' मुलांच्या डब्याची चिंता करणं सोडा! १० मिनिटांत होणारे हे पदार्थ तुमचा प्रश्न सोडवतील – InMarathi

मुलांच्या डब्याची चिंता करणं सोडा! १० मिनिटांत होणारे हे पदार्थ तुमचा प्रश्न सोडवतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उन्हाळ्याची सुट्टी संपून नुकत्याच शाळा सुरू झाल्या असतील. शाळा सुरू होणार म्हटलं, की लहान मुलांचे गणवेश, रेनकोट-छत्र्या, दप्तरं, वह्या-पुस्तकं, पावसाळी बूट अशा सतराशे साठ गोष्टींकडे पालकांना, विशेषतः आईला लक्ष द्यावं लागतं.

सकाळी उठल्याबरोबर रोजच्या कामांचा पाढा आईसमोर असतो आणि त्याच धांदलीत करावं लागणारं एक काम म्हणजे मुलांचे आणि इतरांचे डबे तयार करणं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे आवडत नाही- ते आवडत नाही अशी मुलांची खाण्याच्या बाबतीतली हजार नाटकं असतात. त्यामुळे रोज मुलांना काय वेगळा डबा द्यायचा हा सगळ्याच मातांसमोरचा प्रश्न असतो. रुचकरही लागेल आणि पोषकही असेल असा डबा मुलांना कसा देता येईल हाच आईचा प्रयत्न असतो.

मातांनो, तुमच्या याच प्रश्नावर तोडगा म्हणून झटपट तयार होतील अशा सकस आणि रुचकर पदार्थांची ही यादी वाचा.

१. पोहे :

 

pohe inmarathi

 

अवघ्या १५-२० मिनिटांत होणारा हा आपला रुचकर आणि सकस पारंपरिक पदार्थ. पोहे भातापासून बनवले जात असले, तरी पोहे पोटभरीचे असतात. कमी तेलात मुलांसाठी डब्याला पोहे बनवून देणं सहज शक्य आहे.

२. पराठे :

बरीच लहान मुलं आवडीने पराठे खातात, पण बऱ्याचदा मेथी, बटाटा अशा काही ठराविक भाजांचेच पराठे तयार करून मुलांना दिले जातात.

त्याचबरोबर जर फ्लॉवर, गाजर, बीट अशा इतरही भाज्यांचे पराठे करून मुलांना डब्यात दिले तर पराठे दिलेत म्हणून मुलं आवडीने डबा खातील. शिवाय, त्यांच्या पोटात भाज्याही जातील. कोबी, मुळ्यासारख्या मुलांच्या नावडत्या भाज्या भरून तयार केलेले पराठे मुलांना डब्यात देणं हा एक चांगला पर्याय आहे.

३. व्हेजीटेबल सँडविच :

 

sandwich inmarathi

 

ब्रेडच्या दोन्ही स्लाईसेसना बटर, चटणी, सॉस लावून त्यामध्ये काकडी, टोमॅटो, बटाटा, कांदा, बीटाचे काप लावणे, वरून चीज टाकून व्हेजिटेबल सॅन्डविच तयार करून मुलांना डब्यात दिलं तर मुलंही खुश आणि कसं का होईना आपल्या मुलांच्या पोटात सॅलड गेलं म्हणून आईही खुश.

४. गाजराचा ढोकळा :

तयार पिठाचे इडली-डोसे करून ते चटणीसोबत मुलांना डब्यात देता येऊ शकतात, त्याचप्रमाणे त्या इडलीच्याच पिठात थोडं दही, तांदळाचं पीठ, थोडेसे मसाले आणि गाजर घालून त्यापासून ढोकळा बनवून आहे त्याच सामग्रीतून एक मस्तपैकी नवा पदार्थ तयार करून मुलांना डब्यात देता येईल.

५. ब्रेडची भाजी :

झटपट तयार होणारा आणि मुलांना आवडेल असा हा आणखीन एक पदार्थ. ब्रेडच्या स्लाईसेसचे तुकडे करून, गॅसवर कढईत तेल, जिरं, मोहरीची फोडणी देऊन त्यावर काही भाज्यांचे तुकडे आणि ब्रेडचे तुकडे घालून परतले, शेवटी वरून गरम मसाला किंवा पाव भाजी मसाला आणि मीठ घातलं तर तुमच्या मुलांचा डबा चविष्ट, भाज्या घातल्यामुळे सकस आणि हटकेसुद्धा होईल.

