' कधीकाळी अभिनयातून केवळ अडीच रुपये मिळवणारा हा अभिनेता आज पंचायतमधून अनेकांची मन जिंकत आहे – InMarathi

कधीकाळी अभिनयातून केवळ अडीच रुपये मिळवणारा हा अभिनेता आज पंचायतमधून अनेकांची मन जिंकत आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खूप वर्षांपूर्वी जेव्हा दिल्ली दूरदर्शन हा मनोरंजनाचा एकमेव पर्याय होता तेव्हाचे दिवस जर तुम्हाला आठवत असतील तर दिवसा ढवळ्या, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघता बघता एकच डोळा बंद करत खांदा उडवणारा मुंगेरीलाल तुम्हाला आठवतो का? मुल्ला नसरुद्दिन लबाड डोळ्यांनी बघणारा, बेरकी हसणारा, गाढव ओढत चालणारा मुल्ला आठवतो का? तोच तो पंचायत या लोकप्रिय वेब सिरीजमधला प्रधानजी म्हणजे रघुवीर यादव!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आजकाल वेब सिरीज म्हटलं की हिंसाचार अनावश्यक बोल्ड दृश्ये, सेक्स सीन, गलिच्छ शिवीगाळ यांचा भडीमार असतो. पण अमेझॉन प्राईम वरील पंचायत ही वेब सिरीज या सर्व गोष्टींना अपवाद आहे आणि विशेष म्हणजे याच कारणामुळे लोक या वेब सिरीजचे अतिशय कौतुक करत आहेत.

सोशल मिडीयावर तर लोकांनी तरीफो के पूल बांधले आहेत. असं कौतुक खूप कमी वेब सिरीजच्या वाट्याला आलं आहे प्रधानजी आणि लौकी ही पात्रे लोकांच्या मनात ठसली आहेत. परधानजी अर्थात रघुवीर यादव आणि नीना गुप्ता!

 

neena im

 

रघुवीर यादव आपल्यासारख्या सर्वसामान्य चेहऱ्याचा अभिनेता. कोणतेही पात्र लोकांना आपलं किंवा आपल्यातलं कधी वाटू लागतं? त्याचा पोशाख, बोलणं, दिसणं आपल्यासारखं असतं तेव्हा. कारण जोहरचे सिनेमे बघताना ते नकली वाटतात कारण त्यातलं सगळंच फक्त हायफाय असतं. पण पंचायत वेब सीरीज मात्र लोकांना आवडली.

कारण ती आपल्या आसपास घडणारी कथा आहे. तसाच आवडला यात काम करणारा रघुवीर यादव… रघुवीर यादव वय वर्षे ६५ असलेला हा कलाकार. गायक होण्याचं स्वप्न उराशी घेऊन घरातून पळून आला होता आणि झाला अभिनेता.

माणसाची इच्छा काही एक असते आणि त्याचं दैव मात्र काहीतरी वेगळंच असतं. २५ जून १९५७ रोजी मध्यप्रदेशातील जबलपुर येथे रघुवीर यादव यांचा जन्म झाला. साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले रघुवीर लहानपणी गाण्याचे फार शौकीन होते. पण तो काळ मुलांच्या इच्छा आवडी लक्षात घेणारा नव्हता. मग रघुवीर सरळ पळून गेले घरातून. आणि त्यांनी एन.एस.डी. मध्ये प्रवेश घेतला.

१९७७ च्या बॅचचे ते विद्यार्थी. त्यांनी पपेट शो म्हणजे कठपुतळीचे खेळ पण केले आहेत. एकदा एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं, त्यांनी साठ दिवस साठ ठिकाणी पपेट शो केले होते. साधारणपणे एन.एस.डी. चे विद्यार्थी हे रंगमंचावर जास्त रमतात, रंगदेवतेवर प्रेम करतात. त्यांना सिनेमाच्या पडद्यापेक्षा रंगमंच जास्त खुणावतो आणि आवडतोही. रघुवीर यादव पण याला अपवाद नाहीत. त्यांनी नाटकातही काम केलं. पण हा प्रवास खडतर होता.

 

raghubir im

 

घर सोडून पळून आलेल्या मुलाला या जगात जगणं किती कठीण गेलं असेल विचार करा. ते सुरुवातीला पारशी थिएटरमध्ये काम करत तेव्हा त्यांना मिळणारे मानधनाचे पैसे होते २.५० रुपये .. प्रत्येक शोचे अडीच रुपये.

