आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पनीरपासून बनवलेले पदार्थ हे आपल्या बहुतेकांचे आवडते असतात. लग्नाच्या बुफेमध्ये हमखास एक पनीरची भाजी असतेच. बरेच जण आवडीने घरीदेखील पनीरच्या रेसिपीज बनवतात.
अगदी डाएटमध्येही काही जण योग्य प्रमाणात पनीरचा समावेश करतात. जे नॉन व्हेज खात नाहीत त्यांच्यासाठीही काहीतरी मसालेदार बनवून खाण्याकरता पनीरचा पर्याय असतो. आपण साधारणपणे गाय किंवा म्हशीच्या दुधापासून बनवलेलं पनीर खातो. बकरीच्या दुधापासूनही पनीर बनवलं जातं.
भारतात आपल्याला सुमारे ३०० ते ६०० रुपये भावाने एक किलो पनीर डेअरीमध्ये मिळतं. पण एखाद्या देशात अगदी सोन्याच्या भावाइतकं महाग पनीर मिळत असेल अशी कल्पना आपण कुणीही केली नसेल.
याचसंदर्भातली एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे. युरोपमधील सर्बिया देशात गाढविणीच्या दुधापासून पनीर बनवलं जातं आणि ते एक किलो पनीर सुमारे ८०,००० रुपयांना विकलं जातं.
गाय, म्हैस आणि बकरीच्या दुधापासून बनवललेल्या पनीरपेक्षा गाढविणीच्या दुधापासून बनवलेलं पनीर अतिशय उत्तम दर्जाचं आणि फायदेशीर समजलं जातं. गाढविणीच्या दुधापासून बनवलेलं पनीर इतकं महाग का असतं? जाणून घेऊ.
एका अहवालानुसार, युरोपमधील उत्तर सर्बियात ‘झासाविका स्पेशल नेचर रिझर्व्ह’ नावाचं एक फार्म हाऊस आहे. स्लोबोदान सिमिक नावाची व्यक्ती हे फार्म हाऊस चालवते. त्याने त्याच्या पार्कमध्ये २०० हून अधिक गाढविणी पाळल्या आहेत.
या गाढविणींच्या दुधापासून बऱ्याच प्रकारची उत्पादनं तयार केली जातात. पण या दुधापासून बनणारं पनीर अतिशय उत्तम दर्जाचं म्हणून जगप्रसिद्ध आहे. हे पनीर मोठ्या प्रमाणावर बनवलं जात नाही त्यामुळे ते फार दुर्मिळ असतं. त्याची किंमत आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतकी जास्त आहे.
आपल्याआधी कुणीही गाढविणीच्या दुधापासून पनीर बनवलं नव्हतं. गाढविणीच्या दुधापासून पनीर बनवणारे आपण पहिलेच आहोत असा दावा सिमिक यांनी मीडियाशी बोलताना केला. या उत्पादनावर आपला अधिकार आहे असं ते समजतात. गाढविणीच्या दुधात पनीरच्या बाइंडिंगसाठी आवश्यक असलेल्या कॅसिनचं प्रमाण कमी होतं ही या दुधापासून पनीर बनवण्यातली पहिली समस्या होती असं सिमिक यांनी सांगितलं.
नंतर आपल्या फार्म हाऊसच्या एका सदस्याच्या मदतीने सिमिक यांनी यावर एक तोडगा काढला आणि या दुधात काही प्रमाणात बकरीचं दूध मिसळलं तर त्यापासून पनीर बनवता येतं हे त्यांच्या लक्षात आलं. गाढविणीच्या दुधापासून बनवलेलं हे पनीर पांढऱ्या रंगाचं, व्यवस्थित घट्ट आणि चविष्ट असतं.
