रशियाची विभागणी झाली अन भारतीय “बाटा”ला टक्कर देणारा ब्रँड भारतात दाखल झाला
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोणताही व्यवसाय नावारूपास येण्यासाठी एका संधीची आवश्यकता असते. ही संधी शोधणं आणि साधणं ज्याला जमतं तो यशस्वी व्यवसायिक होतो. ‘वूडलँड’ या बुट तयार करणाऱ्या कंपनीचे जनक ‘अवतार सिंग’ हे असेच एक भारतीय व्यवसायिक आहेत ज्यांनी योग्य वेळी एक योग्य निर्णय घेतला ज्यामुळे आज वूडलँड ही १२५० कोटी इतका टर्नओव्हर असलेली कंपनी झाली आहे.
१९७० च्या दशकात कॅनडामध्ये व्यवसाय करण्यासाठी स्थायिक झालेल्या अवतार सिंग यांना त्यांच्या कंपनीच्या शाखा भारतात कधी आणि कोणत्या परिस्थितीत सुरू करावी लागल्या ? ही एक रंजक कथा आहे.
‘वूडलँड शूज्’ या नावाने परदेशी वाटणाऱ्या ब्रँडच्या मागे भारतीय नावं आहेत हे एक आश्चर्य वाटणारी गोष्ट आहे. अवतार सिंग यांनी १९७० च्या दशकात कॅनडा मधील ‘क्यूबेक’ येथे ‘ऐरो ग्रुप’ या नावाने बुट तयार करणारी एक कंपनी सुरू केली होती.
कॅनडा आणि रशियन मार्केटला डोळ्यासमोर ठेवून ‘हिवाळी’ बुट तयार करण्याचा त्यांचा छोटा व्यवसाय होता. आज भारतात ६०० स्वतःचे ‘वूडलँड स्टोअर’ असलेल्या या कंपनीचा एकेकाळी भारतात येण्याचा कोणताही विचार नव्हता.
अवतार सिंग यांचा मुलगा हरकिरत सिंग हे आज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम बघत आहेत. आपल्या वडिलांच्या मेहनतीचं आणि व्यवसाय कौशल्याचं कौतुक करतांना हरकिरत सिंग सांगतात की, “१९७० च्या दशकात जेव्हा माझ्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा आमच्याकडे कोणतंही ब्रँड नव्हतं. समोरुन आलेल्या ऑर्डर प्रमाणे बुट तयार करणे, निर्यात करणे असा आमचा व्यवसाय होता.”
१९८० च्या दशकात सिंग पिता-पुत्रांनी हे ठरवलं की, आपल्या ‘हॅन्ड स्टीच शूज्’ला इथून पुढे आपण स्वतः ‘वूडलँड’ या नावाने बाजारात विकायचं. कॅनडा मार्केट मधून या ब्रँड नावाला लोकप्रियता मिळतांना दिसत होती. रशियात निर्यातीचा ओघ सुद्धा वाढला होता. पण, १९९० मध्ये सोव्हिएत युनियन बरखास्त झाल्यानंतर रशियाने ‘वूडलँड’ला दिलेल्या काही ऑर्डर रद्द केल्या आणि अवतार सिंग यांच्यासमोर एक पेच प्रसंग उभा राहिला. ‘वूडलँड शूज्’ हे नाव तोपर्यंत युरोपमध्ये लोकप्रिय झालं होतं. पण, रशिया साठी तयार करून ठेवलेल्या बुटांची बरोबरी करू शकेल इतकी मागणी कुठूनही नव्हती.
परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला ज्याप्रमाणे संकटात सापडल्यावर भारताची आठवण होते त्याप्रमाणे अवतार सिंग यांना देखील झाली. १९९१ मध्ये भारताचं बदललेलं आर्थिक धोरण बघून त्यांनी भारतात दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे आपलं पहिले दोन ‘एक्स्लुसिव्ह ब्रँड आऊटलेट’ सुरू केले. बाटा, करोना या भारतीय कंपन्यांनी त्यावेळचं मार्केट काबीज केलेलं होतं. भारतीयांना जसं आज भारताबाहेरच्या कंपनीच्या वस्तू वापरण्यात धन्यता वाटते तशी तेव्हा सुद्धा वाटायची.
‘वूडलँड’ हा कॅनडा, रशिया मधील बुटांचा ब्रँड भारतात येतोय हे कळताच त्यावर ग्राहकांच्या उडया पडल्या. रशियासाठी तयार करण्यात आलेले शुज् अल्पावधीतच भारतात विकले गेले.
