' अमरनाथ यात्रेवरील हल्ला : आता तरी मोदीभक्त व मोदीविरोधक जागे होतील काय? – InMarathi

अमरनाथ यात्रेवरील हल्ला : आता तरी मोदीभक्त व मोदीविरोधक जागे होतील काय?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काश्मीरच्या सतत अशांत असलेल्या पृथ्वीवरील स्वर्गात काल नवा रक्तरंजित इतिहास घडला. अमरनाथ यात्रेतील श्रद्धाळुंवर अतिरेकी हल्ला झाला. लष्कर ए तैय्यबा ने हा हल्ला घडवून आणला असं सांगितलं जात आहे. दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार –

अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात जण ठार झाले. बेंटेगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी हल्ले घडवले. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांपैकी दोन भाविक हे महाराष्ट्रातील पालघरचे आहेत. जखमींमध्ये महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी आज जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली आहे. दहशतवादी हल्ल्यात पालघरच्या डहाणूमधील रहिवाशी निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर यांचा मृत्यू झाला आहे. भाविकांची ही बस गुजरातच्या वलसाडमधील ओम ट्रॅव्हल्सची असून या बसच्या मालकाचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, रामबन, सांबा, कठूआ आणि उधमपूर येथे हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज तातडीची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारत अशा भ्याड हल्यांपुढे आणि द्वेषमुलक कृत्यांपुढे कधीच झुकणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवरील हल्ल्याचा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी निषेध केला आहे. ‘अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणारे काश्मीर आणि काश्मिरीयतचे शत्रूच आहेत’ अशी प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी दिली.

amarnath-attack-marathipizza
indianexpress.com

हा हल्ला प्रत्येक भारतीयांसाठी वेदनादायक आहे. निष्पाप भाविकांना अश्या प्रसंगाला सामोरं जावं लागणं हे प्रचंड मनस्ताप देणारं आहे. दुर्दैवाने राजकीय टिपण्यादेण्यासाठी शिवशिणारे आमचे हात आज सोशलमिडीयावर लगेचच व्यक्त होत आहेत. त्या व्यक्त होण्यात ना प्रसंगाचं भान आहे ना प्रसंग का घडला व ह्यापुढे घडू नये ह्यासाठी काय करायला हवं ह्याची जाण.

दैनिक लोकमत (व इतरही सर्वच प्रमुख दैनिकांत) आलेल्या माहितीनुसार ह्या बस चालकाने एकूणच हलगर्जीपणा दाखवला होता. दै लोकमतमधील माहिती ही अशी :

 

amarnath yatra terrorist attack marathipizza

एवढंच नव्हे. अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे ह्या भाविकांची नोंद नाही. सगळ्या सुरक्षा यंत्रणेला गुंगारा दिला. त्यामुळे सुरक्षा मिळाली नाही. सातची मर्यादा मोडून साडेआठला तिकडं गेले. मुख्य यात्रेसोबत न राहता अमरनाथपर्यंत गेले…ह्या सर्व प्रकारामुळे ही बस – हे यात्रेकरू अतिरेक्यांसाठी अगदी इझी टार्गेट ठरले. ह्यावरून आपल्याकडे एकूणच सुरक्षा व्यवस्थेविषयी किती अनास्था आहे हे दिसून येतंय. ही अनास्था ७ निष्पाप भाविकांचा बळी जाण्यास कारणीभूत ठरली.

ह्या अनास्थेविषयी श्री सौरभ गणपत्ये ह्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ती आवर्जून वाचायला हवी अशी आहे –

===

अमरनाथ यात्रेत बसवाल्याची काही चूक झाली असेल काय?

जगातली तिसऱ्या क्रमांकाची आर्मी आणि ५६ इंची छाती आपलं रक्षण करू शकत नाही हे मान्य करावं लागेल. पण तरीही क्षणभर भावना बाजूला ठेऊन आपण हा प्रश्न स्वतःला विचारून बघूया. ते पुरोगामी, हिंदुत्ववादी, अवॉर्डवापसी किंवा राष्ट्रवादी या वादातून बाहेर पडूया.
वैष्णवदेवीला अख्खा डोंगर चढताना मला एकूण १८ वेळा चेकिंग केलं गेलं होतं. “भेंडी माझ्याच देशात माझ्याच देवीला जाताना मला १८ वेळा चेकिंगला जावं लागतंय” असा मी चरफडत होतो. महिलांची सुरक्षा महिलाच पाहत होत्या. दिवसरात्र उभ्या उभ्या पाठीवरची गन सांभाळत सगळयांशी शक्य तितक्या पोलाईटपणे वागत मोर्चा सांभाळणं चालू होतं. प्रत्येकाने सहकार्यही उत्तम दिलं.

