आकार बदलणारं शिवलिंग, मोक्ष देणारी कबूतरं, अमरनाथ यात्रेच्या या अद्भुत गोष्टी जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिमालयाच्या कुशीत वसलेले, उणे तापमान असल्याने रक्त गारठून टाकणारी थंडी असुनही नेहमी अस्थिर सामाजिक व राजकिय वातावरण तापलेले, अखिल हिंदु धर्मिय लोकांचे पवित्र देवस्थान “अमरनाथ” यात्रेबद्दल तर सगळ्यांनाच ठाऊक असेल!
श्रीनगर पासुन १४१ किमी अंतरावर पहलगाम जवळ अमरनाथ गुहेमध्ये भगवान महादेव यांचे शिवलिंग आहे.
दरवर्षी बाबा बर्फानी यांचे दर्शन घ्यावयास लाखो भाविक येत असतात.
या शिवलिंगाचा सर्वप्रथम शोध सोळाव्या शतकात एका मुस्लिम मेंढपाळास लागला. त्यामुळे आजही त्याच्या वारसांना दानाचा चौथा हिस्सा दिला जातो. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे गुहेत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबां पासुन हे शिवलिंग बर्फ स्वरुपात तयार होते.
गुहेत पाझरणाऱ्या पाण्याचा अति थंड वातावरणामुळे बर्फ होतो. या गुहेतील इतरत्र पडलेल्या कोणताही बर्फाला हातात दाबले तर तो कुस्करुन जातो, पण बर्फाचे शिवलिंग मात्र अगदी कडक असते. हा चमत्कार म्हणावा की निसर्गाची किमया, या प्रश्नाचे उत्तर संशोधक आजही शोधत आहेत.
या शिवलिंगाचा आकार आषाढी पौर्णिमी पासून अमावस्येपर्यंत लहान होत जातो. जसे कि चंद्राची कला पोर्णिमेपासून अमावस्येपर्यंत मोठ्याची लहान होत जाते आणि अखेर नाहीशी होते. या बर्फाच्या शिवलिंगाच्या बाबतीतही अगदी तोच प्रकार आपणास पहावयास मिळतो.
म्हणूनच या शिवलिंगास स्वयंभू शिवलिंग म्हणत असावेत. जेव्हा शिवलिंग पुर्णपणे आकारास येतो तेव्हा उंची १० फुटापर्यत असते.
अमरनाथ शिवलिंगा बाबतीत काही अख्यायिका आहेत. सर्व प्रथम भृगुऋषी यांना शिवलिंग दिसले व त्यांनी सर्वांना याचे महात्म्य सांगितले. तसेच, भगवान शंकराने पार्वतीला येथेच अमरकथा सांगितली होती.
ती कथा दोन कबुतरांनी पण ऐकली व त्यामुळे ते अमर झाले. आजही तेथे दोनच कबुतर दिसतात. जर ते भाविकांना जोडीने दिसले तर साक्षात् महादेव-पार्वती दर्शन देऊन मुक्ती देतात असे मानले जाते.
शंकरजी पार्वतीला अमरकथा ऐकण्यासाठी घेवून जात होते. तेव्हा त्यांच्याकडे लहान लहान अनंत असे नाग होते, ते त्यांनी एका ठिकाणी सोडले. जेथे सोडले ते ठिकाण ‘अनंतनाग‘ म्हणुन प्रसिद्ध झाले.
कपाळावरील चंदनाला चंदनबावडी येथे उतरविले, गळ्यातील शेषनागला जेथे सोडले ते ठिकाण शेषनाग झाले. पहलगाम (बैलगाम) येथे नंदी बैल यांना सोडले. महागुनेस पर्वत येथे त्यांनी आपला पुत्र भगवान गणेश यांना सोडले.
पंजतारणी येथे पंचतत्व अग्नि, वायू, जल, पृथ्वी व आकाश हे सोडले म्हणुन हे ठिकाण पंजतारणी म्हणुन ओळखले जाते. उपरोक्त सर्व ठिकाणे अमरनाथ यात्रे दरम्यान येतात.
अमरनाथ यात्रा ही राज्य सरकार व श्री अमरनाथ श्राईन बोर्ड यांच्या सहकार्याने पार पाडली जाते. यात्रे दरम्यान आवश्यक अश्या पाणी, संपर्क यंत्रणा, निवास व्यवस्था इ.सोई पुरविल्या जातात.
