' चुलत बहीणींशी लग्न करणारा, अरबोंच्या महालात राहणारा रंगेल आणि विक्षिप्त राजा! – InMarathi

चुलत बहीणींशी लग्न करणारा, अरबोंच्या महालात राहणारा रंगेल आणि विक्षिप्त राजा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्राचीन काळातल्या राजे-राण्यांच्या खानदानीपणाचं, शाही जीवनशैलीचं आपल्याला अप्रूप असतं. पेशव्यांपासून मुघलांपर्यंत अनेक राजांकडे असलेल्या गडगंज संपत्तीविषयी, त्यांच्या विलासी आयुष्याविषयी आपण कथा- कादंबऱ्यांमधून वाचत आलेलो आहोत.

ऐतिहासिक काळातल्या अशा राजा-राण्यांच्या गोष्टी भव्य-दिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर पाहायला आपण नेहमीच उत्सुक असतो. राजे-राण्यांचं आरस्पानी सौंदर्य, त्यांची आदब, उंची वस्त्रं, राजवाड्यांचं स्थापत्य या आणि अशा अनेक गोष्टी पाहून आपल्या डोळ्यांचं पारणं फिटतं.

आपण त्या काळात असतो आणि प्रत्यक्ष डोळ्यांदेखत आपल्याला हे केव्हातरी बघता आलं असतं तर असाही विचार आपल्या मनात येऊन जातो. अनेक देशांमध्ये आता राजेशाही नसली तरी आजही असे काही देश आहेत जिथे ती अजूनही आहे.

 

england queen IM

 

आजही तिथल्या राजांची मुलं वंशपरंपरेने गादीवर बसतात आणि देशाचा कारभार चालवतात. थायलंडमध्येदेखील आजही राजेशाही असून तिथल्या राजाचं नाव महा वजिरालोंगकोर्न असं आहे. या राजाचं आजवरचं आयुष्य बघितल्यानंतर राजा म्हणून त्याच्या आयुष्याविषयी अप्रूप वाटणं तर सोडाच पण त्याने केलेल्या एका पेक्षा एक घृणास्पद गोष्टी पाहून त्याच्या विक्षिप्तपणावर हसावं की रडावं हे कळेनासं होतं.

थेट राजाच्या पदावर असलेल्या या व्यक्तीच्या आयुष्याला आयुष्य तरी कसं म्हणावं असा प्रश्न पडतो. १५०० करोडच्या महालात राहणाऱ्या, बॉडीगार्डशी लग्न करणाऱ्या, कुत्र्याला एअर फोर्सचा चीफ बनवणाऱ्या या विक्षिप्त राजाविषयी जाणून घेऊ.

बालपण ते राज्याभिषेक :

महा वजिरालोंगकोर्न राजाचं बालपण हे अगदी शाही म्हणावं असंच होतं. राजा भूमिबोल अदुल्यदेज आणि राणी सिरिकीत यांच्या अति लाडाने वाया गेलेला हा एकुलता एक मुलगा. वयाच्या १२व्या वर्षापर्यंत त्याला स्वतःच्या बुटांच्या लेसची गाठही बांधता यायची नाही. राजवाड्यातले नोकर त्याला ती बांधून द्यायचे.

 

thailand king IM

 

युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याने आपलं उच्चशिक्षण पूर्ण केलं. तो २० वर्षांचा झाला तेव्हा त्याला मुकुटधारी राजपुत्र म्हणून घोषित केलं गेलं. भूमिबोल अदुल्यदेज राजाने सुमारे ७० वर्षे थायलंडवर राज्य केलं. संपूर्ण जगात सगळ्यात जास्त काळ राज्यगादीवर बसलेले ते राजे होते. २०१६ साली भूमिबोल राजाचं निधन झालं.

भूमिबोल राजाच्या अंतिम संस्कारांचा खर्च सुमारे ६०० करोड रुपये झाला असल्याचं आणि त्यांचं शव सोन्याच्या रथातून स्मशानापर्यंत नेण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं.

