लोकांनी “India is Nothing” म्हणत हिणवलं आणि मिल्खा सिंग यांनी विजयातून सणसणीत उत्तर दिलं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तो १५ भावंडांपैकी एक होता. फाळणीपूर्वी त्याने आपल्या ८ भावंडांना गमावले होते. फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचारात त्याने आपले आई-वडील, एक भाऊ आणि दोन बहिणी आपल्यासमोर जळताना पाहिले. तो अनाथ झाला आणि नंतर कायमचा भारतात आला इथून त्याचा नवा प्रवास सुरू झाला.
फाळणीच्या वेळी पाकिस्तानात समाविष्ट झालेले पूर्व पंजाबातील, राजस्थानच्या सीमेजवळचे, मुझफ्फरगढ जिल्ह्यातील, गोविंदपुर तालुक्यातील ‘कोट अड्डू’ हे लहानसे खेडेगाव त्याचे जन्मगाव होते. या गावातल्या एका शीख कुटुंबात, दि. २० नोव्हेंबर, १९२९ रोजी त्याचा जन्म झाला.फाळणीच्या वेळी उसळलेल्या धार्मिक दंगलीत त्याचे वृद्ध आई-वडील दंगेखोर जल्लादांच्या तलवारींचे बळी ठरले.
पाकिस्तान समर्थक धर्मांध दंगेखोर, कसायाच्या निष्ठुरतेने, धारदार तलवारी परजत, ज्या क्षणी त्यांच्या दारी येऊन थडकले होते, त्याक्षणी मिल्खा सिंग यांच्या वडिलांनी, आपल्या मुलाचा जीव वाचावा या उद्देशाने “भाग, मिल्खा भाग…” अशी आर्त किंकाळी फोडली आणि ती कानी पडताच, १७-१८ वर्षांचे मिल्खा सिंग सैरभैर होऊन वार्याच्या वेगाने घरातून दूरवर पळाले आणि झाडाझुडपांतून लपतछपत सरतेशेवटी भारताकडे धाव घेणार्या निर्वासितांच्या एका जथ्थ्यात मिसळून रेल्वेने थेट दिल्लीला येऊन पोहोचले.
आपल्या वडिलांची ती अखेरची आर्त किंकाळी मिल्खा सिंग यांच्या स्मरणात कायमची बसली आणि म्हणूनच रूपेरी पडद्यावर सादर झालेल्या त्यांच्या जीवनावरच्या चित्रपटाला, ‘भाग, मिल्खा भाग…’ असे शीर्षक दिले गेले. सदैव संघर्षाने भरलेल्या आयुष्याचा सामना करण्याचे धैर्य त्यांना अॅथलेटिक्सनेच दिले आहे असे ते नेहमी म्हणत असत.
तीन वेळा चाचणी परीक्षेत अयशस्वी झाल्यावरही चौथ्या वेळी उत्तीर्ण होवून १९५१ साली मिल्खा सिंग हे सिकंदराबाद येथे लष्करात भरती झाले. त्यांना आर्मीच्या मेसमध्ये काम देण्यात आले. मेसमध्ये काम करत असताना त्यांना धावण्याचा सराव करायची भरपूर संधी मिळाली.
लष्कराने विविध ठिकाणी आयोजित केलेल्या धावण्याच्या अनेक स्पर्धांमधून ते चमकू लागले. पतियाळा येथे लष्कराने आयोजित केलेल्या ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत त्यांनी भाग घेतला. ते अंतर त्यांनी अवघ्या ४७.९ सेकंदांच्या विक्रमी वेळेत पार करून सर्वांनाच चकित केले.
लष्कराच्या शिफारसीमुळे मिल्खा सिंग यांना १९५६ साली ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न शहरात झालेल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये ४०० मीटर्स धावण्याच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
या स्पर्धेत ५० हून अधिक देशांचे सुमारे १०० धावपटू सहभागी झाले होते.भारताचे प्रतिनिधित्व करत असलेले मिल्खा सिंग हे प्राथमिक स्पर्धेत ४०० मीटर्स अंतर ४८.९ सेकंदात पार करून त्यांच्या गटात चौथा क्रमांकावर आले. त्यामुळे ते कुठल्याच उप उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले नाहीत.
तरी त्यांनी आपले हे अपयश भविष्यातल्या आपल्या भव्य यशाची पहिली पायरी आहे, असा विचार केला आणि अंतिम स्पर्धा संपताक्षणी या ‘ऑलिम्पिक’मध्ये ४०० मीटर्स अंतर ४६.७ सेकंदात धावून सुवर्णपद मिळवलेल्या चार्ल्स जेनकिन्स या अमेरिकेच्या धावपटूंची भेट घेतली आणि त्यांच्याच तोंडून त्यांच्या यशाची नेमकी कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या मौल्यवान सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचा दृढनिश्चय करून मिल्खा भारतात परतले.
ओडिशाची तत्कालीन राजधानी कटक येथे १९५८ साली राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा झाल्या. त्यांत मिल्खा यांनी २०० मीटर्स आणि ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतींमध्ये सुवर्ण पदके मिळवून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
दर चार वर्षांनी होणार्या कॉमनवेल्थ गेम्स ‘कार्डिफ’, वेल्स येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. भारताकडून या खेळांमध्ये मिल्खा सिंगचा ही समावेश होता. या खेळांमधील ४०० मीटर शर्यतीपूर्वी मिल्खा सिंग हे नाव जगाला अपरिचित होते, पण या शर्यतीच्या शेवटी मिल्खा सिंग यांचा प्रवास सुरू झाला ज्यामुळे ते ‘फ्लाइंग शीख’ बनले.
