श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी पाण्यात का बुडाली?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
श्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर जवळपास ३६ वर्षानंतर समुद्रात बुडाली.
द्वारका समुद्रात बुडण्यापूर्वी श्री कृष्णा समवेत संपूर्ण यदुवंश युद्धात मारला गेला. पौराणिक कथांनुसार “यादवी” माजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्णाची नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात.
एक म्हणजे गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि दुसरी म्हणजे ऋषी मुनींनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला दिलेला शाप.
अर्थात, सदर पौराणिक कथा या काही द्वारकेला जलसमाधी मिळाल्याचे सबळ पुरावे मानता येत नाहीत. पण आजही त्या समुद्रात एक शहर आहे, जे अगदीच महाभारतातल्या द्वारकेशी संबंध दर्शवते. संशोधक आजही पाण्यात उड्या घेऊन त्या प्राचीन नगरीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेला एक रिपोर्ट ह्या संदर्भात वाचनीय आहे. इच्छुकांनी इथे क्लिक करून जरूर वाचावा.
असो – तर आपण या कथा सविस्तरपणे जाणून घेऊया.
गांधारीने दिला होता यदुवंशाच्या नाशाचा शाप
महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा युधिष्ठीर पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान होणार होता, तेव्हा गांधारीने महाभारताच्या युद्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवून शाप दिला की,
ज्याप्रकारे कौरवांच्या वंशाचा नाश झाला त्याचप्रकारे यदुवंशाचा सुद्धा नाश होईल.
–
- प्रेमाचं प्रतिक ठरलेल्या कृष्ण-राधेचा विवाह झाला होता का? प्रचलित कथा काय सांगतात?
- या मंदिरात श्रीकृष्णाबरोबर राधा नव्हे तर चक्क मीराची पूजा केली जाते!! वाचा
–
ऋषींनी दिला होता सांबाला शाप
महाभारत युद्धानंतर जेव्हा ३६ वे वर्ष सुरु झाले तेव्हा अनेक वाईट घटना घडू लागल्या आणि द्वारकेत अपशकुनाचे संकेत मिळू लागले. एक दिवस महर्षी विश्वमित्र, कण्व, देवर्षी नारद द्वारकेला गेले. तेव्हा यदु वंशातील राजकुमारांनी त्यांची मस्करी करण्याचे ठरवले.
त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला स्त्री वेशात ऋषींसमोर उभे गेले आणि ऋषींना सांगितले की,
ही स्त्री गर्भवती आहे, हिच्या गर्भातून काय उत्पन्न होईल ?
सर्व ऋषींच्या जेव्हा लक्षात आले की हे तरुण आपला अपमान करत आहेत, तेव्हा त्यांनी क्रोधीत होऊन शाप दिला की,
–
- आजही श्रीकृष्ण इथे करतो रासलीला… वृंदावनातील एका अद्भुत जागेचं रहस्य!
- कृष्णाच्या खट्याळपणामुळे आजही मथुरेमधील पुरुषांना लाठ्या खाव्या लागतात
–
श्रीकृष्णाचा हा मुलगा वृष्णी आणि अंधक वंशाच्या पुरुषांचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ निर्माण करेल. त्याच कारणाने तुमच्यासारखे क्रूर आणि क्रोधी लोक स्वत:च स्वत:च्या संपूर्ण कुळाला नष्ट कराल. त्या मुसळाच्या प्रभावाने फक्त श्रीकृष्ण आणि बलराम वाचतील.
श्रीकृष्णला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खात्री होती की हा शाप खरा ठरणार.
ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्याच दिवशी मुसळ निर्माण केला. जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला समजली तेव्हा त्यांने त्या मुसळाचा चुरा करून तो समुद्रात फेकून दिला. त्यानंतर द्वारकेमध्ये भयंकर अपशकुन होऊ लागले. प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागली.
नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की, रस्त्यावर माणसांपेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले. ते रात्री झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे कुरडतडून खात असत. गायींच्या पोटातून गाढव, कुत्रींच्या पोटातून बोका आणि मुंगुसांच्या गर्भातून उंदीर जन्माला येऊ लागले.
श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपशकुन बघितले, तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवींचा शाप खरा होण्याची वेळ समीप आली आहे.
हे सर्व अपशकून आणि सोबतच चालू पक्षाच्या तेराव्या दिवशी असणारा अमावस्येचा योग अगदी महाभारताच्या युद्धाच्या वेळी असलेल्या क्षणासारखा होता.
गांधारीचा शाप अटळ आहे हे लक्षात आल्यावर श्रीकृष्णाने द्वारकेतील यदुवंशीयांना प्रभास तीर्थावर जाण्याची आज्ञा दिली. श्रीकृष्णाच्या आज्ञेचा मन राखून सगळे राजवंशी समुद्र किनाऱ्यावर प्रभास तीर्थावर येऊन राहू लागले.
==
हे ही वाचा : कुरुक्षेत्रात पांडवांचा निर्णायक विजय होण्यामागची, कृष्णनीतीची अशी ही एक कथा!
==
प्रभास तीर्थावर असताना एके दिवशी अंधक आणि वृष्णी वंशजांमध्ये बाचाबाची झाली.
