Site icon InMarathi

प्लास्टिक कॅफे : ह्या हॉटेलमध्ये मनसोक्त हादडा आणि पैशांऐवजी प्लास्टिक द्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पर्यावरणासाठी प्लास्टिक किती घातक आहे हे आजवर कितीतरी वेळा समोर आलेलं आहे. त्याच्या विरोधात सरकारने बरेच निर्बंध घातले, दंड ठोठावले. पण अजूनही लोक म्हणावे तसे जागृत झालेले दिसत नाहीत. आजही लोक प्लास्टिकच्या कॅरी बॅग वापरताना दिसतात.

गटारीत कितीतरी प्लास्टिकच्या पिशव्या तुंबलेल्या दिसतात. गायी-म्हशी यासारखे प्राणी चारा खरकटे पदार्थ खाताना त्यासोबत असलेल्या प्लास्टिक पिशव्या पोटात जाऊन मृत्युमुखी पडलेल्या गोष्टी पण आपली कानावर आल्या असतीलच.

 

 

कापडी पिशव्या वापर अशी हाक पर्यावरणप्रेमी देताना दिसतात. पण लोक त्याकडे फारसे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. पण अशाही वातावरणात काही लोक आहेत जे पर्यावरणपूरक विधायक कामे करत आहेत.

जुनागढ येथे एक कॅफे अशाच अभिनव संकल्पनेतून उभारला आहे. तिथे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी एक अभिनव कल्पना राबवली आहे. या कॅफेचं नावच प्राकृतिक प्लास्टिक कॅफे असं ठेवलं आहे.

भारतात उद्या १ जुलै पासून सिंगल यूज प्लास्टिक संपूर्णपणे बंद केले जाणार आहे. इतके वाढलेले प्रदूषण पाहून सरकारने आता कसलीही सवलत द्यायला नकार दिला आहे. आपण नीट पहा, आपल्या भोवती आपण किती प्लास्टिक वापरतो.

रोजच्या जीवनात प्लास्टिकचे चमचे, डिश, टेबल. अक्षरश: प्लास्टिक सर्वव्यापी झाले आहे. आणि प्रदुषणाच्या दृष्टीने तर ही जागतिक समस्या झाली आहे. यावर उपाय कुणाकडेही नाही.

एकतर प्लास्टीकचं विघटन होत नाही. ते वर्षानुवर्षे जमिनीत आहे त्या अवस्थेत राहू शकतं. त्याने होणारे प्रदूषण हे अपरिमित आहे. पण तरीही काही लोक असे आहेत की, जे धरतीला या प्लास्टिकच्या भास्मासुरापासून वाचवू इच्छितात.

जुनागढ येथील हा अभिनव कॅफे याच उद्देशाने उभारला आहे. त्याचं नावही अनोखं आहे. प्राकृतिक प्लास्टिक कॅफे. या कॅफेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कसल्याही प्रकारचे प्लास्टिक वापरले जात नाही. आणि लोकांनाही प्लास्टिक वापरू नका असा सल्ला दिला जातो. म्हणजे आधी केले मग सांगितले ही उक्ती येथे अगदी लागू पडते.

 

 

या कॅफेची दुसरी खासियत म्हणजे इथे फक्त सेंद्रिय उत्पादनापासून बनवलेले पदार्थच तयार केले जातात. स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेला सेंद्रिय भाजीपाला वापरूनच येथे पदार्थ तयार करतात.

या कॅफेने स्थानिक शेतकऱ्यांसोबत करार केला आहे. त्यामुळे ते आपली उत्पादने या कॅफेसाठी देणार आहेत. या कॅफेचं उद्घाटन लवकरच होणार आहे.

जुनागढमधील लोक जेव्हा या कॅफेमध्ये जातील तेव्हा खिशात पैसे नाही लागणार, घरातील प्लास्टिकचा कचरा गोळा करून न्यायचा आहे,आणि त्याच्याबदल्यात आपल्या आवडीचे पदार्थ खाऊ शकणार आहेत.

येथील स्थानिक प्रशासनाने पण या कॅफेचं बांधकाम करण्यासाठी खूप मोठी मदत केली आहे.या कॅफेमध्ये ५०० ग्राम प्लास्टिक दिले की त्याबदल्यात १ ग्लास लिंबू सरबत किंवा १ ग्लास लिंबू पाणी दिले जाईल. आणि १ किलो प्लास्टिकच्या बदल्यात १ प्लेट ढोकळा किंवा १ प्लेट पोहे दिले जाणार आहेत.

 

याचबरोबर या कॅफेमध्ये काठीयावाडी आणि गुजराती मेनू पण मिळणार आहेत. तुम्ही जितकं जास्त प्लास्टिक आणाल तेवढे जास्त पदार्थ तुम्हाला मिळणार आहेत. आज ३० जून रोजी जुनागढचे जिल्हाधिकारी या प्राकृतिक प्लास्टिक कॅफेचं उद्घाटन करणार आहेत.

याच बरोबर या प्रशासनाने एका एजन्सी नेमली आहे जी हा प्लास्टिकचा कचरा गोळा करणार आहे आणि त्याची नीट विल्हेवाट लावणार आहे. भारतातील हा काही पहिलाच कॅफे नाही. दिल्लीमधील नजफगड, आणि छत्तीसगड येथे पण असे कॅफे आहेत जिथे असा प्लास्टिकचा कचरा खरेदी केला जातो.

किती चांगली कल्पना आहे. प्लास्टिकमुक्त वसुंधरा हे केवळ स्वप्न राहणार नाही. अशा अभिनव कल्पना राबवल्या तर आपलं आयुष्य पण प्रदूषणमुक्त व्हायला हरकत नाही. नाही का?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version