आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मुंबई शहर हे ज्याप्रमाणे आर्थिक राजधानी, विविध उद्योगांचं उगमस्थान म्हणून ओळखलं जातं, तसंच ते ‘धारावी’ या जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीसाठी सुद्धा ओळखलं जातं. धारावी ही एक अशी वसाहत म्हणता येईल जिथे मुंबईत सुरू असलेल्या जवळपास सर्व उद्योगांना लागणाऱ्या कामगारांना आश्रय मिळतो.
१८८० मध्ये काही करखान्यांचा झालेला स्फोट, गावातून स्थलांतरित झालेले कामगार यामुळे धारावी झोपडपट्टी ही अस्तित्वात आल्याचं सांगितलं जातं.
कोरोना काळात धारावी येथे रहाणाऱ्या लोकांनी कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबवतांना आरोग्य खात्याला केलेलं सहकार्य हे खरंच कौतुकास्पद होतं.
धारावी काय आहे ? कुठे आहे ? तिथले लोक कसे जगतात हे त्यावेळी टीव्हीवर आलेल्या विविध बातम्यांमधून काही लोकांना नव्याने कळलं होतं. धारावी या जागेत ‘रिवा’ नावाचा एक किल्ला आहे ही बाब मात्र आजवर कधीच प्रकाशात आलेली नाहीये.
आपण प्रत्यक्ष हा किल्ला पहायला जाण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे ‘रिवा’ किल्ला कसा आहे ? तो कोणी व का बांधला होता ? हे कुतूहल म्हणून जाणून घेऊयात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
मिठी नदीच्या तीरावर वसलेली धारावी ही जागा १७३७ मध्ये इंग्रजांचा ताबा असलेलं ‘बॉम्बे’ आणि पोर्तुगीज लोकांनी बळकावलेलं सॅल्सेट बेट यांच्यामध्ये होती.
१७३७ मध्ये सॅल्सेट या बेटावरुन आपल्या शूरवीर मावळ्यांनी पोर्तुगीजांना हुसकावून लावलं आणि तिथे मराठेशाहीचा झेंडा फडकवला. मराठ्यांचा हा पराक्रम बघून इंग्रजांचं धाबं दणाणलं.
मराठा सरसेनापती कान्होजी आंग्रे यांच्याबद्दल इंग्रजांच्या मनात भीती निर्माण झाली. मराठ्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तत्कालीन ‘बॉम्बे कमिशनर’ जॉन हॉर्न यांनी आजच्या धारावी येथे एक किल्ला बांधायचं ठरवलं. ‘रिवा फोर्ट’ किंवा ‘काळा किल्ला’ या नावाने ओळखलं जाऊ लागलं.
मिठी नदी ही त्या काळात इंग्रजांना रेवा किल्ला ते ‘सायन किल्ला’ हा प्रवास करण्यासाठी उपयुक्त असायची. मुंबईतील इतर किल्ल्यांपैकी ‘माहीम किल्ला’ हा ब्रिटिशांनी ‘बॉम्बे आईसलँड’वर बांधला होता आणि ‘बांद्रा किल्ला’ हा पोर्तुगीजांनी सॅल्सेट या बेटावर बांधला होता.
दार नसलेला किल्ला
‘रिवा’ किल्ला हा असा एकमेव किल्ला म्हणता येईल ज्याच्या आत जाण्यासाठी कुठूनही रस्ता ठेवलेला नाहीये. धारावीत असलेल्या दत्तगुरु हाऊसिंग सोसायटीच्या आणि धारावी झोपडपट्टीच्या मध्ये असलेल्या एका छोट्या कपारीतून आपण किल्ल्याच्या आत जाऊ शकतो.
रिवा किल्ल्याच्या भिंती या आजही त्याच अवस्थेत शाबूत आहेत. पण, त्याच्या आजूबाजूची जागा ही धारावी झोपडपट्टीने पूर्णपणे काबीज केली आहे. रिवा किल्ल्यामध्ये आजही कोणीच अतिक्रमण केलेलं नाहीये.
रिवा किल्ल्यावर एक पाटी लिहिलेली आहे ज्यावर हे लिहिलेलं आहे की, “१७३७ मध्ये हा किल्ला तत्कालीन मुंबईच्या राज्यपालांच्या आदेशावरून बांधण्यात आला आहे.” या पाटीवर काही बांधकाम अभियंत्यांनी स्वाक्षरी केल्याचं आपण बघू शकतो.
१७३४ ते १७३७ या काळात मुंबईचे १९ वे राज्यपाल जॉन हॉर्न यांनी ‘रिवा’ किल्ल्याच्या बांधकामाची पाहणी केली होती अशी देखील या पाटीवर नोंद आहे.