दोन शोरूम पासून झालेली ही सुरुवात पहाता पहाता ६०० शोरूम पर्यंत पोहोचली आणि जवळपास ५५०० ‘मल्टी ब्रँड आऊटलेट्स’ने ‘वूडलँड शूज्’ विकण्याची तयारी दर्शवली. भारत हेच आपल्यासाठी सर्वात मोठं मार्केट आहे हे हरकिरत सिंग यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्यानुसार भारतातील आपली उत्पादन क्षमता वाढवली. जगभरातील वूडलँडच्या विक्रीच्या ७५% विक्री ही केवळ भारतात होते ही वस्तुस्थिती आहे.
प्रत्येक राज्यात असलेल्या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती बघून त्यांनी उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्यात उपयोगी पडणाऱ्या वूडलँडचे विविध मॉडेल्स तयार केले. ‘वूडलँड’च्या शोरूम मध्ये आल्यावर तिथेच ग्रहकांना संबंधित वस्तू जशा की, शु लेस, सॉक्स, स्पोर्ट्स पॅन्ट मिळतील अशी सोय कंपनीकडून करण्यात आली.
वूडलँड भारतात पहिल्यांदा आलं तेव्हा त्यांचं लक्ष हे केवळ दिल्ली, मुंबई, बँगलोर अशा मोठ्या शहरांवर होतं. पण, नंतर त्यांनी आपल्या व्यवसाय कक्षा रुंदावल्या आणि इतर शहरांमध्ये सुद्धा आपले शोरूम सुरू केले. संपूर्ण भारताचा विचार केल्यास ‘वूडलँड शुज्’ची विक्री ही उत्तर भारतात सर्वाधिक होते असं आकडे सांगतात.
–
एका मारवाडी कुटुंबाने सुरु केला अस्सल मराठी मसाल्यांचा व्यवसाय…
महागाईत मोठे ब्रँड्स आपल्याला गंडवण्यासाठी वापरतात “श्रिंकफ्लेशन” नावाचं शास्त्र अन् शस्त्र!
–
भारतात आपले पाय मजबूतपणे रोवल्यावर वूडलँडने हाँग काँग, दुबई आणि दक्षिण आफ्रिका या मार्केटकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. भारतात ‘नॉएडा’ येथे तयार होणारे ‘वूडलँड शुज्’ हे सर्वदूर निर्यात होऊ लागले. नॉएडा येथे तयार होणाऱ्या या बुटांसाठी कंपनी पंजाब मधील जालंधर येथून चामड्याची खरेदी करू लागली. चीन, बांगलादेश, तैवान या देशांमधील छोटे उद्योजक कंपनीने शोधले आणि त्यांना देखील बुट तयार करण्याचं काम देऊ लागली.
वूडलँड शुज् हे महाग का असतात ? आणि ते जास्त वर्ष का टिकतात ?
वूडलँड कंपनी ही जर्मन तंत्रज्ञानाने रबर सोल तयार करते. ‘डेस्मा’ या जर्मन कंपनीचे रोबोट्स वापरून हे काम कमीत कमी वेळात आणि अधिकाधिक आकर्षक दिसेल याप्रमाणे केलं जातं. इटालियन मशिनरी वापरून बुटांना अपेक्षित रंग, फिनिशिंग दिली जाते. जपान, कोरिया येथून फॅब्रिक मागवलं जातं आणि अशा प्रकारे या बुटांची किंमत आणि टिकाऊपणा वाढत जातो.
हरिकीरत सिंग आज अमेरिका आणि इंग्लंडमध्ये ‘वूडलँड शुज्’ची विक्री वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. “आम्ही केवळ बुट विकत नाहीत, तर एक ‘लाईफ स्टाईल’ विकतो” हे आपलं ब्रीदवाक्य कंपनीने सुरुवातीपासून लक्षात ठेवत आपली प्रगती केली आहे. ‘फ्रॅंचाईज् मॉडेल’ वर काम न करता स्वतःच्या शोरूम मधून बुटांची विक्री करणाऱ्या वूडलँड कंपनीची आजवर केवळ चीनमधून फसवणूक झाल्याचं सिंग यांनी सांगितलं आहे.
हरकिरत सिंग यांनी दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं आणि आपलं पदव्युत्तर शिक्षण त्यांनी हार्वर्ड आणि रशियन विद्यापीठातून पूर्ण केलं आहे. गिर्यारोहण हा त्यांचा आवडता छंद आहे. भारतीय वंशाच्या या व्यवसायिकाला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्याची संधी मिळो यासाठी आमच्या शुभेच्छा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.