‘बलबीर पाशा’ची जाहिरात लागली की पालक मुलांचे डोळे झाकायचे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
”बलबीर पाशा को एड्स होगा क्या”, हा प्रश्न आठवतोय? हा प्रश्न ऐकल्यानंतर अनेक घरात पालक रिमोट शोधायचे तर काही तरुण कान टवकारून लक्ष द्यायचे. बलबीर पाशा नावाचं वादळ त्याकाळी अस काही सुसाट वेगात फोफावलं होतं, की घराघरात केवळ हीच चर्चा होती. कोण होता हा बलबीर पाशा? त्याचा एड्सशी काय संबंध? खरंच या पाशाला एड्स झाला होता का? याकडे सुसंस्कृत भारतीयांनी कसं पाहिलं? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं खूप गरजेचं आहे.
२१ व्या शतकात प्रवेश करतांना भारतासमोर ‘एड्स’ या आजाराचं संकट घोंघावत होतं.
लैंगिक शिक्षण आणि संबंधित समुपदेशन यामध्ये नेहमीच आपला देश मागे राहिला आहे. आपली कुटुंब व्यवस्था, एकत्र कुटुंब पद्धती आणि प्रत्येक घरात असलेले स्वघोषित काही संस्कृती रक्षक लोक यामुळे हे अज्ञान वर्षानुवर्षं वाढत गेलं आणि लहान मुलांमध्ये या विषयाबद्दल केवळ कुतूहल वाढत गेलं. या अज्ञानातूनच काही ठिकाणी गुप्तरोगाचं प्रमाण वाढलं, तर काही ठिकाणी बलात्काराचं प्रमाण वाढलं आणि संपूर्ण भारतात लोकसंख्येचा विस्फोट झाला ते वेगळंच.
‘एड्स’चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलणं हे सर्वांना अपेक्षित होतं. पण, या विषयावर समाज प्रबोधन कसं करावं ? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. ‘पॉप्युलेशन सर्व्हिसेस इंटरनॅशनल’ ही सामाजिक संस्था तेव्हा समोर आली आणि त्यांनी ‘बलबीर पाशा’ या काल्पनिक पात्राद्वारे हे काम करता येईल असं सरकारला सुचवलं.
‘बलबीर पाशा’ हे असं बेफिकीर पात्र होतं ज्याला कशाचीच भीती वाटत नाही, संभोग करतांना त्याला कंडोमची आवश्यकता वाटत नाही अशाप्रकारे हे पात्र लिहिण्यात आलं होतं. एड्स या रोगाचे २ लाखांपेक्षा अधिक रुग्ण सापडलेल्या भारतात ‘बलबीर पाशा’ हे पात्र जणू भारतीयांचं प्रतिनिधित्व करत होतं आणि त्यामुळेच ते लोकांना लगेच कनेक्ट झालं होतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
“बलबीर पाशा को एड्स होगा क्या ?” या नावाची दूरदर्शनवर जाहिरात प्रसारित केली जाऊ लागली. हे एक वाक्य लिहिलेले होर्डिंग्ज तेव्हा शहर, गावातील प्रमुख चौरस्त्यावर लावण्यात आले होते. जाहिरात तयार करतांना ‘१८ ते ४० या वयोगटातील पुरुष’ यांना डोळ्यासमोर ठेवावं असं ‘लोव्हे लिंटास’ या मार्केटिंग संस्थेला सांगण्यात आलं होतं.
एड्स जनजागृती व्हावी, पण ती सोप्या आणि उपदेश वाटणार नाही अशा शब्दात व्हावी हे पॉप्युलेशन सर्व्हिसेस इंटरनॅशनल (पीएसआय) या संस्थेने सरकारच्या निर्देशानुसार तंतोतंत पाळलं होतं.
संजय चगंती यांच्यावर त्यावेळी पीएसआय संस्थेकडून हे पूर्ण कॅम्पेन यशस्वी करण्याची जबाबदारी होती. विषयाला हात घालण्यापूर्वी त्यांनी बराच ‘ग्राउंड रिसर्च’ केला. त्यामधून हे निष्पन्न झालं होतं की, “त्या काळात लोकांना एड्स कसा होतो ते माहीत होतं. पण, आपल्याला सुद्धा होऊ शकतो, असं त्यांना वाटत नव्हतं.
‘बलबीर पाशा’ हे पात्र छोट्या पडद्यावर जाहिरातींमध्ये कसं दिसलं पाहिजे? यासाठी दिगदर्शक ‘आर. बाल्की’ यांचं मार्गदर्शन घेतलं असं सांगितलं जातं. ‘बलबीर पाशा’ हे पात्र एड्स होण्यासाठी पूरक असलेल्या सर्व गोष्टी करतांना जाहिरातीत दाखवण्यात आलं होतं.
