महाराणी ताराबाई : औरंगजेबाच्या स्वप्नांना धुळीस मिळविणारी मर्दानी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय इतिहासाला ज्याप्रमाणे योद्ध्यांनी झळाळी चढवली, त्याचप्रमाणे त्या इतिहासाला पराक्रमाच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले कित्येक वीरांगणांनी. त्यापैकीच एक म्हणजे महाराणी ताराबाई भोसले होत!
उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागावर आपले वर्चस्व राखून असणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाची नजर जेव्हा पश्चिम भारताकडे वळली, तेव्हा त्यांच्या मनसुब्यांना सुरंग लावायचे काम महाराणी ताराबाईंनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या कित्येक सेनापतींकडून मार खाल्लेल्या औरंगजेबाला पुन्हा अद्दल घडवून स्वराज्याच्या स्त्रिया या देखील पुरुष योद्ध्यांपेक्षा कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले.
दुर्दैव हे की अश्या महापराक्रमी वीरांगणेचा जीवनप्रवास आज नव्या पिढीली माहित नाही. हाच अज्ञात जीवनप्रवास लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न या लेखामार्फत करत आहोत.
—
- छत्रपतींच्या स्वराज्यातील पहिल्या सरसेनापतींबद्दल जाणून घ्या!!!
- इतिहासाच्या पानांतून वगळली गेलेली, झाशीच्या राणीचे प्राण वाचवणारी अज्ञात विरांगना!
–
पश्चिम भारतामध्ये कितके वर्षांपासून आपला दबदबा कमावून ठेवणाऱ्या मराठा साम्राज्याची ताकद काहीशी कमी होत चालली होती.
स्वराज्याला कोणीही खंदे नेतृत्व नाही असा विचार करून औरंगजेबाने पुन्हा एखादा स्वराज्याची संपत्ती असलेले गड-कोट काबीज करण्यास सुरुवात केली. इतरही शत्रू टपून बसले होतेच. अश्या वेळेस महाराणी ताराबाईंनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि मराठा साम्राज्याची पताका पुन्हा उंचावली.
महाराणी ताराबाई म्हणजे स्वराज्याचे सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत. त्यांचा जन्म १६७५ सालचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते मराठ्यांचे पानिपत या सर्व गोष्टी महाराणी ताराबाईंनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या.
शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांच्यासोबत महाराणी ताराबाईंचा वयाच्या ८ व्या वर्षी विवाह झाला. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर औरंगजेब मनातून खुश झाला. शिवाजी महाराजांनी ज्या ज्या प्रकारे औरंगजेबाचा अपमान केला होता, त्या त्या सर्व अपमानाचा बदला घेण्यास औरंगजेब उत्सुक होता.
मराठ्यांनी राखून ठेवलेला पश्चिम भाग हा काही केल्या त्याच्या हाती येत नव्हता, पण आता तो भाग मिळवण्याची आयती संधी त्याच्याकडे चालून आली होती.
पण तो विसरला की, महाराजांचा वारसा पुढे चालवयाला छत्रपती संभाजी महाराज सक्षम आहेत. त्यांनी सर्व मुघली आक्रमणांना चाप बसवला, क्रोधीत झालेल्या बदशहाला मग स्वत: दक्षिणेत उतरावे लागले. १६८६ आणि १६८७ मध्ये गोवळकोंडा आणि विजापूर काबीज केल्यावर औरंगजेबाने आपली सर्व शक्ती मराठ्यांच्या विरुद्ध लावली.
औरंगजेबाने साम-दाम-दंड-भेद सर्व नीतींचा वापर करत मराठा साम्राज्याला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. त्याचे परिणाम देखील त्याला दिसून लागले आणि अखेर १६८९ मध्ये त्याने स्वराज्याच्या छत्रपतींनाच जेरबंद केले.
छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती लागल्यानंतर मराठा साम्राज्य मोठ्या संकटात सापडले. औरंगजेब मराठ्यांची एक एक ठाणी काबीज करत सुटला. दरम्यान त्याने छत्रपती संभाजी महाराजांना यातना देऊन त्यांची हत्या केली आणि अखंड स्वराज्य पुन्हा एकदा पोरकं झालं.
छत्रपती संभाजी महाराजांनंतर त्यांचे लहानगे पुत्र ‘पहिले शाहू यांचे औरंगजेबाने अपहरण केले, जेणेकरून भविष्यात मराठ्यांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला भाग पाडण्याचा त्याचा डाव होता.
आता मात्र मराठी साम्राज्य संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांच्या हाती आले. मुघलांच्या बलाढ्य सेनेशी थेट दोन हात करणे सोपे नाही हे त्यांना कळून चुकले होते, म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मुघलांशी गनिमी काव्याचे युद्ध सुरु केले.
