आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
मित्रांच्या गोष्टी आपण अनेकदा ऐकल्या आहेत.
दोन मित्र, त्यांची दोस्ती, त्यांनी एकमेकांसाठी केलेलं शौर्य यांचे किस्से ऐकले असतील. शोलेसरख्या चित्रपटांनी ये दोस्ती हम नही तोडेंगे यांसारखी गाण्यांतूनही दोस्तीची व्याख्या सांगितली.
मात्र आज आम्ही तुम्हाला जगावेगळ्या दोस्तांची गोष्ट सांगणार आहोत.
चीनच्या येली गावात राहणारे Jia Haixia आणि Jia Wenqi हे दोन मित्र. दुर्दैवाने दोघांच्या नशिबी अपंगत्व आले.
एक दोन्ही हाताने अधू तर दुसरा दृष्टीने! पण अश्या परिस्थितीतही ते करत असलेले कार्य पाहून तुमच्याही तोंडून त्यांच्यासाठी नकळत गौरवोद्गार निघतील.
गेल्या १५ वर्षांपासून या दोन मित्रांनी आपले जीवन पर्यावरणाला समर्पित केले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. या दोघांनी स्वत:च्या हिंमतीवर तब्बल ३ हेक्टर जमिनीवर वृक्षारोपण केले आहे.
यामागे त्यांचा एकाच उद्देश आहे तो म्हणजे आपले गाव नैसर्गिकदृष्ट्या संतुलित राहो आणि नेहमी ताजी हवा गावात खेळती राहो.
आपल्याला निसर्गानं सारं काही देऊनही आपण अनेकदा निराश होतो, आपलं काम पुर्ण न करण्याची कारणं देतो,
मात्र प्रत्यक्षात या दोस्तींची कथा ऐकली की आपल्याला नवे स्फुरण येईल.
Jia Wenqi चे दोन्हीही हात नाहीत, तर Jia Haixia हा दृष्टीने अंध आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून दोघे एकमेकांचे हात आणि डोळे म्हणून वावरत आहेत.
दोघेही रोज हातोडी आणि लोखंडी रॉड घेऊन जंगलात जातात. Jia Wenqi पुढे चालतो आणि त्यामागे Jia Haixia त्याचे शर्ट पकडून त्याच्या मागोमाग मार्गक्रमण करतो.
मित्र हे एकमेकांचा आधार होतात, हे आपण ऐकलं होतं, पण त्याचं खरोखर उदाहरण ऐकायचं असेल, तर मित्रांची कथा ऐपण ऐकलीच पाहिजे.
त्यांना रस्त्यात एक नदी लागते, जेव्हा या नदीजवळ दोघे येतात तेव्हा Jia Wenqi हा Jia Haixia ला आपल्या पाठीवर उचलून घेतो, जेणेकरून Jia Haixia नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ नये.
मैत्री म्हणजे विश्वास असं आपण म्हणतो, मात्र हा सुविचार प्रत्यक्षात आणला तो या दोघांनी
दोघांचा एक दुसऱ्यावर गाढ विश्वास आहे. त्यामुळेच दोघ एकमेकांना उत्तमरीत्या सांभाळतात.
दोघे लहानपणापासून एकत्रच वाढले, परंतु शिक्षणामुळे त्यांची ताटातूट झाली. Jia Haixia हा लहानपणी एकाच डोळ्याने अधू होता, परंतु २००० साली तो ज्या कारखान्यात काम करत होतो, तेथे घडलेल्या एक दुर्घटनेमध्ये त्याला आपला दुसरा डोळाही गमवावा लागला.
तर Jia Wenqi ला वयाच्या ३ ऱ्या वर्षीच दोन्ही हातांना मुकावे लागले.
त्याने चुकून एका विजेच्या तारेला दोन्ही हातांनी स्पर्श केला आणि त्या दुर्दैवी प्रसंगात त्याचे दोन्ही हात निकामी झाले,
पण हार न मानता तेव्हापासूनच त्याने हातांशिवाय काम करण्यास सुरुवात केली, आणि आज तो बहुतेक गोष्टी हातांविना सहज करतो.
पुन्हा जेव्हा ते एकत्र आले, तेव्हा दोघांच्या आयुष्यात काही खास सुरु नव्हतं, नोकरी कोणी देत नव्हतं.
शेवटी वनविभागाने त्यांना लहानसहान गोष्टींसाठी मदत होईल म्हणून कामावर ठेवलं.
हळूहळू दोघांनी वृक्षारोपण शिकून घेतले, त्यांना झाडांबद्दल प्रेम वाटायला लागलं.
पोटच्या पोराप्रमाणे दोघे झाडांची काळजी घेतात. याच प्रेमातून त्यांनी एक उजाड जमीन भाड्याने घेतली आणि त्यावर झाडे लावण्यास सुरुवात केली.
मुख्य म्हणजे ही झाडचं पुढे भविष्यात आपल्याला आधार देतील अशी दोघांना अशा आहे. या झाडांच्या मार्फतच आपले अर्थार्जन सुखरूप चालेल असा विश्वास दोघ व्यक्त करतात.
त्यांच्या या वृक्षारोपण उपक्रमात गावकरी देखील सढळ हस्ते मदत करतायत.
दोघांनी सुरु केलेल्या या कार्याने या गावाच्या आसपासच्या प्रांतात जणू चळवळ उभी केली आहे. या दोघांनी खऱ्या अर्थाने लोकांसमोर आदर्श उभा केला आहे.
त्यांच्या मैत्रीचे दाखले आजही जगभरात दिले जातात. केवळ मैत्री म्हणूनच नव्हे तर पर्यावरणाशी बांधिलकी जपण्याचं कामही ते करतात.
शारिरीक अपंगत्व असूनही संकटाशी दोन हात करत आपलं आयुष्य आनंदी कसं जगावं याची शिकवण ते देतात.
आपणही याबाबत जास्तीत जास्त सकारात्मक असणं गरजेचं आहे. किंबहुना या जोडीची कथा वाचून आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.