' कर्नाटकचं हे कुटुंब ठाण्यात आलं आणि मामलेदारांच्या मिसळीने महाराष्ट्राला वेड लावलं – InMarathi

कर्नाटकचं हे कुटुंब ठाण्यात आलं आणि मामलेदारांच्या मिसळीने महाराष्ट्राला वेड लावलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तिखटजाळ रस्सा, त्यावर खमंग फरसाण, मऊसुत पाव, सोबतीला थंडगार ताक…याचा आस्वाद घेतल्यावर ढेकर आला नाही तरच नवल! ठाण्यात आल्यानंतर हा खमंग आस्वाद घ्यायचा असेल तर एक ठिकाण हमखास सापडतं.

ठाण्यात येऊन मामलेदारला गेला नाहीत तर जणूकाही खूप मोठं हातून गमावलं असंच वाटतं? मुंबईकरांना मिसळ खाण्याची सवय लावणारे मामलेदार नक्की कोण? यांनी ठाण्यात आपलं बस्तान कसं बसवलं? मुळचे ठाणेकर नसलेलं हे कुटुंब ठाणेकरांचे जीव की प्राण कसे झाले? जाणून घेऊयात.

 

misal im

 

 

मिसळ म्हटलं की काही मोजकी नावं आणि शहरं डोळ्यासमोर येतात. पुलंनी नाशिककर, मुंबईकर, पुणेकर यांना आपल्या गोष्टीतून अजरामर केलेलं आहे. त्याच धरतीवर मिसळीच्या बाबतीत हा पुढचा अध्याय म्हणता येईल. मिसळीच्या राज्यातली मुख्य शहरं चारच- कोल्हापूर, नाशिक, पुणे आणि ठाणे. पैकी ठाणे आणि कोल्हापूरची मिसळ म्हणजे आजच्या पिढीच्या शब्दात #जाळ आणि धूर संगटच प्रकरण!

सणसणीत तिखट चवीची, लालभड्क तर्री ही या शहरांची खासियत. पुणे आणि नाशिकच्या मिसळीचा तिखटपणा जिथे संपतो तिथे या दोन शहरातल्या मिसळींचा चालूही होत नाही.

ठाण्यातली मिसळ म्हणलं की इथे मिसळीला समानार्थी शब्द आहे, मामलेदार! या मिसळीची, नव्हे ब्रॅण्डची खासियत ही आहे की तुम्ही याच्या प्रेमात असा किंवा द्वेष करा पण तुम्ही याला दूर्लक्षित करुच शकत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बहुतेक एकही ठाणेकर असा नसेल ज्यानं आयुष्यात एकदा तरी मामलेदार मिसळ खाल्ली नसेल. या मिसळीला नाकं मुरडाणार्‍यांनिही ती खाल्लेली असतेच ही एक गंमत आहे. मामलेदार मिसळ हे तमाम ठाणेकर खवैय्यांचा अभिमान आहे.

 

misal 1 im

 

सोशल मिडीयावर मामलेदार मिसळीवरुन इतर शहरातल्या मिसळ प्रेमींशी तावातावात भांडणारे मामलेदारप्रेमीही चिक्कार आहेत. या मिसळीला मामलेदार नाव कसं पडलं? कोण आहे या मिसळीचे मालक? हा सगळा इतिहास आणि या ब्रॅण्डची आजवरची वाटचाल रंजक आहे.

या मिसळीला थोडाथोडका नाही तर तब्बल सत्तर वर्षांचा इतिहास आहे. इतकी वर्षं चवीतलं सातत्य राखणं ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे.

ठाणे रेल्वे स्टेशनपासून जवळच असणारा मामलेदार मिसळीचा फ़ूड जॉईंट हा एक लॅण्डमार्क बनला आहे. खरंतर ना दुकानावर फलक आहे ना जागोजागी जाहिरात पण तुम्ही ठाण्यात नवखे असाल आणि रिक्षात बसून मामलेदार मिसळ सांगितलं तरिही तो तुम्हाला अचूक पत्त्यावर नेईल कारण मामलेदार या ठिकाणाची लोकप्रियताच अशी आहे.