मुंबईत नेहमीच होणाऱ्या प्रचंड पावसामुळे या किल्ल्यात पाणी भरायचं आणि किल्ल्याच्या भिंतीवरून लोक त्या पाण्यात उडी मारायचे असं धारावी येथील स्थानिक रहवासी सांगतात.
या किल्ल्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. स्थानिकांकडून नेहमीच या सार्वजनिक वास्तूत स्वच्छता ठेवली जाते आणि त्याचं रक्षण केलं.
किल्ल्याचे शेजारी असलेल्या लक्ष्मण झाके परिवाराने आपल्या या सामाजिक योगदानासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे अनुदानाची मागणी देखील केली आहे.
रिवा किल्ल्याच्या आतील भागात झाडी आहे आणि या जागेला भेट दिलेल्या लोकांनी टाकलेल्या कचऱ्याचं जाळं आहे.
रिवा किल्ल्याला तीन बुरुज आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी तीन जागा आहेत ज्या भुयारी मार्गाकडे जातात. या भुयारी मार्गांकडे गेल्यावर एक अगदी कमी उंची असलेलं भुयार दिसतं. सध्या ही जागा झाडांची पानं आणि कचऱ्याने भरलेली आहे. पण, त्याचा साचा बघून इथे कधीकाळी एक किल्ला होता आणि हा त्याचा अंतर्गत रस्ता होता हे लक्षात येऊ शकतं.
भुयाराच्या आत गेल्यावर एक छोटी चौकट दिसते. ही चौकट इतकी लहान आहे की त्यातून केवळ एखादा पक्षी किंवा प्राणी सरपटत जाऊ शकतो. १७ व्या शतकात इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने केलेलं हे बांधकाम आपल्याला नक्कीच चकित करतं.
धारावी झोडपट्टीत रहाणारे लोक हे दर रविवारी आपला वेळ या किल्ल्यात, त्याच्या अवतीभवती व्यतीत करत असतात.
आपल्या वसाहतीत इतकी जुनी आणि ऐतिहासिक वास्तू आहे हे धारावीत राहून जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना माहीत नसावं असं त्यांचा या जागेचा वापर बघून वाटतं.
ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास जाणून घेण्यात रुची असलेले लोक या जागेच्या पुनर्वसनाची, तिथे स्वच्छता राखण्याची मागणी सरकारकडे नक्कीच करू शकतात.
किल्ल्याच्या आवारात काही स्थानिकांनी सायकल दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं आहे. मुंबईत असलेली जागेची कमतरता आणि त्याचं होणारं योग्य नियोजन याचा आपल्याला इथे प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
२०१९ मध्ये भारतीय पुरातत्व खात्याने महाराष्ट्र सरकारकडे काळा किल्ल्याच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव पाठवला आहे जो की आजही पैश्यांच्या अभावी आणि हे काम कमी महत्वाचं आहे असं सांगून विचाराधीन ठेवण्यात आला आहे.
‘झोपडपट्टी पुनर्वसन योजना’ जेव्हा धारावीत पूर्णपणे राबवली जाइल तेव्हा रेवा किल्ल्याबद्दलचा निर्णय सुद्धा घेतला जाईल असं सातत्याने मागणी करणाऱ्या लोकांना सांगितलं जात आहे.
कसं पोहोचाल?
‘काळा किल्ला’ या जागेचा मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये समावेश होत नाही. पण, त्याच्या आसपास रहाणाऱ्या लोकांना रिवा किल्ल्याचा इतिहास वाचून त्याला नक्कीच भेट द्यावी वाटू शकते. ‘माहीम नेचर पार्क’च्या समोर आणि धारावी बस डेपोच्या मागे हे ‘रिवा’ या किल्ल्याचं ठिकाण आहे.
धारावी बस डेपोच्या समोर असलेल्या गल्लीतून सरळ येऊन तुम्ही इथे पोहोचू शकता. रेवा किल्ल्याच्या बाजूला सध्या ‘दत्तगुरू हाऊसिंग सोसायटी’चं मुख्य प्रवेशद्वार आहे. ‘रेवा फोर्ट कॉलनी रहिवासी संघ’ हे आज या काळा किल्ल्याचं रक्षण करतात.
—
- आरे कॉलनी घडवण्यात, समृद्ध होण्यामागे पंडित नेहरू आहेत…!
- जगातील उद्योजकांना धडे देणारा १३० वर्षं जुना ‘मुंबई डब्बेवाल्यांचा’ उद्योग डबघाईला का आलाय?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.