Site icon InMarathi

शिवरायांच्या “पहिल्या” गडाबद्दल पसरलेल्या भयानक आख्यायिका आजही शत्रूच्या मनात धडकी भरवतील!

torna fort featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्राचं खरं वैभव म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काबिज केलेले आणि डागडुजी करून बांधलेले भक्कम गड-किल्ले. आज याच किल्ल्यांवर आपण सगळेच पावसाळ्यातला पहिला ट्रेक आवर्जून करायला जातो.

हे गडकिल्लेच आपला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आणि आपणच ते जपलंच पाहिजे, पण अशाच एका किल्ल्याविषयी काही विचित्र आख्यायिका प्रचलित आहेत. त्या ऐकून आपल्याच काय राज्याच्या शत्रूच्या मनातसुद्धा धडकी भरेल. तो लोकप्रिय गड नेमका कोणता? या आख्यायिका किंवा गूढकथांमागचं सत्य आणि तथ्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

मिसळ, तुळशी बाग आणि पुणेरी बाणा या तीन गोष्टींव्यतिरिक्त पुणेकरांना आणखीन एक वरदान लाभलंय ते सह्याद्री पर्वतरांगा! त्यामुळे पुण्याच्या आसपास तुम्हाला बरेच किल्ले गड आहेत. महाराजांच्या काळातले कित्येक किल्ले पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत.

 

 

त्यापैकीच एक विशाल गड ज्याला महाराजांनी ‘प्रचंडगड’ हे नाव दिलं होतं आणि नंतर तो तोरणा गड या नावाने ओळखला जाऊ लागला. याच तोरणा गडाविषयी काही गूढकथा आपण ऐकल्या असतील, हा किल्ला म्हणे haunted आहे, चला तर जाणून घेऊया यामागचं तथ्य!

गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा तोरणा हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला एक मोठा किल्ला आहे. शिवाय रायगड, राजगड आणि तोरणा हे तीनही किल्ले एकाच पर्वतरांगेत असल्याने एका किल्ल्यावरून इतर २ गड आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतात.

हा किल्ला स्वराज्याचा शिलेदार म्हणूनही ओळखला जातो. इ स १६४७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून तो मराठा साम्राज्यात सामील करून घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणूनच या किल्ल्याला प्रचंड महत्व आहे.

हा किल्ल्या कुणाचा होता, कुणी बांधला याची नोंद तुम्हाला इतिहासात आढळणं जरा कठीणच आहे पण एकंदरच या किल्ल्यावर सापडलेले अवशेष आणि मंदिरं पाहता शैवपंथीयांचं या किल्ल्यावर अस्तित्व होतं असं म्हंटलं जातं!

निजामाकडून महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि आपल्या साम्राज्यात सामील करून घेतला. किल्ल्याचे बांधकाम करतेवेळी त्यावेळी सोन्याच्या मोहरांचे २२ हंडे सापडले होते शिवाय हा किल्ला बांधण्यासाठी महाराजांनी तब्बल ५ हजार होन खर्च केले होते असंही म्हंटलं जातं.

 

commons.wikimedia.org

 

तोरणावर झुंजार माची, मेंगाई मंदिर, तोरंजाई देवी मंदिर, बुरूज, बालेकिल्ला हे सगळं फिरायला जवळपास ३-४ तास लागतात.

बहुतेककरून जे ट्रेकर्स असतात ते तोरणावर दिवसाउजेडी यायचाच प्लॅन करतात. तोरणावर सहसा कुणीच रात्रीच्या मुक्कामासाठी येत नाही असं म्हंटलं जातं. पण काही लोकांनी तोरणावर रात्री राहिल्यावर त्यांना जे अनुभव आले ते इंटरनेटवर शेयर केले आणि त्यामुळेच कदाचित या किल्ल्याविषयी काही गूढ आणि दंतकथा प्रसिद्ध आहेत.

“गडावरील मंदिरात रात्री मुक्काम केलात, तर रात्री किंवा मध्यरात्रीच्या सुमारास दरवाज्यावर थाप पडण्याचे आवाज ऐकू येतात आणि हळूहळू तो आवाज खूप वाढतो, शिवाय एका म्हाताऱ्या बाईचासुद्धा आवाज ऐकू येतो जी आतल्या माणसांना नावाने हाक मारते आणि खायला मागते!” असा काही ट्रेकर्सचा अनुभव आहे आणि त्यांनी तो इंटरनेटवरदेखील मांडला आहे.

इतकंच नाही तर बहुतांश लोकांनी तोरणावर राहिल्यानंतर हे असे विचित्र अनुभव शेयर केले आहेत जे आपण इथे वाचू शकता!

 

 

अर्थात यामागे काहीच तथ्य नाही असं कित्येक इतिहासकारांचं म्हणणं आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील काही खोडसाळ व्यक्तीच हे सगळं करतात असंच लोकांचं म्हणणं आहे.

शिवाय रायगड किंवा राजगडावरून अमावस्येच्या  रात्री एक मशाल तोरणा किल्ल्याच्या भोवती फिरताना दिसते असाही काही लोकांना अनुभव आला आहे. पण यामागेसुद्धा काहीच तर्क नाही. काहींच्या मते ते गावकरीच आहेत जे अंधारात दिवे घेऊन फिरतात किंवा त्याला काही लोकं वेतोबाप्रमाणे किल्ल्याचा राखणदारही मानतात जो कधीच कोणाला दगाफटका करत नाही.

तसं बघायला गेलं तर या सगळ्या सांगीवांगी गोष्टी आहेत, आजवर कोणत्याही इतिहासकाराने या गोष्टी कधीच खोडून काढलेल्या नाहीत किंवा या सगळ्या गोष्टी खरंच घडतात असंही सांगितलेलं नाही.

जी लोकं रात्री तोरणावर राहिले त्यापैकी काही एक्का दुक्का लोकांनी सांगितलेले हे प्रसंगच आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. बाकी या गूढकथांमागे काहीच तथ्य नाही हे आभाळा इतकं स्वच्छ आहे.

अर्थात तोरणा हा गड फार मोठा आहे आणि महाकाय आहे, त्यामुळे रात्रीच्या काळोखात कोणाला काही भास झाले असतील किंवा कोणाला खरंच तसे अनुभव आले असतील हे देखील आपण मान्य करू शकतो, पण जोवर ही गोष्ट सिद्ध होत नाही तोवर या कानगोष्टींकडे दुर्लक्षच केलेलं बरं!

 

 

एकाअर्थी या गूढकथा प्रचलित असल्याचा आणखीन एक फायदा तो असा की, राष्ट्राचं अहित चिंतणाऱ्या गनिमाचीसुद्धा आपल्या या भव्य गडांकडे नजर उचलून बघायची हिंमत होणार नाही!

त्यामुळे मित्रहो तुम्हीसुद्धा तोरणावर जायचा बेत करत असाल किंवा गेला असाल तर या गूढकथा जास्त मनावर घेऊ नका, आणि एकच म्हण लक्षात ठेवा ती म्हणजे “भीत्यापाठी ब्रह्मराक्षस”!

आपल्यापाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद आहेत त्यामुळे बिनधास्त फिरा आणि आपल्या राजाच्या इतिहासाविषयी, शौर्याविषयी अभिमान बाळगा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version