Site icon InMarathi

फ्रूटी: आपलं बालपण जपणारं आणि यशस्वी मॅनेजमेंटचे धडे शिकवणारं “आपलंसं” नाव!

frooti image im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

”मँगो फ्रूटी फ्रेश न ज्यूसी” ही ओळ तुम्हाला आठवत असेलच. टेट्रा पॅकच्या हातात मावेल एवढ्या खोक्यात छोटीशी नळी घालून फ्रूटी पिणारी मॉडेल आणि ते जिंगल विसरणे शक्य नाही.

कारण आत्ता जी पिढी चाळीशीत आहे त्या पिढीच्या लहानपणी आतासारखा चॅनेल्सचा सुळसुळाट झालेला नव्हता. ढीगभर जाहिरातींचा पण रतीब ओतला जात नसायचा. मोजकीच उत्पादने, त्याच्या ठराविक जाहिराती. आणि सतत मॉडेल बदलत नसत. जिंगल्स पण तीच असत.

 

 

आता त्यातील कितीतरी उत्पादने बंद पडली. काही अजूनही चालू आहेत. पण त्यांची जिंगल्स आजही तुम्हाला आठवत असतील- जय साबण, गोदरेजची वेगवेगळी साबणे फ्रेस्का, विजील आणिही बरीच.

त्यावेळी बाजारात आलेल्या उत्पादनांपैकी फ्रूटी मात्र आजही टिकून आहे. कोका कोला, थम्स अप, पेप्सी वगैरे कितीही परदेशी शीतपेये आली पण फ्रूटी मात्र आजही आपलं स्थान अबाधित ठेवून आहे. काय आहेत या फ्रूटीच्या यशाची कारणे?

कशी झाली फ्रूटीची सुरुवात?

फ्रूटी ही पार्ले अॅग्रो कंपनीची निर्मिती! १९८० च्या दशकात भारतात अगदी मोजकेच शीतपेयांचे प्रकार होते. लिम्का, गोल्डस्पॉट आणि थम्सअप हे तीनच प्रकार जास्त करून बाजारात होते.

त्यापैकी लिम्का आणि गोल्डस्पॉट हे अनुक्रमे लिंबू आणि संत्र स्वादाची रुची देणारे प्रकार होते. मग त्या पेक्षा भारतीयांना आवडणारे फळ कोणते? याचा विचार करून खूप संशोधन करून पार्लेनं आंबा हा भारतीयांचा आवडता स्वाद त्याचेच पेय बनवायचा निर्णय घेतला.

कारण आंबा बारमाही न मिळणारे फळ आहे. मग असा स्वाद जो कोणत्याही ऋतूत चाखायला आला पाहिजे म्हणून त्यांनी आंब्याची निवड केली.

 

 

बऱ्याच संशोधनानंतर १९८५ मध्ये पार्ले अॅग्रोने मँगो फ्रूटी बाजारात आणली.

याचं पॅकिंग अतिशय आकर्षक होतं. त्यापूर्वी लिम्का, गोल्ड स्पॉट, ही सरी शीतपेये काचेच्या बाटलीतून मिळत. पण फ्रूटी मात्र पहिले टेट्रा पॅकमध्ये मिळणारे शीतपेय होते. आता अमुलचे ताक, बासुंदी वगैरे टेट्रा पॅकमध्ये मिळतात. पण याची सुरुवात मात्र फ्रूटीने केली आहे.

टेट्रा पॅकचा एक चांगला फायदा म्हणजे ओझं वाटणार नाही असं हलका आणि वापरून टाकून द्यायला सोयीचा.आत्ताशी प्लास्टिकच्या बाटल्या मिळतात. त्यावेळी काचेच्या बाटल्यातूनच शीतपेये मिळत असत. काचेचं आणि त्यातील द्रवाचे वजन जास्त होई. ते हातातून नेणे तसे कठीण होते.

 

 

शिवाय ती बाटली पडून फुटायचा पण धोका. काचा लागल्या तर ..आणि हॉटेलवाल्याला ती बाटली देताना फुटली तर ती भरून द्यावी लागायची. ही एक वेगळीच डोकेदुखी. त्यामुळे टेट्रा पॅक लोकांना अतिशय सुटसुटीत वाटला, आवडला. तो कॅरी करणे सोपे होते.

फ्रूटीचा मार्केटिंग फंडा

एखादं प्रॉडक्ट बाजारात आणणं कदाचित सोपे असतं पण ते मार्केटिंग करून लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्याहून कठीण असतं. पण फ्रूटीने मार्केटिंग भारी केलं.

बऱ्याच झाडांवर फ्रूटी लटकवली. जाता जाता आंबा तोडल्यासारखे लोक फ्रूटी तोडून घेऊन जाऊ शकत होते. कित्येक सिनेतारकांनी पण या फ्रूटीची जाहिरात केली. त्याचं जिंगल आजही गुणगुणता येईल असं सोपं आहे. मँगो फ्रूटी फ्रेश न ज्यूसी…म्हणून बघितलं का?

त्याचबरोबर फ्रूटीची किंमत! अगदी वाजवी दरात कोणत्याही दुकानात मिळणारी फ्रूटी लोकांना आवडू लागली. कोणतंही उत्पादन जेव्हा सर्वसामान्य माणसाला खिशाला परवडतं तेव्हाच ते घेण्याकडे लोकांचा कल असतो. एकदा खर्च करायचा आणि महिन्याभराचे बजेट बिघडून जायचे असे कोणतेही खर्च करणे सामान्य माणसाला झेपणारे नसते. त्यामुळे १० रुपयाचा फ्रूटीचा टेट्रा पॅक लोकांना न आवडेल तरच विशेष!

 

 

पार्लेने या सर्व गोष्टींचा इतका बारकाईने विचार केला होता आणि मगच उत्पादन बाजारात आणलं. त्यामुळे सामान्यांना पण ते आवडलं. वाजवी दरात आंब्याचा स्वाद कुणाला आवडणार नाही?

आज फ्रूटी बाजारात येऊन ३५ वर्षे होऊन गेली. पण आजही लोक फ्रूटी आवडीने घेतात. फ्रूटीचे त्रिकोणी आयताकार बॉक्स लोकाना आजही भुरळ घालतात. त्यानंतर अॅप्पी, माझा यासारखी उत्पादने बाजारात आली पण फ्रूटीची जागा आजही जनमानसात कायम आहे.

‘माझा’ हा तर फ्रूटीचा तगडा स्पर्धक आहे पण फ्रूटी त्यालाही टक्कर देत आजही तशीच लोकप्रिय होऊन उभी आहे. नैसर्गिक आंब्याचा स्वाद आणि खिशाला परवडणारा दाम या मोठ्या मानांकनावर आजही फ्रूटी विराजमान आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version