Site icon InMarathi

जिकडे पाहावे तिकडे मायबाप विठोबारखुमाई दिसावे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २८

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २७

===

मौन! मौन! मौन! कोणाहीशी काहीही बोलायचे नाही! प्रश्न विचारायचे नाहीत! मनातही प्रश्न उगवता कामा नये! म्हणजे आपल्याच मनाने आपल्याच मनाशीही बोलायचे नाही! आबाची काय अवस्था झाली असेल याची आपण नुसती कल्पनाच करावी! पण आबा हा काही लेचापेचा गडी नव्हता. ईश्वरशोधार्थ बाहेर पडलेला, बारा गावांचे पाणी पिऊन आलेला आणि सर्वांवर कडी म्हणजे तुकोबांच्या घरात राहून तुकोबांचा सहवास केलेला असा तो कशालाही न हटणारा तरूण होता. तुकोबांनी आपल्याला उगाचच रामेश्वरभटांकडे शिकण्यास पाठविलेले नाही ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती. रामभटांचे ऐकणे आणि तुकोबांचे ऐकणे यांत म्हणूनच काही फरक नाही असे त्याने मानले आणि मौनाचे आव्हान स्वीकारले. तुकोबांचा अभंग आहे –

क्षणभरी आह्मीं सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ।।
सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ।।
तुका ह्मणे येणे जाणे नाही आतां । राहिलों अनंताचिये पायीं ।।

अनंताच्या पायापर्यंत पोहोचायचे असेल तर क्षणभर वाईट सोसले पाहिजे! ते सोसले तरच अंतरात वसलेला आनंद गवसेल. एकदा काय तो त्रास सहन करू आणि हे सुखदुःखमय जीवन बदलून टाकू. आनंदाचे करू. सुखदुःखे बरोबरीची करू. दुःखाचे प्रकार मग अधिक का असेनात! आबा प्रश्न विचारीत राही हे जरी खरे असले तरी त्यात जिज्ञासा होती. उद्धटपणा नव्हता. समोरच्याची चूक दाखविण्याचा हेतू नव्हता. आपल्याला कळावे असे त्याला वाटे. कळण्यातील अडचण काही असली तर हीच होती की काही ऐकले की त्यावर प्रतिप्रश्न लगेच तयार होई. रामभट कसलेला शिक्षक असावा. त्याने आबाचे दुखणे बरोबर ओळखले आणि मुळावरच घाव घातला.

आबा सुरुवातीला मनात म्हणाला, गुरुजींनी आपल्याला गप्प बसायला सांगितले. मग म्हणाला, त्यांनी आपले अगदी तोंडच शिवून टाकले. असे विचार काही काही विचार मनात आले खरे, पण टिकले मात्र नाहीत आणि एकच विचार उरला, आपण मौन साधायचे!

रामभटांनी मौनाची आज्ञा केली त्या क्षणापासून आबा बोलायचा बंद झाला आणि रात्री झोपताना त्याने मनात ह्यावर बराच खल केला. त्याच्या लक्षात आले की लोकांशी बोलणे सोडणे हे ह्या घरात आपल्याला सहजच शक्य आहे. किंबहुना आपले घर वा आपले कामाचे ठिकाण सोडले तर आपल्याला बोलण्याचे काही कामच पडत नसते. रामभटांकडून आपल्याला काही अपेक्षा नाही आणि त्यांनाही आपल्याकडून काही अपेक्षा नाही. दोन वेळेस आयते जेवायचे. दिसले तर काही काम करायचे. बोलावे लागतेच कशाला?