श्रीनगरच्या एअरपोर्टवर आलेला अनुभव भयानक होता. श्रीनगरला उतरताना तुमची जनरल तपासणी होते. परंतु श्रीनगरमधून बाहेर प्रयाण करत असाल तर तुमचं पाच पाच वेळा चेकिंग होतं. त्यामुळे तुमचं फ्लाईट तीन वाजता असेल तर तुम्ही किमान बारा वाजता त्या परिसरात पोहोचायला हवं. गाडी विमानतळावर यायच्या आधीच तुमच्या सामानाचा तपास सुरु होतो.

एक दीडशहाणा माझ्या पुढे उभा होता. हातात आयपॅड आणि खिशात आयफोन. सतत त्याला फोन येत होते. प्रत्येक ठिकाणी आमची कसून तपासणी चालू होती. प्रत्येक तपासणी राउंडला हा लॉर्ड फॉकलंड काहीतरी वेडावाकडा चेहरा करत होता. चौथ्या वेळी त्याचा संयम सुटला आणि तो त्या पोलीस अधिकाऱ्यावर वस्सकन ओरडला.

साडे सहा फुटाचा तो अत्यंत देखणा पठाण मनात आलं असतं तर याचा जबडा एका झापड्यात तोडू शकला असता. पण तो डोक्यावर बर्फ आणि आणि जिभेवर साखर ठेऊन होता. काय करणार आम्ही येतो म्हणून यांना पगार मिळतो ना. शेवटी ना राहवून मीच त्या माणसावर खेकसलो. “ए भाई, मेरी गल सुण, यहा छोटासा बच्चा भी भरोसे के लायक नाही होता. अगर किसी बच्चे को कहा गया ना, के बच्चा जा वह अंकलके बगलमे ये ये थैली रख के आ, तो चॉकलेट के लिये वह पाच साल का बच्चा ये करेगा. भाई तेरे घरवाले ना, तेरी बॉडी पेचाण नही पायेंगे”

पाचवी राउंड त्याने चूप चाप पार केली. माझं चेकिंग करताना पठाण मला म्हणाला –

प्यार से आवो प्यार से जाओ, क्यू ऐसे लोगों के मुह लगते हो भाई? हमे तो यह रोज का है.

===

हा दृष्टिकोन, हे भान राजकीय चर्चांमध्ये नं दिसणं भयावह आहे. प्रत्येक घटनेत आधी सत्तेत कोण होतं, आता सत्तेत कोण आहे, तेव्हा काय झालं, आता काय होतंय – ह्या चर्चा करण्याचं व्यसन आम्हाला विवेकी विचार करण्यापासून थांबवतोय.

ह्या दुःखद घटनेचा प्रतिशोध घेण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. पंतप्रधान, गृहमंत्री पुढील पावलं उचलतीलच. विरोधक टीका करतील. परंतु अशी घटना घडणं दुःखद आहे. हे घडतंय, ते थांबवता नं येणं ही हतबलता आहे. पुढे १०० अतिरेकी मारू आपण. पण हे ७ गेले त्याचं काय? प्रतिशोध, प्रत्युत्तर सर्व काही मान्य. हिरवा दहशतवाद, इस्लाम, कट्टरवाद सगळं खरं. पण आपले ७ निष्पाप गेले ना. ते वाईट आहे. ह्या सगळ्यात – जसं सौरभ म्हणाले – तसं – “भावना बाजूला ठेऊन आपण हा प्रश्न स्वतःला विचारून बघूया. ते पुरोगामी, हिंदुत्ववादी, अवॉर्डवापसी किंवा राष्ट्रवादी या वादातून बाहेर पडूया.” हे का घडलं, ह्याचा विचार करू या.

