Site icon InMarathi

रिल्समधून जगभरात धुमाकूळ घालणारं हे गाणं भारत-पाक मधली कटुता दूर करतंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी भारताकडून आजवर असंख्य प्रयत्न करण्यात आले आहेत. पाकिस्तानी गायक, अभिनेत्यांना भारतात आपली कला सादर करण्यासाठी मुभा देणं हे त्याचं एक उदाहरण म्हणता येईल.

‘समझौता एक्सप्रेस’ ही ट्रेन सुरू करणे, बॉर्डर सारख्या सिनेमातून “मेरे भाई, मेरे हमराही…” या शब्दांची गाणे प्रदर्शित होऊ देणे, पाकिस्तानी क्रिकेटरला सुरुवातीच्या आयपीएल मध्ये खेळू देणे अशा कित्येक प्रसंगातून भारताने मैत्रीचा हात पुढे केला होता. पण, कुत्र्याचं शेपूट जसं नेहमी वाकडंच असतं तसं पाकिस्तानने आपलं धोरण ठेवलं आणि स्वतःची आर्थिक अधोगती करवून घेतली आहे, ज्याचं नुकसान कित्येक पाकिस्तानी खेळाडू, कलाकारांना झालं, होत आहे.

‘कोका कोला’ या कंपनीने जगातील सर्व संगीतप्रेमी देशांमध्ये ‘कोक स्टुडिओ’ या कार्यक्रमाची काही वर्षांपूर्वी सुरुवात केली, ज्यामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश होता. आज ‘कोक स्टुडिओ’ हा पाकिस्तानी टीव्हीवर सर्वात जास्त काळ चाललेल्या संगीत कार्यक्रमांपैकी एक आहे.

 

 

‘कोक स्टुडिओ’ या संगीत कार्यक्रमात कंपनीने स्थानिक कलाकारांना आपली कला जगासमोर सादर करण्याची संधी निर्माण करून दिली आहे. ‘कोक स्टुडिओ’ या कार्यक्रमात सुफी, कवाली, लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत असे विविध गाण्यांचे प्रकार सादर होत असल्याने त्याची लोकप्रियता भारतात सुद्धा वाढत आहे.

‘कोक स्टुडिओ पाकिस्तान’ला भारतातून मिळणाऱ्या प्रतिसादाचं आश्चर्य वाटत आहे. कोका कोला कंपनीने ‘कोक स्टुडियो भारत’ हा संगीत कार्यक्रम सुद्धा सुरू केला पण, त्या कार्यक्रमापेक्षा ‘कोक स्टुडिओ पाकिस्तान’ची लोकप्रियता भारतात अधिक असल्याचं आकडे सांगत आहेत.

‘कोक स्टुडिओ’ या कार्यक्रमात सादर करण्यात आलेलं ‘पसुरी’ नावाचं पाकिस्तानी गायकांचं गाणं सध्या इंटरनेटवर चांगलंच गाजत आहे. या गाण्यात ओडिसी नृत्य करणारी एक स्त्री कलाकार आपली कला सादर करत आहे आणि गायक अली सेठी आणि शय गिल हे त्यांच्या शब्दातून दोन देशांमधील अंतर कमी व्हावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत.

‘कोक स्टुडिओज’च्या पुढाकाराने तयार करण्यात आलेलं हे व्हिडिओ गीत सध्या भारतात लोकप्रिय होत आहे असं युट्युबच्या लाईक्सचे आकडे सांगत आहेत. भारतीय लोकसंगीताची ट्यून असलेलं आणि शास्त्रीय संगीताचा बाज असलेलं हे गाणं ‘पसुरी’ या पंजाबी शब्दाने तयार करण्यात आलं आहे.

‘पसुरी’ या शब्दाचा अर्थ ‘अवघडलेली’ किंवा ‘वादग्रस्त, तणावग्रस्त’ परिस्थिती असा होतो. दोन संस्कृतींमध्ये अडकलेल्या दोन प्रेमींची व्यथा या गाण्यात मांडण्यात आली आहे. त्यांच्या नात्यांमधील गोडवा आणि तक्रार एकाचवेळी सांगण्याचा प्रयत्न केल्याचं युट्युबवरील भाषांतर करणाऱ्या ‘सबटायटल्स’ मधून प्रतीत होतो.