परंतु, प्रश्न आत चालणाऱ्या थैमानाचा होता. ते कसे थोपवायचे हा प्रश्न मोठा होता. दुसरा प्रश्न अजून गंभीर होता. सर्वांत राहायचे म्हणजे आपण गप्प असलो तरी इतर बोलणारच. ते काही बोलले तर आपल्या मनात प्रतिक्रिया उमटतेच. ती कशी थांबवायची? मौन कसे साधायचे ह्यावर आबाचे विचारचक्र जबरदस्त चालू झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी आबा सरळ घरातून निघून गेला आणि जेवायला उगवला. दुपारी कुठे आडोशाला थांबला आणि रात्रीचे जेवून निजून गेला. पण हा दिवस त्याला फार कठीण गेला. दिवसभर करायचे काय ह्या प्रश्नाने त्याला दिवसभर छळले. वेळ घालवायचा कसा? एकदा वाटले, एकदाच मौन मोडावे आणि बरेच पुरेल असे काहीतरी अंगमेहनतीचे काम मागून घ्यावे. कामात मन रमेल! हा विचार आला आणि तत्क्षणीच निर्णय झाला की नाही, काम मागायचे नाही! कामात शिरलो आणि मन रमवले तर ज्या क्षणी काम संपेल त्या पुढील क्षणी हीच परिस्थिती पुन्हा उद्भवेल. अविरत काम करणे म्हणजे मौन नव्हे. मौन हा प्रकार काहीतरी वेगळाच आहे.

आबा कल्पना करू लागला. मौनाची अंतिम अवस्था काय असेल? जेथे शब्दच नाहीत तो अनुभव कसा असेल? त्या निःशब्द क्षणाच्या केवळ कल्पनेनेच आबाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तुकोबा सांगतात,

स्थिरावली वृत्ति पांगुळला प्राण । अंतरीची खुण पावूनियां ।।
पुंजाळले नेत्र झाले अर्धोन्मीळित । कंठ सद्गदित रोमांच आले ।।
चित्त चाकाटले स्वरूपा माझारी । न निघे बाहेरी सुखावलो ।।
सुनीळ प्रकाश उदैजला दिन । अमृताचे पान जीवनकळा ।।
शशिसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटणी आनंदाची ।।
तुका ह्मणे सुखे प्रेमासी डुलत । वीरालो निश्चित निश्चितीने ।।

ज्या क्षणी वृत्ती स्थिरावल्या तो क्षण इतका विशेष होता की त्या क्षणी प्राण सुद्धा पांगळा झाला! (वाहत राहणे हा प्राणाचा गुण, तर क्षणभर जणू मृत्यूच भोगला!) अंतरीची खूण म्हणून पटली ती त्या क्षणी. नेत्र अर्धे मिटलेले असून दृष्टी विस्तारली. कंठ सद्गदित झाला आणि अंगावर रोमांच उभे राहिले. ही आपलीच अवस्था पाहून मन चकित झाले आणि त्या अवस्थेतून बाहेर यावेसे त्याला वाटे ना!

हा दिवस जीवनात असा उजाडला की वाटावे सर्वत्र स्वच्छ प्रकाश भरून राहिलेला आहे आणि आपल्या जीवनाला अशी कळा आलेली आहे की आपण अमृत प्राशन करून जणू अमर्त्य झालो आहो. ह्या सूर्यचंद्रांनी व्याप्त जगावरून जीव ओवाळून टाकला गेला आणि आनंदात आनंद मिसळून गेला. हा तुका म्हणतो, ह्या साऱ्या प्रकारात मनाच्या निश्चयाने मी सुखाने व प्रेमाने डुलत डुलत विरून गेलो!

मौन ही काही सामान्य गोष्ट नव्हे याची जाणीव आबाला एका दिवसात झाली. भूत आणि भविष्य विनाकारण समोर नाचू लागले. मौनाने मन निर्मळ व्हायच्या ऐवजी गढूळच होणार की काय असे वाटून एका क्षणी भयही झाले. परंतु, काही असो ह्या साऱ्यांतूनच आबाचा मौन साधण्याचा निर्णयच पक्का होत गेला आणि त्याने त्या साधनेतील एक पाऊल पुढे टाकले.

