चला सिग्नल शाळा बंद करू या, कारण तोच खरा ‘विजय’ ठरणार आहे!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
पार्श्वभूमी
ठाण्यातील तिन हात नाका सिग्नलवर भीक मागणारया मुलांसाठी औपचारिक शाळा सुरू करण्याची संधी ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने समर्थ भारत व्यासपीठाला वर्षभरापूर्वी मिळाली. या संधीचे सोने करण्याचा विडा शाळेतील शिक्षिका आरती परब, आरती नेमाणे, प्रतिभा घाडगे, श्रध्दा दंडवते, दुर्गा कुरकटे, सुमन शेवाळे यांनी उचलला. त्यांच्या मेहनतीला लाख सलाम. बीबीसी, एलजझिरा पासून तर थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शाळेचे कौतुक केले खरे, पण खरेच ही शाळा दिर्घकाळ चालावी का असा प्रश्न मला नेहमी सतावत असतो. सिग्नल शाळेला आकार देत असतांना मला नेहमी वाटत आले आहे की एक दिवस ही शाळा बंद व्हावी आणि तो आमच्या कामाचा खरा आदर्श आहे. सिग्नल शाळेवर आरती परब आणि मी लिहित असलेल्या आगामी पुस्तकातील हे एक प्रकरण खास मराठी पिझ्झाच्या वाचकांसाठी माझ्या पहिल्यावहिल्या ब्लॉग लेखनातून आपल्यासमोर आणत आहे.
सिग्नल शाळेचा पहिला निकाल 99 टक्के लागला, मोहन एमएससीआयटी पास झाला, निकिता आणि नेहा शाळेच्या ओढीने घणसोलीहून रोज शाळेत येतात, विशाल आणि छोट्या काजलने तंबाखू सोडली, शंकर एका मोठ्या अपघातातून बचावला आणि शाळेमुळे त्याला नवीन जन्म मिळाला तोही अभ्यासात रमला, कुपोषित संगीता पाच तास न झोपता शाळेत रमू लागली, मनिषा कोडगेपणातून बाहेर आली आणि तिच्यातील बालपण पुन्हा बहरू लागले, कामचुकार राहूल अजूनही तसाच असला तरी हा गजरेच विकणार नसेल तर किमान शिकू दे तरी म्हणून पालकांनी राहूलच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला, गतीमंद बबडी आजही आव्हान म्हणून समोर आहे, कल्पना आणि काजल या दोन्ही मोठ्या मुली सिग्नल शाळेतून बाहेर फेकल्या गेल्या, कदाचित वयात आलेल्या मुलींना सिग्नल शाळा हा पर्याय नाही याचे त्या निदर्शक असाव्यात इतके धक्का देणारे वास्तव त्या मांडत आहेत, मोहन आणि दशरथच्या रूपाने दोन मुले यावर्षी सिग्नल शाळेतून दहावीसाठी तयारी करीत आहेत, त्यांच्यासारखे भाग्य या दोघींना लाभले नाही मागासलेपणाचे जळमटं अजूनही दुर होत नाहीत, श्याम, विलास, शंभू, रेखा, समीर, संजय, अतुल, दशरथ ही मुलं उज्वल शैक्षणिक उंची गाठू शकतील इतकी सरस असल्याचे दिसुन येते, त्यांना न्याय देणे ही सिग्नल शाळेची प्राथमिकता आहे, सुरज, सुनिल, अश्विनी, संगीता, मनिषा, श्याम, गीता, दिपक, पुजा, बालू, गणेश आणि करण ही बालवाडीची 12 जणांची गॅंग सिग्नल शाळेच्या चौकटीतून बाहेर जाऊन मुळ प्रवाहातील शिक्षण घेतील असे धाडसी शिवधनुष्य पेलायचे आहे.
माहित नाही सिग्नल शाळा कधी बंद होईल, परंतू एक दिवस सिग्नल शाळा नक्की बंद करायची आहे. शाळेला एक वर्ष पूर्ण झाले असून चार वर्षानंतर ही शाळा बंद करण्याचे समर्थ भारत व्यासपीठाने ठरवले आहे. शाळेची पटसंख्या सध्या 37 आहे ठाण्यातील इतर सिग्नलवरील अजून 20 मुले दाखल होतील असे नियोजन आहे. साधारण 60 मुले शाळेत पुढील चार वर्षे शिकतील आणि लवकरच तथाकथीत मुख्य धारेच्या शाळेत ते जावेत यासाठी समर्थ भारत व्यासपीठ आग्रही आहे.
अर्थात हे करीत असतांना भविष्यात सिग्नलवर नवीन मुले येणार नाहीत आणि नव्या सिग्नल शाळेची गरज निर्माण होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. मुद्दा या 60 मुलांना मुख्यधारेतील शाळेत शिकतं करणे असा नाहीच आहे. खरा प्रश्न आहे ठाण्यातील सिग्नल बालभिकारी मुक्त होतील का आणि सिग्नल शाळा नावाचा कलंक कायम स्वरूपी मिटवता येईल का हे खरे आव्हान आहे.

