' ती दिसायला कशीये, गोरी की काळी, काही फरक पडत नाही; दिसते फक्त ‘स्त्री’ आणि तिचं ‘शरीर’… – InMarathi

ती दिसायला कशीये, गोरी की काळी, काही फरक पडत नाही; दिसते फक्त ‘स्त्री’ आणि तिचं ‘शरीर’…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – ज्योती थोरवत 

स्त्री, निसर्गाची अमुल्य आणि अद़्भुत निर्मिती.

फक्त स्त्रीच अशी आहे जी एकाचवेळी सगळया जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पेलत सगळी कामे व्यवस्थितरित्या पार पाडू शकते. तिच्या क्षमता, स्त्रीवादी बहुकौशल्ये, परिस्थितिशी दोन हात करण्याची हातोटी, सामंजस्य, टीम मॅनेजमेंट, अर्थकारण, मार्केटिंग इ. उपजत गुणांच्या पायावर ती उभी असते.

शिक्षणाचा विचार आणि अधिकार नसलेल्या काळातही ती या सर्व गुणांचाच वापर करत होती. बालवयात होणारे लग्न, दरवर्षी पाळणा हलण्याच्या पद्धतीमुळे जीर्ण दोरीसारखी होणारी तिची अवस्था…!

वडाच्या मूळासारखे मोठे एकत्र कुटुंब, कुळाचार, परंपरांच्या ओझ्याने दबत चाललेली स्त्री,  जाते-उखळातून भरडून तर कधी स्वतःच्याच (?) घरातील वयस्क स्त्री जाचाचे चटके आणि फटके खात जमिनीवर पडली, तोच त्याच आपल्या घरातील पुरुष प्राणी पडलेल्या स्त्रीच्या शरीराचे लचके तोडून आपली भूक भागवू लागला.

यातून बाहेर निघण्यासाठी शिक्षण हा एकमेव खडतर मार्ग होता. “जोपर्यंत आपण एखाद्यावर पूर्णपणे अवलंबून आहोत तोपर्यंत आपण गुलामच आहोत” ही शब्दास्त्रे सट़्कन काळजात घुसली आणि साक्षर बनण्याची तिची डगमगती पाऊले सुशिक्षित होण्याच्या वाटा तुडवत प्रसंगी घरापासून लांब जाऊन/राहून आपली स्वप्ने पाहण्याचे धाडस करू लागली.

घरातल्या छळवादापासून पळण्यासाठीची तिची वाट योग्य तर होतीच, पण वाटत होती तितकी सुरक्षितही नव्हती.

 

rape victim inmarathi

 

ती तिच्या (?)घरीही सुरक्षित नव्हतीच पण बाहेरच्या जगाची मन सुखावणारी झुळूक ही सर्वस्व हिरावून घेवून जीवघेणी ही असू शकते  याचा अंदाजही कदाचित तिला नसावा, कारण छोट्यामोठ्या छेड़ाछेडीच्या अनुभवातून प्रत्येक स्त्री जातेच जाते. इथे कातडी गोरी/काळी आणि इतरवेळी सौंदर्याची व्याख्या आणि समजली जाणारी विशेषणे टीचभरही लागू पडत नाहीत बरं का.  इथे दिसत ती फक्त “स्त्री” आणि तिचं “शरीर”.

सुरुवातीला छोटी मोठी कामे करून अर्थार्जन करणाऱ्या स्त्रीया “स्वबळावर” (इथे बळाचेही प्रकार आहेत जे पुढे वाचताना लक्षात येत जातील). आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्चशिक्षित होऊन प्रसंगी एखाद्या नव्याच क्षेत्रात पाय रोवू लागल्या. परिणामी नोकरी/व्यवसाय आणि सर्वच अधिकारांच्या बाबतीत पुरुषांच्या मक्तेदारीला घरघर लागली. एक स्त्री आपली वरीष्ठ अधिकारी म्हणून पारंपारिक पुरुषी अहंकराला हे सहन करणे खूप अवघड जात होते आणि बस इथूनच स्त्री सत्तेविरुद्ध कारस्थानांच बीज रुजू लागलं.

