आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बॉलीवूड आणि भारतीय समाज यांचं एक अतूट नातं आहे. “समाज तसे बॉलीवूडचे चित्रपट असं आहे की बॉलीवूडचे चित्रपट तसा समाज आहे ?”या विषयावर नेहमीच चर्चा होत असते. या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं कठीण आहे.
पण, एक नक्की की, आपण सर्वच मनोरंजन प्रिय आहोत. पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींना आपण सत्य मानत असतो, त्यामध्ये समरस होत असतो आणि प्रसंगी त्यामध्ये स्वतःला शोधत असतो.
आपण ‘रामायण’ मध्ये रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांना राम मानतो आणि ‘जय संतोषी माँ’ सिनेमा बघतांना साक्षात देवी समोर येऊन आपल्याला आशीर्वाद देत आहे असं आपल्याला वाटतं.
रामायण जेव्हा दूरदर्शनवर सर्वप्रथम प्रसारित झालं होतं तेव्हा लोक टीव्ही समोर उदबत्ती लावून बसायचे हे आपण ऐकलं, बघितलं असेल.
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जय संतोषी माँ’ या सिनेमाचा किस्सा त्याहून वेगळा आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघण्यासाठी लोक चप्पल, बूट थिएटरच्या बाहेर काढून ठेवायचे, सिनेमा सुरू होण्याआधी थिएटरमध्ये आरती केली जायची आणि प्रसाद वाटला जायचा. कमाल आहे ना ?
कोट्यवधी रुपये खर्च करून तयार होणाऱ्या हॉलीवूडच्या सिनेमांना सुद्धा प्रेक्षकांच्या अशा भावनांची कमाई आजवर करता आली नसावी. आपण वेगळे आहोत, सिनेमासाठी आपण वेडे आहोत.
३० मे १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटाचे विजय शर्मा हे दिग्दर्शक होते.
अनिता गुहा या अभिनेत्रीने या सिनेमात संतोषी माताची प्रमुख भूमिका साकारली होती. कनन कौशल, भारत भूषण आणि आशिष कुमार हे या सिनेमात काम केलेले इतर कलाकार आहेत.
संकटात लोकांसाठी धावून येणाऱ्या संतोषी माताची महती सांगणाऱ्या या धार्मिक चित्रपटाचं उषा मंगेशकर यांच्या आवाजतील गाणं “… अपनी संतोषी माँ” हे आज ४७ वर्षांनंतर सुद्धा लोकप्रिय आहे.
१९७५ हे वर्ष बॉलीवूडसाठी सुवर्ण वर्ष म्हणून मानलं जातं. याच वर्षी ‘शोले’ आणि ‘दिवार’ हे दोन दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती.
एकीकडे अमिताभ बच्चन हे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होते, तर दुसरीकडे जय संतोषी माँ हा सिनेमा सुद्धा लोकांना तितकाच आवडत होता हे विशेष आहे.
जय संतोषी माँ हा सिनेमा केवळ ५ लाख रुपयांमध्ये तयार झाला होता आणि त्या सिनेमाने ५० आठवडे सिनेमागृहात आपलं स्थान टिकवत १ कोटी रुपयांची कमाई केली होती.
जय संतोषी माँ सिनेमा बघण्यासाठी देशभरात सारखाच प्रतिसाद होता. बिहार मधील एका थिएटरसमोर तर एका तरुणाने प्रेक्षकांचे चप्पल, बूट सांभाळण्याचा स्टॉल लावला होता आणि त्यातून त्याने २ लाख रुपयांची कमाई केली होती.
जय संतोषी माँ सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर संतोषी मातेच्या जोधपूर जवळच्या मांडोर येथील मंदिरात दर्शनासाठी रांगा लागायच्या.
पुराणात उल्लेख असलेल्या संतोषी मातेचं व्रत करण्यास या सिनेमानंतर मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली होती.
बॉलीवूडमध्ये त्या काळात पत्र व्यवहाराने कामं व्हायची. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कित्येक वर्ष बॉलीवूडचे निर्माते एकमेकांना पत्र लिहितांना त्या पत्राची ‘ओम शुभ लक्ष्मी’ अशी सुरुवात करायचे.
२००६ मध्ये जय संतोषी माँ टीव्हीवर पहिल्यांदा दाखवण्यात आला होता तेव्हा अनिता गुहा यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, “सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कित्येक वर्ष लोक माझ्या घरासमोर यायचे आणि आपल्या बाळांना माझ्या ओटीत ठेवून त्यांच्या कल्याणासाठी आशीर्वाद घ्यायचे.”
जय संतोषी माँ या सिनेमाच्या कथेबद्दल सांगायचं तर, ही सत्यवती नावाच्या एका तरुणीची कथा आहे जिला सासरचे लोक खूप त्रास द्यायचे. या त्रासातून मुक्त होण्यासाठी तिने संतोषी मातेचं व्रत केलं आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडला अशी होती.
सिनेमाचे नायक आशिष कुमार यांनी एका मुलाखतीत हे सांगितलं होतं की, ” मी निर्माते सतराम रोहरा यांना या विषयावर सिनेमा केला जाऊ शकतो हे सुचवलं होतं. माझ्या पत्नीने संतोषी मातेचं १६ शुक्रवारचं व्रत केलं होतं आणि त्यानंतर आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं होतं. हा अनुभव मी निर्मात्यांना सांगितला आणि मग आमचा संतोषी मातेच्या महतीवर सिनेमा करण्याचा निर्णय झाला.”
जय संतोषी माँ या धार्मिक विषयावर सिनेमा तयार केल्यानंतरही त्याच्या वितरकांच्या वागण्यात प्रामाणिकपणा नव्हता ही आश्चर्याची बाब आहे.
सिनेमाचे प्रमुख वितरक केदारनाथ अग्रवाल यांनी सिनेमाच्या कमाईचे पैसे आपल्या भागीदारांना दिले नाही. निर्माते सतराम रोहरा यांना त्यामुळे असंख्य आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
जय संतोषी माँ सारखे चित्रपट हे बॉलीवूडमध्ये फार कमी तयार झाले आहेत ज्याने आपल्या सोबत पूर्ण इंडस्ट्रीचा फायदा करून दिला होता.
दक्षिण सिनेसृष्टीसमोर फिक्या पडलेल्या आजच्या बॉलीवूडला सुद्धा असाच एखादा सिनेमा उभारी आणू शकला तर प्रेक्षकांना नक्कीच आनंद होईल.
—
- शबाना आझमी मुस्लिम असल्यामुळे एक अस्सल कलाकार त्यांच्या प्रेमाला पारखा झाला!
- R.K. Studio चे हे दुर्मिळ फोटोज् आपल्याला एका अज्ञात जादुई विश्वात घेऊन जातात
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.