के.व्ही. श्रीधर, प्रीती नायर या त्यावेळच्या जाहिरात क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळींना या कॅम्पेनमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. पण, तरीही ‘पीएसआय’ या संस्थेला अपेक्षित असलेली कंडोमची विक्री काही केल्या वाढत नव्हती.
आजच्या इतके डिजिटल मार्केटिंगचे पर्याय त्या काळात उपलब्ध नसल्याने ‘पॉप्युलेशन सर्व्हिसेस इंटरनॅशनल’ या संस्थेने ‘बलबीर पाशा’ला प्रसिद्ध करण्यासाठी होर्डिंग्ज लावण्याचा निर्णय घेतला. हे होर्डिंग्ज लावण्यासाठी मुंबईतील काही अशा रस्त्यांची निवड करण्यात आली जिथे सुशिक्षित लोकांचं प्रमाण कमी आहे, रेड लाईट एरिया आहे, ट्रक चालक ज्या ठिकाणी जास्त वेळ घालवतात अशा जागी “बलबीर पाशा को एड्स होगा क्या ?” हे होर्डिंग्ज लावण्यात आले.
लोकांमध्ये “बलबीर पाशा कोण आहे ?” याबद्दल एक उत्सुकता निर्माण करण्यात आली. काही दिवसांनी हे कॅम्पेन केवळ होर्डिंग्ज पुरतं मर्यादित न ठेवता टीव्ही, रेडिओ अशा सर्व उपलब्ध माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आलं.
१ डिसेंबर २००२ या ‘जगतिक एड्स दिना’च्या दिवशी बलबीर पाशा हा सर्वप्रथम सर्वांना टीव्हीवर दिसला.
“विना कंडोम संभोग केला तर कोणालाही एड्स होऊ शकतो” हे या टीव्हीवरील जाहिरातीत सांगण्यात आलं. भारतासाठी ही भाषा नवीन होती. पण, ती त्यांना खटकली नाही. कारण, या जाहिरातीत कोणतीच गोष्ट “करू नका” असं सांगण्यात आलं नव्हतं.
आजचा लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा सुद्धा बलबीर पाशाच्या एका जाहिरातीत प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना दिसला होता.
दक्षिण भारतीय लोकांचं त्यांच्या स्थानिक भाषेवर असलेलं प्रेम बघून ‘बलबीर पाशा’ला ‘पुल्ली राजा’ या नावाने बदलण्यात आलं. दक्षिण भारतात हे पात्र इतकं लोकप्रिय झालं की, तिथे कोणीही काहीही चुकीचं वागलं तरी आजही त्याला ‘पुल्ली राजा’ या नावाने बोलावलं जातं.
बलबीर पाशा हे असं एकमेव कॅम्पेन होतं जिथे एकापेक्षा अधिक मार्केटिंग एजन्सी एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी समाजकार्य म्हणून कोणतंही मानधन न घेता हे काम केलं होतं.
‘अमुल बटर’ने सुद्धा ‘बलबीर पाशा’ या प्रसिद्ध झालेल्या मार्केटिंग कॅम्पेनचा आधार घेतला आणि आपली जाहिरात केली. पण, इतर वेळी प्रत्येक जाहिरातीचं कौतुक होणाऱ्या ‘अमुल’ला यावेळी टीकेचा सामना करावा लागला होता.
“बलबीर पाशा हे पात्र म्हणजे कोणती विशिष्ठ व्यक्ती नसून ती एक वृत्ती आहे जी आम्ही फक्त लोकांसमोर आणली” असं पॉप्युलेशन सर्व्हिसेस इंटरनॅशनल या संस्थेने आपल्या पत्रकात म्हटलं होतं. या कॅम्पेन नंतर भारतात कंडोमची विक्री फार मोठ्या प्रमाणात वाढली.
एड्सचे वाढणारे आकडे कमी झाले. ‘बलबीर पाशा’ हे कॅम्पेन झालं नसतं तर भारतात एड्स ही एक महामारी म्हणून घोषित करावी लागली असती.
पॉप्युलेशन सर्व्हिसेस इंटरनॅशनल या संस्थेने ‘बलबीर पाशा’ नंतर लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी बरेच कॅम्पेन केले. पण, त्याला तितकं यश मिळालं नव्हतं. ‘मस्ती कंडोम’ हे एक अशाच प्रकारचं कॅम्पेन होतं. पण, त्याला लोकांचा तितका प्रतिसाद मिळाला नव्हता.
लोकप्रिय सिनेमांचा जसा दुसरा भाग निर्माण करण्याची प्रथा सध्या सुरू आहे तसं ‘बलबीर पाशा’ हे कॅम्पेन एड्स किंवा इतर कोणत्या साथीच्या रोगासाठी परत सुरू करण्यात येईल का ? याकडे सध्या पूर्ण जाहिरात क्षेत्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
—
- ९० च्या दशकातल्या ‘या’ जाहिराती लागल्या की पालक लगेच टीव्हीचा रिमोट शोधायचे!
- संस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका, मनावर वाईट संस्कार होतील…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.