भूमिबोल राजाच्या निधनानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये महा वजिरालोंगकोर्न राजा गादीवर आला. चक्री वंशाचा तो १० वा राजा ठरला . मे २०१९ मध्ये महा वजिरालोंगकोर्न राजाचा राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक सोहळा ३ दिवस चालला आणि या सोहळ्याचा खर्च सुमारे ६ बिलीयन झाला. १,३०० लोक आणि हत्ती या सोहळ्याचा भाग होते.

बॉडीगार्डशीच केलं लग्न :

आपला राज्याभिषेक होण्याच्या आदल्या दिवशी या राजाने चक्क आपल्या बॉडीगार्डशीच लग्न करून राजवाड्यातल्या सगळ्यांना चकित केलं होतं. सुथिदा तिजाई असं तिचं नाव. २०१४ साली वजिरालोंगकोर्न राजाने सुथिदा यांना बॉडीगार्ड युनिटची डेप्युटी कमांडर म्हणून नियुक्त केलं होतं.

 

thailand king marriage IM

 

त्यापूर्वी सुथिदा या थाई एअरवेजमध्ये फ्लाईट अटेंडंट पदावर कार्यरत होत्या. लग्न होण्यापूर्वी अनेकदा शाही लोकांनी आणि विदेशी मीडियाने राजाचं नाव सुथिदा यांच्याशी जोडलं होतं. मात्र राजवाड्यातील मंडळींकडून यावर काहीच बोललं गेलं नव्हतं.

यापूर्वीची तीन लग्नं आणि घटस्फोट :

सत्तरी जवळ आलेल्या या राजाचं वैवाहिक आयुष्य कमालीचं गुंतागुंतीचं आहे. १९७७ साली वजिरालोंगकोर्न राजाने आपल्या आईच्या बाजूने असणाऱ्या सौमसवाली कितीयाकरा या आपल्या चुलत बहिणीशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी झाली.

वजिरालोंगकोर्न राजाने अभिनेत्री युवाधिदा पोलप्रासेर्थ हिच्यासोबत राहायला सुरुवात केल्यानंतर त्याचा सौमसवाली कितीयाकरा यांच्याशी घटस्फोट झाला. त्यांचा घटस्फोट झाला तेव्हा नातं अयशस्वी होण्यात सौमसवाली यांचीच सर्वस्वी चूक असल्याचा आरोप वजिरालोंगकोर्न राजाने त्यांच्यावर केला. थायलंडमध्ये राजाची अपकीर्ती करणं, त्याचा अपमान करणं किंवा त्याला धमकी देणं बेकायदेशीर आहे. त्यामुळे या सगळ्या घटनेत सौमसवाली स्वतःच्या बाजूचं समर्थन करू शकल्या नाहीत.

 

king thailand 2 IM

 

त्यानंतर त्याने अभिनेत्री युवाधिदा पोलप्रासेर्थ हिच्याशी लग्न केलं. त्यांना चार मुलं आणि एक मुलगी झाली. मात्र या लग्नाचा शेवटही गलिच्छप्रकारे झाला. आपल्या बायकोचे एअर मार्शलसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप राजाने तिच्यावर केला.

ही अभिनेत्री नंतर आपल्या मुलांना घेऊन युकेला पळून गेली. मात्र, त्यानंतर वजिरालोंगकोर्न राजाने आपल्या मुलीला थायलंडला परत आणलं आणि तिला राजकन्येचा मान देण्यात आला. मात्र राज्याने आपल्या बायकोचे आणि मुलांचे राजनैतिक पासपोर्ट आणि शाही पदव्या काढून घेतल्या.