कंपनी कोणतीही आणि कितीही मोठी असो, पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांची संख्या मोजकीच. त्यात मग डिपार्टमेंट नुसार त्याच्या कामाच्या वेळा, डेस्क इ. वेगवेगळेच!  शिवाय आपसातले कपड़े, दागिने  इ. वरून फालतू गोष्टीवरून हेवेदावे असतातच, मग अश्यानेच त्यांच्यात एकी बनत नाही. हीच पडती बाजू कोल्ह्या लांडग्यांची हपापलेली नजर आपली शिकार हेरते.

 

rape-molestation-women-marathipizza

 

आईटी पार्क/बीपीओ बाहेरून जितके आकर्षक दिसतात त्यापेक्षाही सुंदर इमारत दिसते आणि आतली सजावट, चकाचक जमीन, अन् तितकेच चमकदार दिसणारे कपडे आणि कृत्रिम रंगाने रंगवलेले चेहरे, हाताखाली कामासाठी माणसे आणि तोंडातून बाहेर पडणारी इंग्लिशची वळवळ बघितलं की सगळयांना हेवा वाटावा असा थाट, पण बाहेरून बघणाऱ्यांना काय माहीत या मायावी नगरीतलं कपटी घाण आणि दलदलीचं साम्राज्य. ते आतून तितकच विविध प्रकारच्या घाणीने भरलेलं असतं.

‌ऑफिसमधे कोणी नवी स्त्री आली की लगेच कंपनीतील सर्व वयोगट, हुद्दे आणि विविध डिपार्टमेंटमधील माजुरडया आणि खाजाऱ्या कुत्र्यासारख्या जीर्ण झालेल्या बुद्धीच्या पुरुष प्राण्यांची अधाशी नजर तिच्यावर खीळते आणि हावरट जीभ हातभर लांब लोंबत लाळ टपकू लागते. त्यात जर ती लेटेस्ट फॅशन किंवा स्वतःच्या आवडीनिवडीनुसार जगणारी असेल तर अजुनच ऊत येतो. मग सुरु होतं विविध पद्धतीने ओळख करून जवळीक साधण्याची स्पर्धा रंगू लागतात.

 

 

फ्रेंड्स, ट्रेंड, मॉडर्निटी इ. पोकळ शब्दांचे जग रंगवून पार्ट्यांचा कट रचला जातो. आपल्यासोबत काय आणि कसे घडले हे तिला तेव्हाच समजते जेव्हा पोलिसांना छिन्नविछिन्नावस्थेत शरीराचे तुकडे मिळतात. यामागे असणारी मूळ कारणे पुढलप्रमाणे लक्षात घेता येतील .

‌1. कधी कधी एकतर्फी प्रेमाचा दिखावा तर कधी नाकारलेला प्रस्ताव (वीकेंड एन्जॉय करण्यासाठी)

2. तर कधी स्वतःच्या पुरुषी जन्माचा माज म्हणून

‌3. कधी त्यांच्या चुकीमुळे त्यांच्या झालेल्या अपमानाची सल

‌4.  तर कधी चांगलं काही दिसलं की वाट लावायची म्हणून

सगळयात जास्त अश्या पुरुषी वागण्याचे मूळ असते ते त्यांच्या मानसिकतेमधे. स्त्रीविषयीच्या त्यांच्या भावना, विचार आणि ही अशी पुरुषी कीड निर्माण होते तिही एका स्त्रीमुळेच – आईमुळे! कारण लहान मूल आईकडून जे शिकते तेच ते पुढे बनते. आपल्याच घरातील स्त्रिया/बहिणींना दुजाभाव दिला जातो. एक स्त्री म्हणून जन्माला येणं पाप असल्यासारखं वागवलं जातं. मग समस्त स्त्री जाती ही फक्त उपभोग्य वस्तू आहे हाच विचार त्यांच्या किडयाच्या रथाचा सारथी बनून यांच्या मेंदूवर चाबकाचे फटके ओढू लागतो.

स्त्रीचा स्वाभिमान आणि  देहाच्या चिंध्या करून तिला तिच्याच नजरेत पाडून वरुन आपण किती भेकड आहोत हे दाखवण्यासाठी तिचा जीव घेवून मोकळे होतात. ही बाजू झाली मानसिक विकृत पुरुषांची बाजू. दूसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. ती म्हणजे स्त्रीयांची!

