Site icon InMarathi

समाजाची सर्व बंधने झुगारून ही मराठमोळी स्त्री बनली भारताची पहिली महिला डॉक्टर!

Dr Anandibai Joshi im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपला भारत देश पुरुषप्रधान असल्याने प्रत्येकवेळी स्त्रियांना कमी लेखले जात होते. तेव्हाचं सोडा, आजही काही खेड्यापाड्यांत स्त्रियांना महत्त्व दिले जात नाही, परंतु भारतीय स्त्रियांनी प्रत्येकवेळी काहीतरी वेगळे करून सगळ्यांचाच तोरा उतरवला आहे. कित्येक भारतीय स्त्रियांनी विलक्षण असे कार्य करून देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे. त्याच स्त्रियांपैकी एक म्हणजे – आनंदीबाई गोपाळ जोशी!

या आनंदीबाई म्हणजे भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होतं. काय? ऐकून आश्चर्य वाटलं ना? हो एक मराठमोळी स्त्री भारताची पहिली महिला डॉक्टर होती. त्यांनी १८८६ मध्ये थेट अमेरिकेमधून डॉक्टरकी मिळवली होती.

commons.wikimedia.org

आनंदीबाईंचा जन्म सनातनी ब्राम्हण कुटुंबात झाला. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचे गोपाळरावांशी लग्न झाले. गोपाळराव विधुर होते आणि वयाने आनंदीबाईंपेक्षा तिप्पट मोठे होते. आनंदीबाईंचे पती गोपाळराव जोशी हे उदारमतवादी होते. त्यांनी नेहमी आपल्या पत्नीच्या मागे खंबीरपणे उभे राहून तिचा विश्वास वाढवला. त्यांनी नेहमी आनंदीबाईना प्रेरणा देण्याचे काम केले. वयाच्या १४ व्या वर्षी प्रसूतीच्या वेळी वैद्यकीय संसाधने उपलब्ध नसल्याने आनंदीबाईना त्यांच्या पहिल्या मुलाला गमवावे लागले. त्याच क्षणाला त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरवले. गोपाळरावांनी सुद्धा आपल्या बायकोला शिकवण्याचे ध्येय मनाशी बाळगले आणि तिच्या मागे खंबीरपणे उभे राहून तिचे प्रत्येक पाऊलावर समर्थन केले.

त्यावेळी स्त्रियांचे शिक्षण कुणीही गंभीरपणे घेत नसे. परंतु गोपाळराव त्यामधील नव्हते. त्यांनी आनंदीबाईंशी एका अटीवर लग्न केले होते की, मुलीने शिक्षण घेण्यास तयार असावे, तसेच किमान तिने लिहिता वाचता येईल एवढे तरी शिकावे.

गोपाळरावांनी आनंदीबाईंना मराठी, इंग्रजी आणि संस्कृत कशी लिहितात आणि वाचतात त्याचे शिक्षण दिले. आनंदीच्या आई–वडिलांनी तिच्या शिक्षणामध्ये हस्तक्षेप करू नये, म्हणून गोपाळरावांनी आपली बदली कोलकत्त्याला करून घेतली. गोपाळराव आनंदीच्या शिक्षणासाठी नेहमी आग्रही असायचे.

tnmgc.com

एके दिवशी त्यांनी आनंदीबाईना स्वयंपाकघरात त्यांच्या आजीची मदत करताना पहिले, अभ्यास न करता स्वयंपाक करण्यात वेळ वाया घालवताना बघून गोपाळरावांना राग आला आणि त्यांनी आनंदीबाईना बांबूच्या काठीने मारले.

हळूहळू आनंदीबाईंना देखील शिक्षणाची गोडी लागली. पण या सर्व प्रवासात त्यांनी खूप हालअपेष्टा देखील सोसल्या. १८८० मध्ये गोपाळरावांनी प्रसिद्ध अमेरिकन मिशनरी रॉयल विल्डर यांना पत्र पाठवले. त्या पत्रात त्यांनी आपल्या पत्नीची अमेरिकन औषधांचा अभ्यास करण्याची इच्छा आहे तर तिला काही मदत मिळू शकते का असे? असे विचारले होते.

रॉयल विल्डरने आनंदीबाईंना मदत मिळावी म्हणून ही बातमी एका लेखाद्वारे स्थानिक वर्तमानपत्रात छापली. त्याच दरम्यान न्यू जर्सीतील एक श्रीमंत अमेरिकन थिऑडीसिया कारपेंटर याने हा लेख वाचला आणि ती आनंदीबाईंची औषधांविषयी शिकण्याची असणारी डोंगराएवढी कळकळ बघून त्यांनी आनंदीबाईंना मदत करण्याचे ठरवले.

१९ वर्षाच्या आनंदीबाईंनी पेनीसिल्व्हेनियातील महिला वैद्यकीय महाविद्यालयात (सध्या ड्रेक्सेल विद्यापीठ, वैद्यकीय विद्यालय म्हणून ओळखले जाते) प्रवेश घेतला. शिक्षण घेताना आनंदीबाईंचे आरोग्य नेहमी बिघडायचे. पण त्यावर मात करत १८८६ मध्ये त्यांनी एम.डी.ची पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर खुद्द राणी विक्टोरिया हिने अभिनंदनाचा संदेश आनंदीबाईंना पाठवला. प्राचीन हिंदू स्त्रियांच्या प्रसूतीकरणावर अभ्यास करून आनंदीबाईंनी आपला प्रबंध पूर्ण केला.

पण दुर्दैव असे की, ज्या कार्यासाठी त्यांनी एवढे शिक्षण घेतले होते ते वाया गेले, कारण २२ फेब्रुवारी १८८७ रोजी,वयाची २२ वर्ष पूर्ण होण्यास महिन्याभरच कालावधी उरला असताना त्यांचे निधन झाले. जणू देवाच्या मनात त्यांच्या हातून सत्कार्य व्हावे असे विधीलिखित लिहिले गेलेच नव्हते. आनंदीबाईंच्या अस्थी अमेरिकेत त्यांचा पाहुणचार करणाऱ्या मिसेस कारपेंटर यांना पाठवण्यात आल्या. त्यांनी त्या न्यूयॉर्क जवळील दफनभूमी मध्ये ठेवल्या आहेत.

thebetterindia.com

समस्त स्त्री जातीला प्रेरणा देणाऱ्या या नारीबद्दल १८८८ मध्ये कॅरोलाइन वेल्स हिने चरित्र लिहिले होते. दूरदर्शनने आनंदीबाई यांच्या जीवनावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ नावाची हिंदी मालिका देखील प्रदर्शित केली होती. श्रीकृष्ण जनार्दन यांनी आपल्या ‘आनंदी गोपाळ’ या कादंबरीमध्ये आनंदीबाईंच्या जीवनाचा आढावा घेणारा लेख लिहिला आहे. (आशा कादले यांनी या कादंबरीचे इंग्रजीमध्ये संक्षिप्त भाषांतर केले आहे). राम.जी.जोगळेकर यांनी याच नावाने कादंबरीवर आधारित एक नाटक देखील बसवले होते.

अगदी खडतर परिस्थितीवर मात करीत पतीच्या मार्गदर्शनाने आणि साथीने आनंदीबाईंनी भारताची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. त्यांच्या लहानग्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य म्हणजे प्रत्येक भारतीय स्त्री साठी आदर्श आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version