Site icon InMarathi

तुमच्या प्रेमाची गुपितं, परीक्षांचे निकाल…सर्वांच्या गुजगोष्टी सामावून घेणारे पिवळे डबे आठवतात?

PCO booth featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वी रेडिओवर, कधी टीव्ही वर खूपदा टूणटूण मेरे पिया गये रंगून वहाँ से किया है टेलीफून हे गाणं टेलिफोनचा रिसिव्हर कानाशी धरून म्हणताना ऐकू यायची, दिसायची. जुन्या पिढीतील ते गाणं अतिशय लोकप्रिय होतं. तो काळ म्हणजे फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांकडेच फोन असत.

मध्यमवर्गीय लोक फक्त आपल्या ऑफिसेसमध्ये फोन पहात आणि बाकी सारे सिनेमात. अशा वेळी कोण तो फोन हातात धरून गाणी म्हणेल?

 

 

इतरत्र म्हणजे पोस्ट ऑफिसेसमध्ये फोन असत. गरजेनुसार ट्रंककॉल केले जात. लोक तर काय आणि किती शब्द बोलायचं हे पण कागदावर लिहून आणत. आणि तितकेच शब्द बोलत. कारण त्याचे चार्जेस तसेच जबरदस्त होते. आता अनलिमिटेड कॉलिंगच्या जमान्यात ही गोष्ट थोडी विचित्र वाटेल. पण हे सत्य आहे.

त्यावेळी लोकांकडे अगदी मोजका पैसा असायचा. त्यानुळे फोन ही चैन होती. केवळ अन्न वस्त्र आणि निवारा मिळाला म्हणजे खूप झाले असे मानले जायचे. त्यामुळे टीव्ही, टेलिफोन या अनावश्यक किंवा चैनीच्या गोष्टी होत्या ज्यावर फक्त श्रीमंत लोकांचा हक्क होता असं सर्रास मानलं जायचं.

नंतर मात्र ९० च्या दशकात दळणवळण विभागाने कात टाकली. टेलिफोन घरोघरी नाही तरी बऱ्याच घरात आले. आणि ज्यांना ते शक्य नव्हते त्यांनी काय करायचं? यावरही सोपं उत्तर आलं टेलिफोन बूथ. आजही त्या काळातील सिनेमामध्ये तसे बूथ दिसतात.

अज्ञात माणूस तिथून फोन करून सावध करायचा किंवा धमकी द्यायचा हे सारे आपण आता फक्त सिनेमात पाहू शकतो. कारण आता मोबाईल क्रांतीने त्या टेलिफोन बूथना नामशेष केले आहे.पण एक काळ होता की लोकांना टेलिफोन बूथमधून फोन लावायचा असेल तर तेव्हाही नंबर लावायला लागायचा.

ओळ करून थांबावे लागायचे आणि एक रुपयाचे नाणे टाकून मग बोलावे लागायचे. तेही एक मिनिट. वेळ संपली की फोन कट व्हायचा. ही ट्रंककॉल पासून सुरु झालेली ही मालिका एक रुपयाला कॉल पाशी येऊन थांबली. हा उतरणीचा प्रवास कसा होता?

 

 

भारतात २५ नोव्हेंबर १९६० मध्ये पहिल्यांदा एसटीडी सेवा सुरु झाली. यावेळी सगळ्यात पहिला कॉल कानपूरहून लखनौला लावला गेला. एसटीडी म्हणजे सबस्क्राईबर ट्रंक डायलिंग चे संक्षिप्त रूप. या सेवेमुळे लोक देशातील कोणत्याही एका शहरातून कोणत्याही दुसऱ्या शहरात फोन लावू शकत होते.

या सेवेत प्रत्येक शहराला, गावाला एक एसटीडी कोड दिला गेला होता. कोणताही फोन लावण्याआधी हा एसटीडी कोड लावून मग फोन नंबर लावला की मग कॉल जोडला जायचा. एसटीडी कोड आणि फोन नंबर मिळून दहा अंकी नंबर तयार व्हायचा.

पण तेव्हा अजूनही घरोघरी फोन आलेले नव्हते. अजूनही मोजक्याच लोकांची मक्तेदारीच होता हा फोन. मग लोकांच्या सोयीसाठी अजून एक पाऊल उचलले गेले. ते म्हणजे जागोजागी टेलिफोन बूथ उभे केले गेले.

