आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
”अवघा रंग एक झाला” असं म्हटलं की विठुरायाची सावळी मुर्ती आणि त्यात एकरूप झालेले लाखो वारकरी हे दृश्य आपोआप डोळ्यासमोर येतं. धर्म, जात, पंथ विसरून खऱंखूरं एक होणाऱ्या या वारकऱ्यांमध्ये शिवभक्तांचं प्रमाणही मोठं असतं. म्हणजे विठ्ठलभक्ती करणारे माळकरी आणि शिवाचे भक्त असलेले शैव पंथीय लोकंही तितक्याच उत्साहाने वारीत सामील होतात याचं काण तुम्हाला ठाऊक आहे का?
पंढरपुरात विठुरायाच्या गाभाऱ्यात कधी मुर्तीचं नीट निरीक्षण केलं असेल तर विठुरायाच्या डोक्यावर एक शिवलिंग असल्याची बाब लक्षात आली असेल. याच गोष्टीत दडलय शिवभक्तांच्या वारीतील सहभागाचं रहस्य!
विठ्ठलाला ‘पांडुरंग’ म्हटलं जातं, मात्र या नावामागील कारणं तुम्हाला ठाऊक आहे का? तर विठुरायाच्या डोक्यावर असलेलं शिवलिंग? त्याला पांडुरंग म्हणण्यामागील कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच कथेत दडली आहेत.
अन् त्याला विठ्ठलात शिव दिसला
ही कथा त्या वेळेची जेव्हा रुख्मिणीच्या शोधात विठुराया पंढरपुरी दाखल झाले आणि भक्तांच्या ओढीने पंढरपुरातच स्थायिक झाले. त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांची रीघ वाढतच होती.
मात्र शहरात असेही काही भक्त होते ज्यांना विठुरायाचं अस्तित्व फारसं आवडलं नव्हतं. याचं कारण म्हणजे मुळातच ते शैवपंथिय अर्थात शिवाची भक्ती करणारे होते. आमच्या शंकराशिवाय दुसऱ्या कोणत्याही आराध्याची पुजा करण्याची त्यांची तयारी नसायची. असाच एक भक्त होता नरहरी सोनार!
तर आख्यायिका सांगते, की पंढरपुरातील एका सावकाराला दिर्घ प्रतिक्षेनंतर पुत्रप्राप्ती झाली. या आनंदाप्रित्यर्थ त्याने विठुरायाला सोन्याचा कंबरपट्टा दान करण्याचा बेत आखला. त्यासाठी त्याने गावातील प्रसिद्ध अशा नरहरी सोनाराला गळ घातली.
मात्र नरहरी सोनार कट्टर शिवभक्त असल्याने त्यानी विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊन कंबरपट्ट्याचं माप घेण्यास नकार दिला. त्यानंतर विविध मार्गांनी मुर्तीचं माप घेण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र सगळेच प्रयत्न फसले.
अखेरिस डोळ्यावर पट्टी बांधून सोनार गाभाऱ्यात पोहोचला आणि हाताने माप घेऊ लागला. मुर्तीवरून हात फिरवताना त्याला मुर्तीच्या काही भागात शिवलिंगाच्या आकाराचा भास झाला. त्याने पटकन डोळ्यावरची पट्टी दूर केली, मात्र तिथे शिवलिंग नव्हते.
पुन्हा डोळे बंद केले असता पुन्हा तोच प्रत्यय आला. अखेर त्यांचा भ्रम दूर झाला. शिव आणि विठ्ठल हे एकरूप आहेत, याची त्यांना प्रचिती आली आणि त्याा दिवसापासून शैवपंथियांनीही विठुरायाला माऊली मानलं.
अशीही एक आख्यायिका…
असं म्हणतात पंढरपुरी विठुरायांचं आगमन झालं आणि भक्तांसह देवदेवांनाही त्यांची ओढ लागली. सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढीलाच अनेक देवांनी आपला मोर्चा पंढरपुरीत वळवला. त्यातचं पहिला क्रमांक लागला तो शिवशंकराचा!
अर्थातच या दर्शनासाठी भगवान शंकर आपल्या कुटुंबासह निघाले. पार्वती देवी, कार्तिकेय, बालगणेश आणि नंदी हे सर्वजण पंढरपुरी दाखल झाले.
मात्र तिथे असलेल्या प्रचंड गर्दीतून वाट काढताना त्यांचा निभाव लागेना.
अहोरात्र चालल्यानंतर अखेर माता पार्वती दमल्या आणि मंदिराच्या मागील बाजूस आल्यानंतर त्यांनी आता पुढे चालणं शक्य नसल्याचं सांगितलं. याचंच प्रतिक म्हणजे आजही मंदिराच्या मागील बाजूस पद्मावती मंदिर आढळून येतं.
उरलेल्या सर्वांनी मंदिराकडे प्रस्थान केलं, मात्र महाव्दार घाट येथिल हनुमान मंदिराजवळ येताच नंदीलाही चालणं अशक्य झालं. ही गोष्ट सिद्ध करणारी बाब आजही मंदिरात आढळून येते, कारण हे एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानासमोर नंदी आढळतो. उर्वरित सर्व मंदिरांत शंकरासमोर नंदी विराजमान असतो.
अखेर गणपती आणि शंकर भगवान हे दोघेही पुढे आले, मात्र महाव्दाराच्या समोरच गणपतींनीही थकल्याचं सांगितलं. आजही गणेशाची आराधना येथेच केली जाते.
—
- संत नामदेवांना या देवळात मनाई केली म्हणून मंदिराने चक्क दिशाच बदलली…!!
- पंढरीचा विठूराया आणि आषाढी वारीबद्दल १० अफलातून गोष्टी..
—
अखेरिस शंकर भगवान एकटेच गाभाऱ्यात शिरले, देवाधिदेव शंकर भगावानांना पाहून विठुरायांनाही अत्यानंद झाला. आपल्या भक्तीपायी आलेल्या शंकरांना त्यांनी थेट आपल्या डोक्यावरच स्थान दिलं. आणि म्हणूनच विठुरायाच्या मूर्तीत शिवलिंग आढळतं.
असं म्हणतात, ज्या भक्तावर विठुरायाची भक्ती असते त्याला थेट डोईवर स्थान दिलं जातं. याचंच प्रतिक म्हणजे शिवलिंग!
अर्थात या सगळ्या आख्यायिका आहेत, ज्या भक्तांकडून भक्तांना सांगितल्या जातात. यामध्ये इतरही अनेक कारणं, कथा असू शकतात. मात्र कथेतील अनेक दाखले आजही मंदिराच्या विविध भागांमध्ये दिसून येतात.
येत्या आषाढीला वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरी रंगणार आहे, विठुरायाही आपल्या भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज आहे, जात, पात, धर्म, पंथ यांचा भेदाभेद टाळून प्रत्येकाला आपलंसं करणाऱ्या ‘माऊलीला’ त्रिवार वंदन!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.