 

 

भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगातील कोणत्याही दोन वेगवेगळ्या देशात रहाणाऱ्या प्रेमींची व्यथा व्यक्त होण्यासाठी हे शब्द साजेसे आहेत हे गाणं इतकं लोकप्रिय होण्यामागचं कारण सांगितलं जात आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये युट्युबवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या गाण्याला ४० लाखांपेक्षा अधिक भारतीय लोकांनी लाईक केलं आहे. अमितव घोष या ६५ वर्षीय भारतीय लेखकाने सर्वप्रथम या गाण्याची लिंक ट्विट केली आणि त्यांनी गायक अली सेठीचं कौतुक केलं. अमितव घोष यांनी आपल्या ट्विट मधून अली सेठी यांच्या ‘जंगलनामा’ या गाण्याच्या अल्बमचं सुद्धा कौतुक केलं आहे.

अमितव घोष यांनी आपल्या ट्विट सोबत ‘न्यूयॉर्कर’ या अमेरिकन वेबपोर्टलची लिंक सुद्धा दिली आहे ज्यामध्ये “भारत आणि पाकिस्तान मधील अंतर कमी करणारं गाणं” असा ‘पसुरी’ या गाण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

कोणतंही गाणं, सिनेमा खरंच लोकप्रिय आहे की नाही? हे सोशल मीडियावरून लगेच लक्षात येऊ शकतं. इन्स्टाग्रामवर ‘पसुरी’ या गाण्याचं पार्श्वसंगीत असलेल्या कित्येक रिल्स सध्या बघायला मिळत आहेत हीच त्याच्या लोकप्रियतेची पावती म्हणावी लागेल.

या रिल्स बनवणाऱ्या लोकांमध्ये केवळ भारतीय तरुणाई नसून त्यामध्ये ‘शिल्पा शेट्टी’ सारख्या सेलिब्रिटिंचा सुद्धा समावेश आहे. एका ‘डिझायनर आउटफिट’चं प्रमोशन करण्यासाठी शिल्पा शेट्टीमध्ये रॅम्पवर चालली होती.

 

 

या ‘रॅम्पवॉक’ची २० सेकंदांची रिल अपलोड करण्यात आली होती ज्यामध्ये शिल्पा शेट्टीने गायक अली सेठी आणि शय गिल यांचे आभार देखील मानले आहेत.

बॉलीवूडच्या इतर सेलेब्रिटींपैकी भूमी पेडणेकर, तेजस्विनी प्रकाश, रीया चक्रवर्ती यांनी सुद्धा ‘पसुरी’च्या गाण्याच्या रिल बनवत त्यांना अजून लोकप्रिय केलं आहे. या आधी अशी लोकप्रियता पाकिस्तानी गायक दानानिर मोबीन याच्या ‘पावरी हो रही है’ या गाण्याला मिळाली होती.

मिम्स, रिल्स तयार करणाऱ्या कित्येक भारतीय कलाकारांनी या गाण्याचा वापर करून आपल्या लाईक्सची संख्या वाढवली होती.

‘गुलाम अली’, ‘नुसरत फतेह अली खान’, ‘आबिदा परवीन’ सारख्या पाकिस्तानी गायकांना भारतीय रसिकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे. तसंच, भारतीय कलाकारांवर पाकिस्तानी प्रेक्षक हे देखील भरपुर प्रेम करतात.

 

 

पाकिस्तानी टीव्ही सिरियल्स देखील भारतात आवडीने बघितले जातात ही वस्तुस्थिती आहे. पण, इतकं सांस्कृतिक ‘आदान प्रदान’ होत असून देखील पाकिस्तानी कलाकारांची त्यांच्या राजकीय नेतृत्वाला काहीच कदर नसल्याने दोन्ही देशांतील संबंधात कोणतीही सुधारणा नाहीये हे देखील वास्तव आहे.

‘पसुरी’ गाण्यामुळे जर हे अंतर खरंच कमी होणार असेल आणि पाकिस्तानी दहशतवादी कारवाया कमी होणार असतील तर त्याचं कौतुकच असेल. हे होण्याची शक्यता किती आहे? याचं उत्तर येणारा काळच देईल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version