Site icon InMarathi

माणसाला त्याचा ‘माणूस’ म्हणून जन्म इतका नकोसा झालाय का? वाचा ‘केन डॉल आणि बारबी’ची दुः खद कहाणी!

barbie im 4

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लहान मुलांची खेळणी ही दिवसेंदिवस ‘हायटेक’ होतांना आपण बघतोय. कित्येक वर्षांपासून चीनचं वर्चस्व असलेल्या या खेळणीच्या व्यवसायात मागील दोन वर्षात काही भारतीय उद्योजक सुद्धा उतरले आहेत हे बघणं सुखावह आहे. मुलांच्या बदलत्या आवडी निवडींप्रमाणे खेळणी नेहमीच बदलत राहतील. पण, ‘बार्बी डॉल’ हे एक असं खेळणं आहे जे वर्षानुवर्षे आपल्या लहान मुलींच्या हातात दिसत आलं आहे आणि दिसत राहील.

लहान मुलींची लाडकी असलेल्या ‘बार्बी’ला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालणे, तिला सजवणे, सोबत घेऊन फिरणे हे कायमच लहान मुलींना आनंद देत आलं आहे. नवा ‘जोकर’ किंवा जुन्या ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमांत दाखवलेल्या जोकर प्रमाणे या बार्बीची सुद्धा आपली एक करुणामयी कथा आहे हे आपल्याला कदाचित माहीत नसेल.

 

history.com

‘बार्बी डॉल’ म्हणून कायम हसतमुखाने मिरवणाऱ्या मुलीच्या मागे खरा चेहरा कोणाचा आहे ? काय आहे तिची एखाद्या सिनेमाला शोभेल अशी स्टोरी ? जाणून घेऊयात.

कोण आहे बार्बी डॉल ?

‘बार्बी डॉल’ ही बाहुली तयार करण्याचं श्रेय हे ‘मत्तेल आयएनसी’ या खेळणी तयार अमेरिकन कंपनीला दिलं जातं. ‘रूथ हँडलर’ या महिलेने मार्च १९५९ या कंपनीची स्थापना केली होती.

बार्बी डॉल ही सर्वप्रथम ९ मार्च १९५९ रोजी जगासमोर सादर करण्यात आली होती. रूथ यांना बार्बीची संकल्पना १९५५ मध्ये जर्मनी मध्ये निर्माण करण्यात आलेल्या ‘बिल्ड लिली’ या फॅशन बाहुलीला बघून सुचली होती. आज ६३ वर्षांनंतर सुद्धा बार्बी ही खेळण्याच्या विश्वातील सर्वात जास्त खपणारी ‘डॉल’ आहे.

 

 

१५० देशांमध्ये पोहोचलेली ‘बार्बी’ ही एका सेकंदात ३ या गतीने विकली जात असल्याचा दावा कंपनीने केला आहे. केवळ बाहुली म्हणूनच नाही तर हा ‘ब्रँड’ कपडे विक्रीत सुद्धा नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस पडला आहे.

बार्बी ही अशी एकमेव खेळणी आहे जिच्यावर एक २००१ मध्ये कार्टून फिल्मची सिरीज तयार झाली होती. ही सिरीज २००२ ते २०१७ पर्यंत निकोलोडियन या टीव्ही चॅनलवर प्रदर्शित करण्यात आली होती. खेळण्याच्या जगात ‘केन’ आणि ‘बार्बी’ यांना नेहमीच बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असं दाखवण्यात आलं आहे.

आजच्या जगातली ‘बार्बी’ कोण आहे ?

वलेरिया लुकिनोव्हा हे त्या युक्रेनियन मॉडेलचं नाव आहे जिला आजच्या जगातील ‘बार्बी’ डॉल म्हणून संबोधलं जातं. वलेरिया लुकिनोव्हाचा जन्म २३ ऑगस्ट १९८५ रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियन मधील तिरासपोल या गावात झाला होता. वलेरिया लुकिनोव्हा या मुलीचं दिसणं, वावरणं आणि राहणीमान यांचं बार्बी डॉल सोबत प्रचंड साधर्म्य आहे.