भारतातल्या जर्सी गायीची दिवसाला ३० लिटर दूध देण्याची क्षमता असते. पण गाढविणीने दिवसाला एक लिटर दूध देणंही कठीण असतं. याच कारणामुळे या फार्ममधल्या सगळ्या गाढविणी जे दूध देतात त्यातून केवळ १५ किलो पनीर बनवता येतं.
सगळ्याच गाढविणींच्या दुधापासून उत्तम प्रकारचं आणि महागडं पनीर मिळत नाही. बाल्कन प्रजातीची जी गाढवं असतात त्यांच्यापासून मिळणारं दूधच सगळ्यात पौष्टिक समजलं जातं. सर्बिया आणि मॉंटेनेग्रोमध्ये या प्रजातीची गाढवं प्रामुख्याने आढळतात.
सर्बियातील पनीर उत्पादकांच्या म्हणण्यानुसार आईच्या दुधात जे गुण असतात तेच गाढविणीच्या दुधात असतात. एखाद्या नवजात बालकाला त्याचा जन्म झाल्याच्या दिवसापासूनच हे दूध देता येऊ शकतं. या दुधात अनेक प्रकारची पौष्टिक तत्त्वं असतात.
—
- दूध मिळावं म्हणून माणूस गौ-मातेला ज्या यातना देतो त्या पाहून मन सुन्न झाल्याशिवाय रहाणार नाही…
- आता अमेरिकेत सुद्धा प्रचंड मागणी असलेल्या पनीरचा रंजक इतिहास..
—
ज्यांना गायीच्या दुधाची एलर्जी असते ते गाढविणीचं दूध किंवा पनीर खाऊ शकतात. अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस झालेल्यांनी हे दूध प्यायलं तर त्यांना बराच फायदा होऊ शकतो. फार्मच्या म्हणण्यानुसार या दुधाचं उत्पादन कमी होतं. पण गाय आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या पनीरच्या तुलनेत गाढविणीच्या दुधापासून बनवलेल्या पनीरमध्ये काही विशेष गुण असतात त्यामुळे या पनीरला जगात मागणी आहे.
उत्पादन कमी त्यामुळे ते दुर्मिळ आहे आणि इतके जास्त गुणधर्म असल्यामुळे हे एक किलो पनीर साधारण ७८,००० रुपयांना मिळतं. सर्बियातलं हे फार्म वर्षाला ६ ते १५ किलो पनीर विकतं. जगातल्या केवळ काहीच देशांमध्ये गाढविणीच्या दुधापासून बनवलेल्या पनीरचं उत्पादन केलं जातं.
२०१२ साली सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविच या पनीरचं सेवन करत असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यानंतर जगभरात या पनीरविषयीच्या चर्चांना उधाण आलं.
मात्र नंतर जोकोविचने त्याच्याविषयीच्या या बातम्या खोडून काढल्या. अजूनपर्यंत या दुधावर वैज्ञानिक संशोधन झालेलं नाही त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने याच्या असलेल्या फायद्यांविषयी आणि गुणांविषयी ठोसपणे सांगता येत नाही.
विदेशी लोक आणि पर्यटक हे पनीर जास्त करून खरेदी करतात. सर्बियाच्या फार्ममध्ये गाढविणीच्या दुधापासून साबण आणि दारूदेखील बनवली जाते.
आधीच फारच मर्यादित प्रमाणात तयार होणारं आणि त्यात जगात मागणी असणारं हे पनीर नक्कीच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. आपल्या देशातली बडी मंडळी आणि सेलिब्रिटीज जरी काही काळाने या पनीरचं सेवन करत असल्याच्या बातम्या समोर आल्या तरी आश्चर्य वाटणार नाही.
मात्र, पनीर आणि त्याच्या किंमतीची कल्पना केली की डोळ्यांसमोर नाचणाऱ्या आकड्यापेक्षा बराच अधिक मोठा आकडा एखाद्या प्रकारच्या पनीरचा असू शकतो याची जाणीव तरी यापुढे आपल्याला नक्की असेल.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.