समानता आणि स्वातंत्र्याचा गैर अर्थ घेणाऱ्या स्त्रीया, तसेच कोणावरही नको इतका विश्वास ठेवून गाफील राहून काळवेळेच भान न ठेवणाऱ्या स्त्रीया बलात्कार आणि खून प्रकरणात उध्वस्त होतात.

 

rape 3 inmarathi

 

 

स्त्रिया समानतेच्या नावाखाली असे कपडे घालून येतात आणि मीटिंग्समधे, कॅफेटेरियामधे इ. ठिकाणी अश्या स्थितीत बसलेल्या असतात की अक्षरशः त्यांचे कपड़े गळून इतके खाली आलेले असतात, कधीकधी त्यामुळे स्त्रीया आणि अगदी पुरुषही लाजेने मान फिरवतात. आता यात काहीवेळा यांचं भान नसतं तर कधी त्या आपल्या इन्क्रीमेंट आणि प्रमोशनच्या लोभाने वरिष्ठांना खुश करण्याच्या उद्देशाने स्वतःच स्वतःसाठी जाळे विणत असतात.

 

sexual-harassment-inmarathi
theindianexpress.com

काहीवेळा हा फंडा काम करून जातो. पण जेव्हा हे अधिकारी आणि हावरट स्त्रीयांमधील “डील” काही कारणास्तव फिसकटते तेव्हा हे वरिष्ठ अश्या स्त्रीयांना माशीसारखे फटकून टाकतात. किंवा मग नोकरी जॉइन करताना कमी पगारावर जॉइन करून घेवून नंतर वाढवतो या भूलथापा मारत आपला मूळ उद्देश बाहेर काढतात आणि पगार/पद वाढवून घेण्याचे फंडे सांगत स्त्रीचे खेळणे बनवून टाकतात.

sexual positions inmarathi

 

 

कॅब ड्राईवरशी एकेरी बोलत अति सलगी दाखवतात. आपला मोबाइल नंबरही त्याला देतात. आपले घर जवळआल्यावर कॉल कर/उशिरा ये असं लाडिकपणे सांगतात. आपलं रोजची दिनचर्या कॅबमधे बिनधास्त ओकत बसतात आणि बऱ्याचवेळा कॅबमधे झोपूनच ये जा करतात आणि आपण कुठे झोपलोय याचं मुळीच भान त्यांना आणि त्यांच्या कुठल्याच गोष्टीला नसते.

कधी कधी तर छोटेमोठ्या कपड्यांची अदलाबदल/ मेकअप इ. कॅबमधे करणं या गोष्टी अगदी बिनदिक्कतपणे करत असतात. शिवाय बीपीओ/नाईट शिफ्ट करणाऱ्या मुली रोज मधेच कॅब थांबवून कुठल्यातरी सुनसान टपरीवर सिगारेट घ्यायला उतरतात आणि शेकडो एकरात पसरलेल्या ऑफिसच्या स्मोकिंग झोनमधे जावून अंधारात भकभका धुर सोडत बसतात.

quit smoking inmarathi

 

इतरवेळी झुरळाला घाबरणाऱ्या मुलींची भीती आता कुठे जाते कुणास ठाऊक. पुरुष सहकाऱ्याशी  गळयात गळे घालून, मीठी मारून भेटणे. चेष्टा मस्करीच्या नावाखाली स्पर्श मर्यादांकडे दुर्लक्ष करणं इ. कारणे छोटी आणि क्षुल्लक वाटत असली तरी मान्य करणं गरजेचं आहे.

 

corporate-marathipizza01
careerindia.com

तिसरा महत्वाचा भाग येतो तो ज्या कंपनीमधे स्त्रीवर्ग वेगवेगळया शिफ्ट्समधे काम करतो आणि साहजिकच कंपनी ट्रांसपोर्ट घेतात त्यांचा. बऱ्याचवेळा असं पाहण्यात आलय की काही स्त्रीयांना हेरून कामाच (?) सबब देवून सुट्टीच्या दिवशी एकट्या स्त्रीला ऑफिसला बोलावणं. तसेच नाईट शिफ्ट/ओवरटाइम करण्यासाठी दबाव आणला जातो.