 

 

५ फुट ७ इंच इतकी उंची असलेल्या या मॉडेलने इतक्या वर्षांपासून आपली फिगर ही ‘३४-१८-३४’ अशीच ठेवली आहे ही एक कमाल आहे. ‘बार्बी’च्या निर्मात्यांच्या मते, ‘बार्बी डॉल’ जर प्रत्यक्षात असली तर तिची फिगर ही ‘३९- १८-३३’ अशी असली असती. वलेरिया लुकिनोव्हा हिने ही फिगर कमावण्यासाठी कित्येक दिवस हे केवळ हवा आणि सूर्यप्रकाशावर दिवस काढल्याचं तिने सांगितलं आहे. या प्रकारच्या जगण्याला ‘ब्रिथ्ररीयन’ म्हणजेच श्वासोत्छवासावर जगणारे लोक म्हणतात.

आजची ‘बार्बी’ जगासमोर कधी आली ?

वलेरिया लुकिनोव्हा ही २००७ मध्ये सर्वप्रथम प्रसार माध्यमांच्या नजरेस पडली जेव्हा तिने ३०० स्पर्धकांमधून ‘मिस डायमंड क्राऊन ऑफ द वर्ल्ड’ हा किताब जिंकला होता. रशियन मीडियाने या बार्बी सारख्या दिसणाऱ्या मॉडेलचे विविध फोटो प्रकाशित केले आणि जगाला जणू बाहुलीतून अवतरलेल्या वलेरिया लुकिनोव्हा बद्दल कळलं.

करिअर:

मॉडेलिंग सोबतच वलेरिया लुकिनोव्हाने संगीत क्षेत्रात सुद्धा करिअर करण्याचा प्रयत्न केला होता. २०१३ मध्ये वलेरियाचा ‘सन इन द आईज्’ हा संगीत अल्बम प्रकाशित झाला होता. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद बघता वलेरियाने सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला होता. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डॉल’ या सिनेमात तिने प्रमुख भूमिका केली होती.

 

 

जगातील सर्वात ‘परफेक्ट’ व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होण्यासाठी तिने नाकाची, तोंडाची प्लास्टिक सर्जरी केल्याचं सांगितलं जातं. पण, तिने कधीच या गोष्टीला दुजोरा दिला नाही. “मी केवळ छातीवर शस्त्रक्रिया केली आहे” असं वलेरिया लुकिनोव्हाने आपल्या प्रत्येक मुलाखतीत म्हंटलं आहे.

आजच्या ‘बार्बी’कडे यश, श्रीमंती, पैसा, खेळण्यातील ‘केन’ सारखा बॉयफ्रेंड आहे. पण, तरीही तिची गोष्ट आनंदी शेवटअसणारी नाहीये हे सत्य आहे.

आजच्या जगातील ‘केन’:

वलेरिया लुकिनोव्हाचा ‘केन’ या बाहुली सोबत साधर्म्य असलेल्या बॉयफ्रेंडचं खरं नाव जस्टीन जेडलिका आहे. तो न्यूयॉर्कचा आहे. आपण ‘केन’ या बाहुली सारखे दिसतो हे कळल्यावर या मॉडेलने एकूण ७८० प्लास्टिक सर्जरी करून हे रूप मिळवलं आहे. ‘केन’ सारखं दिसण्यासाठी जेव्हा त्याने शरीरावर पहिली शस्त्रक्रिया केली तेव्हा काही काळासाठी त्याचा शरीराचा एक भाग अधु झाला होता.