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यावरून हे लक्षात येतं की एकटा पंतप्रधान बदलून, सत्तेतील पक्ष बदलून जो फरक पडतो वरवरचा असतो. सध्याचं सरकार चांगलं की वाईट ह्या पुढे जाऊन – “चांगलं सरकार” म्हणजे नेमकं काय हा विचार करण्याची गरज आहे.

राजकीय विषयांवर चर्चा करणाऱ्यांपैकी मोजकेच लोक “व्यवस्था परिवर्तन” बद्दल बोलत असतात – ते ह्याच अनुषंगाने. जे सरकार व्यवस्था परिवर्तन घडवून आणतं, व्यवस्था आधीपेक्षा अधिक सक्षम, अधिक कार्यक्षम बनवतं ते सरकार “चांगलं सरकार”. मनमोहनसिंगांच्या जागी मोदी आणले आणि मोदींच्या जागी राहुल गांधी किंवा केजरीवाल किंवा इतर कुणी बसवले की परिस्थिती सुधारेल ही अंधश्रद्धा आहे. भक्त आणि द्वेष्टे – दोघेही ह्या अंधश्रद्धेत जगत असतात.

काश्मीर असो वा कन्याकुमारी – सुरक्षा यंत्रणेच्या नजरेतून एखादी बस सुटूच नये – अशी काटेकोर यंत्रणा असायला हवी. आणि अतिरेकी हल्ल्यांचं स्थान-वैविध्य बघता पुण्यात आणि ठाण्यासाठी CCTV चं सक्षम जाळं असायला हवं. गुप्तहेरांचं जाळं, स्थानिक सुरक्षा कर्मचारी, पोलिस इत्यादींचं सुसूत्रीकरण ह्यात कमतरता असता कामा नये. उरी हल्ला ते अमरनाथ – हे सतत जाणवत आहे की ह्या व्यवस्था सुधारणांमध्ये आपण कमी पडत आहोत. आता हे दोष आधीच्या सरकारांचे होते वगैरे समर्थन देणं किंवा पहा हे सरकार नुसत्या गप्पा मारतं, करत काहीच नाही – हे ताशेरे राजकीय पॉईंट्ससाठी सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांच्या मुखी शोभेल. नागरिक जेव्हा अशे ताशेरे मारत एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंततात तेव्हा ह्या देशातील जनतेच्या प्रायॉरिटीज काय असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

देशाला कित्येक दशकांत सक्षम विरोधक मिळालेला नाही, त्याची ही फळं आहेत असं समजण्यास वाव आहे. सत्तेतील व्यक्तीचा, किचकट गुंत्यातून अंग काढून घेण्याकडे स्वाभाविक कल असतो. त्यामुळे सत्तेत असलेल्या लोकांवर वचक ठेऊन आवश्यक त्या सुधारणा घडवत आणणे हे सत्ते बाहेरील शक्तिकेंद्रांचं काम असतं. दुर्दैवाने विरोधक ते करताना दिसत नाहीत. इथेच नागरिकांचा, व्हिजिलण्ट सिटिझन्सचा रोल महत्वाचा ठरतो.

पण राजकीय पक्षांनी बहुतेक सर्वच राजकीय दृष्ट्या सजग असणाऱ्या लोकांना pro आणि anti मोदी सरकार करण्यात ठसठशीत यश मिळवलं आहे. ज्यामुळे आजच्या राजकीय चर्चा “करंट इव्हेन्ट”वर क्षणिक टीका टिपणी करणाऱ्या आणि २ दिवसांनी नवी घटना शोधणाऱ्या चक्रात अडकल्या आहेत. ह्यामुळे समाजास घातक घटना घडूच नयेत ह्यासाठी आवश्यक त्या सुधारणा घडवून आणण्यासाठी जे मोजकेच लोक प्रयत्नशील आहेत, जनाधार आटत चालला आहे. लोकशाहीत असं होणं बरं नाही.

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यानंतर तरी मोदीभक्त आणि मोदी द्वेष्टे आपल्या देशातील व्यवस्था परिवर्तन आणि व्यवस्था सुधारणा ह्याकडे लक्ष देतील अशी आशा आहे. नव्हे ही आत्यंतिक तातडीची गरज आहे.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?