नोकरी गमावण्याच्या भीतीने यांच्याकडे मग दूसरा पर्याय नसतो, कारण हे दबाव आणणारे त्यांचे वरिष्ठ असतात. दिवसा अधाशी नजर ठेवून, कामाच्या निमित्ताने स्पर्श करण्याची एकही संधी न सोडणारे, शिटी वाजवणे, उद्देशून गाणी म्हणत आपला डाव रचत असतात. हे असे वागणारे फक्त/दरवेळी तिचे वरिष्ठच नसतात. यांच्यासोबत दुसऱ्या डिपार्टमेंटचे आणि अगदी हाउसकीपिंग/सिक्यूरिटी /ट्रांसपोर्ट इथपर्यंत सगळे कोल्हे लांडगे संध्याकाळची ढोसताना एकत्र येवून कारस्थान रचत असतात. अर्थातच यात तेच खरजे कुत्रे असतात ज्यांना या स्त्रीयांनी भीक घातलेली नसते.

 

sex slave market 2 InMarathi

 

मग प्रत्येकजण आपल्याला जमेल तसे यांना लटकवण्याचे गळ घेवून सज्ज असतात. ट्रांसपोर्ट आणि सिक्यूरिटी टीमकड़े सगळयांच्या घरचे पत्ते, मोबाइल नंबर्स तर असतातच शिवाय ऑफिसवेळ किंवा घरापर्यंत पोचण्यासाठी लागणारा वेळ, नेमके घर कुठे आहे इ. सगळी इत्यंभुत माहिती यांच्याकडे असते. एकट्या स्त्रीला सकाळी ६ आधी आणि ७ नंतर कॅबमधून न्यायचे असेल तर ड्रायवरसोबत सिक्यूरिटी गार्ड दिला जातो आणि त्यात जर वरती दिल्याप्रमाणे गाफिल स्त्री असली की अजुनच काम सोपे. कारण हिंस्त्र प्राणी नेहमी कमजोर आणि गाफिल सावज हेरुनच आपली भूक भागवतो.

कारण अश्या घटना या ओळखीच्या लोकांनीच केल्याच प्रमाण जास्त दिसते. जसं की पुण्यातल्या आयटी / मल्टीनेशनल कंपनीमधील ठळक घटना बघायच्या म्हटल्या तर नयना पुजारीने कंपनी कॅब चुकल्याने ओळखीचा सिक्यूरिटी गार्ड दिसल्याने बिनधास्त लिफ्ट घेतली. शिवाय रसीला राजू हिच्याही बाबतीत ओळखीच्या सिक्यूरिटी गार्डने दुष्कृत्य केलं.

नयनाच्या आधी ज्योतिकुमारी चौधरी हिचाही खून झाला होता. नयनानंतर दर्शना टोंगारे, अंतरा दास  इ. समोर आलेल्या केसेस आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेतच. अजुन एक स्वतः जवळून बघीतलेली घटनाही असेच वळण मिळता मिळता वाचली ती त्या स्त्रीच्या सतर्कतेमूळे.

 

sex slave market InMarathi

 

कंपनीतील  वरीष्ठ स्त्री अधिकारिला अश्लील आणि धमकीचे संदेश पाठवून सिक्यूरिटी गार्डने मनस्ताप आणि मानसिक छळ केला होता. कंपनीमध्ये नावालाच आणि मर्यादित अधिकार असलेली महिला तक्रार समितीही अश्यावेळी फोल ठरते, कारण एक इंटरव्यू मी असा पाहिला होता जिथे अत्याचारपीड़ित होती ती त्याच समितीची अध्यक्ष्या!

आता तिने तक्रार करायची कुणाकड़े? यातली दूसरी न दिसणारी मेख जिकडे कंपनी आणि तिची ही दिखाऊ समिती हात वर करून थांबते. सध्या सेकंड पार्टी/थर्ड पार्टी पेरोल ( कंत्राटी पद्धत) बळावली आहे. कंपनी पेरोलवर घेण्यापेक्षा मोठमोठ्या कंपन्या हुशार, तरुण, गरजू मुलामुलीना यापद्धतीने जॉइन करुन घेतात. म्हणजे कमी पगार, कमी फायदे मात्र काम जास्त या आधारावर त्यांचा गाढव बनवून आरामात कंपनीचा नफा वाढवून घेता येतो.

