' आमची मुंबई “धक्क्याला” लागण्याच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार : भाऊचा धक्का! – InMarathi

आमची मुंबई “धक्क्याला” लागण्याच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार : भाऊचा धक्का!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुंबई महाराष्ट्राची राजधानी, देशाच्या आर्थिक घडामोडींचं केंद्र. इथं काय नाही? फिल्मसिटी, शेअर बाजार,मंत्रालय, ताज, समुद्र, गेट वे ऑफ इंडिया, मोठी मोठी हॉस्पिटल्स. मायानगरी स्वप्ननगरी मुंबई.

इथे असलेलं स्ट्रीट फूड, फॅशन. काय नाहीय या मुंबईमध्ये? रोज कितीतरी लोक मुंबईमध्ये येतात. आपली निरनिराळी स्वप्ने घेऊन कुणी कामाच्या शोधात कुणी स्वप्नाच्या शोधात. कुणी गरज म्हणून तर कुणी गंमत म्हणून!

 

mumbai city inmarathi

 

इथे असलेलं प्रसिद्ध सिद्धिविनायकाचे मंदिर, माउंट मेरी चर्च, मरीन ड्राईव्ह, क्विन्स नेकलेस अशी कितीतरी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. लोक उगीच जीवाची मुंबई करायची म्हणत नाहीत.

कितीतरी ठिकाणांना प्रवासी भेट देतात. पण मुंबईमधील खरे जीवन समजण्यासाठी एक मोठे ठिकाण आहे. तिथला मासळी बाजार प्रसिद्ध आहे. त्याला भाऊचा धक्का असेही म्हणतात.

काय आहे हा भाऊचा धक्का?

मुंबई हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. अरबी समुद्राच्या काठावर असलेली ही मायानगरी हे देशातील प्रमुख बंदर आहे. आजवर अनेक घडामोडी इथेच झाल्या. आजही मुंबईमध्ये व्हिक्टोरियन शैलीतील कितीतरी वस्तू त्याच रुबाबात दिमाखात उभ्या आहेत. त्या पाहून पूर्वीच्या काळाची साक्ष मिळते.

परंतु माझगाव डॉक येथील भाऊचा धक्का म्हणजे या दिमाखदार व्हिक्टोरियन शैलीच्या बरोबर उलटी बाजू.एकीकडे आपल्या श्रीमंतीचे वैभवाचे दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या टोलेजंग इमारती आणि दुसऱ्या बाजूला मुंबईची अगदी अडाणी बाजू आणि ही पण सर्वांना माहीत आहे.

असंख्य मच्छीमार तिथे दिसतात. मासळी बाजार भरतो. अनेक जहाजे नांगरून पडलेली असतात. येणार्या जाणाऱ्या जहाजांचे भोंगे वाजत असतात. मुंबईची ही पण एक बाजू आहे जिथे खूप श्रमजीवी लोक आहेत.

 

majhgav im

 

भाऊचा धक्का हे बंदर मुंबईच्या पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर असलेला घाट आहे. या बंदरावर रोज अनेक जहाजे येतात, त्यात माल भरला जातो, उतरवला जातो, लोक पण जहाजाने बोटीने प्रवास करतात.

कित्येक बॉलिवूड मधील सिनेमांचे चित्रीकरण येथे केले जाते. जुन्या मुंबईचे चित्रण हा भाऊचा धक्का अगदी नैसर्गिक रित्या करतो. पहाटे पहाटे या परिसराला जाग येते. इथे सारे मच्छीमार येतात. पकडलेली ताजी ताजी मासळी खरेदी करणाऱ्या लोकांची पण झुंबड उडालेली असते.हा भाग भाऊचा धक्का म्हणून ओळखला जातो.

हा धक्का म्हणजे बंदर आता १७५ वर्षाचे होईल. कुणी बांधला हा धक्का?

सारे सर्रास भाऊचा धक्का म्हणतात, कुणी माझगाव डॉक असेही म्हणतात. पण याची उभारणी कुणी केली हे खूप कमी जणांना माहीत असेल. भाऊ लक्ष्मण अजिंक्य हे या धक्क्याचे निर्माते.

मुंबईच्या उभारणीत खूप मोठमोठी दिग्गज नांवे आहेत. जगन्नाथ शंकरशेठ, दादाभाई नौरोजी, जमशेटजी टाटा, फिरोजशा मेहता,करसनदास मूळजी, डेव्हिड ससून प्रेमचंद रायचंद अशा लोकांनी मुंबईच्या विकासाला फार मोठा हातभार लावला.

यामध्येच अजून दोन नांवे आहेत एक म्हणजे डॉ.भाऊ दाजी लाड आणि भाऊ अजिंक्य लक्ष्मण. यातील भाऊ अजिंक्य लक्ष्मण हे भाऊचा धक्का उभारणारे दिग्गज.