या खमंग प्रवासाला सुरवात झाली सात दशकांपूर्वी. नरसिंह मुर्डेश्वर नावाचे गृहस्थ कारवारहून ठाण्यात आले आणि त्यांनी ५० चौ.मी. जागेत एक खाऊचा ठेला सुरु केला. याठिकाणी वडा, पुरी भाजी, डोसा असे अनेक पदार्थ मिळत मात्र इथे मिळणार्‍या मिसळीची लोकप्रियता झपाट्यानं वाढली आणि मामलेदार म्हणजे मिसळ हे समीकरण रुढ झालं.

त्यानंतर लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी मामलेदारची धुरा खांद्यावर पेलली आणि या व्यवसायाच्या कक्षा रुंदवल्या.

 

lakshman mudershwar im

 

याचं नाव मामलेदार का पडलं? तर हा फ़ूड जॉईंट ठाण्याच्या तहसील कार्यालयाच्या आवारात होता. तहसीलदाराला पूर्वी मामलेदार म्हणलं जात असे. यावरुन या फ़ुड जॉईंटचं नाव मामलेदार पडलं आणि तेच लोकांच्या तोंडी बसलं.

केवळ जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु झालेल्या या स्टॉलमध्ये गर्दी वाढू लागली, आणि जागा अपुरी पडत असल्याने अखेरिस परिषदेसमोरच मामलेदारांचा छोटेखानी स्वतंत्र व्यवसाय सुरु झाला. तिथेही खव्वैयांची रीघ थांबण्याचं नाव घेत नव्हती.

खचाखच गर्दी असणार्‍या मामलेदारमधे तुम्ही पार्सल न्यायला जा नाहीतर तिथे बसून खा, तत्पर सेवा हा तिथला नियम आजही कसोशीनं पाळला जातो.

या मिसळीची जी अनोखी चव आहे तिचं गुपित आहे, या मिसळीच्या चवीच्या कौटुंबिक फॉर्म्युल्यात! हा फॉर्म्युला मुर्डेश्वरांच्या आजीनं शोधला. तिनं ज्या प्रमाणात हे मसाले बनविले त्याच प्रमाणात आणि त्याच रेसेपीनं आजही ही मिसळ बनते आणि म्हणूनच कुठल्याही ठिकाणची मामलेदार मिसळ खा, चव सारखीच असते.

या मिसळीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे तीन प्रकारच्या तिखटपणात मिसळ मिळते. एक दोन आणि तीन नंबर. पैकी तीन पासून मिसळीचा तिखटपणा वाढत जातो. या मिसळीत जे फरसाण वापरलं जातं ते देखिल मुर्डेश्वरांच्या घरातच पहिल्यापासून बनतं. बाहेरचं विकतचं फरसाण मामलेदार मिसळीत वापरलं जात नाही.

 

misal 2 im

 

तहसिलदार कार्यालयातल्या छोट्याशा जागेत सुरू झालेली मामलेदार मिसळ आज ठाण्यासहित नवी मुंबई आणि मुंबईतल्या उपनगरातही विकली जाते. बदलत्या काळाची पावलं ओळखत चवीशी तडजोड न करता सेवेत बदल करण्यात आले आहेत. आता घरबसल्या ऑनलाईनही ही मिसळ मागविता येते.

सामान्य खवैय्यच नाही तर राज ठाकरेंसारखा राजकारणी ते नामांकीत खेळाडू आणि बॉलिवुड सितारेही मामलेदार मिसळ चाखूनही गेलेले आहेत आणि तिच्या प्रेमातही आहेत.

 

misal raj im

 

अलिकडेच अभिषेक बच्चनचा मामलेदार मिसळ आवडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ही मिसळ या सेलिब्रिटींनाही आवडत असण्यात काहीही अतिशयोक्तीही नाही.

तुमच्या शहरातही असाच एखादा मिसळ पॉईंट असेल ना? तुमच्या शहरातली तुम्हाला आवडणारी मिसळ कोणती? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?