पंजाबच्या या ‘गंवार’ दिसणाऱ्या मुलाने योग्य प्रशिक्षण न घेता दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मानल्या जाणाऱ्या माल्कम स्पेन्सला हरवून इतिहास रचला. जिथे ‘INDIA is NOTHING’ असे म्हणून भारतीय खेळाडूंना हिणवले गेले तिथेच मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदक मिळवत भारताचे नाव उंचावले होते.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिल्खा यांनी स्वतंत्र भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांनी त्यावेळचा विश्वविक्रमधारी मॅल्कम स्पेंसचा ४४० यार्डच्या रेसमध्ये पराभव करीत सुवर्णपदक पटकावले होते.
या घटनेची आठवण सांगताना मिल्खा सिंग म्हणाले होते की “त्या दिवसाच्या आदल्या रात्री मी झोपू शकलो नव्हतो. दुसऱ्या दिवशी ४४० यार्डची अंतिम रेस ४ वाजता होती. सकाळी मी आपल्या स्नायूंना विश्रांती देण्यासाठी टबमध्ये गरम पाण्याने अंघोळ केली, नाश्ता केला आणि ब्लँकेट घेऊन झोपण्यासाठी गेलो. १ वाजता मी भांग केला आणि आपल्या लांब केसांना पांढऱ्या रुमालाने कव्हर केले. मी माझ्या बॅगमध्ये आपले स्पाइक्ड बूट, एक लहान टॉवेल, एक कंगवा आणि ग्लुकोजचे एक पॉकेट ठेवले.
त्यानंतर मी ट्रॅकसूट घातला आणि डोळे बंद करीत गुरु नानक, गुरु गोविंद सिंग आणि शिवाचे स्मरण केले. बसमध्ये मी आपल्या सीटवर बसलो त्यावेळी माझ्या सहकाऱ्यांनी गंमत केली की मिल्खा सिंग आज ‘ऑफकलर’ वाटत आहे. मला नाराज बघून कोच डॉक्टर हॉवर्ड माझ्या बाजूला येऊन बसले व म्हणाले की, आजची शर्यत तुला तारेल किंवा नेस्तनाबूत करेल.
—
- ऑलिम्पिक बघा किंवा नका बघू; या ८ स्पोर्ट्स मुव्ही नक्की बघा!!
- पायातले बूट चोरीला गेले तरीही गोल्ड मेडल मिळवणाऱ्या जिद्दी पठ्ठ्याची कथा
—
जर तू माझ्या टीप्स अंगिकारल्या तर तू माल्कम स्पेंसला हरवशील. तुझ्यात ती क्षमता आहे. इंग्लंडचा साल्सबरी पहिल्या लेनमध्ये होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्पेंस, ऑस्ट्रेलियाचा केर, जमैकाचा गास्पर, कॅनडाचा टोबॅको आणि सहाव्या लेनमध्ये मी होतो. गोळीचा आवाज कानावर पडताच मी पळालो.”
हॉवर्ड यांच्या टिप्स कानात गुंजत होत्या. सुरुवातीला ३०० मीटर्समध्ये मी सर्वकाही झोकून दिले. स्पेंसने त्याच्यापुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण नशिबाची साथ मला लाभली. मी पांढरी पट्टी केवळ शर्यंत संपण्यास ५० मीटर शिल्लक असताना बघितली. ज्यावेळी मी पट्टीला स्पर्श केला त्यावेळी स्पेंस माझ्यापेक्षा अर्धा फूट मागे होता. इंग्रज पूर्ण ताकदीने ओरडत होते ‘रन ऑन मिल्खा, कम ऑन मिल्खा’ पट्टीला स्पर्श करताच मी मैदानावर बेशुद्ध पडलो.‘
ती शर्यत संपताच मिल्खा सिंग यांना स्ट्रेचरवरून डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथे त्यांना ऑक्सिजन देण्यात आला. त्यानंतर त्यांना शुद्ध आली. त्यावेळी त्यांना, आपण मोठी कामगिरी केल्याची कल्पना आली. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खांद्यावर घेतले आणि तिरंगा त्यांच्या अंगाला गुंडाळत पूर्ण स्टेडियमला रपेट मारली.
ज्यावेळी इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांनी मिल्खा सिंग यांच्या गळ्यात सुवर्णपदक घातले त्यावेळी भारतीय तिरंगा आसमानत जाताना पाहून त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे आणि आनंदाचे अश्रू तरळले होते.
आपल्या मुलीच्या मदतीने लिहून प्रसिद्ध केलेल्या ‘द रेस ऑफ माय लाईफ’ या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या आधारे तयार झालेला ‘भाग, मिल्खा भाग…’ हा हिंदी चित्रपट भारतातच नव्हे, तर इतर अनेक देशांत लोकप्रिय ठरला. या चित्रपटाचे मूळ कथालेखक म्हणून मिल्खा सिंग यांनी नाममात्र एक रुपया मानधन घेतले होते.
मिल्खा सिंग हे भारतासाठी अभिमान होते. देश-विदेशातल्या धावपटूंसाठी ते एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक होते. ‘फिल्ड अॅण्ड ट्रॅक स्पोर्ट्स’च्या विश्वातले ते हिमालयाच्या उंचीचे ‘अॅथलेट’ होते.
यामुळेच की काय , पद्मश्री, खेलरत्न आणि जीवन-गौरव पुरस्काराने सन्मानित मिल्खा सिंग यांनी आपल्या ‘फ्लाइंग सिख’ या नावाला जगत केलेले विक्रम आजही अबाधित राहिले आहेत.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.