सिग्नलवर मुले येऊच नये अशी कोणती व्यवस्था आहे जी निर्माण करावी लागले याबाबत आजही आम्ही चाचपडत आहोत. विस्थापित लोकांना पुलाखाली आश्रय मिळतो आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह भागतो किंवा उदरनिर्वाह भागतो, म्हणून पुलाखाली आश्रय शोधत विस्तापित लोक शहराकडे धावतात. ही परिस्थिती कशी बदलता येणार हा प्रश्न आहे. या ही पुढे म्हणजे वर्षभरातील किमान 150 दिवस शहरांमधील पुलाखाली येणे हा एक व्यावसायिक शहाणपणा आहे असे गणित गेल्या दहा वर्षांत भटक्या जमातीतील लोकांनी तयार केले आहे, त्याला लगाम कसा घालता येईल हाही प्रश्न आहे. सिग्नलवरील भटक्यांचे अस्तित्व ही एक पूर्वनियोजित विचारपुर्वक केलेली कृती आहे हे एव्हाना आम्हाला कळायला लागले आहे. शहरामधील विविध झोपडपट्यांमध्ये पत्राच्या शेडच्या जागा अडवून त्या फीक्स डिपॉझीट सारख्या सांभाळणे व ऐरवी वर्षभर सिग्नलवर उघडा संसार माडून पिढ्या बर्बाद करणे, असा परंपरागत व्यावसायिक शहाणपणा अंगात रूजलेल्या या लोकांना कसे रोखायचे हा देखील प्रश्न आहे. सिग्नल शाळा बंद करायची आहे त्यासाठी आधी हे सर्व बंद करावे लागले किंवा हे का होते त्यामागील कारणांचा शोध घेत त्या कारणांवर घाव हाणावा लागेल. हा चक्रव्युह भेदण्यासाठीचा मार्ग आगामी चार वर्षात गवसायला हवा.
पुलाखालील या शाळेच्या भिंतीवर मुलांनी रेखाटलेली चित्रे भविष्यात पुसली जावीत, तो पिवळा धमक कंटेनर तिथून हटवला जावा, शाळेमुळे त्यांचे पालक पुलाखाली पसारा मांडतात अशा आरोपांची राळ बंद व्हावी, शाळेच्या बागेत मुलांनी लावलेली काकडी, टमोटे, कांदे यांची रोपे सुकुन नष्ट व्हावीत, बोरिंगच्या थंडशार पाण्यात कुडकुडत आंघोळ करणारी, कपडी धुणारी चिल्लीपिल्ले कोसो लांब जावीत, इथला नेकीचा पिटारा बंद व्हावा, त्या सहली, सांस्कृतिक कार्यक्रम संपुष्टात यावेत असे प्रामाणिकपणे वाटते. तीन हात नाक्याच्या सिग्नलवर थांबून रात्री गृहपाठ पाहण्याचा शिरस्ता मोडावा असे वाटते. देशभरातील पुलाखालील वास्तु सिग्नल शाळेच्या जागेकडे उपहासाने पहात आहेत, तिथे परंपरागत सुशोभिकरण, छानसी बाग किंवा गेला बाजार एखादे जॉगिंग ट्रॅक अथवा ओपन जिम असायला हवे, पालकांकडून मरेस्तोवर मार खाणारी ती छोटी काजल शिक्षकांच्या आड किती दिवस लपून राहणार, किती दिवस त्या आई नसलेल्या विशालला सिग्नल शाळा पानाच्या टपरीपासून लांब ठेवणार, गजरे विणणे आणि विकणे याकामात न रमणारा व कामचुकारपणा शिक्का बसलेला राहूल आणि त्याचा गतीमंद भाऊ बबडी याला दिवसभर नशेत असलेल्या बापापासून किती दिवस रोखणार, नेहा, निकीताची घणसोली ते ठाणे पायपीट बंद व्हायला हवी, ते ध्येयवेडे शिक्षक, आपला व्याप सांभाळत मदतीचा हात देण्यासाठी येणारे स्वयंसेवक यांना या कामातून मुक्ती मिळायला हवी.

कशाला हवेत भीक मागू नकोचे दिर्घकालीन डोस, कशाला हवेत विस्थापितांनी तयार केलेले दिवाळीचे किल्ले, र्दुव्यसनांची होळी, पुस्तकांची दहीहंडी. ती कुपोषित आणि हेल्पलेस संगीता तर अंगावर शहारे आणते ती तीचा तो बाप, आई, एक दिव्यांग मोठा भाऊ आणि दुसरा जन्मापासून हेळसांड झालेला लहान भाऊ सिग्नल शाळेच्या प्रयोगासमोरील आव्हान आहेत.
एक वर्षाच्या या काळात मंत्री, अधिकारी, उच्चपदस्थ, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माध्यमे, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य पापभिरू नागरिक, कलावंत सगळे सिग्नल शाळेच्या महानाटयात सहभागी झालेत. या सगळ्यांसमोर आव्हान आहे की असेल हिम्मत तर या सिग्नल शाळेला नैसर्गिक मरण आणू या किंवा या महानाट्यावर हॅप्पी एंडिंगचा पडदा पाडू या.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page