 

bhau im

 

पाठारे प्रभू समाजातील लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य ऊर्फ भाऊ रसूल यांचं जन्म रायगड जिल्ह्यातील करंजा गावी झाला. गनर्केरिएज या कंपनीमध्ये ते कारकून म्हणून कामाला लागले.

युद्धसाहित्य व यंत्र बनवणाऱ्या या ब्रिटीश कंपनीमध्ये त्यानी आपल्या कामाच्या जोरावर खूप विश्वासार्हता मिळवली. मालक आणि कामगार दोघेही त्यांना मनात आणि त्यामुळे कामगारांनी त्यांना दिलेले भाऊ हेच नांव पुढे कायम झाले.

कॅप्टन रसेलची त्यांच्यावर विशेष मर्जी होती म्हणून त्यांना भाऊ रसूल असेही म्हटले जायचे. भाऊ अतिशय कष्टाळू होते. त्यावेळी मुंबई आताइतकी सुधारलेली नव्हती.माहीम, वरळी, माटुंगा, परळ, माझगाव, धाकटा कुलाबा आणि मोठा कुलाबा या सात बेटावरून लोक नोकरीसाठी गनर्केरीएज कारखान्यात यायचे. लांबच्या अंतरामुळे त्यांचे जेवणाचे हाल होत.

त्यावर उपाय म्हणून कारखाना प्रशासनाच्या मदतीने कामगारांसाठी उपाहारगृह सुरु केले. माफक दरात कामगारांना दुपारचे जेवण द्यायला भाऊंनी सुरुवात केली.

अतिशय कष्टाळू आणि कल्पक असलेल्या भाऊनी नोकरीत बढती आणि इतर व्यवसायात पण यश मिळवलं. मुंबईत वाढणारी लोकसंख्या आणि जमा होणारा कचरा हा प्रश्न होताच. त्या कचऱ्याचे व्यवस्थापन करायचे आणि विल्हेवाट लावायची जबाबदारी घेतली. सरकारकडून त्या कामाचा ठेका मिळवला आणि कंपनीमधील नोकरी सोडून दिली.

 

bhau dhhaka im

 

आता भाऊंना आकाश मोकळं होतं. शहरातील डबकी सांडपाण्याच्या खोलगट जागांवर भराव टाकून ते बुजवण्याचा ठेकाही त्यानी मिळवला. पुढे जाऊन त्यांच्या लक्षात आलं की, मुंबई बंदरावर उतरताना प्रवाशांचे खूप हाल होतात. मुंबई हे नैसर्गिक बंदर असले तरीही येथे समुद्रमार्गे होणारी वाहतूक ही मचवे गलबते यांच्या मदतीने होत असे.

प्रवासी आगबोटी समुद्रात दूरवर उभ्या केल्या जात आणि मग प्रवाशांना मचव्यातून किंवा गलबतातून किनाऱ्यावर आणले जाई यात खूप अडचणी येत. मग माल वाहतुकीसाठी असं धक्का उभारणं किती गरजेचं आहे हे भाऊनी पटवून दिलं. पण त्यावेळी ब्रिटीश सरकारकडे त्या अवाढव्य कामाला लागणारा पुरेसा पैसा नव्हता. म्हणून मालकी हक्काने बांधकाम करण्यासाठी निविदा मागवल्या गेल्या. भाऊनी अर्ज केला.

त्याकाळी ते खरोखर मोठे धाडस होते. ते भाऊनीच केले. पुढे पर्यावरण भरती ओहोटी यांचं बारकाईने अभ्यास करून भाऊनी तो आराखडा शासनाला सादर केला.

मर्यादित साधन सामुग्री, यंत्रसामुग्री, अपुरा निधी,करारातील फेरबदल, स्थानिक राजकारण अशी नाना अडथळ्यांची शर्यत पार करत त्याकाळी भाऊनी दिडलाखाचे कर्ज ६% चक्रवाढ व्याजाने घेतले आणि चार वर्षात पूर्ण केलं.

बंदरावर येणाऱ्या जाणाऱ्या मालासाठी सुसज्ज वखार उभारली. अत्यंत काटेकोर व्यवस्थापनकरून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी गटारे, माल वाहतुकीसाठी रस्ते,सुरक्षित तटबंदी शेड्स हे खूप बारकाईने भाऊनी केले.

याचा परिणाम म्हणजे हे बंदर भाऊना ५० वर्षे मक्त्याने ब्रिटीश सरकारने दिले. भाऊनी त्याकाळचे गव्हर्नर कारनॅक यांचे नांव त्या बंदराला द्यावे अशी विनंती केली. ते दिलेही गेले. पण आजही ते बंदर भाऊचा धक्का म्हणूनच ओळखले जाते.

 

bhaucha dhakka 1 im

 

कोणतीही काम निष्ठेने, परिश्रमपूर्वक कल्पकतेने केले तर ते कायमस्वरूपी जनमानसावर कोरले जाते याचे हे मोठे उदाहरण आहे. आज भाऊ आपल्यात नाहीत पण त्या धक्क्याच्या नावाने ते अमर झाले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?