जेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज थेट कर्नाटकातील जनतेसाठी धावून गेले होते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितींचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥
असे ज्यांचे वर्णन केले गेले तो अवघ्या महाराष्ट्राचा शिवप्रतापी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्याच्या केवळ नावच्या उच्चाराने छाती अभिमानाने भरून येते असे श्रीमानयोगी व्यक्तिमत्व म्हणजे महाराज!!
मात्र काही दिवसांपूर्वी कर्नाटक मध्ये महाराजांची अवहेलना केली गेली. कर्नाटक येथील राजधानी शहर बंगळुरू, जे कि महाराजांचे पिताश्री शहाजी महाराज यांनी वसवले होते, येथील सदाशिव नगर मध्ये काही समाज कंटकांनी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग फेकण्याचा निंदनीय प्रकार केला. मात्र त्याच कर्नाटकातील जनतेच्या संरक्षणासाठी महाराज धावून गेले होते ही बाब विसरता कामा नये.
खरंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकचं नातं फार जुनं आहे. पण म्हणतात ना ‘सत्तातुरणाम न भयम न लज्जा…’ त्याप्रमाणे मराठी-कानडी वाद पेटता ठेवून त्यावर आपली सत्तेची पोळी भाजणार्यांच्या राजकारणातून महाराज ही सुटले नाहीत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
इतकेच नाही तर ऑनलाइन शाळेच्या अभ्यासक्रमाचे कारण देत इयत्ता नववीच्या पाठयपुस्तकातून महाराजांच्या दक्षिण मोहिमेची माहिती देणारे धडे तसेच, भागानागरचा इतिहास, बहमनी सुलतानशाही यांचाही इतिहास वगळण्याचा निर्णय तिथल्या अभ्यास मंडळाने घेतला असल्याचं समजतं.
पण ज्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले जाते, त्यांची आदरपूर्वक पूजा केली जाते त्याच राज्यातील जनतेसाठी धावून जाणार्या महाराजांचा अनादर होणं, हे अयोग्य आहे. या निमित्ताने महाराजांच्या दक्षिण मोहिमेला उजाळा देताना वाचूया कसे महाराज कर्नाटकातील जनतेच्या संरक्षणासाठी धावून गेले होते…
६ जून १६७४ ला स्वराज्याची राजधानी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. फक्त महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी ही क्रांतिकारी घटना होती.
दक्षिणेत असलेले विजय नगरचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर मोगली राजवटीला आव्हान देऊ शकेल अशी एकही सत्ता तेव्हा उरलेली नव्हती. त्याचवेळी या राज्याभिषेकामुळे दिल्लीतील मुघलांपासून ते पोर्तुगीज, इंग्रज, डच यांच्या हृदयात धडकी भरविणारे एक स्थान निर्माण झाले होते.
या परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेला या जुलूमातून मुक्त केल्यानंतर आता संपूर्ण भारतात स्वराज्याचा विस्तार करण्याची वेळ होती. त्यासाठी दक्षिण प्रांत हा पहिला पर्याय महाराजांपुढे होता.
महाराजांनी सत्ता विस्तार करण्यासाठी दक्षिणेकडे लक्ष वळविले. विजापूरच्या आदिलशाही मध्ये सत्तेसाठी राजकारण सुरू होते आणि याचा फायदा महाराजांनी घ्यायचा ठरविला होता. आदिलशाही मध्ये दक्षिणी लोक विरुद्ध पठाण हा संघर्ष शिगेला पोहोचला होता. या घटनेमुळे राजकारणाचा एकंदर नूरच पालटला.
दक्षिणी पक्षाच्या लोकांना पठाणाच्या हातात विजापूरच्या सत्तेची चावी जाणं नामंजूर होते. त्यातच बहलोलखानाने खवासखानाची हत्या करविल्याने त्याचा व्याही मोगली सुभेदार बहादुरखान विजापूरचा नाश करण्याच्या तयारीला लागला आणि विजापूरच्या अस्तित्वासाठी झगडा सुरू झाला.
विजापुरातील बदलत्या राजकारणाबरोबरच दक्षिणेत नायक व पाळेगार यांच्यातील राजकारणही क्षणोक्षणी बदलत होतं. इकडे जिंजीचा सुभेदार नासिर मुहम्मद खान (वजीर खवासखानाचा भाऊ) हा संपूर्ण दक्षिणच ताब्यात घेण्याची स्वप्ने पाहू लागला. त्याच अनुषंगाने छ. शिवाजी महाराजांनी व्यंकोजींना पत्र लिहून त्यांनी हिंदू नायकांना मदत करावी व नासिरखानकडून जिंजी घ्यावी असा सल्ला दिला; पण त्यांच्याकडून हे राजकारण तडीस गेले नाही.
अखेरीस सर्व बाजूंनी विचार करता, या अस्थिरतेचा फायदा घेण्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आला. भविष्यात अटळपणे होणाऱ्या मोगली आक्रमणाप्रसंगी दक्षिणेत संरक्षक जागा व उत्पन्न देणारा भाग स्वराज्यात असावा, हा मनसुबा करून संघटित बळाच्या जोरावर दक्षिण पंथीयांची एकजूट साधून अवघ्या दक्षिणेतून मोगल निपटून काढावा, या हेतूने महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली.
खुद्द शिवाजी महाराज दक्षिणेत उतरणार ही बातमी वार्याच्या वेगाने पसरली आणि कर्नाटकातील सामान्या जनतेला आदिलशाही जाचातून स्वतंत्र होण्याची स्वप्ने पडू लागली.
