आणि त्यांनी राणी रश्मोनी यांना आपल्या ‘ट्रेडिंग’च्या व्यवसायात समाविष्ट करून घेतलं.
राणी रश्मोनी या व्यवसाय वाढवण्यासाठी राज दास यांना मदत करायच्या आणि व्यवसायातून झालेल्या नफ्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि समाजोपयोगी कामांसाठी कसा विनियोग केला जाऊ शकतो? याबद्दल माहिती द्यायच्या.
‘ईस्ट इंडिया कंपनी’ ज्याप्रकारे भारतात व्यापार करून भारताची संपत्ती इंग्लंडमध्ये घेऊन जात आहे याची माहिती त्या आपल्या गावातील लोकांना त्यांच्या भाषेत सांगायच्या. गरीब लोकांना मोफत जेवण देता यावं यासाठी त्यांनी गावातील घाटावर ‘रसोई’ बांधली होती.
१८३० मध्ये राज दास यांचा मृत्यू झाला. राणी रश्मोनी यांनी काही वेळ या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं, पण नंतर त्यांनी आपल्या चार मुलींना आणि राज यांनी उभ्या केलेल्या व्यवसायाला समर्थपणे सांभाळण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली.
विधवा महिलांनी समाजात मुक्तपणे फिरू नये हा त्या काळचा अलिखित कायदा होता, पण त्याविरोधात आवाज उठवत राणी रश्मोनी यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांनी हीच शिकवण आपल्या मुलींना सुद्धा दिली.
राणी रश्मोनी यांनी कमी वयातच आपली तिसरी मुलीला आपलं उत्तराधिकारी म्हणून निवडलं होतं. त्यांची मुलगी आणि पती मथुरा नाथ बिस्वास यांनी राणी रश्मोनी यांच्या मार्गदर्शनाखाली परदेशी वस्तू आयात करणे आणि भारतीय वस्तूंची निर्यात करणे हे काम त्यांनी समर्थपणे केलं.
राणी रश्मोनी यांनी व्यवसाया सोबतच बालविवाह आणि सती प्रथा सारख्या सामाजिक रुढींना त्यांनी विरोध केला. कोलकता येथे त्यांनी दक्षिणेश्वर मंदिराची निर्मिती केली.
हे मंदिर निर्माण होत असतांना राणी रश्मोनी यांना सामाजिक विरोधाला देखील सामोरं जावं लागलं. पण, त्यावेळी ‘रामकृष्ण परमहंस’ यांनी त्यांची साथ दिली आणि हे मंदिर पूर्णत्वास आलं.
ईस्ट इंडिया कंपनीला कधी हरवलं?
१८४० च्या दशकात ईस्ट इंडिया कंपनीने हुगळी नदीत मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांवर कर लावला होता. ईस्ट इंडिया कंपनीने हे सांगून हा कर लावला होता, की कोळी बांधवांच्या छोट्या होड्यांमुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या मोठ्या जहाजांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
आपल्या अल्प उत्पन्नातून इंग्रजांना कर देणं हे कोळी समाजाला शक्य होत नव्हतं. या निर्णया विरोधात त्यांनी कोलकत्ता न्यायालयात धाव घेतली, पण त्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी त्यांनी राणी रश्मोनी यांच्याकडे येऊन आपलं दुखणं मांडलं.
राणी रश्मोनी यांनी ही समस्या ऐकल्यावर त्यावर एक तोडगा काढला. त्यांनी इंग्रजांसोबत या विषयावर सामंजस्याने चर्चा केली. या चर्चेअंती असा करार करण्यात आला, की हुगळी नदीतील १० किलोमीटरचा एक पट्टा इंग्रज लोक १० हजार रुपये किमतीच्या मोबदल्यात कोळी लोकांना मासेमारी करण्यासाठी वापरू देतील.
हे १० किलोमीटरचं क्षेत्रफळ अधोरेखित करण्यासाठी त्यांनी समुद्रात एक खडक आणि साखळदंड बसवला. इंग्रजांचा त्यावर देखील आक्षेप होता. कारण, त्या १० किलोमीटरच्या भागात राणी रश्मोनी यांनी ब्रिटिश जहाजांना येण्यास सक्त मनाई केली होती.
इंग्रजांनी राणी रश्मोनी यांना आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण मागितलं तेव्हा त्यांनी सांगितलं, की “ब्रिटिश कायद्यात असलेल्या तरतुदीमुळे प्रत्येकाला आपल्या संपत्तीचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. हा साखळदंड लावून आम्ही केवळ आमच्या संपत्तीचं संरक्षण करत आहोत.” न्यायालयात करण्यात आलेल्या या युक्तिवादासमोर ब्रिटिशांना हार मानावी लागली.
इंग्रजांनी हा निर्णय झाल्यावर राणी रश्मोनी यांच्यासोबत एक नवीन करार केला. या करारात असं ठरवण्यात आलं, की इंग्रज मासेमारीवर लावलेला कर मागे घेतील आणि संपूर्ण समुद्र हा व्यापारासाठी खुला केला जाईल.
गंगा नदीमध्ये शिरकाव करण्यासाठी मनाई करण्यात आलेल्या कोळी बांधवांवरची बंदी सुद्धा या नवीन करारानंतर हटवण्यात आली. राणी रश्मोनी यांच्या हुशारीमुळे इंग्रज चार पावलं मागे सरकले आणि त्यांनी राणी रश्मोनीच्या हयातीत त्यानंतर बंगाल मधील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर कोणतेच कर किंवा निर्बंध लादले नाहीत.
१९६० मध्ये राणी रश्मोनी यांच्या कर्तृत्वाची माहिती सर्वप्रथम समोर आली. बंगाली लेखक गौरांग प्रसाद घोष यांनी या घटनेचा अभ्यास केला आणि त्यांनी समुद्रात लावण्यात आलेल्या साखळदंडाचा फोटो प्रकाशित केला.
सामान्य जनतेला जरी या घटनेचा विसर पडलेला असला तरीही कोळी समाज राणी रश्मोनी यांच्या या कार्याला विसरलेला नव्हता. बंगाली लेखक समरेश बसू यांनी लिहीलेल्या ‘गंगा’ या पुस्तकात कोलकत्त्याच्या हुबळी नदीचा ‘राणी रश्मोनी का जल’ असा उल्लेख करण्यात आला आणि हा इतिहास लोकमान्य झाला.
आज उपलब्ध असलेल्या माहितीच्या विविध मार्गांमुळे जर अशा लुप्त झालेल्या नायक, नायिकांची माहिती आपल्यासमोर येणार असेल तर आपण या माध्यमांचे आभार मानले पाहिजेत. नाही का?
राणी रश्मोनी यांच्या धैर्य आणि कार्याला सादर वंदन.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.