 

corporate-marathipizza00

 

अश्यातच जर या स्त्री एम्प्लोयी बाबतीत लैंगिक वा तत्सम अत्याचाराची घटना घडलीच तर ही समिती ते तुम्ही आणि तुमचा एम्प्लॉयर बघून घ्या म्हणून हात वर करतात. एम्प्ल़ॉयर क्लाइंट शी नाते आणि आपला फायदा टिकवण्याच्या लोभापायी हा विषय दाबण्याचा प्रयत्न करतात. इकडे पीडिताचा क्लाइंट मेनेजर तुमचा एच आर आणि तूम्ही बघून घ्या म्हणून दबाव आणतात. मग गुन्हेगाराचं चांगलंच फावतं की कोणी दखल घेणारच नाहीये. मग या स्त्रीयांनी जायचे कुठे? असला हलगर्जीपणा करणारे आणि ती कंपनी यांना चाप लावणं गरजेच नाही का?

पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील पोकळ न्याय आणि कायदेव्यवस्था. रोज इतक्या घटना घडत असतात पण त्यावर गंभीर विचार आणि त्याविषयीचे सुधारणावादी प्रयत्न झालेच नाहीत. एखाद्या स्त्रीचं आयुष्य बरबाद करून तिच्या देविस्वरूप मानल्या जाणाऱ्या देहाची राखरांगोळी झालेल्याचा पूर्ण विसर पड़ेपर्यंत अश्या केसेसचा निकालच लावला जात नाही. उलट वर्षानुवर्षे या घटनेचे लोणचे मुरवत ठेवून तिच्या घरच्यांच जगणं हराम करत बसतात आणि स्वतः आधी बलात्कार झाला की खून ? आधी काय केलं, बलात्कार कसा केला हे मिटक्या मारत  “एन्जॉय” केलं जातं.

 

जोपर्यंत शिक्षेची जरब बसत नाही तोपर्यंत कोणताही गुन्हा करताना गुन्हेगाराला भीती राहात नाही. देशभरातील फक्त समोर येणाऱ्या घटनांचा विचार जरी केला तरी सरकार स्त्री संरक्षण, तिचे  सन्मानाने जगण्याचे अधिकार  इ. कड़े  बघणे हे डोळे मिटून दूध पिणाऱ्या बोक्यासारखे झाले आहे .

घटनेला कारणीभूत गोष्टींवर उपाय पाहू

१. घरातील प्रत्येक मुलाला लहानपणापासून समता आणि मुलींचा आदर करायला शिकवाव लागेल. स्त्रीचं समाजात स्थान काय असलं पाहिजे, तिचे महत्व इ . गोष्टी समजावून सांगाव्या लागतील. स्त्री पुरुष यांची कामे वेगवेगळी ठेवण्यापेक्षा घरातील सर्व कामे करणे मुलांना सवयीचे बनवावे.

जेव्हा स्त्रीबद्दल मनातून आदर वाटत राहील तेव्हा कोणताहि पुरुष स्त्रीला तुच्छतेने बघत तिची पायमल्ली करणार नाही आणि पुरुषांनो तुम्ही जसे तुमच्या आई, बहिण, पत्नी इ. स्त्रीवर्गाशी कसे वागता हे मुले बघत असतात आणि तेच त्यांच्या अचेतन मनावर तुमच्या आणि त्यांच्याही नकळत बिंबतात. स्त्रीवाचक शिव्या मुले बाहेरून नव्हे तर घरातीलच पुरुषाकडून ऐकून शिकतात.

तेव्हा गोष्टीचे मूळ कारण इथे आहे. चूक करून शिक्षा देण्यापेक्षा चूक मान्य करून ती कशी सुधारता येईल आणि पुढे अश्या चुकीच्या घटना घडवणार नाही आणि घडूही देणार नाही ही समज  मुलांमधे वाढीस लावली तर नक्कीच समाजविघातक कृत्यांना आळा घालता येईल .

 

tare zamin par Inmarathi

 

२. स्त्रियांनी समानतेचा, स्वातंत्र्याचा, आधुनिकतेचा अर्थ समजुन घ्यावा. समानता, आधुनिकता  विचारात, कामात असावी. आपण आपली वस्तू, कपडे जितके जपतो तेवढेच महत्व स्वतःच्या शरीरालाही द्यावे. पूर्णतः कपड़े बलात्कराला कारणीभूत नसले तरीही स्वतः होवून अश्या गोष्टींना आमंत्रण देवून मरण ओढवून घेवू नये. पार्ट्या, सहली आदी ठिकाणी नेहमी सतर्क रहावे.