‘केन’ म्हणून आज वावरणारा जस्टीनच्या शरीरातील मसल्स, बायसेप्स, सिक्स पॅक हे सगळंच प्लास्टिकचं आहे. हे सर्व त्यांच्या चाहत्यांना माहीत आहे. पण, तरीही त्यांचं जस्टीन आणि वलेरिया यांच्यावरचं प्रेम कमी होत नाही हे जाहिरात क्षेत्रासाठी सुद्धा मोठं आश्चर्य आहे.

 

पैसा, प्रसिद्धी अगदी क्षणात धुळीला मिळू शकते, हे या ८ जणांकडे बघून लक्षात येतं…

पाकिटमार ते बिकिनी किलर: तिहार फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा थरारक जीवनपट!

वलेरिया लुकिनोव्हा आणि जस्टीन यांची प्रत्यक्ष भेट फेब्रुवारी २०१३ मध्ये एका टीव्ही शोच्या शुटिंगच्यावेळी झाली होती. जस्टीनने या ‘टीव्ही शो’ मध्ये काम केल्यानंतर “वलेरिया ही एक खोटी, प्लास्टिक व्यक्ती आहे” असं विधान केलं होतं. ज्याला वलेरियाने प्रत्युत्तर दिलं होतं की, “जो स्वतः पूर्ण प्लास्टिकने तयार झाला आहे, त्याने माझ्यावर काही कमेंट करण्यापूर्वी आधी स्वतःकडे बघावं.” अशी या दोघांची पहिली ओळख झाली होती. पण, नंतर ते एकमेकांचे चांगले मित्र झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

दोघांमधील प्रेम त्यांच्या फोटो, मुलाखतीतून नेहमीच प्रतीत व्हायचं. “आपलं एक ड्रीम हाऊस असावं” अशी इच्छा या दोघांनी प्रत्यक्ष एकत्र आल्यावर व्यक्त केली होती. पण, ‘भातुकलीच्या खेळाप्रमाणे’ ही कहाणी सुद्धा अर्धवट राहिली याला त्यांचे चाहते दुर्दैव मानतात.

खेळण्याच्या जगप्रमाणे जस्टीन आणि वलेरिया यांचा हा वाद खोटा असावा आणि शेवटी त्यांनी एकत्र यावं, त्यांच्या ‘ड्रीम हाऊस’ मध्ये रहावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण, अमेरिका आणि युक्रेनमध्ये वाढलेल्या या दोघांची मनं कधी जुळलीच नाहीत.

दोघांचाही स्वभाव अगदीच एकसारखा असल्याने दोघांनीही एकमेकांना कधीच मान्य केलं नाही. जस्टीन हा गे असल्याने हे नातं पुढे सरकू शकलं नाही असं देखील काही अमेरिकन टिव्ही कार्यक्रमात सांगण्यात आलं आहे.

२०१२ मध्ये वलेरिया लुकिनोव्हाने युक्रेनच्या एका व्यवसायिकासोबत लग्न केलं आणि जस्टीन आणि तिच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला.
“आपण आयुष्यभर असंच फिट रहाणार आणि त्यासाठी मी कधीच आई होणार नाही” असं वलेरिया लुकिनोव्हाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

“आपल्या व्यवसायिक आयुष्यासाठी आपण स्वतःमध्ये किती बदल करू शकतो ?” असा प्रश्न या दोन सजीव असूनही बाहुलीप्रमाणे रहाणाऱ्या लोकांबद्दल वाचल्यावर पडतो. मनासारखं जगण्यासाठी इतकं मन मारून जगावं लागतं हे यांच्याकडे बघितल्यावर नव्याने कळतं.

शरीरावर इतक्या भरमसाठ शस्त्रक्रिया, कायम ‘प्लास्टिक स्माईल’ सोबत ठेवून फिरणे, मनाचा विचार न करणे इतकी किंमत मॉडेलिंग करण्यासाठी द्यावी लागते हे सत्य क्वचितच आपल्यासमोर येतं. अशी ‘बार्बी’ आणि असा ‘केन’ खेळातच बरा आहे असं आपल्याला सुद्धा वाटलं असणार हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version