महाराज मोहिमेला निघण्यापूर्वी दख्खनचा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणार्या कोप्पळ प्रांतातील लोक महाराजांच्या भेटीस गेले आणि त्यांनी त्याकाळी कोप्पळवर सत्ता गाजवणार्या आदिलशाही सरदार अब्दुररहिमान आणि हुसेनखान मियाना या दोघा भावांच्या अत्याचाराचे गार्हाणे महाराजांसमोर मांडले.
महाराजांनी त्यांची जाचातुन सुटका करू अशी ग्वाही दिली अर्थातच हुसेंनखानाला ही बातमी कळताच त्याने त्या लोकांचा छळ करून त्यांची हत्या केली. त्यानंतर महाराजांनी सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अधिपत्याखाली सेनेचा एक मोठा भाग देवून कर्नाटकातील प्रदेश जिंकून खंडणी/चौथाई वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार हंबीरराव मोहिमेवर निघाले.
मराठी सेना हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली घटप्रभा आणि मलप्रभा नद्या ओलांडून कर्नाटकात उतरली. या सेनेत सर्जेराव जेधे आणि त्यांचे सुपुत्र नागोजी, संताजी व मालोजी घोरपडे, धनाजी जाधव हे धुरंधर होते.
येलबुर्गा येथे हंबीरराव मोहिते यांनी छावणी पडली होती. ही संधी साधून हुसेंनखान मियांना अपरात्री येलबुर्गा येथील मराठा छावणीवर चालून आला. पठाण आले, पठाण आले अशी हाकाटी उठली. सगळ्या छावणीत खळबळ उडाली. शत्रूला अंगावर घेण्यासाठी संताजी आणि धनाजी ही तरुण जोडी पुढे सरसावली.
पठाण जवळपास ५००० सैन्य, तिरंदाज, बरचीवाले, बंदुकी आणि भला मोठा तोफखाना सोबत अनेक हत्ती, घोडे असा सारा बिस्तारा घेऊन आले होते. हुसेनखान स्वतः हत्तीवर बसून चालून आला होता. त्याच्या पराक्रमामुळे आणि दहशतीमुळे त्याची तुलना बहलोलखान याच्याशी केली जात असे. त्या प्रमाणात मराठ्यांची ताकद तर खूपच कमी होती.
खानाला स्वत:च्या ताकदीचा गर्व होता पण त्याला मराठ्यांची रणनीती, शौर्य यांची माहिती नव्हती. तिथेच त्याने मात खाल्ली. लढाई पेटली आणि अंगार्यांसारख्या बरसणार्या मराठी सैन्याने आदिलशाही सेनेला धडकी भरवली.
जवळपास चार प्रहर हे युद्ध चालले. सहाव्या प्रहरात मराठ्यांनी हुसेन खानाचे संपूर्ण सैन्य संपवले. मराठ्यांना मात द्यायला निघालेला पठाण स्वतः चक्रव्यूहात अडकला होता. एकीकडे संताजी धनाजी जोडी पराक्रम दाखवत होते.
दुसरीकडे बाजी सर्जेराव जेधे यांचा तरुण मुलगा नागोजी जेधे अभिमन्यू प्रमाणे शत्रूच्या सैन्यात खोलवर घुसला आणि थेट खानाच्या हत्तीपुढे उभे राहून नागोजी यांनी स्वतःच्या समशेरीने हत्तीची सोंड कापून टाकली. भेदरलेला हत्ती पठाणी सैन्याला तुडवत धावू लागला. याने चवताळलेल्या हुसेंखान मियाना याने एक तीर नागोजीच्या दिशेने चालवला.
तीराने आपले काम फत्ते केले.त्याने नागोजींचा वेध गेटला. आपल्या पित्याच्या नजरेसमोर एक सुपुत्र धराशायी विसावला. ही वार्ता ‘कारी’ येथे कळताच नागोजींची पत्नी गोदुबाई सती गेल्या. मराठ्यांनी खानाला जिवंत धरला. त्याच्याकडून मोठं सैन्य, दारुगोळा आणि जवळपास २००० हुन अधिक घोडी मराठ्यांच्या ताब्यात आली.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य विस्तारातील दक्षिण दिग्विजयाची सुरुवात मोठ्या धडाक्यात झाली. याच येलबुर्ग्याच्या युद्धामुळे संताजी, धनाजी यांना पहिली ओळख मिळाली. नागोजी जेधे आणि यांच्यासह अनेक मराठा वीरांनी आपले रक्त सांडले आणि फक्त त्यामुळेच कानडी जनता सुखाचा श्वास घेऊ शकली.
या घटनेला आता जवळपास तीनशे वर्ष होवून गेली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. देशाच्या स्वातंत्र्याला देखील ७५ वर्षे झाली. पण त्यानंतर निर्माण केल्या गेलेल्या राज्ये आणि त्यांच्या विवादीत सीमांनी मात्र लोकांना एकमेकांपासून दुरावले. महाराष्ट्राचा द्वेष करणारे राजकारण कर्नाटकात केले गेले आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही.
आता पाठ्यपुस्तकातून महाराजांचा आणि मराठी सैन्याच्या पराक्रमाचा इतिहास वगळायचा घाट घालून कर्नाटक सरकार पुन्हा जुनेच राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहे. पण काही केले तरी हा दैदीप्यमान इतिहास आणि ही छत्रपती शिवाजी महाराज नावाची महागाथा कधीच झाकोळली जाणार नाही हे त्रिवार सत्य आहे.
—
- मराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे..
- “आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं!”, वाचा रायबाचं पुढे काय झालं?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.