Site icon InMarathi

जातीवरून घडलेला हा घृणास्पद प्रसंग वाचल्यानंतर माणुसकी शिल्लक आहे का? हा प्रश्न पडेल

zomato im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जात, धर्म, वर्ण, लिंग या कशावरूनही कुणाहीमध्ये भेदभाव करू नये असं आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय. हे पुस्तकांमधून वाचत आपण मोठे झालोय. पण प्रत्यक्षातली परिस्थिती किती वेगळी आहे याची कल्पना वारंवार आपल्याला येत असते.

जाती, धर्माच्या द्वेषापायी कितीतरी भीषण घटना घडत असतात आणि ज्यांची काहीच चूक नसते असे अनेकजण या घटनांचे नाहक बळी ठरतात. माणूस जन्माला येतो तो केवळ माणूस म्हणून! आपण कुठल्या जातीत जन्माला येऊ हे त्याच्या हातात नसतं.

केवळ मोठ्या स्तरावरच नाही तर अगदी दैनंदिन आयुष्यातही जातीवरून भेदभाव केले जाण्याचे अनुभव लोकांना येत असतात. पण एखाद्या तथाकथित कनिष्ठ जातीच्या डिलिव्हरी बॉय संपर्कात आल्यामुळे एखाद्या व्यक्तीने तिच्याकडून काहीही घेणं अस्पृश्य मानल्याचं, इतकंच नाही तर त्या व्यक्तीला चक्क मारहाण केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय?

आजच्या काळातही अशी घटना घडली असेल यावर चटकन आपला विश्वास बसणार नाही. पण लखनौ मधल्या एका डिलिव्हरी बॉयच्या बाततीत हाच लज्जास्पद प्रकार घडलाय. अजय सिंग नावाच्या व्यक्तीने झोमॅटोवर फूड ऑर्डर केली होती.

 

 

विनीत कुमार रावत हा फूड डिलिव्हरी बॉय अजय यांच्या घरी ऑर्डर घेऊन आला तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयला अजय यांनी त्याची जात विचारली. त्यानंतर जो प्रकार घडला तो कळल्यावर खरंच माणूसकी शिल्लक आहे का असं प्रश्न आपल्याला पडेल. काय आहे ही घटना? जाणून घेऊ.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधल्या आशियना येथे राहणारे विनीत कुमार रावत हे एसी टेक्निशियनची नोकरी करतात. त्याचबरोबरीने झोमॅटोची फूड डिलिव्हरीही करतात.

आशियानाच्या सेक्टर ५ मध्ये राहणाऱ्या अजय सिंग यांनी झोमॅटोवर फूड ऑर्डर दिली होती. विनीत ती डिलिव्हरी घेऊन अजय यांच्या घरी गेले तेव्हा अजय यांनी विनीत यांना अचानक त्यांची जातच विचारली. ते दलित आहेत हे कळल्यावर अजय यांनी त्यांचा अपमान करायला सुरुवात केली आणि आपण दलितांच्या हातातून काही घेत नाही असं म्हणत विनीत त्यांनी आणलेलं अन्न घ्यायला नकार दिला.

विनीत यांनी याला विरोध करत एकतर तुम्ही ही ऑर्डर दिली होती ती घ्या नाहीतर ती रद्द करा असं सांगितलं.

विनीत यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या विरोधामुळे चिडलेल्या अजय यांनी विनीत यांच्या तोंडावर आपल्या तोंडातली तंबाखू थुंकण्याचा गलिच्छ प्रकार केला. या कृतीनंतर जेव्हा विनोद यांनी आपला विरोध दर्शवला तेव्हा घरातून आणखी १२ जण आले आणि त्या सगळ्यांनी मिळून विनीत यांना लाठीने मारहाण करायला सुरुवात केली.

 

 

विनीत यांनी तिथून स्वतःचा कसाबसा बचाव केला आणि पोलिसांना फोन करून त्यांना घडलेली सगळी घटना सांगितली. सगळा प्रकार समजल्यावर घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी विनीत यांना त्यांची बाईक परत मिळवून द्यायला मदत केली.

त्यानंतर विनीत यांनी अजय सिंग, अभय सिंग आणि आणखी १२ जणांविरुद्ध आशियाना पोलीस ठाण्यात याचिका नोंदवली ज्यात विनीत यांना जातीवरून शिवीगाळ केल्याची आणि अमानुषपणे मारहाण केल्याची नोंद केली आहे. एससी, एसटी कायदा, हल्ला, बंडखोरी, धमकी अशा बऱ्याच विभागांअंतर्गत या घटनेची नोंद घेतली गेली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी छापे टाकले जात आहेत.

आपल्या समाजात आजही किती खोलवर जातीवाद मूळ धरून आहे याचा प्रत्यय या घटनेतून आपल्याला नव्याने येतो. द्वेष माणसाला कशाप्रकारे पाशवी वर्तन करायला भाग पाडू शकतो हेच यातून दिसलं.

अर्थात सुशिक्षितांमध्येही जातीयवाद संपला नाही ही बाब खेदाचीच म्हणावी लागेल.

 

 

समाजातून जातीयवाद समूळ नष्ट व्हावा म्हणून ज्यांनी आपली सगळी आयुष्यं खर्ची घातली अशा थोरामोठ्यांच्या प्रयत्नांना अद्याप पूर्णतः यश आलेलं नाही, आजही यादृष्टीने जनजागृती होण्याची गरज आहे हेच खरं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version