Site icon InMarathi

स्मिता पाटील यांनी आपल्या मृत्युची केलेली भविष्यवाणी दुर्दैवाने खरी ठरली…

smita patil im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्मिता पाटील, हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक मनस्वी स्वप्न. स्वप्न म्हणलं की त्यांचं तुटणंही गृहित धरावं लागतंच आणि दुर्दैवानं स्मिता नावाचं सावळं, सुहास्यवदनी स्वप्न अवघ्या तिशीत नियतीने क्रुरपणे संपविलं. मात्र याची चाहूल तिला आधीच लागली होती का? वयाच्या ३१ व्या वर्षी, लहानग्याला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही दिवसात हे जग सोडून जाणार असल्याचं भाकीत तिने आधीच केलं होतं का? मन विचलित करणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने होकारार्थी आहे.

 

 

एका राजकारण्याच्या घरात जन्मलेल्या स्मितानं चित्रपटसृष्टित येणं, करियर करणं हे सगळं चमत्कारीकच होतं. एकदम साधी रहाणी असणार्‍या आणि भिन्न विचार संस्कृती असणार्‍या मध्यमवर्गिय मराठी संस्कारात वाढलेली स्मिता पहिल्यापासूनच मनस्वी होती.

आपल्या नैसर्गिक अभिनयानं तिनं त्या काळातील समांतर चित्रपटांत एक अढळ स्थान मिळविलं होतं. श्याम बेनेगल असो की जब्बार पटेल, स्मिता खेरीज इतर कोणाचा ते विचारही करु शकत नसत इतकी तिनं आपली पकड ठेवली होती. आर्ट फिल्मची राणी होती स्मिता! व्यावसायिक चित्रपटांतूनही तिनं भूमिकाही केल्या आणि त्या गाजल्याही मात्र तिचं खरं साम्राज्य होतं, समांतर चित्रपट!

मात्र याच स्मिता पाटील यांनी केलेली अनेक भाकीतं खरी ठरल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये नेहमीच होती.

लिफ्टमध्ये जात असताना एका परदेशी व्यक्तीला बघून तिनं सांगितलं होतं की याचा खांदा अपघातात दुखावला आहे. चौकशी केल्यानंतर यात सत्य असल्याचं आढळलं होतं.असाच किस्सा अमिताभ यांच्या बाबतीतही घडला होता जो सर्वश्रुत आहे.

अमिताभ बेंगलोरला शुटींग करत होते. मध्यरात्री कधीतरी हॉटेलमधील कर्मचारी त्यांना बोलवायला आला. गाढ झोपेतून उठवल्यामुळे अमिताभची चिडचिड होत होती मात्र त्या कर्मचार्‍यांनं सांगितलं की रिसेप्शनवर त्यांच्यासाठी स्मिता पाटील यांचा फोन असून त्यांना अमिताभ यांच्याशी तातडीनं बोलायचं आहे.

 

 

इतक्या अपरात्री स्मितानं फोन केला म्हणजे तसंच काहीतरी गंभीर असणार हे जाणून अमिताभनी फोन घेतला. पलिकडे स्मिता काळजीच्या आवाजात त्याची चौकशी करत होती. ”तब्येत ठीक आहे का? सगळं ठीक आहे नां?” याची काळजी तिच्या प्रश्नातून दिसत होती.

अमिताभनी याचं कारण विचारल्यावर तिनं सांगितलं की ती आत्ताच एका दू;स्वप्नातून जागी झाली आहे. तिनं अमिताभ यांच्या जिवाला धोका असल्याचं स्वप्नात पाहिलं आणि हे ऐकल्यापासून चित्त थार्‍यावर नसल्याचे तिनं कबुल केलं.

हे ऐकून अमिताभ हसायला लागला आणि त्यानंच तिची समजूत काढली. स्वप्नच होतं ते आणि स्वप्नं खरी नसतात असं सांगून त्यानं तिला काळजी न करण्यास सांगितलं. तरिही फोन ठेवताना स्मिता चार-चारदा त्याला स्वत:ची काळजी घेण्याबाबत कळवळून सांगत होती कारण तिला स्वत:ला हे माहीत होतं की तिला अशुभाची चाहूल लागली होती.

दुसर्‍या दिवशी नेहमीप्रामाणे अमिताभ सेटवर चित्रीकरणासाठी गेला असताना त्याला अपघात झाला. असा अपघात ज्यानं अमिताभचा जीव धोक्यात आला होता.

 

 

राज बब्बरशी लग्न केल्यानंतर स्मिताला प्रचंड प्रमाणात झालेल्या टिकेला सामोरं जावं लागलं होतं. मात्र स्मिता आपल्या भूमिकेवर ठाम होती. तिच्या मते राजच्या आयुष्यात ती आली तेंव्हा त्याचा संसार संपलेला होता, त्या दोघांचं नातं संपलेलं होतं त्यामुळे नादिरा-राज च्या संसारात ती खलनायिका ठरण्याचा, त्यांचं लग्न तुटायला कारण बनण्याचा प्रश्न नाही.

ती राजवर मनापासून प्रेम करायची. एक मूल, छोटसं घर आणि प्रेम करणारा नवरा इतकंच तिचं स्वप्न होतं. ना तिला सिनेमाच्या झगमटाचं आकर्षण होतं की ऐशोआरामाच्या जगण्याचं!

 

 

स्मितानं बाळंतपणात स्त्रियांचे मृत्यू होत त्यासंबंधात जागृती कार्य सुरु केलं होतं. वडिलांचं समाजकारण तिच्या रक्तात उतरलं होतं.

स्मिताला नव्या पाहुण्याची चाहूल लागली आणि तिनं नेहमी पाहिलेलं स्वप्न तिच्या हातभर अंतरावर येऊन उभं होतं. सगळं काही दृष्ट लागण्यासारखं चाललेलं असतानाच खरंच या सुखी चित्राला दृष्ट लागली.

प्रसुतीनंतरच्या गुंतागुतींमुळे स्मिताची तब्येत ढासळत गेली. या दरम्यानही तिनं तिची मैत्रीण पूनम धिल्लन हिला फोनवर बोलताना आपला अंत जवळ आल्याचं बोलून दाखविलं. पूनमनं तिची समजूत काढत ”बाळंतपणानंतर अशी विचित्र मनस्थिती होते, तू जास्त विचार करू नको” असंही सांगितलं. मात्र नेहमी असते तशीच याही वेळेस स्मिताला आपल्याला लागलेल्या अशुभाची चाहूल उगाचंच नाही याची खात्री होती.

आपण गेल्यानंंतर आपला मृतदेह एखाद्या नववधु सारखा सजवावा, ही इच्छाही तिने मृत्युपुर्वीच व्यक्त केली होती. अर्थात याचाच अर्थ तिला मृत्युची कल्पना आधीच आली होती.

तिने ही इच्छा व्यक्त केल्यावर प्रत्येकाने तिला सजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आपल्या म्हणण्यावर ठाम होती, जणूकाही तिनं भविष्य पाहिलं होतं.

 

 

मांडलेला संसार तसा अर्धवट टाकून ही मनस्वी मुलगी वयाच्या तिशीlच या जगाचा निरोप घेऊन गेली. मागे उरलं तिचं प्रतिक नावाचं तान्हं स्वप्न, जगानं शिव्याशाप दिलेला, तिला खलनायिका ठरविलेला अर्धवट उरलेला संसार आणि भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मोलाची भर घालणार्‍या तिच्या भूमिका!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version