Site icon InMarathi

आजच्या ‘बोल्ड’ मॉडेल्सना लाजवेल अशी एक मॉडेल “तेव्हा” जुहू बीचवर नग्न धावली होती!

protima bedi featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही अशा व्यक्ती असतात, ज्यांना मनस्वी, बेदरकार, बिनधास्त ही विशेषणंही कमी पडत असावीत. सत्तरच्या दशकात, जेंव्हा स्त्रियांवर समाजात वावरताना अनेक बंधनाचा, संकेतांचा मान राखावा लागायचा, अशा काळात एक मॉडेल मुंबईतील समुद्र किनार्‍यावरुन नग्नावस्थेत धावली आणि तिनं अक्षरश: खळबळ उडवून दिली.

ही मॉडेल कोणी सामान्य व्यक्ती नव्हती तर तिच्या नावाभोवती प्रतिष्ठेचं वलयही होतं. पुढे जाऊन ती या प्रतिमेत अडकून न रहाता तिने अलौकीक कार्यही केलं. अशी कोणत्याच प्रतिमेत न अडकलेली व्यक्ती म्हणजे, प्रोतिमा.

 

 

ग्लॅमरचं विश्व अनेक आश्चर्यानी भरलेलं जग आहे. सामान्यांचे जगण्याचे नियम, नैतिकतेच्या कल्पना इथे लागू होत नाहीत. आज कलाकारांच्या बिनधास्त बेधडक वागण्याचं फारसं कौतुक कोणाला उरलं नाही.

पापारझिंची लाडकी मॉडेल उर्फ़ी जावेद आज तिच्या बॉडीशोमुळे चर्चेत रहाते मात्र उर्फ़ी फिकी पडेल अशी खळबळ तिच्या आजीच्या पिढीतल्या एका बिनधास्त मॉडेलनं सत्तरच्या दशकात माजवली होती.

प्रोतिमा बेदी हे नाव बिनधास्त वर्तनाचा समानार्थी शब्द होता. मुळची दिल्लीची रहिवासी प्रोतिमा मुंबापुरीत ग्लॅमरच्या जगात करियर घडवायला आली आणि इथली समीकरणंच तिने उलथवून टाकली.

खरंतर तिच्या या निर्णयाला तिच्या कुटुंबियांचा प्रचंड विरोध होता. मात्र मन मानेल तसंच जगणं हे जिच्या रक्तातच होतं ती प्रोतिमा घरच्यांच्या विरोधाला न जुमानता मुंबापुरीत दाखल झाली. एक वेगळं सौंदर्य असणारी बोल्ड ॲण्ड ब्युटीफ़ूल प्रोतिमा मॉडेलिंगच्या क्षेत्रात स्थिरावली नसती तरच नवल होतं.

 

 

सिनेमा, जाहिरातीतून कामं करणं सामान्य घरातल्या मुलींसाठी निषिध्द असण्याचा तो काळ होता. त्यामुळे मॉडेल म्हणून जेंव्हा अशा बोल्ड आणि देखण्या मुली येत तेंव्हा त्यांना कामंही मिळत असत. कितीही बोल्ड, बिनधास्त म्हणलं तरिही या क्षेत्रात काम करणार्‍यालाही काही मर्यादा असतात.

हा काळ चकचकीत कागदांवरच्या उच्चभ्रू इंग्रजी मासिकांच्या लोकप्रियतेचा काळ होता. आज मोबाईलवर अक्षरश: टिचकीच्या अंतरावर वाट्टेल तो आणि हवा तो कंटेट उपलब्ध असणार्‍या पिढीला प्लेबॉय सारख्या मासिकांचा महागडेपणा समजणार नाही.

त्या काळात एका वर्गापुरतीच मर्यादित असं हे मासिक सामान्यांच्या ऐपतीच्या बाहेरची होती. याच चकचकीत जगात एक मासिक पदार्पण करु पहात होतं. १९७४ हे वर्ष. सिनेब्लिटझ मार्केटमधे येण्याची पूर्ण तयारी झालेली. त्यांच्यावर कालांतरानं आरोप झाले त्याप्रमाणे रुसी करंजिया यांना प्लेबॉयचा प्रतिस्पर्धी मार्केटमधे आणायचा नव्हता मात्र पदार्पणातच अशी खळबळ माजवायची होती, जेणेकरुन सगळ्यांना आगमनाची दखल घ्यावीच लागणार होती.

 

 

मासिकाच्या मुखपृष्ठावर स्त्री मॉडेल असावी हा विचार पक्का होता. या विचारातूनच नग्न मॉडेलचं छायाचित्र छापण्याचा प्रचंड धाडसी विचार समोर आला. हे शक्य होईल का? तर हो हे शक्य आहे हा विचार प्रोतिमाचं नाव सुचल्यावर थांबला. प्रोतिमा ही नेहमीच तिच्या काळाच्या पुढच्या विचार आणि वर्तनासाठी ओळखली जात असे. ती बोल्ड होतीच मात्र तिच्यासमोर हा प्रस्ताव ठेवणंही धाडसच होतं. हे काम रुसी यांची कन्या रिटा यांनी केलं.

रीटा आणि प्रोतिमा यांच्यात मैत्री होती. रुसीने प्रोतिमाला जेंव्हा अशा प्रकारचे नग्न फोटोशूट करशील का? अशी विचारणा केली त्यावर प्रोतिमाचे शब्द होते, “व्हाय नॉट?” खुद्द रिटाही या उत्तराने चकीत झाल्या. कारण त्यांना सकारात्म प्रतिसाद अपेक्षित होता मात्र अगदी का नाही? असा उत्साह नक्कीच अपेक्षित नव्हता.

मॉडेलच्या होकाराचा मुख्य अडथळा पार केल्यानंतर टीममधे उत्साह संचारला. फोटोशूटसाठी योग्य लोकेशनची शोधाशोध सुरू झाली आणि मुंबईतील फ्लोरा फाऊंटनचा परिसर निश्चित करण्यात आला. याचं कारण इथल्या देखण्या इमारतींची पार्श्वभूमी.

शूटसाठी पहाटेची वेळ निश्चित करण्यात आली. कारण पहाटेच्या वेळेत या परिसरात एकदम चिडीचूप शांतता असे आणि कोणत्याही व्यत्ययाविना चित्रीकरण करणं सोपं होणार होतं. ख्यातनाम छायाचित्रकार तैयब बादशाह यांच्यावर या फोटोशूटची जबाबदारी सोपविण्यात आली. सर्वकाही ठरल्यानुसार पार पडलं.

 

 

मात्र जेंव्हा फोटोज समोर आले तेंव्हा प्रोतिमा या छायाचित्रांवर नाराज होती. तिच्या अपेक्षेनुसार हे फोटोज आले नसल्याने पुन्हा एकदा शूट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यावेळेस लोकेशनही बदलण्यात आलं.

आता जुहू बिचवर हे फोटोशूट झालं आणि या छायाचित्रांनी अक्षरश: खळबळ उडविली. पुढचा इतिहास तर सर्वश्रुतच आहे. प्रोतिमानं केलेलं हे धाडस आजच्या घडीलाही करण्याचं कोणत्याही मॉडेल, अभिनेत्रीत धारिष्ट्य नाही यावरुनच ती काळाच्या किती पुढे होती हे लक्षात येतं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version