तेव्हा सत्यकीने रागाच्या भरामध्ये कृतवर्माचा वध केला. हे बघून अंधक वंशीयांनी सत्यकीला घेरून त्याचावर हल्ला केला. सत्यकीला एकटे पाहून श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी गेला.
सत्यकी आणि प्रद्युम्न दोघेच अंधक वंशीयांशी लढले, परंतु त्यांचे बळ कोठेतरी अपुरे पडले आणि अंधक वंशीयांनी रागाच्या भरात दोघांचा वध केला.
आपला पुत्राच्या आणि सत्यकीच्या वधाने क्रोधीत होऊन श्रीकृष्णाने हाताने जमिनीवरचे गवत उपटले. दुसऱ्याच क्षणी ते सांबाने निर्माण केलेल्या लोखंडाच्या मुसळामध्ये परावर्तीत झाले.
त्या मुसळामध्ये इतकी शक्ती होती की एका घावात ते समोरचाचे प्राण हिरावून घेत असे. श्रीकृष्णाने प्रभास तीर्थावर जाऊन त्या मुसळाने सर्वांचा वध करण्यास सुरुवात केली.
श्रीकृष्णाच्या डोळ्यादेखत सांब, चारुदेष्ण, अनिरुद्ध आणि गद या महावीरांचा मृत्यू झाला. श्रीकृष्णाने रागामध्ये इतर सगळ्याच यदुवंशीय वीरांचा वध केला. तेव्हा त्यांनी आपला सारथी दारूक याला सांगितले की,
तू हस्तिनापूराला जा आणि अर्जुनाला या सर्व प्रकाराबद्दल माहिती दे आणि त्याला द्वारकेला घेऊन ये.
दारूकने श्रीकृष्णाची आज्ञा पाळली. इकडे श्रीकृष्ण पुन्हा द्वारकेला परतले त्यांनी सर्व गोष्ट पिता वसुदेवांना सांगितली. यदुवंश नष्ट झाल्याचे दु:ख वसुदेवलाही झाले.
ही वार्ता वडिलांना ऐकवल्यानंतर श्रीकृष्ण बलरामाला भेटण्यासाठी जंगलामध्ये गेले. त्यांनी पाहिले कि बलरामाने आधीच समाधी घेतली आहे. व्यथित झालेल्या श्रीकृष्णाने देखील अवतार कार्य संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने स्वयं समाधी घेतली आणि त्याच अवस्थेत ते जमिनीवर पडून राहिले.
ज्यावेळी श्रीकृष्ण समाधीमध्ये होते, त्याचवेळी जरा नावाचा एक शिकारी शिकार करण्यासाठी आला त्याने लांबूनच हरीण समजून श्रीकृष्णाला बाण मारला.
बाण मारल्यानंतर तो शिकारी शिकार पकडण्यासाठी पुढे गेला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला बघून त्याला पश्चाताप झाला.
तेव्हा –
“हे सर्व विधिलिखित असून, माझा अवतार असाच संपणार होता…”
हे सांगून श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि ते स्वर्गात निघून गेले.
इकडे दारूक श्रीकृष्णाचा निरोप घेऊन हस्तिनापुरात दाखल झाला. यदुवंश नष्ट झाल्याची वार्ता ऐकून अर्जुन त्वरित द्वारकेकडे रवाना झाला. अर्जुन जेव्हा द्वारकेला आला, तेव्हा तेथील भयावह परीस्थिती बघून त्याला खूप दु:ख झाले.
वसुदेवाने सर्व नगरवासीयांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची विनंती अर्जुनाला केली. कारण श्रीकृष्णाचे अवतार कार्य संपुष्टात आले होते आणि सोबत द्वारकेचा देखील अंत होणार होता.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अर्जुनाने वसुदेवाची ही विनंती मान्य केली आणि आजपासून सातव्या दिवशी इंद्रप्रस्थासाठी आपण रवाना होऊ अशी घोषणा केली. द्वारकेतील सर्व नगरवासीयांनी अर्जुनाची आज्ञा शिरसावंद्य मानून प्रस्थानाची तयारी सुरु केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेवानी आपल्या प्राणाचा त्याग केला. अर्जुनाने विधीपूर्वक त्यांचे अंतिम संस्कार केले. वसुदेवाच्या पत्नी देवकी, भद्रा, रोहिणी या सुद्धा वसुदेवाच्या चितेवरून सती गेल्या. त्यानंतर अर्जुनाने प्रभास तीर्थामध्ये मारल्या गेलेल्या सर्व यदुवंशीयांचे सुद्धा अंतिम संस्कार केले.
सातव्या दिवशी अर्जुन आपल्या नातेवाईकांना आणि नगरवासीयांना आपल्याबरोबर घेऊन इंद्रप्रस्थाकडे गेला.
सर्वजण द्वारकेमधून बाहेर निघताच श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी हळूहळू समुद्रात बुडू लागली. ते दृश्य पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पुढील काही क्षणातच द्वारकेला जलसमाधी मिळाली.
तर अशी ही आख्यायिका! म्हटलं तर आख्यायिका…म्हटलं तर कथा…म्हटलं तर इतिहास…!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.