यात्रेचा एकुण कालावधी ४५ दिवसांचा असतो. पहलगाम पासुन पायी चालत गेले तर पाच दिवस लागतात. यात्रा ही दोन वेगवेगळया मार्गाने होते. पहिला मार्ग पहलगाम व दूसरा सोनमर्ग.
दोन्ही ठिकाणापर्यत वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे, पण पुढिल प्रवास आपणास पायीच करावा लागतो. या दोन मार्गांपैकी सोनमर्ग हा खडतर मार्ग आहे.
सुरक्षिततेच्या बाबतीत सरकार जबाबदारी घेत नाही. पहलगाम हे लांब पडते पण रस्ता सोपा आहे व सरकारीदृष्ट्या सुरक्षित.
पहलगाम येथे बऱ्याच सोयी सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येतात. येथे नियमित लंगर चालवली जातात, तसेच पंडालही असतात.
पहलगाम येथुन निघल्यावर पहिला मुक्काम चंदनबावडी येथे असतो. तेथे रहावयास कॅम्प लावला जातो. दुसऱ्या दिवशी पिस्सु कि बाडी येथे भाविक पोचतात. पिस्सु कि बाडी ते शेषनाग हा पुढिल टप्पा कठिण व खडतर आहे. शेषनाग येथे आजही शेषनागाचे अधिवास आहे असे मानले जाते.
पुढिल टप्पा शेषनाग ते पंचतरणी दरम्यान असतो. हे ठिकाण समुद्र सपाटी पासुन १३ हजार फुटापेक्षा जास्त उंचीवर आहे. या टप्यात ऑक्सिजनची कमतरता भासते.
पंचतरणी पासुन अमरनाथ गुफा फक्त आठ किमी अंतरावर आहे. पंचतरणी पर्यत हेलिकोप्टरची सुविधा देखील देण्यात येते. शेवटी एकदा का बाबा बर्फानी चे दर्शन घेतले कि सर्व क्षीण निघून जातो.
दहशतवाद्यांपासुन नेहमी या यात्रेला धोका असतो. सन १९९१ ते १९९५ या कालावधी दरम्यान अमरनाथ यात्रा दहशतवादी कारवाई मुळे बंद होती.
सन १९९६ साली दहशतवादी गटाने यात्रेमध्ये हस्तक्षेप करणार नाही असा विश्वास दिला. त्यानंतर अमरनाथ यात्रा परत चालू करण्यात आली.
सन २००० साली दहशतवादी गटाने विश्वासाला तडा देत यात्रेकरूवंर हल्ला केला. या हल्या दरम्यान ३० यात्रेकरु मृत्यूमुखी पडले आणि १० जुलै २०१७ रोजी परत एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात ७ भाविक मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच बऱ्याच वेळा यात्रे वर हल्ला करण्याच्या धमक्याही देण्यात येतात.
सन २००८ साली भारत सरकार व जम्मु -कश्मिर राज्य सरकार यांनी मिळून करार केला. करारा अंतर्गत श्री अमरनाथ श्राईन बोर्ड यांना १०० एकर जमिन तात्पुरत्या स्वरुपात भक्तांच्या निवास व इतर सोईसाठी देण्याचे ठरवले.
पण विभक्तवादी गटाने त्यांना स्पष्ट नकार देवून कलम ३७० चे स्मरण करुन दिले.
या अंतर्गत कोणत्याही भारतीय नागरिकाला जम्मु व कश्मिर मध्ये रहता येत नाही, तसेच जमिन घेण्याचा अधिकारही त्यांना नाही. विभक्तवाद्यांनी संपुर्ण राज्यात सरकार विरोधात निदर्शने केली. त्यामुळे सरकारने हा प्रस्ताव थंड बासनात गुंडाळला.
खुप मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला जात असल्यामुळे तेथिल जैविक विविधता धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने भाविकांना ठराविक कलावधी, सामान घेवून जाण्याची अट घातली आहे.
अशी ही यात्रा प्रत्येक हिंदू धर्मियाने एकदा तरी करावीच. ज्यातून मानसिक समाधान तर मिळतेच, पण आसपासचा निसर्ग देखील कधीही न दिलेला अवर्णीय अनुभव पदरी पाडतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.