ते पाऊल म्हणजे कानांवर नियंत्रण! लोकांचे बोलणे ऐकून मौन भंगत असेल तर लोकांपासून दूर जाणे हा मार्ग होता. पण त्यात ही आबाला खोट आढळली. तो मनाशी म्हणू लागला, आपण कायमचे विजनवासात तर जाणार नाही आहोत मग लोकांपासून पळून कसे चालेल? सर्वांमध्ये राहूनच काय ते साधले पाहिजे. सर्वांमध्ये राहताना कान आडवे येत असतील तर कानांवर विजय मिळविला पाहिजे. कधी कधी आपण ऐकूनही न ऐकल्यासारखे दाखवितो. तसे आता सहज आणि सतत करावे! लोकांचे, त्यांच्या वागण्याबोलण्याचे भय का धरावे?

तुकोबांनी म्हटले आहे,

जन विजन झाले आह्मां । विठ्ठलनामाप्रमाणें ।।
पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ।।
वन पट्टण एकभाव । अवघा भाव सरता झाला ।।
आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ।।

जनांत राहूनही, हा तुका म्हणतो, मी विजनांत आहे अशी माझी अवस्था झाली! विठोबाचे नाम घेत असताना जी समाधी लागत असे ती आता नेहमीची स्थिती झाली! जिकडे पाहावे तिकडे मायबाप विठोबारखुमाई दिसावे! आपण वनांत आहोत की नगरात हे कळेनासे होण्याइतके मन एकत्व पावले! बाकी साऱ्या भावना नष्ट झाल्या, सुखदुःखांपासून मुक्ती झाली आणि हा तुका कौतुकाने मनोमन नाचू लागला!

आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा किती गर्दी, किती कोलाहल असतो. कितिकांचे काहीबाही बोलणे आपण ऐकत असतो. त्यात आपले चित्त आपल्याला हवे ते शोधीत असते. ती वस्तू सापडली की आपल्याला किती बरे वाटते! तसे आपल्या रोजच्या जीवनात झाले पाहिजे. जे साधायचे आहे ते सोडून आपले मन कशावरही जाऊ नये. कोणीही काहीही बोलोत, आपल्याशी त्याचा संबंध नाही. आपला त्यांचाही संबंध नाही. आपण मौन साधतो आहोत, ते त्यांचे जीवन जगताहेत. त्यांचे आणि आपले जगणेच आता वेगळे झाले आहे. तोंड बंद करता येते तसे कान बंद करता आले असते तर सोपे झाले असते. ती सोय ह्याचकरिता नसावी की साधकाला मनाची ताकद वाढविता यावी.

मौनाचा अभ्यास करताना आबाच्या लक्षात आले की आपण म्हणतो की आपण कानांनी ऐकतो पण ते खरे नव्हे. आपण मनानेच ऐकतो. कान असून नसल्याचे नाटक आपण चालू ठेवले तर त्याचेच जीवन करता येईल. मी तसे करीन. माझे मौन माझ्या कानांवर काय पडते यावर मी अवलंबून ठेवणार नाही. त्यासाठी मी जगापासून मनाने अलिप्त होईन.

आबाने अजून शोध घेतला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपण रानात फिरायला गेलो की पक्षांचे सुंदर आवाज कानावर पडतात आणि आपल्याला त्याचा मोह होतो. तेथील शांतता आपल्याला हवीशी वाटते. ती शांतता आपण निर्माण केलेली नसते. आपण तिचे भोक्ते होतो आणि म्हणून जनांत आले की ती टिकत नाही. तो मोह सोडला पाहिजे. अडचण आली की मनुष्य विचार करतो आणि त्याला उपाय सापडतो. तुकोबांनीही एकदा असाच विचार करून उपाय काढला असला पाहिजे. कारण एका अभंगात ते म्हणतात,

न कळता काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ।।
येऊनिया वास करिसी हृदयीं । ऐसे घडे कईं कासयानें ।।
साच भावें तुझें चिंतन मानसीं । राहे हें करिसी कैं देवा ।।
लटिकें हे माझे करूनियां दुरी । साच तूं अंतरीं येऊनिं राहें ।।
तुका ह्मणे मज राखावे पतिता । आपुलिया सत्ता पांडुरंगा ।।

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version