Site icon InMarathi

…आणि म्हणून जगन्नाथ पुरी मंदिरातील मूर्ती आजही अपूर्ण अवस्थेत आहेत…

jaganthpuri im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ओरिसा मधील जगन्नाथ पुरी या मंदिरातील मुर्ती अपूर्ण अवस्थेत का आहेत ? हा कित्येक लोकांना पडणारा प्रश्न आहे. दरवर्षी जगन्नाथ पुरीची यात्रा ही लाखो लोक दूरदर्शनवरून बघत असतात. कित्येक लोक सुट्ट्यांमध्ये ओरिसा फिरून देखील येतात. पण, आपल्या या ऐतिहासिक मंदिराची ही माहिती विचारण्यात, इतरांना ती माहिती सांगण्यात खूप कमी जणांना रस असतो.

जगन्नाथ पुरी येथे प्राचीन काळात घडलेल्या काही घटनांमुळे या मूर्ती अर्धवट अवस्थेत आहेत ? याची एक कथा प्रचलित आहे. काय आहे ही कथा? काय आहे या मंदिराच्या अपूर्ण अवस्थेचं कारण ? कुतूहल म्हणून जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

हिंदू धर्मातील बऱ्याच प्रथा, जागा, मंदिरांची माहिती ही आजवर आपल्याला अर्धवट मिळत आलेली आहे. काही वर्षांपासून लोकांमध्ये हिंदू धर्माविषयी निर्माण झालेल्या जागरूकतेमुळे ही माहिती आता लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यामुळे आजच्या पिढीला प्रत्येक गोष्टीमागे असलेलं शास्त्र, लॉजिक कळत आहेत.

सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू यांच्या एका अवतारात त्यांनी जगन्नाथ यांचं रूप धारण केलं होतं, तेव्हा त्यांना बलभद्र नावाचा भाऊ आणि सुभद्रा नावाची बहीण होती. जगन्नाथ पुरीची यात्रा ही तीन भावांची असते. देव जगन्नाथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचं प्रतीक आहे हे अशी देखील मान्यता आहे.

 

 

दरवर्षी जून महिन्यात ही रथ यात्रा निघत असते. मराठी महिन्यांप्रमाणे आषाढ महिन्याच्या अखेरीस या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक सहभागी होत असतात. जगन्नाथाच्या यात्रेत कडुनिंबाच्या झाडाच्या लाकडाने तयार करण्यात आलेले एकूण तीन रथ असतात.

मागील दोन वर्षांपासून या यात्रेत केवळ मर्यादित लोकांना सहभागी होण्याची परवानगी ओरिसा प्रशासनाकडून मिळत आहे.

कथा काय आहे ?

सत्य युगात इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होता. हा राजा भगवान विष्णूंचा परम भक्त होता. आपल्या आराध्य दैवताचं एक मंदिर बांधावं अशी त्याची इच्छा होती.

भगवान विष्णूंच्या मूर्तीचा आकार कसा असावा? याचं ज्ञान राजाकडे नव्हतं. हे ज्ञान मिळवण्यासाठी त्याने ब्रह्माची उपासना केली. काही काळ भक्ताची परीक्षा घेऊन देव प्रसन्न झाले. पण, त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.

ब्रह्माजींनी इंद्रद्युम्न राजाला भगवान विष्णूंची उपासना करून त्यांच्याकडूनच मंदिरासाठी अपेक्षित असलेल्या मूर्तीची माहिती घेण्याचा सल्ला दिला.

इंद्रद्युम्न राजाने भगवान विष्णूंची आराधना केली. कालांतराने भगवान विष्णू हे इंद्रद्युम्न राजाच्या स्वप्नात आले आणि त्यांनी राजाला सांगितलं की, “तू बंकामूहाना नावाच्या जागेला भेट दे आणि तिथून कडुनिंबाच्या झाडाच्या लाकडाचा ओंडका शोधून आण आणि त्यापासून माझी मूर्ती तयार कर.”

