' पाटील काकींचा बिझनेस मोठमोठ्या पिझ्झा-बर्गर वाल्यांना पण मागे टाकतो! – InMarathi

पाटील काकींचा बिझनेस मोठमोठ्या पिझ्झा-बर्गर वाल्यांना पण मागे टाकतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल अनेक तरुण-तरुणी कामानिमित्त अथवा शिक्षणानिमित्त आपल्या राहत्या घरापासून लांब परदेशात किंवा परराज्यात जातात. तिथे गेल्यावर सर्व सुखसोयी असल्या तरीही घरचे कौटुंबिक वातावरण आणि आईच्या हातचे जेवण हे मात्र आवर्जून ‘मिस’ केले जाते. अशावेळी आईच्या हातचे तहान लाडू ,भूक लाडू मिळाले ना तरी पोट पूर्ण भरून जातं.

तसं पाहिलं तर प्रत्येक आई ही सुगरणच असते. तिच्या हाताला खास तिचा असा एक टच असतो आणि हा टच ज्याचा त्याला खूप प्रिय असतो. पण अशा काही सुगरणी असतात, ज्यांच्या हाताला खऱ्या अर्थाने वैश्विक टच किंवा आजच्या भाषेत सांगायचं झाल तर वल्डवाइड टच असतो. याच मांदियाळीतील एक प्रसिध्द नाव म्हणजे गीता पाटील उर्फ पाटील काकू!

 

geeta patil im

 

गीता पाटील यांचा ‘गीता ते पाटील काकू’ होण्यापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. गीता यांचे वडील महानगर पालिकेत कामाला होते तर आई लोकांना डबे पुरविण्याचा छोटासा व्यवसाय करीत असे. अर्थात या कामात आईची एकमेव मदतगार म्हणजे गीता! आईला काम करत बघताना तसंच मदत करताना गीतावर कळत –नकळतपणे सुगरण स्वंयपाकाचे संस्कार झाले.

पुढे गीता याचं लग्न होऊन त्यांना दोन मुले देखील झाली. मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन इतर चतुर आयांप्रमाणे गीता देखील मुलांच्या डब्यात वेगवगळे प्रयोग करू लागल्या. आवश्यक असलेली पोषक घटक समोसा नि वेगवेगळ्या आकारातील पराठ्यांमधून मुलांबरोबर त्यांच्या मित्र-मैत्रिणीच्या पोटात जाऊ लागले.

सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक २०१६ साली त्यांच्या पतीची नोकरी सुटली. दोन मुलांचं शिक्षण, घरखर्च कसा चालवायचा हा मोठा प्रश्न होता. अशावेळी न डगमगता घरच्या घरी लाडू, चिवडा, चकली, पुरणपोळी, मोदक यांसारखे पदार्थ विकण्यास सुरुवात केली.

 

ladoo im

 

या पदार्थांना असलेल्या घरगुती चविष्टपणामुळे अल्पावधीतच हे पदार्थ चांगलेच लोकप्रिय ठरले आणि गीता पाटील ‘पाटील काकी’ म्हणून प्रसिध्द होऊ लागल्या. इतकंच नाही तर काकूंच्या पदार्थांना पुण्याहून देखील मागणी होऊ लागली.

काकूंच्या या व्यवसायाला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या मुलाने, विनीतने लक्ष घातल्यानंतर! त्याने या व्यवसायासाठी आवश्यक असलेलं मार्केटींग उत्तम प्रकारे केलं. पाटीलकाकी.कॉम या वेबसाईट ची निर्मिती केली. या द्वारे ऑनलाइन ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. यामुळे व्यवसायाला चांगलीच गती लाभली.

इतकी की त्यांनी सांताक्रूझ येथे मोठी जागा घेऊन त्या जागी आपला व्यवसाय सुरु केला. आज त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कित्येक स्त्रियांचे संसार सुरळीतपणे चालू आहेत.

महिन्याकाठी कमीतकमी दहा हजार पुरणपोळ्या, ५०० किलो चकल्या मुंबई, पुणे येथे पाठविल्या जातात. त्या व्यतिरिक्त त्यांच्या बेसन लाडू, पुरणपोळी आणि मोदकांना तर निव्वळ मराठीच नाही तर अनेक पर प्रांतीय कुटुंबांकडून देखील चांगलीच मागणी असते.

या व्यवसायातून होणारी त्यांची वार्षिक उलाढाल १.४ कोटीच्या घरात इतकी आहे.

 

patil kaku im

 

त्यांची ही कहाणी महिंद्रा समुहाचे प्रमुख असलेले आनंद महिंद्रा यांना समजताच त्यांनी स्वत: पाटील काकूंच्या व्यवसायाची यशोगाथा ट्विट केली.

पाटील काकुंचे कौतुक करताना आनंद महिंद्रा म्हणाले की ,” फूड स्टार्ट अप हा असा व्यवसाय आहे ज्यासाठी खऱ्या अर्थाने धैर्य आणि दृढ संकल्प या जिन्नसांची गरज असते. कोणत्याही बिजनेस स्कूलमध्ये हे जिन्नस शिकविले जात नाहीत, तर ते आत्मसात करावे लागतात.”

 

anand mahindra im

 

आज मुंबईतील अनेक गल्ल्यांमध्ये अगदी चहावाल्यांपासून ते थेट पिझ्झा-बर्गर पर्यंत उतमोत्तम चविष्ट पदार्थ उपलब्ध असतात. अशा या स्पर्धात्मक वातावरणात स्वत:चा खाद्यपदार्थ यशस्वी करायचा असेल तर हाताला आवश्यक ती चव आणि कष्ट करण्याची अपार ताकद असण गरजेचे आहे. हेच गीता पाटील यांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध करून दाखविले आहे.

व्यवसायाचे रुजविलेले छोटेसे रोपटे आज वटवृक्ष झाला आहे. त्यांची ही कहाणी निव्वळ स्त्रियांसाठीच नाही तर व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?