६. रवा टोस्ट :

टोस्ट सॅन्डविचसारखाच पण काहीसा वेगळा असलेला हा पदार्थ. सिमला मिरची, बीट, काकडी, गाजर अशा तुम्हाला हव्या त्या भाज्या बारीक चिरून त्या रव्यात घोळवून ते मिश्रण ब्रेडच्या स्लाइसवर पसरवायचं आणि तेलावर खरपूस भाजायचं की हा रवा टोस्ट तयार. करायला सोपा आणि झटपट तयार होणारा हाही एक  पदार्थ.

७. पोळीचा रोल :

 

kathi-roll-inmarathi

 

रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांची फोडणीची पोळी, पोळीचा लाडू तयार करून डब्यात देणे हे पर्याय आहेतच. शिवाय रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचा रोलही करून तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता.

पोळीला तूप किंवा बटर लावून ती पुन्हा तव्यावर भाजा. पनीर कुस्करून, त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा, मिरपूड, चिली फ्लेक्स, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून ते मिश्रण चांगलं एकजीव करायचं आणि २ मिनिटं तेलावर परतायचं.

त्यानंतर ते पोळीच्या मधोमध घालून सरकवलं आणि त्याचा रोल केला की पोळीचा रोल तयार. आपल्याला आईने डब्यात पनीर रोल दिलाय हे पाहून मुलं खुश झाली नाहीत तर नवलच.

८. उपमा :

 

upma inmarathi

 

पोह्यासारखाच नेहमी आपल्याकडे ब्रेकफास्टला केला जाणारा हा दुसरा पारंपरिक पदार्थ. नेहमीसारखा उपमा करून त्यात गाजर, सिमला मिरची अशा भाज्या घालून तुम्हाला मुलांना तो डब्यात देता येईल.

मधल्या सुट्टीत अगदी जेवायच्या वेळी लागते तशी भूक लागलेली नसते. त्यामुळे पुढे काही तास मुलांचं पोट भरलेलं राहायला उपम्यामुळे नक्कीच मदत होईल.

९. दही भात :

 

curd rice inmarathi

 

 

पचायला हलका, चविष्ट आणि पोषक असा हा एक झटपट होणारा पदार्थ मुलांना डब्यात द्यायचा विचार करायला हरकत नाही.

शिजवलेल्या भातावर थंड दही घालून त्यावर मिरची, कडीपत्ता, मोहरीची फोडणी आणि मीठ घालून तुमच्या मुलांना तुम्ही डब्यात एखाद दिवशी दहीभातही देऊ शकता.

१०. भरपूर भाज्या घालून मॅगी :

 

maggie inmarathi

 

अनेक लहान मुलांना मॅगी आवडते. पण कितीही चविष्ट असली तरी मॅगी शरीरासाठी चांगली नसते. मॅगीत भरपूर भाज्या घालून ती तयार केली तर त्यातल्या त्यात पोषक होईल. भरपूर भाज्या घातलेली पटकन होणारी मॅगी तुम्ही मुलांना कधीतरी डब्यात देऊ शकता.

याशिवाय एका दुसऱ्या छोट्या डब्यात तुम्ही मुलांना चटपटीत, मसालेदार असे उकडलेले मक्याचे दाणेही देऊ शकता. उकडलेल्या मक्याच्या दाण्यांवर मीठ, तिखट, चाट मसाला घाला, लिंबू पिळा. वरून थोडी कोथिंबीर घाला. त्याचप्रमाणे चाटमसाला भुरभुरलेले डाळींबाचे दाणे आणि भाजके मखाणेही तुम्ही त्या दुसऱ्या छोट्या डब्यात मुलांना देऊ शकता.

मुलांसाठी पोषक असतील, त्यांना पोटभरीचे होतील आणि चविष्टही असतील असे पदार्थ तयार करून ते डब्यात द्यायला बायकांना शक्कल लढवावी लागते. या वरच्या पदार्थांमुळे त्यांच्यासाठी ही रोजचीच समस्या थोडी सोपी होईल अशी अपेक्षा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?