 

 

इंद्रद्युम्न राजाला झालेल्या दृष्टांता नंतर तो बंकामूहाना या जागेवर गेला आणि तो लाकडाचा ओंडका घेऊन आला. पण, त्या लाकडापासून मूर्ती कोण साकारणार ? हा राजासमोर मोठा प्रश्नच होता. त्याने कित्येक कारागिरांवर ही कामगिरी सोपवली, पण कोणालाच ते काम जमत नव्हतं.

मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न करत असतांना काही कारागिरांची अवजारं तुटली. भगवान विष्णूंची मनासारखी मुर्ती तयार होत नसल्याने इंद्रद्युम्न राजा नाराज झाला होता.

हे बघून देवांचे ‘आर्किटेक्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेले भगवान ‘विश्वकर्मा’ तिथे प्रसन्न झाले आणि त्यांनी या कामासाठी राजासमोर ‘अनंत महाराणा’ या कारागिराला हजर केलं.

भगवान विश्वकर्मा स्वतः या कामावर लक्ष ठेवून होते. त्यांनी मंदिराची रचना करून दिली. पण, मुर्ती तयार करत असतांना त्यांनी इंद्रद्युम्न राजासमोर ही अट ठेवली होती की, “आम्ही मुर्त्या तयार करून देऊ. पण, आमचं काम होईपर्यंत माझ्या परवानगी शिवाय मंदिराचं दार कोणीही उघडायचं नाही. आणि तसं झालं तर आम्ही त्या क्षणी जितकं काम झालं आहे ते सोडून अदृश्य होऊ.”

काही दिवस हे काम सुरू होतं. काम संपत नव्हतं. आजकाल सांगतात तसं भगवान विश्वकर्मा यांनी या कामासाठी कोणतीच कालमर्यादा निश्चित केली नव्हती. राजा आपल्या लाडक्या देवाची मुर्ती बघण्यासाठी अधीर झाला होता.

एक दिवस न राहून त्याने त्या मंदिराचं दार उघडलं. दार उघडताच राजाला जगन्नाथ, बलभद्र आणि सौभद्र यांच्या तीन अर्धाकृती मुर्ती दिसल्या. इंद्रद्युम्न राजाला भगवान विश्वकर्मा यांची अट न पाळण्याचा पश्चात्ताप झाला. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

 

 

इंद्रद्युम्न राजाने परत एकदा ब्रह्नदेवाची उपासना केली आणि त्यांच्याकडे भगवान विश्वकर्मा यांची तक्रार केली. ब्रह्माजींनी तयार झालेल्या मूर्त्यांची माहिती भगवान विष्णूला दिली.

भगवान विष्णूला त्या तयार झालेल्या मुर्ती आवडल्या त्यांनी ब्रह्माजींना याच मूर्त्यांची आपण स्वहस्ते प्रतिष्ठापना करावी असे आदेश दिले. ब्रह्मदेवांनी ही माहिती इंद्रद्युम्न राजाला दिली आणि ते मंदिराच्या पूजेच्या, लोकार्पणाच्या दिवशी स्वतः हजर राहिले.

इंद्रद्युम्न राजाच्या मनात स्वप्नात दिसलेलं मंदिर पूर्ण झाल्याची भावना आली आणि तो धन्य झाला. आपण इच्छा व्यक्त केलेलं हे मंदिर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तयार झालं आहे याचं राजाला समाधान वाटलं.

ब्रह्मदेवाने इंद्रद्युम्न राजाला आश्वस्त केलं की, भगवान विष्णूंचे मोठे डोळे असलेल्या या मूर्ती जगभरात लोकांना आवडतील.

अर्धवट किंवा भंगलेल्या मुर्त्यांची पूजा करणं हे हिंदू धर्मात जरी अशुभ मानलं जात असलं तरीही या मुर्ती साक्षात भगवान विष्णूंना आवडलेल्या असल्याने त्यांची पूजा करावी असं हिंदू ग्रंथांमध्ये लिहिण्यात आलं आहे. हिंदू धर्मात मान्यता असलेल्या चार धामांपैकी जगन्नाथ पुरी हे सर्वात महत्वाचं धाम म्हणून मानलं जातं.

 

 

१ जुलै २०२२ रोजी यावर्षीची जगन्नाथ पुरीची यात्रा होणार आहे. मंदिर प्रशासन आणि ओरिसा सरकार सध्या हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तयारी करत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version