या बूथ मध्ये मोठमोठ्या टेलिफोन डायरेक्टरी आणि एसटीडी कोडची यादी असायची. त्याच्या मदतीने तुम्ही कुठेही फोन लावू शकायचा. यावेळी कॉलचे दर हे अक्षरशः सेकंदाच्या गणितावर आधारलेले असायचे. पण हळूहळू ते दरपण उतरले. संपूर्ण भारतात ५० लाखाहून अधिक टेलिफोन बूथ होते. हा अगदी कळस होता.

भारतातील प्रत्येक बस स्थानक रेल्वे स्टेशनवर टेलिफोन बूथ अनिवार्यपणे उभे होते. कितीतरी किराणामालाच्या दुकानात, जनरल स्टोअरमध्ये टेलिफोनचा लाल रंगाचा डबा ऐटीत उभा असायचा. लोक त्यावर पण वेळ ठरवून बोलायला येत.

सिर्फ तुम सिनेमात हा सीन पाहिलेला आठवत असेलच तुम्हाला. टेलिफोन धून मे हसनेवाली म्हणणारा कमल हसन पाहिलाही असेल तुम्ही.

 

 

२००० सालानंतर मात्र मोबाईलचे युग अवतरले. प्रत्येकाकडे आपला आपला मोबाईल आला. मग जे लँडलाईन फोन होते ते पण घरातून हळूहळू हद्दपार होऊ लागले. वास्तविक हे फोन घरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीचे होते. फोन करायला त्यांना सोपा पर्याय होता.

मोबाईलवरील बटने दाबणे, नंबर सेव्ह करणे या कटकटी लँडलाईनमध्ये नव्हत्या. एक साधी वही, डायरी ज्यात फोन नंबर लिहून ठेवलेले असत त्याच्या आधारे फोन करणे हे खूप सोपे होते. पण मोबाईल क्रांतीने जी मोबाईलची लाट आली त्यात हे लँडलाईन वाहून गेले. घरातून फोन करणे सोपे झाले. मग टेलिफोन बूथची गरज भासेनाशी झाली. आणि २००९ साली ४.५ लाख बूथ बंद केले गेले. २०१५ पर्यंत या टेलिफोनबूथची संख्या अजून १० टक्क्यांनी घसरली.

त्यानंतर संपूर्ण देशात केवळ १० टक्के टेलिफोन बूथ शिल्लक राहिले. २०१८ साली रेल्वे स्टेशनवरून पीसीओ काढून टाकले गेले.कारण तोपर्यंत प्रत्येकाजवळ आपापला फोन आलेला होता. हळूहळू मेडिकल स्टोअर , जनरल स्टोअर, किराणा मालाच्या दुकानात असलेला कॉईन बॉक्स पण बंद झाला.

तो कॉईन बॉक्स कितीतरी जणांच्या रोजगाराचा डबा होता असं म्हणायला हरकत नाही. तो बंद झाल्यावर लोकांनी रोजगाराचे नवे रस्ते शोधले. म्हणजे मोबाईल रिचार्ज, दुरुस्ती किंवा फूड कोर्ट.

 

 

त्यावेळी टेलिफोन बूथमध्ये आपल्या प्रेमिकाचा किंवा प्रेमिकेचा फोन येणार म्हणून तासंतास ताटकळत वाट पाहणारे लोक होते.

टेलिफोन बूथने किती काय काय ऐकलं असेल.. कुणा सासुरवाशीण लेकीने माहेरी चोरून केलेला फोन, आई बापाचे गहिवरलेले आवाज, प्रेमिकातील वाद विवाद, कुणाची निधन वार्ता, कुणाला झालेलं नातवंड, परीक्षेचा निकाल सांगताना आनंदाने उड्या मारत आलेला एखादा विद्यार्थी.. मार्क कमी पडले तरी धीराचे चार शब्द… किती भाव भावना त्या एका टेलिफोनच्या बूथने ऐकल्या असतील.

ते बूथ निर्जीव आहेत. सजीव असते तर अशा कितीतरी कथांची साक्ष त्याने सांगितल्या असत्या. मोबाईल क्रांती झाली आणि हे सारे काळाच्या पडद्याआड गेले.

आता या पिढीला मोबाईलमुळे सगळे जग मुठीत आले आहे. त्यांना याचे काय अप्रूप असणार? पण त्या लाल डब्याच्या कॉईन बॉक्सच्या काळातले किस्से फक्त त्या पिढीतील जे आता चाळीशीच्या पुढे आहेत ते लोक सांगू शकतील. शेवटी काय काळाचा महिमा खरोखर अफाट आहे हेच खरं नाही का?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version