Site icon InMarathi

१० वर्ष उभं राहून तप केलेले, योगसिद्धीने १०९ वयोमान असूनही कार्यरत असणारे सियाराम बाबा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत देशाला मोठमोठ्या संतांची परंपरा लाभलेली आहे. कितीही शतकं लोटली, काळ कितीही बदलला, आधुनिक, विज्ञानवादी झाला तरी संतांनी दिलेली मूळ शिकवण आजही सर्वोच्च मानली जाते.

माणसाकडे बुद्धी असली तरी माणसाचं मन चंचल आहे. हे चंचल मन त्याला सारासार विचार करण्यापासून परावृत्त करत राहतं. त्यामुळे आधी मनावर, भावनांवर नियंत्रण मिळवता आलं पाहीजे.

संतांनी आपल्याला इंद्रियसंयमनाचं महत्त्व सांगितलं. आपण सामान्य माणसं असल्यामुळे आपल्याला हे सहज ऐकता किंवा वाचता आलं तरी ते प्रत्यक्षात अवलंबता येणं ही आपल्यासाठी अत्यंत कठीण गोष्ट असते. संतांनी मात्र ते शक्य करून दाखवलं.

 

 

आजच्या काळात भाबड्या सर्वसामान्यांना लुबाडणाऱ्या, त्यांना विवेकी विचारापासून दूर नेणाऱ्या बाबा-बुवांचाही समाजात सुळसुळाट आहे. अशात खरोखरच सगळ्याविषयीच अनासक्ती निर्माण झालेल्या, आपल्या कठोर साधनेने अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवणाऱ्या काही मोजक्या संतांविषयी आपल्याला कळतं तेव्हा आपल्या मनात केवळ आश्चर्याची भावना असते.

योगसिद्धीने १०९ वयोमान असूनही कार्यरत असणारे सियाराम बाबा हे असंच एक उदाहरण. सियाराम बाबांचं रहस्यमय आयुष्य आणि त्यांनी आजवर केलेला प्रचंड दानधर्म पाहून आपण केवळ थक्क होऊ. जाणून घेऊ या सियाराम बाबांविषयी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात नर्मदा तटावर असलेल्या भट्याण इथल्या पर्णशाळेत हे संत सियाराम बाबा राहतात. ते ८० वर्षांचे आहेत असं काही लोक म्हणतात तर काही लोक ते १३० वर्षांचे असल्याचं म्हणतात, पण मीडियाच्या वृत्तानुसार ते अंदाजे १०९ वर्षांचे असावेत.

बाबा सियाराम यांचा जन्म मुंबईत झाला असून त्यांनी ७वी-८वी पर्यंत शाळा शिकली असल्याचं समजतं. नंतर एका संताच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या मनात वैराग्याचे विचार सुरू झाले. मग त्यांनी घराचा त्याग केला आणि ते हिमालयात तप करायला गेले.

सियाराम बाबा हे हनुमानाचे परम भक्त असून ते कायम राम चरितमानसाचे पाठ करताना दिसतात.

सियाराम बाबांना ‘सियाराम’ हे नाव कसं पडलं?

 

 

त्यांना ‘सियाराम’ हे नाव पडण्यामागे एक रंजक कहाणी आहे. असं म्हणतात, की या बाबांनी १२ वर्षे मौन पाळलं होतं.

१२ वर्षांनंतर काहीतरी बोलायला त्यांनी तोंड उघडलं तेव्हा ते ‘सियाराम’ हा पहिला शब्द म्हणाले. त्यामुळेच गावातल्या लोकांनी त्यांना सियाराम हे नाव दिलं आणि आता ते सियाराम या नावानेच ओळखले जातात.

१० वर्षं केलं होतं खडेश्र्वर तप :

या बाबांनी १० वर्षे एक खडेश्र्वर नावाचं तप केलं होतं. अतिशय कठीण अशा या तपात तपस्व्याला झोपण्यापासून दिवसाभरातली सगळी कामं उभी राहूनच करावी लागतात.

बाबांच्या योग साधनेमुळेच हे शक्य झालं होतं. असं म्हटलं जातं, की या बाबांचं खडेश्र्वर तप सुरू असताना नर्मदा नदीला पूर आला होता आणि बाबांच्या नाभीपर्यंत पुराचं पाणी आलं होतं, मात्र तरीदेखील हे बाबा जिथे होते तिथेच उभे राहीले.

 

 

ऋतू कुठलाही असला, तरी फक्त लंगोटीवर राहणारे बाबा :

आपल्या ध्यानसाधनेच्या बळावर या बाबांनी स्वतःला इतकं कणखर केलंय की थंडी, उन्हाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. थंडी असो की उन्हाळा, सियाराम बाबा आपल्याला कायम एकाच लंगोटीवर राहत असलेले दिसतात.

इतकं वय असूनही हे बाबा त्यांची सगळी काम स्वतः करतात. आपलं जेवणही ते स्वतःच बनवतात.

केवळ १० रुपयेच घेतात दान :

हे सियाराम बाबा कुणाहीकडून केवळ १० रुपयेच दान घेतात. १० रुपयांपेक्षा जास्त पैसे त्यांना कुणी दिले तर ते ते अतिरिक्त पैसे परत करतात. या बाबांच्या दर्शनाला देशातलेच नाहीत तर परदेशातले लोकही येतात.

 

 

असं म्हटलं जातं, की ऑस्ट्रिया आणि अर्जेंटिनामधले काही लोक बाबांचं दर्शन घ्यायला त्यांच्या आश्रमात गेले होते तेव्हा त्यांनी ५०० रुपये बाबांना दान दिल्यावर बाबांनी त्यातले केवळ १० रुपयेच घेतले आणि बाकीचे त्यांना परत केले.

बाबांनी नागलवाडी भीलट मंदिराच्या स्थापनेसाठी आणि पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी छप्पर तयार करण्याकरता २ करोड ५७ लाख रुपये दान केले होते, त्याचप्रामणे नर्मदा परिक्रमा करणाऱ्या यात्रेकरूंना विश्रांती घेता यावी यासाठी भट्याण-ससाबड मार्गावर त्यांनी ५ लाख रुपयांचं प्रतीक्षालय तयार केलं.

या बाबांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी अडीच लाख रुपये रक्कम दिली होती. संसदेतले सदस्य असलेले गजेंद्रसिंह पटेल हे भट्याण बुजुर्ग इथल्या पर्णशाळेत गेले तेव्हा या बाबांनी स्वतः त्यांना ही रक्कम दिली होती.

आपल्यासारखी सामान्य माणसं अनेकांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवतात, पण या बाबांसारख्यांचं इतकं अविश्वसनीय वाटावं आणि तरीही खरं असलेलं आयुष्य पाहून आदर्शत्वाची नव्हे तर केवळ नतमस्तक होण्याची भावनाच मनात येते. बाबा सियाराम यांनी आजवर जगलेल्या आणि ते आताही जगत असलेल्या आयुष्याला सलाम!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version