पारशी थिएटरने त्यांना कला, संगीत, संस्कृती सारं काही शिकवलं. आणि रघुवीर यादव एका मुलाखतीत असं म्हणाले की , सतत नवं शिकलं तरच या प्रवाहात टिकून राहता येतं हे पारशी थिएटरमध्ये राहिल्यामुळे त्यांना समजले आणि केवळ जिज्ञासा, नवे शिकण्याचा उत्साह या गोष्टीनी त्यांना सदैव अपडेट ठेवले.

पैसा नसतानाचा प्रतिकूल काळ हा मोठा शिक्षक असतो. त्याने रघुवीर यादवना चांगले धडे दिले त्यामुळेच आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. स्पॉटलाईटची त्यांना खूप भीती वाटायची. आजही वाटते. पण तुमचं काम हीच तुमची ओळख आहे असं त्यांना वाटतं.

१९८७ मध्ये मेस्सी साहब या सिनेमातील भूमिकेने त्यांच्यामध्ये असलेला अभिनेता जगासमोर आला. मग हळूहळू हा आलेख वाढतच राहिला. मुंगेरीलाल के हसीन सपने ही दूरदर्शन वरील मालिका खूप लोकप्रिय ठरली. चार्ली चाप्लीनसारखी मिशी असलेला मुंगेरी दिवसाढवळ्या स्वप्न बघायचा. अतिशय गरीब चेहरा असलेला मुंगेरी त्या स्वप्नात हरवून जायचा. त्या पाठोपाठ आली मुल्ला नसरुद्दिन. ती मालिका पण लोकांना आवडून गेली.

चाचा चौधरी या मालिकेत पण रघुवीर यादव प्रमुख भूमिकेत होते. आजही तो दूरदर्शनचा सुवर्णकाळ मानला जातो त्या काळात अशा दर्जेदार मालिका होत्या. ना त्यात विवाहबाह्य संबंध होते, ना मेकअपचा चकमकाट. साध्या सोप्या कथा, साधी सरळ माणसं माफक आणि हमखास मनोरंजन.

रघुवीर यादव त्या मालिकांमधून देखील भेटले होते. आणि त्यावेळचे प्रेक्षक आजही त्यांना विसरू शकलेले नाहीत, हीच दूरदर्शन आणि रघुवीर यादव यांच्या दर्जेदार कामाची पोचपावती आहे.

 

raghubir im 1

 

मग रघुवीर यादव यांनी सिनेमात पण उल्लेखनीय भूमिका केल्या. सध्याच्या पत्रकारितेची टिंगल करणारा पीपली लाईव्ह, या सिनेमात तर त्यांनी खास लोकगीताच्या स्टाईलमध्ये महंगाई डायन खाय जात है हे गाणं म्हणून आपण एक चांगले गायक असल्याचा पुरावा दिला. रामजी लन्दनवाले, क्लब ६० या चित्रपटातही त्यांनी गाणी गायली आहेत.

रघुवीर यादव हे हिंदी चित्रपट सृष्टीमधील असा एकमेव अभिनेता आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या सिल्व्हर पिकॉक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी काम केलेल्या आठ सिनेमांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे. ते चित्रपट- १) सलाम बॉम्बे, २)रुदाली, ३) बँडीट क्वीन, ४) अर्थ, ५) लगान, ६) वॉटर ७) पीपली लाईव्ह ८) न्यूटन. आणि इतकं असूनही रघुवीर यादव हे अत्यंत विनयशील म्हणूनच ओळखले जातात.

 

raghubir im 4

एव्हरग्रीन अशा हेराफेरीमध्ये सुनील शेट्टी ऐवजी हा अभिनेता दिसला असता….

पैसा, प्रसिद्धी अगदी क्षणात धुळीला मिळू शकते, हे या ८ जणांकडे बघून लक्षात येतं…

खूप प्रतिकूल परिस्थितीशी झगडून रघुवीर यादव आज यशस्वी आहेत पण आजही त्यांच्या डोक्यात ते यश गेलेलं नाही. आपल्या मुळांशी असलेली नाळ आजही त्यांनी तोडलेली नाही. वेळ घालवण्यासाठी शिकणं त्यांना मान्य नाही. आणि म्हणूनच अडचणी आणि अडथळ्यांची शर्यत पार करत आज रघुवीर यादव अशा ठिकाणी आहेत तिथे लोकप्रिय असण्याचा त्यांना गर्व नाही. स्तुतीने ते हुरळून जात नाहीत. आणि याच कारणाने ते आपल्यातलेच एक वाटतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?