२०१९ साली या राजाने सिनीनत वोंगवजिरापाकडी यांना आपली शाही कुलीन पत्नी म्हटलं. त्यानंतर काही काळातच त्यांनी लग्न केलं. लग्नाला तीन महिने झाल्यानंतर त्याने आपल्या बायकोच्या सगळ्या पदव्या आणि पदं काढून घेतली. सिनीनत यांनी राणी सुथिदाचा अनादर केला हे त्यामागचं कारण असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र त्यानंतर वर्षभराने सप्टेंबर २०२० मध्ये त्याने सिनीनत यांना त्यांच्या पदव्या परत बहाल केल्या आणि त्या कधीच कलंकित नव्हत्या असं म्हणत त्यांच्याशी पुन्हा विवाह केला.

त्यामुळे यापुढे आपल्या बायकोची लष्करी पदं आणि शाही पदव्या कधीच काढून घेतल्या गेल्या नव्हत्या असा याचा अर्थ होतो असं त्यांनी म्हटलं. वजिरालोंगकोर्न राजाला एकूण ७ मुलं आहेत.

कुत्र्याला केलं एअर फोर्सचा प्रमुख :

या राजाच्या विक्षिप्तपणाची हद्द म्हणजे त्याने आपला प्रिय कुत्रा फुफू यालाच चक्क एअर फोर्सचा प्रमुख केलं होतं.

ऑफिशियल डिनरला तो आपल्या या कुत्र्याला फॉर्मल अटायरमध्ये घेऊन आला होता. फुफू कुत्रा वारला तेव्हा राजाने त्याच्याविषयीच्या आदराप्रीत्यर्थ बौद्ध धर्माच्या पद्धतीनुसार ४ दिवस त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते.

 

dog air marshall IM

क्रॉपटॉपची आवड आणि लॉकडाऊनमधली ऐय्याशी :

या राजाच्या बऱ्याच कॉंट्रोव्हर्सीज फेसबुकवरून पसरल्या आहेत. या राजाला क्रॉप टॉप्स घालायची भलतीच आवड आहे. आपल्या पदानुसार आपला पेहराव कसा असला पाहिजे याचं भान या राजाला नाही. या राजाचे रेसरबॅक क्रॉप टॉपमधले बरेच फोटो समोर आले. जर्मन शॉपिग सेंटरमध्ये तो टॅंक टॉप घालून फिरतानाचे फोटोजही समोर आले होते. या राजाला ऐय्याश आणि रंगेलही म्हटलं जातं.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी त्याला ‘प्लेबॉय’ म्हटलंय. थायलंडमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या केसेस सुरू होत्या तेव्हा या राजाने स्वतःला सेल्फ आयसोलेट केलं होतं. जर्मनीतल्या एका शाही हॉटेलचा पूर्ण मजला बुक करून, वीस शाही बायकांचा लवाजमा तिथे नेऊन तो हॉटेलवर ऐय्याशी करत होता आणि हा राजा स्वतःला प्रभू रामचंद्रांचा वंशज समजतो.

दोन लाख करोडहून अधिक संपत्ती :

रॉयटर्स न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, राजा वजिरालोंगकोर्न हा जगातला सर्वात श्रीमंत राजा आहे. या राजाकडे २ लाख करोडहूनही अधिक संपत्ती असल्याचं समजतं.

 

thailand king palace IM

 

२०११ साली जाहीर केलेल्या फोर्ब्सच्या यादीत त्याच्या संपत्तीचा आकडा २ ते ४ लाख करोडच्या दरम्यान असल्याचं समोर आलं होतं. त्याच्या या शाही मालमत्तेत कैक अरब रुपयांच्या शाही महालाचाही समावेश आहे.

इतिहासातल्या अनेक खलनायकी राजांविषयीही आपण जाणून असतो. पण या राजाचं उभं आयुष्यच इतकं अविश्वसनीय आणि तरीही खरं असलेलं पाहून एखाद्या राजाचं आयुष्य असं कसं असू शकत हा प्रश्न आपल्याला पडतो.

एखाद्याचे डोळे पांढरे होतील इतक्या संपत्तीचा मालक असलेल्या या राजाचं आयुष्य किळस आणणारं आणि मूर्खालाही लाजवेल असं आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. असे आणखी किती नमुने या जगात असतील देव जाणे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?