जिंजीच्या मोहिमेवर असताना रसद अपुरी पडू लागल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. मुघलांशी तह करून ते पुन्हा महाराष्ट्रात आले आणि त्यांनी स्वराज्याची राजधानी साताऱ्याला हलवली.
१७०० साली राजाराम महाराजांचेही निधन झाले. आता वेळ अशी होती की स्वराज्याला छत्रपती तर होते पण ते अतिशय लहान होते. अश्या बिकट प्रसंगी २५ वर्षीय महाराणी ताराबाईंनी राज्यकारभार आपल्या हातात घेतला.
महाराणी ताराबाईंनी विखुरलेल्या मराठा सरदारांना एकत्र केलं. त्यांची युद्धनीती अचाट होती. महाराणी ताराबाईं इतक्या सक्षमपणे स्वराज्याचा गाडा हाकतील अशी कोणालाही कल्पना नव्हती. १७०० ते १७०७ या सात वर्षांत महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या सेनेला बेजार करून सोडले. ही ७ वर्षे त्या सतत युद्धाला तोंड देत राहिल्या.
डबघाईला आलेल्या मराठा साम्राज्याने पुन्हा एकदा राखेतून भरारी घेण्यास सुरुवात केली. प्रजेचा आणि मराठा सैन्याचा आपल्या महाराणीवरचा विश्वास कैकपटीने वाढला. औरंगजेबाची पकड पुन्हा ढिली होऊ लागली.
दक्षिणेत असलेल्या औरंगजेबाच्या निष्क्रिय स्थितीचा फायदा घेऊन महाराणी ताराबाईंनी उत्तरेकडील मुघल प्रदेशांना लक्ष्य केले आणि त्यांना मोठी हानी पोहचवली. या खेळीने औरंगजेब पुरता क्रोधीत झाला. पण मुठ्या आवळत बसण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता आणि इकडे महाराणी ताराबाई त्याच्या साम्राज्याची वाताहत करीत होत्या.
मराठा साम्राज्याचा पुन्हा दबदबा निर्माण होऊ लागला. औरंगजेबाला मात्र चरफडतच राहावे लागले आणि अखेर १७०७ मध्ये त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या मृत्युनंतर मुघलांनी मराठ्यांमध्ये फुट पडावी म्हणून कैदेत असलेल्या पहिल्या शाहू महाराजांना मुक्त केले आणि त्यांच्या मनाप्रमाणेच झाले. मुघलांचे पाठबळ असलेल्या पहिल्या शाहू महाराजांसमोर महाराणी ताराबाईंची ताकद कमी पडू लागली. इकडे प्रजा देखील खरा राजा कोणाला मानावे या संभ्रमात पडली.
मुघलांच्या सहाय्याने पहिल्या शाहू महाराजांनी साताऱ्यावर कब्जा केला, नाईलाजाने महाराणी ताराबाईंना आपले बस्तान पन्हाळ्याला हलवावे लागले.
महाराणी ताराबाई गप्प बसणाऱ्यातल्या नव्हत्या. पुढे अजून ५-६ वर्षे महाराणी ताराबाई आणि पहिले शाहू महाराज यांच्यात संघर्ष सुरु राहिला. शेवटी पहिल्या शाहू महाराजांनी महाराणी ताराबाईंचा बंदोबस्त करण्यासाठी बाजीराव पेशवे यांना नियुक्त केले. कान्होजी आंग्रेंच्या साथीने १७१४ मध्ये बाजीराव पेशवे यांनी महाराणी ताराबाईंना पराभूत केले आणि पन्हाळा किल्ल्यामध्येच त्यांच्या पुत्रासमवेत त्यांना नजरकैदेत ठेवले.
१७३० पर्यंत महाराणी ताराबाई या नजरकैदेत राहिल्या. दरम्यान अनेक घटना घडल्या. पहिल्या शाहू महाराजांच्या मृत्युनंतर छत्रपती रामराजे गादीवर आले आणि पुन्हा एकदा महाराणी ताराबाईंनी सत्तेत रस घेण्यास सुरुवात केली.
१७६१ मध्ये आपल्या मृत्यूपर्यंत त्यांनी मराठा साम्राज्याचे अनेक चढ उतार पाहिले. कधी कधी त्यांना कठोर निर्णय देखील घ्यावे लागले, पण त्यांनी मराठा साम्राज्य मात्र कधीही पणास लावले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न शेवटपर्यंत अबाधित राखायचे हे एकच ध्येय त्यांच्यासमोर होते आणि त्यासाठी त्या आयुष्यभर सक्रीय राहिल्या.
स्वराज्याच्या या वीरांगणेला मानाचा मुजरा!!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.