आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : ईशान पांडुरंग घमंडे
===
टीप: ‘आयपीएल फिक्सच असते’ आणि ‘भाजप नेहमीच पैशांच्या जोरावर राजकीय खेळी खेळते’ असं म्हणणाऱ्या स्वघोषित तज्ज्ञांना उद्देशून लिहिलेला एक उपहासात्मक लेख!
हार्दिक या नावाची सध्या फारच चर्चा होतेय. राजकारणात रस असणारी मंडळी हार्दिक पटेलची, क्रिकेटमध्ये रस असणारी मंडळी हार्दिक पंड्याची आणि या दोन्हीमध्ये रस असणारी मंडळी या दोघांची चर्चा करतायत.
दोघेही गुजराती, दोघांनी आश्चर्याचे धक्के दिलेत, असा साधारण या चर्चेला सूर आहे. हार्दिक पंड्याने आयपीएल जिंकणं आणि हार्दिक पटेलचा भाजप प्रवेश, आता आश्चर्य तर वाटलेलं असणारच ना…
अहो पण मंडळी या सगळ्यामागचा कुटील डाव कुणाला कळलाच नाहीये. कुठला डाव म्हणताय? अहो हार्दिक पटेलने काँग्रेस सोडणं फार फार पूर्वी ठरलं होतं. अगदी आयपीएलचा लिलाव झाला ना त्याच्याही आधी… सगळंच गौडबंगाल आहे हो. तुम्हाला काय वाटतं, मुंबईत इंडियन्स संघाने हार्दिकचा हात का सोडला? मुकेश अंबानी यांनी इतक्या दमदार खेळाडूकडे साफ दुर्लक्ष कसं केलं? अहो कारण स्पष्ट आहे.
हार्दिक पटेलही काँग्रेसचा हात सोडणार होते. हा सगळा खेळ रचणं भाग होतं. गुजरातमधील निवडणुकांसाठी हो… मुंबईत राहत असले, मुंबईत इंडियन्स नावाच्या संघाचे मालक असले, तरी अंबानी मूळचे गुजरातीत नाहीत काय…
हार्दिक पांड्याला मुंबई संघातून काढणं आणि त्याला गुजरातच्या संघातून खेळायला सांगणं हा तर मुकेशभाई आणि नरेंद्रभाईंचा डाव होता. गुजरातचा संघच यंदाची आयपीएल जिंकणार हेदेखील आधीपासूनच ठरलेलं होतं. मुकेशभाईंना मोदी साहेब आणि शहांकडून सक्त ताकीद मिळाली होती तशी. म्हणूनच तर मुंबई इंडियन्सने यंदा पैशांची पॉवर दाखवली नाही. उलट सुरुवातीचे सलग आठ सामने हारून हेच सिद्ध केलं की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.
यात काहीही होऊ शकतं. म्हूणनच तुमच्यासारख्या भोळ्या-भाबड्या क्रिकेट चाहत्यांना गुजरातने आयपीएल जिंकल्यावर आश्चर्य वाटलं नाही. पण मंडळी हे लक्षात घ्या की हा एक कुटील डाव होता. हार्दिक पंड्याने मुंबई सोडायची, गुजरातचा कर्णधार व्हायचं, गुजरातच्या संघाला आयपीएलमध्ये विजयी करायचं.
“हर जगह बस गुजरात ही गुजरात छा जाना चाहिए”, असं अमित शहांचे सुपुत्र जय शहा यांनी हार्दिक पंड्याला सांगितलेलं मी प्रत्यक्ष माझ्या कानांनी ऐकलंय. (आता कसं ते नका विचारू, तुम्हाला कसं आयपीएल पूर्णपणे फिक्स असते हे माहीत असतं, तसंच मीही ऐकलंय हे…)
आयपीएल गुजरात टायटन्सने जिंकली आणि गुजरातचं नाव अख्ख्या देशात चर्चेत आलं रे आलं की हार्दिक पटेल यांनी हात वर करायचे. भाजपच्या गोटात सामील व्हायचं. गुजरात आयपीएल जिंकणार म्हणजे पैशांची आवक सुरु होणार. हार्दिक पटेल यांनी भाजप प्रवेश केला म्हणजे माणसांची आणि मतांची आवक होणार.
एवढा मोठा डाव रचला होता. आता हा असा डाव रचण्यात देशाचे पंतप्रधान नसतील का? गुजरात त्यांचं माहेरघर आहे. (मागची काही वर्षं सातत्याने जगभरात फिरत असतील तरी!) बरं हेदेखील जाऊ द्या, आयपीएलमध्ये टॉप ४ मध्ये स्थान मिळवणारे पहिले दोन संघ कोणते होते आठवा. गुजरात आणि लखनौ. म्हणजे नरेंद्र मोदी आणि योगी यांचा थेट संबंध! त्यात लखनौचा प्रशिक्षक कोण? तो गौतम गंभीर, म्हणजे भाजपचाच माणूस… असा मोठ्ठा खेळ होता.
–
भारतीय संघाच्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची गोष्ट!
CSK विरुद्ध गोलंदाजी करताना ऋषी धवनने ‘फेस शील्ड’ का घातले होते?
–
अहो भाजपने सगळंच ठरवलं होतं. आधी अख्खी आयपीएल सेट केली, हार्दिक पंड्याने गुजरातला जिंकवून दिलं. त्यानंतर हार्दिक पटेलने काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला. इथे भाजपने गुजरातच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत विजय मिळवला. यासाठी त्यांचं ‘हार्दिक’ अभिनंदन!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.