समोरच्या व्यक्तिच्या हालचालीवर, देहबोलीवर लक्ष असू द्यावे. कंपनी कॅब घेताना ड्राईवर/सिक्यूरिटी गार्डशी अवाजवी बोलून जवळीक वाढवू नये. वैयक्तिक गोष्टी फक्त विश्वासु व्यक्तीशीच एकांतात शेअर कराव्यात. कामावर नसताना ड्राईवर /सिक्यूरिटी गार्ड यांच्या ओळखीमुळे कंपनी कॅब घेवु नका, कारण ही जबाबदारी कंपनी घेणार नाही. कंपनीमधे कोणी त्रास देत असेल तर योग्यप्रकारे विरोध करा. सहकाऱ्यांना कल्पना द्या. पुरावे जमा करून ठेवा.

स्वसंरक्षण करण शिकून घ्या. जोपर्यंत स्वतः आवाज उठवत नाही तोपर्यंत कुणाला कळनार नाही आणि अपराध्याला शिक्षा मिळणार नाही. आपण हिऱ्यासारख्या अमुल्य आहोत हे जाणून स्वतःच स्वतःच्या संरक्षणाचं कोंदण बनवा.  गुलाब जितका सुंदर असतो तितकेच त्याचे काटेही भयानक असतात. भितीपोटी गप्प बसू नका.

नवीन नोकरी जॉइन करताना फक्त पगार न बघता रिपोर्टिंग मॅनेजर कसा आहे, कंपनी पॉलिसीस, सपोर्ट टीम इ . कसे आहेत हे जाणून घेवून मगच पुढचा विचार करावा.

 

corporate-marathipizza02
thehindubusinessline.com

३. कंपन्यांनी स्त्रीयांना नाईट शिफ्ट देताना त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा, कारण रात्रीच्यावेळी मोठमोठाले दिवसा चमचमणारे टॉवर्स रात्री/सुट्ट्यांच्या दिवशी स्मशानासारखे भासतात. स्त्रीयांचे मोबाइल नंबर ड्राइवर्स/गार्ड्स यांच्याकड़े चुकुनही लिक होणार नाहीत अशी व्यवस्था करून घ्यावी. उगाच नंतर सारवासारव करून घाण झाकण्याचे नाटक करू नये आणि चुकुन असं काही झालंच तर फक्त नोकरीतून कमी करण्याव्यतिरिक्तही दूसरी कडक शिक्षा द्यावी जी त्याच्यासारख्या सगळ्यांना धडा ठरेल.

स्त्रीसंरक्षणार्थ समितिकडे योग्य अधिकार असावेत आणि कंत्राटी पद्धतीवर काम करण्यासाठीही अशीच समिती कार्यरत असावी. कंपनीच्या बदनामीच्या भीतीने प्रकरण दाबण्यापेक्षा न्यायाची कास धरावी कारण घटना कुणाच्याही बाबतीत घडू शकते. नाममात्र बॅकग्राउंड वेरिफिकेशन ऐवजी कडक नियमांसोबत खरोखरीच वेरिफिकेशन व्हावं .

आपली कायदा आणि न्यायव्यवस्था पोकळ बांबूसारखी आहे. त्यामुळे कुणाला कोणताही गुन्हा करताना धाकच नाही. एकतर बलात्कार, जबरदस्ती, लैंगिक छळ (मानसिक /शारीरिक) घटना समोर येत नाहीत आणि स्त्रीने धाडस दाखवत केस दाखल करायला गेलीच तर पोलीसच उलट पीडिताला तू कशी चुकीची आहेस हे बिंबवण्याचा प्रयत्न करतात आणि अश्या केसेसचा निकाल लवकर लागत नाही. विसरून जा इ. सबबी सांगत केस लिहून घेण्यास फआयआर दाखल करण्यास तयार होत नाहीत.

 

f.i.r. InMarathi

 

जर तक्रार लिहून घेतलीच तर लिहून घेताना स्त्री पोलीस असल्याच तर परत पीडिताचा दुसऱ्यांदा आणि सरकारी दवाखान्यात सत्यता पड़ताळून पाहण्यासाठी परत बलात्कार करतात.  आपण जीवंत उरलो याची त्यांना खंत आणि अतिव दुःख  होत असेल अश्याने आणि मग पोलिसांचे वेळीअवेळी फोन कॉल्स सुरु होतात. इथे सही करायला या, तिथे सही करायची राहिली आणि परत केस मागे घ्यावी यासाठी केसचा निकाल लागण्यासाठी ५-६ वर्षे तरी कमीतकमी लागतील असे निराशावादी सापाचे पिलू पायात सोडायला विसरत नाहीत.

वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या केसेस सोडवण्याशी न्याय /कायदेव्यवस्थेला सरकारला काही देणे घेणे नसते.

प्रसारमाध्यमेही तात्पूर्ती प्रसिद्धी मिळवून गप होतात. कायदे /न्यायव्यवस्था, सुरक्षा यंत्रणा, कंपनीला परवाना देताना आणि रिन्यू करताना प्रत्यक्षपणे सगळया गोष्टी तापासल्या गेल्या पाहिजेत. कंपनीमधील समिती केंद्रीय समितीशी संलग्न करून घेणं बंधनकारक असावं. काळानुसार नवे कायदे आणि त्यांचा अंमलात आणण्याचा कालावधीही निश्चित असावा. स्त्री सन्मानाविषयक सर्व घटनांसाठी स्वतंत्र समित्या असाव्यात. वकील/ जज यामधे स्त्रीयांचं प्रमाण जास्त ठेवावं. विशेषतः येथे कार्यरत असणारया सर्व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मानसोपचाराचे जुजबी ज्ञान (ट्रेनिंग सेशंस) द्यावे. यामुळे पीडीतेची मानसिकता समजुन घेवून तिला वागणूक देण्यात मदत होईल.

 

f.i.r. InMarathi

 

विशेष कोर्टप्रमाणेच विशेष पोलिस यंत्रणा अश्या केसेस सोडवण्यास मदतशीर ठरतील. फाशीची शिक्षाच देण्याऐवजी चुक/गुन्ह्याप्रमाणे शिक्षेच प्रयोजन असावं, की जेणेकरून शिक्षेच्या भीतीनेच गुन्ह्यांना आळा बसेल. डिजिटल इंडिया फक्त नोटा, बिजनेस आणि सपोर्ट सिस्टम नसलेल्या नवनवीन योजना इथपर्यंतच मर्यादित ठेवण्यापेक्षा आणि  गोमातांना आधार नंबर देण्यापेक्षा देशातील आपल्या माता भगिनिंचा आदर कसा वाढीस लावता येईल यावर कार्य करावे लागेल.

सुरक्षित आणि सन्मानाने जगण्यासाठी ही सुचलेली पाऊले चालती ठेवली तरच आपल्या  देशात स्त्रीला  दुर्गा / शक्ती देवीचं स्थान देण्यात आलय या म्हणण्याला अर्थ राहील  नाहीतर स्त्रीला फ़क्त “कामदेवीच” म्हणून पाहिलं जाईल .

आणि स्त्रीयांनो जसे स्वतःचे कपडे, दागिने सांभाळता तश्याच स्वतःच्या बाबतीत सतर्क रहा. कोणी मदतीला येईल म्हणून निपचित पडून राहण्याऐवजी स्वतः स्वतःची मदत करायला शिकावं. कारण आपण जेव्हा घरातून बाहेर पाऊल टाकतो ते स्वतःच्या हिंमतीवर.

शक्य असल्यास जमेल तितके स्व-संरक्षणाचे धड़े शिकून घ्या आणि सर्वात महत्वाचे सहवासातल्या सर्व स्त्रीयांनाही याबद्दल जागरूक करत रहा.

बघ्याची भूमिका घेण्याऐवजी एकमेकांच्या मदतीला तत्पर रहा. आपलं स्त्री असणं आपली कमजोरी नव्हे तर शक्ती बना.

एका टिचकीने फुटणारी  काच  फुटल्यावर किंवा अगदी तडा गेल्यावरही तितकेच तीक्ष्ण आणि धारदार शस्त्र बनते आणि खेळ करणारयाच्या जिवावर बेतते. असे आपले विचार आणि व्यक्तिमत्व बनवा आणि आपण निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती आहोत हे सत्य अबाधित ठेवा .

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Jyotie Thorwat

Electronics & Communication engr. B.A.(English Litrature) Dr- Naturopath PGD-HR

jyotie has 3 posts and counting.See all posts by jyotie

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?